Friday, October 14, 2022

 नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीस नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. सन 2022 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छूक व पात्र अर्जदारांनी www.awards.gov.in या संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचनानुसार 31 ऑक्टोंबर 2022 पर्यत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेतअसे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

0000

 जिल्ह्यातील नदीपात्रातून अवैधरित्या

रेती उत्खनन करण्यास प्रतिबंध  

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, लेंडी या नदी पात्राच्या दोन्ही बाजुस मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांमार्फत नदीपात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन व तीच रेती अवैध वाहतुकीद्वारे उपलब्ध होत असल्याचे आढळून येत आहे. परप्रांतीयांच्या माध्यमातून नदी पात्रातून तराफे, बोट इत्यांदीच्या सहाय्याने अवैध रेती उत्खनन, साठवणूक व वाहतूक करू नये. यासाठी सदर ठिकाणी 15 ऑक्टोंबर ते 14 डिसेंबर 2022 पर्यंत ट्रॅक्टर मालक, त्यांचे नोकर, ट्रक्टर चालकांना याठिकाणी रेती उत्खनन करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे.

 

रेतीची वाहतूक, उपसा करण्यास प्रतिबंध करण्यास तसेच नांदेड जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, लेंडी या नदी पात्राच्या दोन्ही बाजुस मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करून ट्रक, टिपर, हायवा, ट्रॅक्टर मालक व त्यांचे नोकर, चालकांनी रेती उत्खनन करू नये. त्याचप्रमाणे नदी लगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी, इतरांनी अवैधरित्या रेतीचा साठा करू नये अथवा करू देऊ नये, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.  

000000

 हरभरा बियाणेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

नांदेड (जिमाका) दि. 14 :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन 2022-23 अंतर्गत रब्बी हंगामामध्ये हरभरा या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण (दहा वर्षा आतील वाण ) या घटकाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बीज निगम लि. कृषक भारती को ऑप या बियाणे वितरण संस्थेमार्फत‍ राबविण्यात येत आहे. या अनुदानावरील बियाण्याचा लाभ घेण्यासाठी 21 ऑक्टोबर 2022 महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून कृषी सहाय्यक मार्फत परमिट देण्यात येत आहे. प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे, महामंडळ राष्ट्रीय बीज निगम व कृषक भारती को.ऑप यांच्या वितरकांकडे परमिट देऊन अनुदान वगळता उर्वरित रक्कम देऊन हरभरा बियाणे खरेदी करावे.

 

या बियाणास 25 रूपये प्रती किलो अनुदान देण्यात येते.तसेच हरभरा ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत प्रती शेतकरी एक एकर मर्यादेत अनुदानावर बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे.यामध्ये 10 वर्षाआतील वाणास (राज विजय -202.फुले विक्रम.फुले विक्रांत, एकेजी -1109 पिडीकेव्ही कांचन बीजी -3062 पुसा पार्वती, बीजीएम-10216 पुसा ) रुपये 25 प्रती किलो व 10 वर्षावरील वाणास (जॉफी -9218 विशाल, दिग्विजय विजय, विराट) रूपये 20 प्रती किलो अनुदान वगळता उर्वरित रक्कम महाबीज वितरकाकडे देऊन खरेदी करावे. जिल्ह्यात कृषी विभागामार्फत हरभरा प्रमाणित बियाणे अंतर्गत 3202 क्विंटल बियाणे व हरभरा ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत 11919 क्विंटल बियाणे वाटप करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

 राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

नांदेड (जिमाका) दि. 14 :- महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शोर्य अशा विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

 

या पुरस्कारासाठी सोमवार 31 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत युनिफाइड नॅशनल  अर्वाडस  पोर्टल http://awardsgovin या संकेतस्थळावर इच्छुकांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 किनवट येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना 2022-23 अंतर्गत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प किनवट येथे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनासाठी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन शासकीय आश्रमशाळा येथे दिनांक 15 ते 17 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आले आहे.

 

यापूर्वी सारखणी, दुधड, बोधडी व उमरी या केंद्रावरील यशस्वी झालेले 1 हजार 7 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये  14,17 व 19 वर्ष या वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेमध्ये खो-खो, व्हॉलीबॉल, बॅटन रिले, व वैयक्तीक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्मराम धाबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 धर्माबाद, बिलोली, माहूर, लोहा, भोकर, हिमायतनगर

तालुक्यातील गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित

·   लम्पी आजाराबाबत जिल्हा प्रशासन दक्ष

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. धर्माबाद तालुक्यातील करखेली, चिंचोली बिलोली तालुक्यातील आरळी, बावलगाव तसेच माहूर तालुक्यातील पापलवाडी लोहा तालुक्यातील कलंबर भोकर तालुक्यातील नांदा, पाळज, रायखोड हिमायतनगर तालुक्यातील करंजी या गावात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्याने ही गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

 

प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील चोंडी, कारेगाव बिलोली तालुक्यातील हुनगुंदा, कांगठी, भोसी तसेच लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथील पशुधनामध्ये लम्पी स्किन डिसीजची लागण झाल्याचा रोग निदान अहवाल सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध पुणे यांच्याकडून प्राप्त झाला आहे. धर्माबाद तालुक्यातील करखेली, चिंचोली व बिलोली तालुक्यातील आरळी व बावलगाव व माहुर तालुक्यातील पापलवाडी लोहा तालुक्यातील़ कलंबर, भोकर तालुक्यातील नांदा, पाळज, रायखोड हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील पशुधनामध्ये लम्पी स्किन डीसीजची लक्षणे आढळून आली आहेत.

 

भारत सरकारचा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग तसेच पशुसंवर्धन आयुक्त पुणे यांनी रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.  याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. लम्पी स्किन रोग प्रादुर्भावग्रस्त व बाधीत झालेली धर्माबाद तालुक्यातील करखेली, चिंचोली व बिलोली तालुक्यातील आरळी व बावलगाव व माहुर तालुक्यातील पापलवाडी लोहा तालुक्यातील़ कलंबर, भोकर तालुक्यातीलनांदा, पाळज, रायखोड हिमायतनगर तालुक्यातील करंजी ही गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून 5 कि.मी. त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या परिसरातील गावांमध्ये बाधीत जनावरे वगळता इतर जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. साथीच्या काळात बाधीत भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत आहे. बाधीत गावामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चराई करिता पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये गाई व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधीत व अबाधीत जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगानेग्रस्त पशुधनाचा मृत्यु झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावीअसे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

बाधीत परिसरामध्ये स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणीरोग प्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माश्या, गोचीड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणीलम्पी स्किन रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांचेमार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे. तसेच बाधीत पशुधनाची काळजी घ्यावी असे सांगितले आहे.  कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांचेविरुध्द नियमानुसार गुन्हा दाखल करणे. तसेच कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्व खाजगी पदविकाधारकांनी / पशुपालकांनी लम्पी स्किन रोगांची माहिती शासकीय पशुवैद्यकीय संस्थेस देणे बंधनकारक आहे. लम्पी स्किन रोगाचा उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात यावा. खाजगी पदविकाधारकांनी लम्पी स्किन रोगांचा परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नांदेड जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांनी लम्पी स्किन रोगांच्या उपचारासाठी आवश्यक सर्व औषधी वरिष्ठांशी चर्चा करुन उपलब्ध करुन घ्याव्यात, असेही आदेशात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे

0000

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळावा संपन्न

रोजगार मेळाव्यात 1 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

नांदेड (जिमाका) दि. 14 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात 14 आस्थापनांमधील एकूण 2 हजार 340 रिक्त पदांसाठी भरती घेण्यात आली. त्यामध्ये एकुण 1 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

या रोजगार मेळाव्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राजेश गणवीर, औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य सुभाष परघणे, सहा.प्रशिक्षणार्थी सल्लागार पी.के.अन्नपूर्णे, राष्ट्रीय सेवा योजन अधिकारी मोहन कलंबरकर, निरेक्षक संचालक सचिन शहा, कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार निवृत्ती सामाळे, गटनिर्देशक, निर्देशक यांची उपस्थिती होती.

सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या

00000




  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...