Thursday, March 21, 2024

 वृत्त क्र. 263

राजकीय पक्षांनी निवडणूक खर्चाच्या दरांबाबत

शुक्रवारी सायंकाळपर्यंत हरकती सादर कराव्यात : जिल्हाधिकारी

 

खर्च, प्रचार, जाहिरात, पेड न्यूज व सोशल मीडिया संदर्भात बैठक

 

नांदेड, दि. 21 : निवडणूक काळामध्ये पेंडॉल पासून लाऊड स्पीकरपर्यंत, बॅनरपासून पोस्टर पर्यंत तर जेवणापासून चहा -नाश्ता पर्यंत प्रत्येक वस्तूचे दर प्रशासन व राजकीय पक्षांनी मिळून अंतिम करायचे आहेत. गुरुवारी यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी चार वाजता झाली. उदया शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्रारूप दर तक्त्याला अंतिम करण्यात येईल. त्यामुळे या संदर्भातील अभिप्राय उदयापर्यंत नोंदविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे दिले.

 

अठराव्या लोकसभेसाठी 95 लाख रुपये निवडणूक खर्चाची उमेदवाराला मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. सतराव्या लोकसभेमध्ये 70 लाख असणारी ही मर्यादा आता वाढून 95 लाख झाली आहे. मात्र तरीही प्रत्येक गोष्टीचे दर ठरवताना गेल्या पाच वर्षातील महागाई व वाढलेल्या किमती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दरसूची तयार केली आहे. महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी डॉ. जनार्दन पक्वाने यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या दर तक्त्याचे आज सादरीकरण झाले.

 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर ,निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने,रोहयो उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, निवडणूक खर्च कक्षाचे अन्य अधिकारी व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

या बैठकीमध्ये प्रचारादरम्यान लागणारा खर्च, त्याचा ताळमेळ, खर्चाचे सादरीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षामार्फत जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी जाहिरात, पेड न्यूज, समाज माध्यमांवरील प्रचार व त्यासाठी लागणारा खर्च याबाबतची माहिती दिली.

 

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात निवडणूक खर्च सह नियंत्रण कक्षाच्या विविध वस्तू, प्रचार साहित्य, वृत्तपत्राच्या जाहिराती व निवडणूक काळात आवश्यक असणाऱ्या सर्व खर्चांवर चर्चा केली. यासंदर्भातील एक प्रारूप दर तक्ता सर्व राजकीय पक्षांना देण्यात आला. असून पुढील २४ तासात यासंदर्भात कुठले आक्षेप व सूचना असल्यास नोडल ऑफिसर डॉट एक्सपेंडिचर डॉट नांदेड जीमेल डॉट कॉम (nodalofficer.expenditure.nanded@gmail.com ) या मेलवर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000





No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...