Thursday, December 22, 2016

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत
दिवसभराच्या खेळात नांदेडची सरशी
नांदेड दि. 22 :-  औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला आज प्रारंभ झाला. या स्पर्धेत आज पहिल्या फेरीतील विविध क्रीडा प्रकारांच्या सामन्यात नांदेड जिल्ह्याने आघाडी घेतल्याचे संयोजन समितीच्यावतीने सांगण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यातच नांदेडने पथसंचलनात प्रथम क्रमांक पटकाविला. तर औरंगाबादच्या संघाने द्वितीय आणि हिंगोलीने तृतीय क्रमांक पटकाविला.
दिवसभरात झालेल्या विविध क्रीडा प्रकारात थ्रोबॉल महिला गट, बुद्धीबळ महिला गट, बॅडमिंटन पुरुष एकेरी व बॅडमिंटन पुरुष दुहेरी प्रकारात नांदेडने आघाडी ठेवली आहे. क्रीडा प्रकारनिहाय आजच्या सामन्यांची माहिती पुढील प्रमाणे. क्रिकेटमध्ये लातूर विरुद्ध उस्मानाबाद, परभणी वि. हिंगोली, नांदेड वि. बीड, जालना वि. औरंगाबाद असे सामने होवून लातूर, परभणी, बीड व जालना यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला.
फुटबॉलमध्ये बीड वि. नांदेड, लातूर वि. जालना, उस्मानाबाद वि. हिंगोली, असे सामने होवून नांदेड, जालना, हिंगोली यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला. परभणी वि. औरंगाबाद सामना उद्या होणार आहे.
कब्बडीमध्ये नांदेड वि. हिंगोली, बीड वि. जालना, उस्मानाबाद वि. लातूर, औरंगाबाद वि. परभणी असे सामने होवून नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला.
खो-खो उस्मानाबाद वि. जालना, नांदेड वि. परभणी, हिंगोली वि. औरंगाबाद यात जालना, नांदेड, बीड, औरंगाबाद यांचा पुढच्या फेरीत प्रवेश. थ्रोबॉल (महिला) उस्मानाबाद वि. बीड, नांदेड वि. लातूर यातून बीड वि. नांदेड असा सामना होवून नांदेडने विजय मिळवला. तर हिंगोली वि. परभणी, औरंगाबाद वि. जालना असे सामने झाले. यातील विजयी परभणी वि. औरंगाबाद यांचा सामना उद्या होणार आहे.
 बुद्धीबळ पुरुष एकेरी- बीड वि. नांदेड, उस्मानाबाद वि. हिंगोली, जालना वि. लातूर, परभणी वि. औरंगाबाद यांच्या सामने होवून बीड, हिंगोली, लातूर, परभणीच्या बुद्धीबळपटुचा पुढच्या फेरीत प्रवेश. बुद्धीबळ महिला- लातूर वि. हिंगोली व जालना वि. बीड असा सामना होवून हिंगोली व जालना विजयी ठरले. त्यानंतर हिंगोली वि. जालना सामना होवून हिंगोलीच्या खेळाडुंनी विजय संपादन केला. तर नांदेड वि. परभणी, उस्मानाबाद वि. औरंगाबाद यांच्यातील सामन्यातून परभणी व उस्मानाबाद विजय ठरले.
कॅरम एकेरी पुरुष गटात परभणीच्या खेळाडुने प्रथम तर नांदेडच्या खेळाडुने द्वितीय क्रमांक पटकाविला. टेबल टेनीस एकेरी (पुरुष) यामध्ये औरंगाबादने प्रथम तर नांदेडने द्वितीय स्थान पटकावले. टेबल टेनीस दुहेरी पुरुष गटात औरंगाबादने प्रथम तर लातूरने द्वितीय स्थान पटकावले.
बॅडमिंटन एकेरी पुरुष गटात नांदेड प्रथम तर लातूर दुसऱ्या स्थानावर राहिले. तर बॅडमिंटन दुहेरी पुरुष गटात लातूर प्रथम तर नांदेड द्वितीय स्थानावर राहिले. लॉनटेनिस एकेरी पुरुष गटात जालन्याने प्रथम आणि बीडने द्वितीय स्थान पटकाविले.  

0000000
राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष
रविकांत तुपकर यांचा दौरा
नांदेड दि. 22 :- महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) रविकांत तुपकर हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
शुक्रवार 23 डिसेंबर 2016 रोजी शासकीय मोटारीने बुलडाणा येथून दुपारी 12.30 वा. माहूर येथे आगमन. दुपारी 12.30 ते 1.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह माहूर येथे राखीव. दुपारी 1.30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत माहूर येथे रेणुकामाता मंदिरात दर्शनासाठी राखीव. सायंकाळी 7 वा. सोईनुसार शासकीय मोटारीने माहूर येथून उमरखेड मार्गे नांदेडकडे प्रयाण. रात्री 10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.
शनिवार 24 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 10 वा. शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथून धानोरा ता. नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. धानोरा येथे डॉ. प्रकाश पोफळे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती. स्थळ – बळीराजा फार्म धानोरा. दुपारी 1 वा. धानोरा येथून नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.30 ते सायंकाळी 5 यावेळेत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वा. शासकीय मोटारीने नांदेड येथून मालेगाव-औंढा-हिंगोली मार्गे वाशिमकडे प्रयाण करतील.

0000000
संशोधनातील सक्रीय सहभागानेच
देशाचा विकास - कुलगुरू डॅा. विद्यासागर
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेचे उद्घाटन

नांदेड दि. 22 :- तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ग्रीकल्चरल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष पदवी पदविका अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळाचे राज्यभरात आयोजन करण्यात आले असून प्रथम कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडीत विद्यासागर यांच्या हस्ते येथील शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे करण्यात आले. तंत्रशिक्षण संचालनालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी वाय. आय. शहा यावेळी उपस्थित होते.
संपर्ण राज्यातील सात हजार विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात 26 ठिकाणी पुढील 70 दिवस चालणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन झाल्याचे कुलगुरु डॉ. पी. बी.विद्यासागर यांनी जाहीर केले. संशोधनात सक्रिय सहभाग नोंदवून देशाच्या विकासात भर घालणाऱ्या संशोधनावर भर देण्याचे आवाहन यावेळी कुलगुरु यांनी केले. तंत्रशिक्षण संचालनालया तर्फे उपस्थित असलेले श्री. शहा यांनी मेक इन इंडिया उन्नत महाराष्ट्र, अभियान या योजन विद्यार्थ्यांचा समावेश होणार असून डिजिटल इंडियाची जबाबदारी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात संस्थेच प्राचार्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष  पी. डी. पोपळे यांनी विद्यार्थ्यांच्या सार्वांगिण विकासात कार्यशाळेचे महत्व विशद केले. ध्येय साध्य करताना तणाव मुक्त कसे राहता येईल हे समजू शकेल, असे ते म्हणाले. मॅसिआचे उपाध्यक्ष  समीर दुधगांवकर रामेश्वर चिलवंत यांनी कार्यशाळेत मार्गदर्शनकेले.
श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या TEQIP-II निधी अंतर्गत हा कार्यक्रम शासकीय तंत्रनिकेतन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशिक्षण आस्थापना अधिकारी डॉ. एस. व्ही. बी. लेनिना समन्वयक डॉ. रेखा भालेकर उपस्थित होत्या. शासकीय तंत्रनिकेतन तर्फे कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून ए. बी. दमकोंडवार एस. आर. मुधोळकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमास सर्व शाखेचे प्रथमवर्ष पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी उपस्थित होते. सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. डॉ. एस. व्ही. बिट्टेगिरी यांनी सुत्रसंचलन केले. आर. के. देवषी यांनी आभार मानले.

0000000
डीआयईटीतील समूह साधन पदांच्या भरतीबाबत आवाहन
नांदेड, दि. 22 :- जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था नांदेड येथे प्रतिनियुक्तीने समुह साधन व्यक्तीची पदे भरणार आहेत. शिक्षक शिक्षण सक्षमीकरण : डीआयईसीपीडी प्रतिनियुक्ती अर्ज 17 ऑक्टोबरच्या शासन निर्णय क्र. डायट 4516 नुसार प्रशिक्षण व राज्यस्तरीय संलग्न संस्थांची पुनर्रचना आणि सक्षमीकरण करण्यात येत आहे. यासाठी उपक्रमशील तज्ज्ञ, शिक्षकांना कर्मचाऱ्यांना डीआयइसीपीडीमध्ये रिक्त पदे प्रतिनियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हांतर्गत पदे त्याच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांमधून भरले जातील. जसे नांदेडमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना नांदेड डीआयईसीपीडी (डीआयइटी) मध्येच अर्ज करता येईल. ही निवड प्रक्रिया राबविण्यासाठी आपण भरलेल्या माहितीच्या आधारे आपली मुलाखतीसाठी निवड केली जाईल व याबद्दल आपल्या ईमेलद्वारे कळविण्यात येईल. ज्यांची मुलाखतीसाठी निवड केली आहे त्यांनीच उपस्थित रहावे. आपण अर्ज मराठी, इंग्रजी किंवा हिंदी भाषेत भरु शकता. भाषा पुढील दिलेल्या रिक्त पदांच्या उपलब्धेतनुसार विषयासाठी अर्ज करावे. गणित विषयासाठी-एक, विज्ञान- एक, समाजिक शास्त्र- एक, इंग्रजी- एक व  उर्दू-दोन , आयसीटी-दोन. अर्ज भरण्याची अंतिम तारीख शुक्रवार 30 डिसेंबर 2016 आहे. शिक्षक, कर्मचारी संबंधीत विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. संबंधीत शिक्षक संशोधन, प्रशिक्षण व संगणक याबाबतीत अर्हता असल्यास प्राधान्य दिले जाईल. अधिक माहितीसाठी शिक्षक शिक्षण सक्षमीकरण www.tinyurl.com/applydiecpd या लिंकला भेट दयावी, असे आवाहन प्राचार्य जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्था नांदेड  यांनी केले आहे.

00000000
नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीच्या
प्रवेश परिक्षा प्रवेशपत्राबाबत शाळांना आवाहन  
नांदेड, दि. 22 :-   जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे इयत्ता 6 वी वर्गासाठी नांदेड जिल्ह्यातून 41 परिक्षा केंद्रावर रविवार 8 जानेवारी 2017 रोजी सकाळी 10.30 वा. घेण्यात येणाऱ्या प्रवेश परिक्षेचे प्रवेश पत्र जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात या परिक्षेस बसलेल्या संबंधीत विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक यांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्याकडून प्राप्त करुन संबंधीत विद्यार्थी, पालकांना त्वरीत हस्तांतरीत करावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य हरिवरा प्रसाद यांनी सांगितले आहे.

000000
माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शनात सहभागासाठी
पशुपालकांना जनावराच्या नोंदणीचे आवाहन
नांदेड, दि. 22 :-  माळेगाव येथील खंडोबा यात्रेत पशुसंवर्धन विभागाच्यावतीने 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पशुप्रदर्शनात भाग घेण्यासाठी पशुपालकांच्या जनावराची नोंदणी सकाळी 8 ते 11 अशी राहील. याची पशुपालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
मंगळवार 27 डिसेंबर रोजी पशुसंवर्धन विषयक प्रदर्शन स्टॉलचे उद्घाटन. बुधवार 28 डिसेंबर रोजी भव्य पशु प्रदर्शन. शुक्रवार 30 डिसेंबर रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या पशुप्रदर्शनासाठी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना पशुपालकांसाठी देण्यात आल्या आहेत. पशुप्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रत्येक पशुपालकाने जनावरांची नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीची वेळ सकाळी 8 ते 11 अशी राहील. नोंदणी शिवाय रिंगमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. निवड समितीचा निकाल अंतिम राहील. बक्षीस पात्र पशुपालकांना बक्षीसांसोबत प्रशस्तीपत्र दिले जाईल. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीसे दिली जातील. पशुपालकांनी येताना बॅक पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

000000
कृषी, फलोत्पादन राज्यमंत्री खोत यांचा दौरा
नांदेड, दि. 22 :-  राज्याचे कृषी व फलोत्पादन , पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 23 डिसेंबर 2016 रोजी लातूर येथून सकाळी 11.30 वा. नांदेड येथे आगमन व बळीराजा मुक्तेश्वर आश्रमाजवळ वसंतनगर येथे डॉ. पोपळे यांच्याकडे  सदिच्छा भेट व राखीव. दुपारी 12 वा.  सन्मित्रनगर येथे श्री. माने यांच्याकडे सदिच्छा भेट व राखीव. दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. सायंकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून रेल्वे स्टेशन नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.05 वा. देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

000000
क्रीडा स्पर्धेतून खेळांचा उद्देश घेऊन
राष्ट्र सन्मानासाठी कार्यरत रहा - डॅा. दांगट
विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला प्रारंभ
नांदेड, दि. 22 :- खेळ म्हणजे आनंद निर्मितीचा सोहळा असतो. त्यामुळे क्रीडा स्पर्धेतून खेळाचा उद्देश घेऊन राष्ट्र सन्मान वाढविण्यासाठी पुढे कार्यरत रहा , असा संदेश विभागीय आयुक्त डॅा. उमाकांत दांगट यांनी आज येथे दिला. औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्गाटनप्रसंगी डॅा. दांगट अध्यक्षस्थानावरून बोलत होते. येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर या तीन दिवसीय स्पर्धेचे उद्गाटन नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलताई गुंडले यांच्या हस्ते झाले. यावेळी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या खेळाडुंच्या पथकाने शानदार संचलनाने मान्यवरांना मानवंदनाही दिली.
तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत 49 क्रीडा प्रकारात खेळाडू खेळांचे प्रदर्शन करणार आहे. स्पर्धेत नांदेडसह, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील बाराशेहू अधिक खेळाडू अधिकारी-कर्मचारी सहभाग घेणार आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी आमदार सर्वश्री डी. पी. सावंत, प्रताप पाटील-चिखलीकर, नागेश पाटील-अष्टीकर, संयोजन समितीचे अध्यक्ष तथा नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, परभणीचे जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल, लातुरचे जिल्हाधिकारी पांडूरंग पोले, हिंगोलीचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी, विभागीय अप्पर आयुक्त गोविंद बोडखे, नांदेड जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी तसेच स्पर्धेच्या संयोजन समित्यांचे पदाधिकारी - सदस्य अधिकारी-कर्मचारी विविध महसूल कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी-सदस्य आदींची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॅा.दांगट पुढे म्हणाले की, महसूल विभागाकडे नेहमीच कामांची मोठी जंत्री असते. त्यामुळे कामातील शारिरीक आणि मानसिक थकवा घालविण्यासाठी, पुन्हा उत्साह-चैतन्य-आनंद निर्मितीसाठी क्रीडा व सांस्कृतिक प्रकारातील सहभाग आवश्यक ठरतो. खरेतर मानवी जीवनाचे अंतिम ध्येय हे आनंद निर्मिती आहे. खेळ, क्रीडा स्पर्धा म्हणजे आनंद निर्मितीचा सोहळा असतो. खेळाचा उद्देश हा सहभाग वाढविणे हा असतो. सहभाग त्यानंतर सराव आणि मेहनत तुम्हाला यशपर्यंत नेऊन पोहचविते. खेळात जिंकणे हा एक केवळ टप्पा असतो. त्यामुळे क्रीडा स्पर्धेतील सहभागांद्वारे खेळाचे उद्देश घेऊन आपल्या विभागाचा, राष्ट्रीचा सन्मान वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते. यावेळी डॅा. दांगट यांनी विभागीय स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी नांदेड महसूल प्रशासनाने स्वयंस्फुर्तीने स्विकारल्याबद्दल जिल्हाधिकारी सुरेश काकाणी तसेच या संयोजनात सहभागी विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतानात, शुभेच्छाही दिल्या. स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या क्रीडा, पोलीस, महापालिका अशा विविध घटकांचेही त्यांनी आभार मानले.
आमदार सर्वश्री पाटील-चिखलीकर व सावंत यांनीही स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून आलेल्या खेळाडू अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्वागत करतानाच, शुभेच्छाही दिल्या.
स्पर्धा संयोजन समितीच्यावतीने बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी प्रस्ताविकात म्हणाले की, क्रीडा स्पर्धा या निखळ आनंदासाठी असतात. त्यातील जय-पराजयची तमा न बाळगता, पुढे चालण्याची प्रेरणा खेळातून मिळते. खिलाडूवृत्ती विकसित होते. हे वृत्ती नेहमीच्या कामात आणि वैयक्तीक जीवनातही उपयुक्त ठरते. त्यामुळे या स्पर्धेतून मिळणारी खिलाडुवृत्तीची शिदोरी घेऊन, खेळाडूनी पुढे त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात नव्या उर्जेने-उर्मीने कार्यरत व्हावे. स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या विविध घटकांचेही यावेळी त्यांनी आभार मानले.
समारंभाचा प्रारंभ दिपप्रज्वलनाने झाला. त्यानंतर स्पर्धेसाठीच्या क्रीडा ज्योतीचे मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन आणि ध्वजारोहण करण्यात आले. फुगे तसेच शांतीचे प्रतीक असलेल्या कबूतरास हवेत सोडण्यात आले. त्यानंतर आठही जिल्ह्यातून आलेल्या संघाच्या पथकांनी शानदार संचलन करून, मान्यवरांना मानवंदना दिली. या संचलनाचे नेतृत्त्व पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांनी केले. श्रीमती मीना सोलापुरे यांनी सुरेल स्वागतगीत सादर केले. सहायक पुरवठा अधिकारी मुगाजी काकडे यांनी स्पर्धेत सहभागी खेळाडुंना स्पर्धेची प्रतिज्ञा दिली. स्पर्धेच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यातील शानदार संचलनाच्या स्पर्धेत नांदेड जिल्ह्याने प्रथम तर औरंगाबादने दुसरा आणि हिंगोली जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकाविला. यानंतर शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेलाही मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. सुत्रसंचलन व्यंकटेश चौधरी यांनी केले. शेवटी उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध जिल्ह्यातील खेळाडू अधिकारी-कर्मचारी तसेच नांदेडमधील क्रीडाप्रेमी, विद्यार्थीं आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचा समारोप शनिवार 24 डिसेंबर रोजी होणार आहे.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...