Thursday, March 21, 2024

 वृत्त क्र. 262 

नांदेडसह परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

कोणतेही नुकसान नाही ; सर्तक राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    

नांदेड, दि. 21 :- नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आज 21 मार्च 2024 रोजी सकाळी 6.8, 6.19 व 6.24 मिनिटांनी तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावरून जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रास प्राप्त झाली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केलवर अनुक्रमे 4.5, 3.6 व 2.6 अशी नोंदविण्यात आलेली आहे.

 

सकाळी 6.8 मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब गावात, सकाळी 6.19 मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा तर सकाळी 6.24 मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदूऔंढानागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे. हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, यवतमाळ या जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे.

 

नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

नागरिकांनी अशी घ्यावी काळजी 

 

भूकंपापूर्वी

तुमच घर भुकंपाला तोंड देऊ शकेल असे होण्‍यासाठी बांधकाम अभियंत्‍याचा सल्‍ला घ्‍या. भूकंपप्रवणता माहिती करून घ्‍या आणि त्‍यानुसार घरात आवश्‍यक ते बदल करून घ्‍या. तुमच्‍या घराची आरेखने,नकाशे भविष्‍यातल्‍या उपयोजनासाठी जपून ठेवा. भिंतीवरच्‍या तसेच छतावरच्‍या प्‍लास्‍टरला खोल तडे असल्‍यास ते दुरूस्‍त करून घ्‍या. कपाटं,फडताळ भिंतीला सुरक्षि‍तपणे बांधून ठेवा, जड वस्‍तू फडताळात खालच्या कप्‍प्‍यांमध्‍ये ठेवा. विजेच्‍या तसेच गॅसच्‍या वस्‍तुंना भक्‍कम आधार द्या. सुरक्षितता तसेच जीव वाचवण्‍याच्‍यादृष्‍टीने आपत्‍कालीन वस्‍तु संच तयार ठेवा. कुटुंबासाठी आपत्‍कालीन दळणवळण आणि आपत्‍तीप्रसंगी/संकटसमयी बाहेर जाण्‍याचाआरखडा तयार करा. ड्रॉपकव्‍हर होल्‍डचं म्‍हणजे खाली पडा, संरक्षित व्हा, पकडा हे तंत्र शिकून घ्‍या. शक्‍य तो बांधकामासाठी पुराच्‍या ठिकाणचा नदी वा किना-यालगतचा भाग तसंच भराव टाकून विकसित केलेला भाग टाळा. भूकंपात असलेल्‍या धोक्‍याबद्दल स्‍वत:ला तसंच कुटुंबातल्‍या सर्वांना माहिती द्या.

 

भूकंपाच्‍या वेळी 

शांत राहा, घाबरून जाऊ नका, चार भिंतीच्‍या आत वा मोकळया जागी असाल तर तिथेच थांबा. काडेपेटी,मेनबत्‍या किंवा कोणत्‍याही प्रकारची ज्‍योत वापरू नका. नादुरूस्‍त किंवा भंग पावलेली गॅस पाइपलाइन आणि आग एकत्र येणं योग्‍य नाही.मोटारीमध्‍ये असाल तर गाडी तिथेच थांबवून भूकंप थांबेपर्यंत गाडीतच थांबा.टेबलखाली झोपा, एका हाताने तोंड झाका आणि भूकंपाची कंपनं थांबेपर्यंत टेबल धरून ठेवा. खिडक्या तसेच आरशांपासून लांब थांबा. जमीन हादरत असताना इमारत सोडून जाऊ  नका. कंपन थांबल्‍या थांबल्‍या बाहेर पडा, लिफ्टचा वापर करू नका. खुल्‍या जागी असाल तर इमारती, झाडं, भिंती,विजेचे खांब,विजेच्‍या तारा यापासून लांब राहा. एखाद्या वाहनात असाल तर मोकळ्या जागी या आणि पुलावर थांबू नका. भूकंपरोधक बांधकाम असलेल्‍या सुरक्षित इमारतीत असाल, तर जमीन हादरणे थांबेपर्यंत इमारतीतच थांबा. एखाद्या कोपऱ्यांचा आधार घऊन, एखाद्या भक्‍कम टेबलाखाली, पलंगाखाली लपून किंवा खिडक्‍यातसंच आरशापासून लांब अशा एखाद्या आतल्‍या भिंतीचा वापर करून स्‍वत:ला वाचवा. इमारतीतून बाहेर जायच्‍या दाराच्‍या जवळ असाल तर लवकरात लवकर बाहेर पडा. एखाद्या जुन्‍या कमकुवत वास्‍तुत असाल तर बाहेर पडायचा सुरक्षित मार्ग लवकरात लवकर पकडा.

 

भूकंपानंतर

मोडकळलेल्‍या इमारतीत प्रवेश करू नका. राडारोड्यात अडकलात तर. काडेपेटीची काडी पेटवू नका. तोंड कापडाच्‍या तुकड्याने झाकून घ्‍या. एखाद्या पिंप किंवा भिंतीवर हात आपटा. शिट्टी वाजवा. शेवटचा उपाय म्‍हणूनच फक्‍त ओरडा, त्‍यानं अंगात जीव राहील आणि ऊर्जा कमी खर्च होईल. सरकते जिने किंवा लिफ्टचा वापर न करता जिने वापरा. काळजीपुर्वक चाला, तुमच्‍या भोवतीच्‍या डोक्यावरच्‍या धोकादायक,अस्थिर वस्‍तूंचा अंदाज घ्‍या. तुम्‍ही जखम होणार नाही याची काळजी घ्‍या. मोठ्या भूकंपानंतर अनेक छोटे धक्‍के बसतात, याची जाणीव ठेवा. समुद्रकिना-यापासून लांब राहा, जमीन हादरणं थांबलं की, काही वेळ त्‍सूनामी येऊ शकते. अफवांवर विश्‍वास ठेवू नका, त्‍या पसरवू नका. तुम्‍हाला घर सोडायचच असेल तर तु्म्‍ही नेमकं कुठे जाताय, या विषयीचा संदेश सोडून जा. उध्वस्त क्षेत्रात गाडी घेऊन जाऊ नका कारण मदत पुनर्वसन कामासाठी रस्‍त्‍यावरची वाहतूक खोळंबू शकते. पूल किंवा उड्डाणपूल वापरू नका कारण त्‍यांचीमोडतोड झालेली असू शकते. याबाबत सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असेही आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...