क्रीडा स्पर्धेतून खेळांचा
उद्देश घेऊन
राष्ट्र सन्मानासाठी कार्यरत रहा
- डॅा. दांगट
विभागीय महसूल क्रीडा व
सांस्कृतिक स्पर्धेला प्रारंभ
नांदेड, दि. 22 :- खेळ म्हणजे आनंद निर्मितीचा सोहळा
असतो. त्यामुळे क्रीडा स्पर्धेतून खेळाचा उद्देश घेऊन राष्ट्र सन्मान
वाढविण्यासाठी पुढे कार्यरत रहा , असा संदेश विभागीय आयुक्त डॅा. उमाकांत दांगट
यांनी आज येथे दिला. औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या
उद्गाटनप्रसंगी डॅा. दांगट अध्यक्षस्थानावरून बोलत होते. येथील यशवंत
महाविद्यालयाच्या मैदानावर या तीन दिवसीय स्पर्धेचे उद्गाटन नांदेड जिल्हा
परिषदेच्या अध्यक्षा मंगलताई गुंडले यांच्या हस्ते झाले. यावेळी मराठवाड्यातील
आठही जिल्ह्यांच्या खेळाडुंच्या पथकाने शानदार संचलनाने मान्यवरांना मानवंदनाही
दिली.
तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा व
सांस्कृतिक स्पर्धेत 49 क्रीडा प्रकारात खेळाडू खेळांचे प्रदर्शन करणार आहे.
स्पर्धेत नांदेडसह, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली
जिल्ह्यातील बाराशेहू अधिक खेळाडू अधिकारी-कर्मचारी सहभाग घेणार आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटन
समारंभाप्रसंगी आमदार सर्वश्री डी. पी. सावंत, प्रताप पाटील-चिखलीकर, नागेश
पाटील-अष्टीकर, संयोजन समितीचे अध्यक्ष तथा नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी,
परभणीचे जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल, लातुरचे जिल्हाधिकारी पांडूरंग पोले,
हिंगोलीचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी, विभागीय अप्पर आयुक्त गोविंद बोडखे, नांदेड
जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त समीर
उन्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील,
निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी तसेच स्पर्धेच्या संयोजन समित्यांचे
पदाधिकारी - सदस्य अधिकारी-कर्मचारी विविध महसूल कर्मचारी संघटनांचे
पदाधिकारी-सदस्य आदींची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॅा.दांगट पुढे
म्हणाले की, महसूल विभागाकडे नेहमीच कामांची मोठी जंत्री असते. त्यामुळे कामातील
शारिरीक आणि मानसिक थकवा घालविण्यासाठी, पुन्हा उत्साह-चैतन्य-आनंद निर्मितीसाठी
क्रीडा व सांस्कृतिक प्रकारातील सहभाग आवश्यक ठरतो. खरेतर मानवी जीवनाचे अंतिम
ध्येय हे आनंद निर्मिती आहे. खेळ, क्रीडा स्पर्धा म्हणजे आनंद निर्मितीचा सोहळा
असतो. खेळाचा उद्देश हा सहभाग वाढविणे हा असतो. सहभाग त्यानंतर सराव आणि मेहनत तुम्हाला
यशपर्यंत नेऊन पोहचविते. खेळात जिंकणे हा एक केवळ टप्पा असतो. त्यामुळे क्रीडा
स्पर्धेतील सहभागांद्वारे खेळाचे उद्देश घेऊन आपल्या विभागाचा, राष्ट्रीचा सन्मान
वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते. यावेळी डॅा. दांगट यांनी विभागीय
स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी नांदेड महसूल प्रशासनाने स्वयंस्फुर्तीने
स्विकारल्याबद्दल जिल्हाधिकारी सुरेश काकाणी तसेच या संयोजनात सहभागी विविध
अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतानात, शुभेच्छाही दिल्या. स्पर्धेसाठी सहकार्य
करणाऱ्या क्रीडा, पोलीस, महापालिका अशा विविध घटकांचेही त्यांनी आभार मानले.
आमदार सर्वश्री पाटील-चिखलीकर व
सावंत यांनीही स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून आलेल्या खेळाडू
अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्वागत करतानाच, शुभेच्छाही दिल्या.
स्पर्धा संयोजन समितीच्यावतीने
बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी प्रस्ताविकात म्हणाले की, क्रीडा स्पर्धा या
निखळ आनंदासाठी असतात. त्यातील जय-पराजयची तमा न बाळगता, पुढे चालण्याची प्रेरणा
खेळातून मिळते. खिलाडूवृत्ती विकसित होते. हे वृत्ती नेहमीच्या कामात आणि वैयक्तीक
जीवनातही उपयुक्त ठरते. त्यामुळे या स्पर्धेतून मिळणारी खिलाडुवृत्तीची शिदोरी
घेऊन, खेळाडूनी पुढे त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात नव्या उर्जेने-उर्मीने कार्यरत
व्हावे. स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या विविध घटकांचेही यावेळी त्यांनी आभार मानले.
समारंभाचा प्रारंभ
दिपप्रज्वलनाने झाला. त्यानंतर स्पर्धेसाठीच्या क्रीडा ज्योतीचे मान्यवरांच्या
हस्ते प्रज्वलन आणि ध्वजारोहण करण्यात आले. फुगे तसेच शांतीचे प्रतीक असलेल्या
कबूतरास हवेत सोडण्यात आले. त्यानंतर आठही जिल्ह्यातून आलेल्या संघाच्या पथकांनी
शानदार संचलन करून, मान्यवरांना मानवंदना दिली. या संचलनाचे नेतृत्त्व पोलीस
निरीक्षक शिवाजी पाटील यांनी केले. श्रीमती मीना सोलापुरे यांनी सुरेल स्वागतगीत
सादर केले. सहायक पुरवठा अधिकारी मुगाजी काकडे यांनी स्पर्धेत सहभागी खेळाडुंना
स्पर्धेची प्रतिज्ञा दिली. स्पर्धेच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचेही
यावेळी प्रकाशन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यातील शानदार संचलनाच्या स्पर्धेत
नांदेड जिल्ह्याने प्रथम तर औरंगाबादने दुसरा आणि हिंगोली जिल्ह्याने तिसरा
क्रमांक पटकाविला. यानंतर शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेलाही मान्यवरांच्या हस्ते
प्रारंभ करण्यात आला. सुत्रसंचलन व्यंकटेश चौधरी यांनी केले. शेवटी उपजिल्हाधिकारी
बी. एम. कांबळे यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध जिल्ह्यातील खेळाडू
अधिकारी-कर्मचारी तसेच नांदेडमधील क्रीडाप्रेमी, विद्यार्थीं आदी मोठ्या संख्येने
उपस्थित होते. स्पर्धेचा समारोप शनिवार 24 डिसेंबर रोजी होणार आहे.
000000
No comments:
Post a Comment