5 मार्चला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन
नांदेड दि. 1 :- जिल्हयातील उद्योजकांसाठी व उद्योग क्षेत्रात गुंतवणूकीला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन 5 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वा. हॉटेल मिडलॅड येथे करण्यात आले आहे. या परिषदेला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, औद्योगिक समुह, सनदी लेखापाल, उद्योग व्यवसायाशी संबंधित शासकीय विभाग यांनी या परिषदेस उपस्थित राहावे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी कळविले आहे.
या गुंतवणूक परिषदेतंर्गत जिल्हयातील प्रमुख उद्योग क्षेत्र असलेल्या कृषी क्षेत्रातील उद्योगांमध्ये तसेच इतर उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या उद्योगांना गुंतवणूकीच्या संधीबाबत चर्चा करण्यात येईल. तसेच याअंतर्गत एक खिडकी योजना प्रस्तावित असून सेवा, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक प्रकल्प इ. पायाभूत सुविधा देण्याबाबत तसेच गुंतवणूकदारांना उद्योगांसाठी लागणारे विविध परवाने, अनुदान इ. अनुषंगिक बाबी उद्योगास प्राधान्याने दिल्या जातील.
या परिषदेचा उद्देश पुढीलप्रमाणे आहे.
जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्हयांना विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्हयाच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. ही परिषद 5 मार्च रोजी हॉटेल मिडलॅड हॉटेल, स्टेशन रोड, नांदेड येथे घेण्यात येत आहे.
जिल्ह्यातील होतकरु व उत्सुक उद्योजक संघटना, औद्योगिक समुहातील उद्योग घटक व इतर उद्योग व्यवसायाशी संबंधीत सर्व संस्थांनी उद्योग क्षेत्रात गुंतवणूकीसाठी येणाऱ्या अडचणी व संधी इ. बाबींच्या माहिती व चर्चेसाठी जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, पहिला मजला, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.
0000