Monday, October 28, 2024

 वृत्त क्र. 999

अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख 

सकाळी 9.30 वाजेपासून कार्यालय सुरू असतील  

नांदेड दि. 28 ऑक्टोंबर :-  नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 याकालावधीमध्ये अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र अर्ज भरणे व त्यापूर्वीच्या अन्य पूरक प्रक्रियेसाठी उद्या सकाळी 9.30 वा. पासून निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय सुरू असतील. 

जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात आज सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना केली असून इच्छुकांनी धावपाळ टाळण्यासाठी तसेच अर्ज भरण्यासाठी अर्जाची छाननी करण्यासाठी पुरेशा वेळ मिळावा म्हणून सकाळी 9.30 वा. पासून प्रशासन पूरक व्यवस्थेसाठी तयार असेल. तथापि अर्ज स्विकारण्याची वेळ ही सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने ठरविल्याप्रमाणेच असेल. थोडक्यात अर्ज पूर्व तयारी करण्यासाठी यंत्रणा प्रशासनाने उपलब्ध केली आहे. उद्या इच्छुकांनी शेवटचा दिवस असल्यामुळे अर्ज वेळेत दाखल करावेत. कोणत्याही परिस्थिती सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेतच अर्ज दाखल होतील याची नोंद घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

00000

वृत्त क्र. 998

नांदेड दक्षिण व लोहाच्या निवडणूक निरीक्षक

श्रीमती पल्लवी आकृती  यांचे आगमन 

नांदेड दि. 28 ऑक्‍टोबर :- नांदेड दक्षिण व लोहा विधानसभा मतदारसंघासाठी श्रीमती पल्लवी आकृती (भा.प्र.से.) यांची निवडणूक निरीक्षक (सामान्य) जनरल आँब्झर्वर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती नांदेड दक्षिण व लोहा या दोन विधानसभा मतदारसंघासाठी असून त्यांचा संपर्क क्रमांक 8237960955 असा आहे. 

सदरील निरीक्षकांशी मतदारांनी काही अडचण अथवा शंका असल्यास त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हाट्सएपच्याद्वारे संपर्क करु शकतात, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.

०००००

 

वृत्त क्र. 997

मोटार सायकल वाहनांसाठी नवीन मालिका सुरु

नांदेड, दि. २८ :- परिवहन्नेत्तर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एमएच २६-सीआर ही नवीन मालिका २९ ऑक्टोंबर २०२४ पासून सुरु होत आहे.  ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक व ईमेलसह अर्ज २९ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी २.३० पर्यत स्विकारण्यात येणार आहे. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता टेक्स्ट मॅसेज दुरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. तरी सर्वानी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 996

नांदेड दक्षिण मतदारसंघातील नागरिकांसाठी मतदान जनजागृती रांगोळी व चित्रकला स्पर्धा

नांदेड दि. २८ ऑक्टोंबर: आगामी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढावी यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने जनजागृतीसाठी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्विपच्या प्रमुख मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार 31 ऑक्टोबर २०२४ रोजी वजीराबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये नांदेड दक्षिण मतदार संघातील नागरिकांसाठी  सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

मतदान जनजागृती हा या स्पर्धेचा मुख्य विषय आहे. सहभागी स्पर्धकांनी मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत त्याचा मोलाचा वाटा कसा आहे,  हे चित्रकला व रांगोळी मधून दाखवून द्यायचे आहे. स्पर्धकांनी आवश्यक चित्रकला साहित्य आणि रांगोळीचे रंग स्वतः बरोबर आणायचे आहेत. चित्रकलेसाठी A4 आकाराचे ड्रॉइंग शीट लागेल. या स्पर्धेत सर्व वयोगटातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना सहभागाची संधी आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने जनजागृतीच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

०००००

 वृत्त क्र. 995

नृसिंहराव दांडगे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्सेसमध्ये  मतदान जनजागृती 

नांदेड, दि. २८ ऑक्टोंबर:- आस्था एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित नृसिंहराव दांडगे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स , शामनगर , नांदेड येथे मतदान जनजागृतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. 

नांदेड जिल्ह्यात होऊ घातलेल्या विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूकीकरिता सबंध जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रयत्नशील आहेत . याचाच एक भाग म्हणून श्यामनगर येथील नृसिंहराव दांडगे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस येथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थ्यांनी मतदान करण्याची शपथ घेतली . तसेच या परिसरात एक छोटीशी जनजागृतीपर रॅली काढण्यात आली . मी तर मतदान करणारच पण माझ्यासह माझ्या परिवारातील व नातलगातील तसेच आसपासच्या परिसरातील मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करून राष्ट्रीय कर्तव्य बजावणार,  अशी ही शपथ घेण्यात आली.

याप्रसंगी डॉ.अभयकुमार दांडगे, प्राचार्या श्रीमती नीता बेद्रे , शुभांगी शिंदे , कोमल बैलवाड, सौ लामतुरे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

०००००



वृत्त क्र. 994

मतदानासाठी विद्यार्थ्यांनी पालकांना घातले साकडे

विद्यार्थ्यांनी पालकांना लिहले मतदानाचे महत्त्व सांगणारे संकल्पपत्र

नांदेड, दि. २८ ऑक्टोंबर:- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्वीप कक्षाच्या वतीने मतदान जनजागृतीचे विविध उपक्रम घेतले जात आहेत. नांदेड-वाघाळा महानगरपालिका वजीराबाद येथील शाळा क्रमांक 1 मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसाठी मतदान संकल्पपत्र लिहिले आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व समजावून सांगणारे संकल्पपत्र लिहून आपल्या पालकांना दिले. त्यांना मतदान करण्याचे वचन देण्यास प्रवृत्त केले आहे. यामुळे हा उपक्रम प्रभावी ठरला आहे. 

याशिवाय मतदान जनजागृतीसाठी प्रभात फेरी, रॅली यासारखे उपक्रमही घेतले जात आहेत. यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपायुक्त अजितपालसिंग संधू व शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर माहुरे, सर्व शिक्षक व पालकांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

०००००




  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...