Thursday, March 21, 2024

वृत्त क्र. 264

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी-व्हिजिल ॲपवर तक्रार करा

 

·       पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद

·       भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप

 

नांदेड, दि. २१ : नांदेड लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन कोणाकडून होत असेल तर सामान्य जनता प्रशासनाचे कान व डोळे होऊ शकते. अशा पद्धतीचे उल्लंघन झाल्याबाबतची तक्रार करण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाने करून दिली असून त्यासाठी सी-व्हिजिल ॲपवर आपली तक्रार घरबसल्या नोंदल्या जावू शकते. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. हे ॲप कुठल्याही लोकसभा मतदारसंघासाठी वापरता येऊ शकते.

 

 आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

 

 हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

 

वैशिष्ट्य

सीव्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

 

वापर कसा करायचा

एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे. त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

 

अचूक कृती व देखरेख

या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

 

लाईव्ह फोटो, व्हिडिओ

या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

 

तातडीने होते कारवाई

या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

 

डाटा सुरक्षा

या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

000000




 वृत्त क्र. 263

राजकीय पक्षांनी निवडणूक खर्चाच्या दरांबाबत

शुक्रवारी सायंकाळपर्यंत हरकती सादर कराव्यात : जिल्हाधिकारी

 

खर्च, प्रचार, जाहिरात, पेड न्यूज व सोशल मीडिया संदर्भात बैठक

 

नांदेड, दि. 21 : निवडणूक काळामध्ये पेंडॉल पासून लाऊड स्पीकरपर्यंत, बॅनरपासून पोस्टर पर्यंत तर जेवणापासून चहा -नाश्ता पर्यंत प्रत्येक वस्तूचे दर प्रशासन व राजकीय पक्षांनी मिळून अंतिम करायचे आहेत. गुरुवारी यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी चार वाजता झाली. उदया शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्रारूप दर तक्त्याला अंतिम करण्यात येईल. त्यामुळे या संदर्भातील अभिप्राय उदयापर्यंत नोंदविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे दिले.

 

अठराव्या लोकसभेसाठी 95 लाख रुपये निवडणूक खर्चाची उमेदवाराला मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. सतराव्या लोकसभेमध्ये 70 लाख असणारी ही मर्यादा आता वाढून 95 लाख झाली आहे. मात्र तरीही प्रत्येक गोष्टीचे दर ठरवताना गेल्या पाच वर्षातील महागाई व वाढलेल्या किमती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दरसूची तयार केली आहे. महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी डॉ. जनार्दन पक्वाने यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या दर तक्त्याचे आज सादरीकरण झाले.

 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर ,निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने,रोहयो उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, निवडणूक खर्च कक्षाचे अन्य अधिकारी व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

या बैठकीमध्ये प्रचारादरम्यान लागणारा खर्च, त्याचा ताळमेळ, खर्चाचे सादरीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षामार्फत जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी जाहिरात, पेड न्यूज, समाज माध्यमांवरील प्रचार व त्यासाठी लागणारा खर्च याबाबतची माहिती दिली.

 

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात निवडणूक खर्च सह नियंत्रण कक्षाच्या विविध वस्तू, प्रचार साहित्य, वृत्तपत्राच्या जाहिराती व निवडणूक काळात आवश्यक असणाऱ्या सर्व खर्चांवर चर्चा केली. यासंदर्भातील एक प्रारूप दर तक्ता सर्व राजकीय पक्षांना देण्यात आला. असून पुढील २४ तासात यासंदर्भात कुठले आक्षेप व सूचना असल्यास नोडल ऑफिसर डॉट एक्सपेंडिचर डॉट नांदेड जीमेल डॉट कॉम (nodalofficer.expenditure.nanded@gmail.com ) या मेलवर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000





 वृत्त क्र. 262 

नांदेडसह परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

कोणतेही नुकसान नाही ; सर्तक राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    

नांदेड, दि. 21 :- नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आज 21 मार्च 2024 रोजी सकाळी 6.8, 6.19 व 6.24 मिनिटांनी तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावरून जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रास प्राप्त झाली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केलवर अनुक्रमे 4.5, 3.6 व 2.6 अशी नोंदविण्यात आलेली आहे.

 

सकाळी 6.8 मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब गावात, सकाळी 6.19 मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा तर सकाळी 6.24 मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदूऔंढानागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे. हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, यवतमाळ या जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे.

 

नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

नागरिकांनी अशी घ्यावी काळजी 

 

भूकंपापूर्वी

तुमच घर भुकंपाला तोंड देऊ शकेल असे होण्‍यासाठी बांधकाम अभियंत्‍याचा सल्‍ला घ्‍या. भूकंपप्रवणता माहिती करून घ्‍या आणि त्‍यानुसार घरात आवश्‍यक ते बदल करून घ्‍या. तुमच्‍या घराची आरेखने,नकाशे भविष्‍यातल्‍या उपयोजनासाठी जपून ठेवा. भिंतीवरच्‍या तसेच छतावरच्‍या प्‍लास्‍टरला खोल तडे असल्‍यास ते दुरूस्‍त करून घ्‍या. कपाटं,फडताळ भिंतीला सुरक्षि‍तपणे बांधून ठेवा, जड वस्‍तू फडताळात खालच्या कप्‍प्‍यांमध्‍ये ठेवा. विजेच्‍या तसेच गॅसच्‍या वस्‍तुंना भक्‍कम आधार द्या. सुरक्षितता तसेच जीव वाचवण्‍याच्‍यादृष्‍टीने आपत्‍कालीन वस्‍तु संच तयार ठेवा. कुटुंबासाठी आपत्‍कालीन दळणवळण आणि आपत्‍तीप्रसंगी/संकटसमयी बाहेर जाण्‍याचाआरखडा तयार करा. ड्रॉपकव्‍हर होल्‍डचं म्‍हणजे खाली पडा, संरक्षित व्हा, पकडा हे तंत्र शिकून घ्‍या. शक्‍य तो बांधकामासाठी पुराच्‍या ठिकाणचा नदी वा किना-यालगतचा भाग तसंच भराव टाकून विकसित केलेला भाग टाळा. भूकंपात असलेल्‍या धोक्‍याबद्दल स्‍वत:ला तसंच कुटुंबातल्‍या सर्वांना माहिती द्या.

 

भूकंपाच्‍या वेळी 

शांत राहा, घाबरून जाऊ नका, चार भिंतीच्‍या आत वा मोकळया जागी असाल तर तिथेच थांबा. काडेपेटी,मेनबत्‍या किंवा कोणत्‍याही प्रकारची ज्‍योत वापरू नका. नादुरूस्‍त किंवा भंग पावलेली गॅस पाइपलाइन आणि आग एकत्र येणं योग्‍य नाही.मोटारीमध्‍ये असाल तर गाडी तिथेच थांबवून भूकंप थांबेपर्यंत गाडीतच थांबा.टेबलखाली झोपा, एका हाताने तोंड झाका आणि भूकंपाची कंपनं थांबेपर्यंत टेबल धरून ठेवा. खिडक्या तसेच आरशांपासून लांब थांबा. जमीन हादरत असताना इमारत सोडून जाऊ  नका. कंपन थांबल्‍या थांबल्‍या बाहेर पडा, लिफ्टचा वापर करू नका. खुल्‍या जागी असाल तर इमारती, झाडं, भिंती,विजेचे खांब,विजेच्‍या तारा यापासून लांब राहा. एखाद्या वाहनात असाल तर मोकळ्या जागी या आणि पुलावर थांबू नका. भूकंपरोधक बांधकाम असलेल्‍या सुरक्षित इमारतीत असाल, तर जमीन हादरणे थांबेपर्यंत इमारतीतच थांबा. एखाद्या कोपऱ्यांचा आधार घऊन, एखाद्या भक्‍कम टेबलाखाली, पलंगाखाली लपून किंवा खिडक्‍यातसंच आरशापासून लांब अशा एखाद्या आतल्‍या भिंतीचा वापर करून स्‍वत:ला वाचवा. इमारतीतून बाहेर जायच्‍या दाराच्‍या जवळ असाल तर लवकरात लवकर बाहेर पडा. एखाद्या जुन्‍या कमकुवत वास्‍तुत असाल तर बाहेर पडायचा सुरक्षित मार्ग लवकरात लवकर पकडा.

 

भूकंपानंतर

मोडकळलेल्‍या इमारतीत प्रवेश करू नका. राडारोड्यात अडकलात तर. काडेपेटीची काडी पेटवू नका. तोंड कापडाच्‍या तुकड्याने झाकून घ्‍या. एखाद्या पिंप किंवा भिंतीवर हात आपटा. शिट्टी वाजवा. शेवटचा उपाय म्‍हणूनच फक्‍त ओरडा, त्‍यानं अंगात जीव राहील आणि ऊर्जा कमी खर्च होईल. सरकते जिने किंवा लिफ्टचा वापर न करता जिने वापरा. काळजीपुर्वक चाला, तुमच्‍या भोवतीच्‍या डोक्यावरच्‍या धोकादायक,अस्थिर वस्‍तूंचा अंदाज घ्‍या. तुम्‍ही जखम होणार नाही याची काळजी घ्‍या. मोठ्या भूकंपानंतर अनेक छोटे धक्‍के बसतात, याची जाणीव ठेवा. समुद्रकिना-यापासून लांब राहा, जमीन हादरणं थांबलं की, काही वेळ त्‍सूनामी येऊ शकते. अफवांवर विश्‍वास ठेवू नका, त्‍या पसरवू नका. तुम्‍हाला घर सोडायचच असेल तर तु्म्‍ही नेमकं कुठे जाताय, या विषयीचा संदेश सोडून जा. उध्वस्त क्षेत्रात गाडी घेऊन जाऊ नका कारण मदत पुनर्वसन कामासाठी रस्‍त्‍यावरची वाहतूक खोळंबू शकते. पूल किंवा उड्डाणपूल वापरू नका कारण त्‍यांचीमोडतोड झालेली असू शकते. याबाबत सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असेही आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 261 

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी

दुय्यम निबंधक कार्यालय सुरु राहणार

 

नांदेड दि.21:- वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते 1 एप्रिलपासून बदलणार आहेत. मार्च महिन्यात दस्तऐवज नोंदणीसाठी होणारी गर्दी व तसेच आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने तसेच महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना या संबंधीचे कामकाज व दस्त नोंदणीसाठी आलेल्या सुट्टया लक्षात घेता जनतेच्या सोयीच्या दृष्टीने दस्त नोंदणीसाठी सर्व दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक कार्यालये 23  24 मार्च आणि 29 ते 31 मार्च रोजी सुरु राहणार आहेत. संबंधीतांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा प्रशासकीय अधिकारी एस. डी. कल्याणकर यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 260

नांदेड व परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड दि. २१ : नांदेड शहर व तसेच अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यातून आज दिनांक २१ मार्चला सकाळी 06:09 व 06:19 मिनिटांनी  दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अधिकृतरित्या  दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल वर अनुक्रमे 4.5 व 3.6 अशी नोंदविण्यात आलेली आहे.

 भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे.

 नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...