Thursday, February 20, 2025

 लातूर जिल्ह्यातील बालसाहित्य

लातूर जिल्ह्यातील बालसाहित्यिकांची ओळख करुन द्यावयाची झाली तर या जिल्ह्यातील बाललेखकांची, कवींची लेखनी सकस आणि समृद्धच आहे. मराठी, कानडी, तेलगू आणि दखनी भाषेचा वावर या जिल्ह्यात आहे. तीन राज्याच्या सीमा असल्याने या परिसरातील बोली भाषेचा गोडवा बालसाहित्य लेखनात उमटलेला दिसतो. दिल्लीच्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त बालासाहित्यावर प्रकाश टाकणारा हा लेख. 

मुलांसाठी अक्षरांचे सेतू बांधणं खूपच कठीण असते. साहित्याच्या प्रांगणात विविध वाङ्मयप्रकार हाताळणाऱ्या लेखकांची संख्या खूप असली तरी बालसाहित्य लेखन करणाऱ्या लेखकांची संख्या खूप कमी आहे. बालकांचे बालविश्व घडविण्यासाठींचे लेखन करणे तितके सोपे नसते. मुलांसाठी अक्षरांचे सेतू बांधणं खूपच कठीण काम असते. लेखक वयाने मोठा असला तरी बालसाहित्य लेखन करतांना बालकांचे बालमन होऊनच पालकांच्या बालमनांशी नाते जोडण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करावा लागतो. तेव्हाच ते लेखन अजरामर टिकून राहते. हसऱ्या, वाढत्या वयात फुलपाखरांसोबत आनंदाने खेळणारी मुले खूपच कल्पक आणि अनुकरण करणारी असतात. पुस्तकांच्या पानांवरचे रंगीत चित्र बालकांच्या मनाला खुणवत असतात. म्हणूनच चित्रांचे जग त्यांना खूप आवडते.

आपल्या अवतीभोवती, घरातील परिसरातील सजीव असो, की निर्जीव ते आपल्या नाजूक पापणीतून न्याहळत असतात. प्रत्येक वस्तूंचे नवल त्याला वाटू लागते आणि कोवळ्या बोटांनी त्या पकडण्याचा आणि तोंडात टाकण्याचा प्रयत्न करत असतात. तर गालातल्या गालात हसतात आकाशातला चंद्र जरी दूर असला तरी त्याच्याकडे पाहत आपलंसं करुन घेतात. आजी आजोबांच्य गोष्टीत रममाण होऊन पुस्तकांची रंगीत पाने चाळत, पानावरील गोष्टीत मिसळून जातात. अशातूनच बालकांच्या बालमनाची जडण-घडण होत जाते. बालवयात झालेले संस्कार हे दीर्घकाळ टिकणारे असतात. राष्ट्रप्रेम, निसर्ग प्रेम, मित्र प्रेम, परोपकार, पशुप्राण्यांवरील प्रेम, विज्ञाननिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता, अशा अनेक मुल्यांची पेरणी याच वयात नीटपणे करता येते. मनोरंजनातून प्रबोधन करत मुलांचे भावविश्व घडविण्याचा आणि फुलवण्याचा प्रयत्न आपल्या लेखनीतून बालसाहित्यिकच करु शकतात. आणि मग ही मुले कथा, कवितेला बोबड्या बोलीतून सूर लावत ठेका धरुन जमेल, तसे नाचू लागतात.

झुक झुक झुक झुक अगीनगाडी | धुरांच्या रेषा हवेत काढी |

पळती झाडे पाहूया | मामाच्या गावाला जावूया || ’’

ही बालकविता असो किंवा चिऊताईच घरटं,चांदोमामा चांदोमामा, फुलपाखरु, येरे येरे पावसा, नाच रे मोरा, वासुदेव आला, चल गं सई, नंदीबैल, धरतीची आम्ही लेकरं, जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, अशा शेकडो कविता आजही मुलं गुणगुणायला लागतात. अमरेंद्र गाडगीळ, सुधाकर प्रभू, भा.रा. भागवत, लीलावती भागवत, सरिता पत्की, राजा मंगळवेढेकर, यदुनाथ थत्ते, पंढरीनाथ रेगे, सुमती पायगावकर, साने गुरुजी, ना.धो.ताम्हणकर, प्र.के. अत्रे, विं. दा. करंदीकर, वि.वा. शिरवाडकर, लीला दिक्षीत, बालकवी मंगेश पाडगावकर, महावीर जोंधळे ते अगदी अलीकडे ल.म. कडू, विजया वाड, एकनाथ आव्हाड, सुरेश सावंत पर्यंत अनकानेक सकस लेखकांनी बालसाहित्याचे दालन यथाशक्ती सुंदर सजवलेलं आहे.लातूर जिल्ह्यातील बालसाहित्यिकांची ओळख करुन द्यावयाची झाली तर या जिल्ह्यातील बाललेखकांची, कवींची लेखनी सकस आणि समृद्धच आहे. मराठी, कानडी, तेलगू आणि दखनी भाषेचा वावर या जिल्ह्यात आहे. तीन राज्याच्या सीमा असल्याने या परिसरातील बोली भाषेचा गोडवा बालसाहित्य लेखनात उमटलेला दिसतो. गुरंढोरं, शेतीमाती आणि आपल्या संस्कृतीशी इमान राखत राबणाऱ्या हातातून पिकलेले आणि बहरलेले कष्टांचे मळे येथील बालसाहित्यिकांच्या लेखनीला बळ देणारे नक्कीच आहेत. श्री. दि. इनामदार यांची जन्मभूमी ही लातूरच आहे. बालकवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. लातूर जिल्ह्यातील खामगाव (खाडगाव) येथे निजामाच्या राजवटील शिक्षण पूर्ण केले. त्यांची घरी पाळलेल्या बैलावरची कविता बालभारतीच्या शालेय पुस्तकात होती.

तुझ्या शेतात राबुन माझी सरली हयात

नको करु हेटाळणी आता उतार वयात

नाही राजा ओढवत चार पाऊल नांगर

नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर

        श्री. दि. इनामदार यांनी चांदोबा येरे ये, झुक झुक गाडी, फूल फुलता राहिना, नभ मातीच्या कुशीत, हे माय मातृभूमी इ. बालकवितासंग्रह प्रकाशित केलेले आहेत. अजबगाणी, डरॉव डरॉव, बागडणारी गाणी, अक्षरगाणी, धम्माल गाणी, आगळ्यावेगळ्या कविता, मजेचे थेंब, डिंग डाँग डिंग प्राण्यांची गाणी, एक टाळी गाण्याची, गाणी वेचू चला… ही त्यांची गाजलेली बालगीतांची संपदा आहे.

बालसाहित्य लेखनातला हा मोहरा लातूर जिह्याच्या मातीतून उगवला. दिल्ली येथे झालेल्या भारतीय बालशिक्षा परिषदेच्या संमेलनात मराठी भाषेतील वैशिष्टयेपूर्ण बालवाङ्मयाच्या लेखनासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. विनोदी शैलीतून कविता सादर करत मुलांचे मने जिंकणारे विनय अपसिंगेकर यांची ढगांचा गाव, ढगांची शाळा, कोल्ह्याचा दवाखाना बालकवितासंग्रह प्रकाशित आहेत.

रमेश चिल्ले यांचे निळे तळे, गोष्टी आजोबांच्या, येरे येरे पावसा, फुगा गेला फुटुन (बालकविता), भारत सातपुते यांचे नागू वेडा कसा ? (बालकादंबरी) वृषाली पाटील पैशांचं झाड (बालकविता), विश्वनाथ मुडपे अंबारी, आटोळा (बाल कविता) मुडपे यांची कविता बालमनोभावाचे सर्वांगसुंदर दर्शन घडवणारी आहे. मुलांच्या अवती भोवतीचं जग समजावं, मनोरंजनाबरोबर मुलांवर संस्कार व्हावे  या उद्देशाने अत्यंत साध्या सोप्या शब्दातून लयबद्धतेने त्यांच्या कविता वाचताना दिसून येतात.

रामदास केदार यांचा बन्याची शाळा (कथासंग्रह ) गंप्या गुराखी (बालकादंबरी), चिमणी चिमणी खोपा दे (बालकथा) कपाटातील पुस्तक (बालकविता) डोळयात दाटले पाणी, शामची आई कवितेतून बालसाहित्य वाटा आणि वळणे (समीक्षा ग्रंथ) प्रकाशित झालेला आहे. परभणी आकाशवाणी केंद्रावरुन बालमंडळ या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 52 बालसाहित्यिकांची ओळख त्यांनी करुन दिलेली आहे.

विलास सिंदगीकर पाठ्यपुस्तकातील कवी आहेत. ढगा ढगा धाव रे, पाऊसझडी, आनंदगाणी, अमृतधारा (बालकविता) राज्य शासन पुरस्कारप्राप्त कवी असून ग्रामीण कथाकार म्हणून महाराष्ट्रात मोठी ओळख त्यांची आहे. संजय ऐलवाड यांचे पिंटुची आकाशवारी, भित्रा थेंब, बिबट्याचे पिल्‌लू (बालकथा) मुलाफुलांची गाणी (बालकविता), वारूळ (बालकादंबरी) प्रकाशित झाले असून पुणे येथे केसरी वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून काम करतात. बालकांच्या मानसिकतेचा विचार करुन अर्थगर्भीत आणि चेतनायुक्त कविता संजय ऐलवाड यांच्या आहेत. दत्तप्रसाद झवतर जंगलाची शाळा,  पळा रे पळा देवा मला पाव (बालकविता), निवृत्ती शिंदे जाईन सदैव पुढेच,  वाघोबांची शाळा (बालकविता), नागनाथ कलवले झोपडी,  भास्कर बडे आंजीमाय (बालकादंबरी),  प्रकाश घादगीने नक्कल पडली महाग, गोप्याची दोस्त मंडळी(बालकथा) श्रीराम गुंदेकर ढगांची तहान,  रसुल पठाण निसर्गाशी जुळवू नाते (बाल कविता) सुबोध, सरळ भाषाशैली, कृतीयुक्त शब्द रचना अर्थपूर्ण आशय आणि सामर्थ्य प्रसन्नता रसुल पठाण यांच्या कवितेला लाभलेली दिसते.

धनंजय गुडसुरकर चिवचिवाट (बालकविता),  बाबा आमटे यांच्या जीवनावर शालेय मुलांसाठी 150 हून अधिक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. बालाजी बिरादार कावळ्याची शाळा (बालकविता) नंदकुमार बालुरे माय (बालकादंबरी), अनंत कदम अ. आईचे (बालकविता) प्रकाशित असून वाचक संवाद ही चळवळ सातत्याने ते  घेतात.  त्यांचा वाचक संवाद हा कार्यक्रम दखलपात्र ठरणारा आहे.

डॉ. हंसराज वैद्य पक्षांची झाली फुले,  राजाई (बालकविता) लोहारा ही जन्मभूमी असून नांदेड येथे व्यवसायाने ते डॉक्टर आहेत. त्यांची काही बालगीते प्रसिद्ध गायकांनी स्वरबद्ध केलेली आहेत. अंकुश सिंदगीकर हसरी फुलं (बालकथा), सुगंध माझ्या मातीचा(बालकविता), मुरहारी कराड चांदोबाच्या घरी, नव्या जगातील मुले (बालकविता), अनिता येलमटे घे भरारी असे साहित्य आहेत. स्मिता मेहकरकर स्वच्छतेचे पाईकआम्ही (बालकविता) प्रकाशित असून मनोरंजन आणि परिवर्तन यांचा सुरेख संगम करून प्रसाद युक्त आणि ओजस्वीतेने काव्याला स्मिता मेहकरकर यांनी फुलविले आहे. शंकर बोईनवाड यांचा चिवचिव चिमणी कोल्हेवाडीचा बाजार (बालकाव्य) प्रकाशित झालेली आहेत.

ऋषीकेश गुजलवार येरे येरे पावसा (बालकविता) प्रतीक्षा लोहकरे वडील समजून घेताना (बालकविता), ताजोद्यीन पठाण शाळेतील दिवस (बालकादंबरी), चंद्रदीप नादरगे पानाफुलांच्या दुनियेत, बालमित्र हे बालकविता संग्रह इत्यादी साहित्यिक लेखन करतात.

बालकांच्या मनावर उत्तम संस्कार व्हावा, त्यांची मने प्रज्वलित व्हावी. उद्याचा उत्तम युवा नागरिक बनावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मनोरंजनातून प्रबोधन कसे करता येईल ? मुलांच्या मनात वाचनाची गोडी कशी निर्माण होईल, म्हणून या जिल्ह्यात बालकांसाठी काही सांस्कृतिक चळवळी निर्माण झाल्या. 1990 पूर्वी उदगीर येथील विद्यावर्धिनी विद्यालयात नि.म.वडगावकर यांनी बालकुमार साहित्य संमेलन दत्ता ससे यांच्या अध्यक्षतेखाली घेतले. यावेळी बाबा भांड, महावीर जोंधळे, भालचंद्र देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. तर बालकांसाठी श्यामलाल विद्यालयात अखिल भारतीय साने गुरुजी कथा मालेचे अधिवेशन घेण्यात आले. चंद्रशेखर धर्माधिकारी या अधिवेशनाचे उद्घाटक होते. 2001 ला रमेश चिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथे बालकुमार साहित्य प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. शाळेत जाऊन कविसंमेलनाचा उपक्रम राबविला गेला. या प्रतिष्ठानांतर्गत बालसाहित्यिकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुण्याची शाखा रामदास केदार यांच्या अध्यक्षतेखाली उदगीरात स्थापन झाली. या संस्थेंतर्गत लाल बहादूर शास्त्री विद्यालयात विभागीय मराठी बालकुमार साहित्य  संमेलन घेण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष स्वाती राजे, प्रसाद अक्कानूर, तत्कालीन राज्यमंत्री संजय बनसोडे तर समारोप कवीवर्य इंद्रजीत भालेराव, केंद्रीय कार्यकारीणी मसापचे सदस्य रामचंद्र तिरुके होते. भव्यदिव्य असे बालकांसाठीचे संमेलन घेण्यात आले. बालसाहित्य लेखकांचा पुरस्कार देऊन ही संस्था सन्मान करते.

ज्ञान विज्ञान- तंत्रज्ञानाने प्रगती करुन यशांचे उंच शिखर गाठत असलो तरी या धावत्या वेगात मुलांचे बालपण आपण हरवून बसलो. आनंदाने खेळणारी मुले पेन, वही आणि सुंदर अक्षरांपेक्षा मोबाईलच्या स्क्रीनवर खूप प्रेम करतो आहे. मुले हसण्यापेक्षा चिडचिड स्वभावाची होत आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी मुलांचे वय आणि मन लक्षात घेऊन शाळा परिसर आणि निसर्गाशी त्यांचे नाते जोडले पाहिजे. आनंददायी शिक्षणाची गरज आहे. धास्तीच्या धडयांपेक्षा शिस्तीचे धडे खूप महत्वाचे आहेत. नाहीतर ही कोमलमनांची बालके सतत तणावात राहून अनेक मनोविकृतीला बळी पडतील. म्हणून आज अशा बालकुमार मेळाव्याची गरज आहे.

-        प्रा.रामदास केदार, शिवाजी महाविद्यालय , वाढवणा (उदगीर, जि. लातूर)

मो.क्रं.9850367185

पुनर्मुद्रित लेख : 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अश्मक स्मरणीकेतून साभार

000000000000000000000

 विशेष लेख                                                  18 फेब्रुवारी, 2025

 

 

मराठी संपादकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

"सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?" असा अग्रलेख लिहिणारे लोकमान्य टिळक नि इंग्रजांना प्रखर लढा देणारे संपादक पंडित बाबुराव पराडकर नि माधवराव सप्रे यांचा वारसा पुढे नेणारे निर्भिड संपादक आजही कधी नव्हे तेवढे हवे आहेत. जेव्हा जनसामांन्यावर अन्याय, महागाई, रोगराई व रोजगार नि शेतकरी - दलितांचे व महिलांचे जीवन असह्य होते तेव्हा तेजस्वी पत्रकारिता पुढे येते. लोकशाही व्यवस्था पारतंत्र्यात असताना जे लोकमान्य टिळक, पराडकर नि सप्रे, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दिनकर जवळकर, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील, दिनबंधूकार कृष्णराव भालेकर यांना  जमले ते आज लोकशाही व्यवस्था असताना का जमू नये याचा विचार आजच्या संपादक नि पत्रकारितेने करायला हवा. नाही का ?

 

पत्रकारिता हे क्षेत्र जनजागरणाचं  नि लोकशिक्षणाचं  प्रभावी माध्यम आहे, हे सर्वज्ञात आहे. लोकशाही व्यवस्थेतील पत्रकारितेला गुणवत्ता नि अर्थवत्तेचे नवे धुमारे फुटतात. लोकशाहीचं रक्षण नि संवर्धन पत्रकारितेचं मुलभूत काम आहे. कारण लोकशाही नसेल तर पत्रकारिता निर्जीव ठरू शकते व ठरतेही. तसेच हुकुमशाहीत ती पत्रकारिता नव्हे तर भाटकारिता ठरते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा पत्रकारितेचा मूलाधार नि तो स्वातंत्र्यातच प्राप्त होऊ शकतो. लोकशाही व्यवस्थेत स्वाभिमानानं नि  निर्भयपणे पत्रकारिता करणे आज किती कठीण जातंय हे आपण पाहतोच. पत्रकारितेला येनकेन प्रकारेन मिंधे करण्याचे प्रयत्न सत्तावान, धनवान, बलवान करताना आपण पाहतोच आहोत. तरीही लोकशाहीतच पत्रकारिता बहरू शकते, फुलू शकते आणि आपल्या शक्तीचा प्रभाव दाखवून सत्तेलाही हलवू शकते हे सत्य कोणी नाकारू शकत नाही.  म्हणूनच प्रगल्भ लोकशाहीसाठी प्रगल्भ लोकमत बनवावे लागते नि लोकमत (Public Opinion) घडविण्याचं काम पत्रकारिता करते. ते शक्य होते ते पत्रकारिताही प्रगल्भ नि निर्भय असेल तरच. म्हणूनच लोकशाही व्यवस्थेतच पत्रकारिता फुलते-फळते आणि पत्रकारितेचा जीव लोकशाहीच्या मुठीत असतो तर लोकशाहीचे अस्तित्वच पत्रकारिता टिकवून ठेऊ शकते. कार्यपालिका, विधीपालिका व न्यायपालिका या तिन्ही खांबावर नजर ठेवणे, चूकत असतील, घटनेची चौकट मोडत असतील तर निर्भयपणे टीका करणे हे पत्रकारितेचं मूळ काम आहे. जनतेचे स्वातंत्र्य व पत्रकारितेचंही स्वातंत्र्य अबाधित राखणं नि गरज पडली तर त्यासाठी लढा देणे हा पत्रकारितेचा धर्म आहे. त्यामुळेच स्वातंत्र्य लढ्यातील मराठी संपादक-पत्रकारांचं तेजस्वी योगदान पाहणं उदबोधक ठरते.

मराठी पत्रकारिता नि स्वातंत्र्य लढा : टिळक-आगरकरपूर्व संपादक मराठी पत्रकारितेचा आरंभ 1832 साली हा ब्रिटिश आमदानीत झाला हे आपण जाणतोच. दर्पणकार पंडित बाळशास्त्री जांभेकर या थोर विद्वान संपादकाने मराठी पत्रकारितेचा पाया रचला. त्यांनी दिग्दर्शन नावाचा मराठीतील पहिला ज्ञानसंग्रह प्रकाशित केला. मराठी नवसुशिक्षितांना अनेक विषयांचं ज्ञान बाळशास्त्री यांत देत असत. थोडक्यात दिग्दर्शनच्या माध्यमातून नवविचारांची व वैज्ञानिक दृष्टीतून व समाज सुधारणांची पेरणी ते मराठी समाजात करीत होते. नवा मानव व नवविचारी तरूणांचं मन घडवित होते. वैचारिक परिवर्तन करीत होते. आठ भाषांचा अभ्यास असणारे ते ज्ञानमहर्षिच होते पं. बाळशास्त्री जांभेकर. जनजागरण नि लोकशिक्षण व आधुनिकतेचे मूल्यं आपल्या मराठी समाजात रूजविणं यासाठी ते झटले. संपादक या नात्याने ते समाजशिक्षण होतेच ; पण शिक्षक म्हणूनही त्यांनी मौलिक जबाबदारी पार पाडली. एक उदाहरण पुरेसे आहे-स्वातंत्र्य लढ्यात पुढे अग्रणी ठरलेल्या दादाभाई नौरोजी यांचे ते गुरू होते. काँग्रेस संघटना स्थापन करण्यातील त्यांचे योगदान मौलिक राहिलेले आहे हे आपण जाणतोच. ब्रिटिश सरकार विरोधी संघटना बांधणारा नेता एका मराठी संपादकाने घडवावा हे केवढं मोठं देशपातळीवरील योगदान आहे बाळशास्त्री जांभेकरांचे.!

पंडित बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण मधील सहकारी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन यांचा आदराने उल्लेख करावा लागेल. समाजाला नवे वैज्ञानिक नि पाश्चात्य ज्ञान, प्रबोधनकारक विचार देण्यात भाऊ महाजन आघाडीवर होते. संपूर्ण मराठीतील पहिले नियतकालिक प्रभाकर या नावाने त्यांनी काढले. दोन दशकं त्यांनी आपले पत्र चालविले. त्याशिवाय त्यांनी ज्ञानदर्शन हे त्रैमासिकही प्रकाशित केले. शिवाय 'धुमकेतू' हे नियतकालिकही भाऊ महाजनांनी सुरू केले. मराठी समाजाचे प्रबोधन व्हावं, समाज जागृत व्हावा हेच ध्येय या थोर पत्रकार, संपादक नि प्राध्यापकाचं होतं. भाऊ महाजन यांचे कार्य मौलिक असूनही त्यांचे नाव फारसे माहिती नाही. मराठी समाजमन आधुनिकतेकडे घेऊन जाण्यात त्यांचं कार्य नाकारता येत नाही. पहिले मराठी कादंबरीकार म्हणूनही संपादक गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन यांचेच अमूल्य योगदान आहे. साहित्य, गद्य नि वैचारिक, विज्ञान साहित्याचे जनकही संपादक - पत्रकार आहेत, कारण पंडित बाळशास्त्री जांभेकर, प्रभाकरकार भाऊ महाजन हे वैचारिक नि ज्ञानविज्ञानाच्या गद्य साहित्याचे प्रारंभबिंदू आहेत. समाजसुधारणांचे नि प्रबोधन युगाचे कर्ते - करविते आहेत हे आपणास मान्य करावे लागेल असे पुरावे आता पुढे आले आहेत. बाळशास्त्रींचे दिग्दर्शन व भाऊ महाजनांचं ज्ञानदर्शनचे अंक त्याचा सबळ पुरावा आहे.

प्रभाकरकार गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन : धारदार लेखनाचा प्रबोधक व पहिले मराठी कादंबरीकार ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश नि दिनबंधू ज्ञानक्रांतीचा महाराष्ट्रात आरंभ करण्याचे सातत्यपूर्ण श्रेय मराठी संपादकांनाच द्यावं लागेल. ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, दिनबंधू, निबंधमाला, विविधज्ञानविस्तार आदि प्रारंभिक मराठी नियतकालिकांनी  जे वैचारिक लेखन, गद्यलेखन, ज्ञानविज्ञान लेखन मराठीत करून मराठी भाषेला समृद्धीच्या नव्या पर्वात नेले आहे, त्याचा चिकित्सक अभ्यास नि संशोधन आजवर नीटपण व समग्रतेने झालेले नाही, असे मला म्हणावेसे वाटते.

 

वृत्तपत्रांच्या सामर्थ्याविषयी बाळशास्त्रींना यथार्थ जाणीव होती. त्यासंबंधी आपल्या' दर्पण' च्या दुसऱ्याच अंकात त्यांनी असे लिहिले होते की, ' ही शक्ती आपल्या देशात पूर्वी असल्याचा इतिहासात दाखला नाही. सर्व जगामध्ये पाश्चात्य राष्ट्रांची जी प्रगती झाल्याचे आपणास दिसते, त्याचे प्रमुख कारण म्हणजे वृत्तपत्रे. ज्ञानप्रसाराचे आणि लोकजागृतीचे हे अद्भुत साधन आहे. ज्ञान आणि विज्ञान यांचा पुरस्कार करणे, सार्वजनिक नीतिमत्ता सुधारणे, जनतेला तिची कर्तव्ये सांगणे, राज्यकर्त्यांच्या हुकुमशाहीला लगाम घालणे हे सामर्थ्य वृत्तपत्रांच्या अंगी आहे.

महात्मा जोतीबा फुले हे महाराष्ट्रातील बहुजन जागरणाचे (शेतकरी जमाती, शेतमजूर, दलित, महिला) अध्वर्यू राहिले आहेत. या बहुजन जागरणांनं या अज्ञानी व अंधश्रद्ध बहुजनांना मानवी अधिकारापासून  चातुर्वर्ण्य चौकटीमुळं शोषित रहावं लागलं. त्यांना सामाजिक न्याय उपलब्ध करण्यासाठी महात्मा फुले यांनी व सत्यशोधक समाजानं ग्रामजीवनात नि बहुजनात जागृती करण्यासाठी सत्यशोधक विचारधारेची नियतकालिकं निघाली नि त्याची सुरुवात महात्मा फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी 1877 साली केली. टिळक-आगरकर यांचे काही वर्षे आधी ही पत्रकारिता उदयाला आली व त्यातून दीनमित्र, हंटर, विजयी मराठा, ब्राह्मणेतर आदि अनेक वृत्तपत्रं पुढील 60-70 वर्षात निघाली व खेड्यापाड्यातील अठरापगड जातींचे जनजागरण घडले नि ते पुढे लाखोंच्या संख्येने महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले हे विसरता येत नाही. हा मुद्दा बरेचदा अनेकांच्या लक्षात येत नाही हे खरे आहे.

 

 

टिळक-आगरकरांचे अनमोल पर्व

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्र व बंगालचे नेतृत्व अनमोल आहे. मराठीतील महान व लढवय्या संपादकांनी महाराष्ट्रात तेजस्वी योगदान दिलंच; पण ते भारतातील महान संपादकांना प्रेरक राहिले. त्यामुळे हिंदी, दक्षिणेतील व पूर्वेतील अनेक थोर संपादकांस मराठी पत्रकारितने ज्वलंत प्रेरणा दिली.

 लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व सहकारी देशभक्तांनी केसरी व मराठा ही अनुक्रमे मराठी व इंग्रजीतील वृत्तपत्रं सुरू केली. अनेकांना हे माहिती नाही की, प्रारंभिक सहा वर्षे थोर समाजसुधारक नि देशभक्त गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे संपादक होते व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे इंग्रजी नियतकालिक  मराठाचे संपादक होते. काही वर्षांनी आधी राजकीय का सामाजिक सुधारणा या वैचारिक मतभेदातून आगरकर बाहेर पडले व स्वतःचे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. पुढे आपल्या अंतापर्यंत लोकमान्य टिळक हे केसरीचे आक्रमक संपादक होते आणि ब्रिटिश सरकारविरोधी आग ओकणारी त्यांची पत्रकारिता होती. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे व अनेक भाषांमधील महान संपादकांचे प्रेरणास्रोत राहिले ही मराठी सारस्वताला नि माणसांना अभिमानानं छाती फुगून यावी असेच हे कार्य. लोकमान्य टिळक यांच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन हिंदी या राष्ट्रभाषेच्या पत्रकारितेत दोन मराठी संपादकांनी केलेलं मौलिक योगदान अजरामर आहे. हिंदी पत्रकारितेचे पितामह मानले गेलेले स्वातंत्र्यसेनानी पंडित बाबुराव पराडकर हे अत्यंत प्रखर पत्रकारिता करणारे मूळ मराठी संपादक होऊन गेले. आपली लेखनी त्यांनी तलवारीगत धारदार केली होती. निर्भय पत्रकारिता कायम असते व बलदंड इंग्रजी साम्राज्यास आव्हान देण्याची हिंमत अनेकदा त्यांनी केली. जुलमी सरकारविरोधी आवाज उठवणं हे पत्रकारितेचं मूलभूत साहसी काम त्यांनी केलं. हिंदी पत्रकारितेत देशभक्तीचा नवा इतिहास रचला पंडित पराडकर यांनी. परंतु आजही अनेक पत्रकारांनाही त्यांची फारशी माहिती नाही हे खेदजनक होय. पं. बाबुराव पराडकर यांच्याप्रमाणेच मध्यप्रदेशात ज्वालाग्रही लढाऊ पत्रकारिता करणारे दुसरे महान पत्रकार- संपादक आहेत पंडित माधवराव सप्रे. त्यांनी हिंदी पत्रकारितेत जहाल पत्रकारिता केली व त्यांनी हिंदी केसरी सुरु केला नि इंग्रजीविरुद्ध झुंजारपणे लढा दिला. ते लेखक – कथाकार व साहित्यिकही होते. हिंदी कथेचे ते जनक मानले जातात. पत्रकारिता नि साहित्य क्षेत्रात या दोघांनी महान कामगिरी केली.

 

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा अग्रलेख लिहिणारे पारतंत्र्यात लिहिणारे लोकमान्य टिळक नि इंग्रजांना प्रखर लढा देणारे संपादक पंडित बाबुराव पराडकर नि माधवराव सप्रे यांचा वारसा पुढे नेणारे निर्भिड संपादक आजही कधी नव्हे तेवढे हवे आहेत. जेव्हा जनसामांन्यावर अन्याय, महागाई, रोगराई व रोजगार नि शेतकरी - दलितांचे व महिलांचे जीवन असह्य होते तेव्हा तेजस्वी पत्रकारिता पुढे येते. लोकशाही व्यवस्था पारतंत्र्यात असताना जे लोकमान्य टिळक, पराडकर नि सप्रे, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दिनकर जवळकर, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील, दिनबंधूकार कृष्णराव भालेकर यांना जमले ते आज लोकशाही व्यवस्था असताना का जमू नये याचा विचार आजच्या संपादक नि पत्रकारितेने  करायला हवा. नाही का ?

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक दास्यमुक्तीची पत्रकारिता महान समाजक्रांतिकारक व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता थेटपणे स्वातंत्र लढ्याशी संबंधित आहे, कारण त्यांचा लढा हा स्वकियांच्या दास्यातून – चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या शतकानुशतकांच्या गुलामीतून दलित समाजाला मुक्त करणारा नि त्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळवू पाहणारा होता. त्यातूनच त्यांनी 1920 च्या व 30 च्या दशकात आपत्ती वृतपत्रे अन्यायाला व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी काढली. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता व प्रबुद्ध भारत ही त्यांची नियकालिकं Voice of the voiceless मुक समाजाचा आवाज बनलेली  मानवी  हक्काची व सामाजिक स्वातंत्र्याचीच लढाई होती. ही लढाई स्वकियांशीच असल्यानं व स्वकियांनी लादलेल्या जातीय गुलामीविरुध्दची  जटिल नि कठीण अशी स्वातंत्र्याची लढाई होती. विषमतेची पाळेमूळं नष्ट करण्याची लढाई होती. ती त्यांनी आपल्या नियतकालिकांच्या माध्यमातून मोठ्या ताकदीनं लढली. यश मिळवलं, ते भारतीय घटनेत समानता देऊन नि कायद्यानं अस्पृश्यता नष्ट करून… मराठवाडाचे पत्रमहर्षि आ. कृ. वाघमारे यांची एकमेवाव्दितीय झुंजार पत्रकारिता मराठवाडा प्रदेश हैद्राबादच्या निजामाच्या हुकुमशाही राजवटीच्या जुलमी राजवटीत होता. भारतातील स्वातंत्र्य युद्ध शिगेला पोहचल्यावर स्वातंत्र्यसेनानी पत्रमहर्षि मराठवाडाकार आ. कृ. वाघमारे यांनी 1938 साली पुण्यातून मराठवाडा साप्ताहिकाचा आरंभ केला. हैद्राबाद मुक्तीचे आंदोलन मुखपत्र असल्याने कधी निजामाने तर कधी इंग्रजांनी त्यावर बंदी आणली. अशा जुलमी राजवटीला भिणारे आ. कृ. वाघमारे थोडेच होते. निर्भयपणे ते या बंदीविरूद्ध लढले. आपली जिद्द नि झुंजारवृत्ती तसूभरही ढळू दिली नाही. लढाऊ बाण्याच्या या शूर संपादकाने एका अंकावर बंदी आली की दुसरे नाव घेऊन दुसरे गाव गाठून आपला अंक नि लढा चालूच ठेवला. कधी पुणे, कधी औरंगाबाद(आत्ताचे छत्रपती संभाजीनगर), कधी मुंबई तर कधी हैद्राबाद गाठलं पण अंक बंद पडू दिला नाही ते नाहीच. एकूण बारा नावं बदलली. आधी मराठवाडा मग नागरिक, संग्राम, समरभूमी, हैद्राबाद स्वराज्य, मोगलाई, सत्याग्रह, कायदेभंग, रणदुदुंभी, संजिवनी व कथाकल्प अशी वेगवेगळी नावं घेतली. एका नावावर बंदी आली की दुसरं नाव तयार.. जगाच्या इतिहासात अशी लढाई एखाद्या वृत्तपत्रांनं दिली नसेल. 1948 ला मग औरंगाबादहून (आत्ताचे छत्रपती संभाजीनगर) मराठवाडा नावावर प्रकाशन सुरू केलं. 1964 ला ते दैनिक केलं नि दुर्दैवानं त्याच दिवशी ते निधन पावले नि थोर संपादक अनंत भालेराव पुढे दै. मराठवाडाचे संपादक झाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सत्तेविरूद्ध असं लढण्याची हिंमत बाळगणारे संपादक व पत्रकार आज लोकशाहीतही हवेत.

 

-डॉ. सुधीर गव्हाणे,

      माजी कुलगुरू(यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,     

                    नाशिक तथा एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

      पुर्नमुद्रित लेख

उदगीर येथील 95 व्या अ.भा.म.सा.संमेलनाच्या   

                                                         ‘अश्मक’स्मरणिकेतून साभार
0000000000


 वृत्त क्रमांक 204

इयत्ता दहावीच्या परीक्षा आजपासून सुरू

विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी 

 

नांदेड दि. 20 फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षा येत्या 21 फेब्रुवारी ते 17 मार्च कालावधीत घेण्यात येणार आहेत. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त व आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी. आपले भविष्य उज्वल करण्यासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण खूप महत्वाचे आहे. परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदीचे कलम लागू असल्याने पालक व इतर नागरिकांनी परीक्षा केंद्र परिसरात अजिबात थांबू नये तसेच झेरॉक्स मशीन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य सुरु ठेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

इयत्ता 10 वीच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन केले असून जिल्ह्यातील 172 परीक्षा केंद्रावर  48 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देणार असून 172 बैठेपथक असणार आहे. तालुका स्तरावरील विभागप्रमुख यांचे भरारी पथक आणि जिल्हा स्तरावरील भरारी पथक परीक्षा केंद्राना भेटी देणार आहेत.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्डाच्या 12 वीच्या वार्षिक परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 पासून कॉपीमुक्त वातावरणात सुरु झाल्या आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार परीक्षा सुरु झाल्यापासून परीक्षा केंद्राना भेटी देत आहेत. महसूल विभाग, जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी परीक्षा केंद्राना भेटी देत आहेत.

0000

  वृत्त क्रमांक 203

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी
इच्छूक मदरसांनी प्रस्ताव सादर करण्यास 22 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
#नांदेड दि. २० फेब्रुवारी :- राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्या मदरसांना या योजनेत अनुदान घेण्याची इच्छा आहे, अशा इच्छूक नोंदणीकृत मदरसांनी 11 ऑक्टोंबर 2013 व 22 डिसेंबर 2023 च्या तरतुदीनुसार आवश्यक कागदपत्रासह विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सादर करण्यासाठी 22 फेब्रुवारी 2025 पर्यत मुदतवाढ दिलेली आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राहय धरले जाणार नाहीत.
पात्र मदरसांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत मदरशांकडून अल्पसंख्याक विकास विभाग अर्ज मागवित आहे. हे मदरसे राज्यातील वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असावेत. ही योजना सन 2024-25 या वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेमध्ये जिल्ह्यातील पात्र मदरसांना पायाभूत सुविधांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करून जास्तीत जास्त 10 लक्ष रुपये इतक्या मर्यादेपर्यंत अनुदान देण्यास मान्यता आहे. या योजनेची अंमलबजावणी करतेवेळी खालील अटींची पूर्तता करणाऱ्या मदरसांना प्राधान्य देण्यात येईल.तसेच ज्या मदरसांमध्ये कंत्राटी पध्दतीने नेमण्यात आलेल्या शिक्षकाद्वारे गणित व विज्ञान हे विषय शिकविले जातील. अशा मदरसांना प्राधान्य दिले जाईल व तसे शिक्षणाधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील. एका इमारतीत एक मदरसा असावा. या व्यक्तीरिक्त संदर्भाधीन शासन निर्णय 11.10.2013 मधील इतर सर्व बाबी, अटी व शर्ती कायम राहतील.
ज्या मदरशांना Scheme for Providing Quality Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्कृरत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना ह्या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2013 व अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक विकास विभागाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी केले आहे.
00000

 वृत्त क्रमांक 202

आधारभूत किंमत खरेदी योजनेत तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु
#नांदेड दि. २० फेब्रुवारी :- किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरीप हंगाम 2024-25 मध्ये तुर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. तरी शेतकऱ्यांनी चालू हंगामातील तुर या पिकाचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबूक ई. कागदपत्रके सबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.
केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत एन.सी.सी.एफ च्यावतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 मध्ये हमीभावाने तुर खरेदीसाठी दिनांक 24 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे एकूण 21 खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात तुर खरेदी 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झालेली आहे.
मुखेड तालुक खरेदी विक्री संघ मुखेड, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ हदगाव, लोहा तालुका खरेदी विक्री संघ लोहा, कृषि उत्पन्न बाजार समिती किनवट, तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर, मृष्णेश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. धनज (ता. मुखेड), सिद्राम फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. बेटमोगरा (ता. मुखेड), किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया सह. संस्था गणेशपूर (ता. किनवट), तिरुपति शहापूर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. वन्नाळी (ता. देगलूर), राधामाई फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. रातोळी, (ता.नायगाव), अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्था मानवाडी फाटा (ता. हदगाव), श्रीजगदंब फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. जांब (बु) (ता. मुखेड), नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सह खरेदी विक्री संस्था नांदेड (ता. अर्धापूर) , कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कुंडलवाडी (ता. बिलोली) , बळीराम पाटील फळे व भाजीपाला प्रक्रिया सह संस्था मुखेड बेरली खुर्द (ता. मुखेड), मुखेड फळे व भाजीपाला उत्पादक सह संस्था उमरदरी (ता. मुखेड) , जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्री सहकारी संस्था कौठा (ता. कंधार) , नांदेड प्रगती अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी चेनापूर (ता. धर्माबाद), स्वामी विवेकानंद अभिनव सहकारी संस्था मर्या शेळगाव थडी (ता. धर्माबाद), नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सह. खरेदी विक्री संस्था नांदेड केंद्र अर्धापूर या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत तुर ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे.
0000

 वृत्त क्रमांक 201

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत

पुणे संघाची विजयी सुरूवात

 

नांदेड दि. 20 फेब्रुवारी :- राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेमध्ये आज झालेल्या क्रिकेटच्या शुभारंभ सामन्यात पुणे विभागाने छत्रपतीसंभाजीनगर विभागाचा रोमहर्षक सामन्यात 7 धावांनी पराभव केला.

 

आज दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी क्रिकेटच्या सामन्याची सुरुवात केली. सर्व खेळाडुंची ओळख झाल्यानंतर सामन्याला सुरूवात झाली. पुणे विभागातर्फे उमाकांत मोरे, हरिष जनिरे, विकास माने यांनी अनुक्रमे 29, 20, 25 धावा काढत सर्वाधिक संघातर्फे धावा केल्या. तर संभाजीनगरकडून दिनेश सरोदे, पुणित मान, विठ्ठल गाडेकर यांनी गोलंदाजी करत अनुक्रमे 3, 2, 2 बळी घेतले. तत्पूर्वी संभाजीनगरकडून केसामी यांनी 33 धावा काढल्या. दिनेश सरोदे यांनी 31 धावा काढल्या. सर्व संघ 113 धावाकडून बाद झाला. पुणे संघाकडून असिफने 3 बळी घेतले.

 

श्री गुरूगोविंदसिंघजी क्रिडा संकुलातील क्रिकेट मैदानावर हा समाना रंगला. उद्यापासून तीन दिवस याठिकाणी क्रिकेटच्या सामने होणार आहेत. अन्य क्रीडा प्रकाराची उद्यापासून सुरुवात होणार आहे.

0000  








नांदेड शहरातील शुक्रवारचा आठवडी बाजार सोमवार 24 फेब्रुवारी रोजी भरणार  

नांदेड दि. 20 फेब्रुवारी : शुक्रवारी गोकुळ नगर, व्हीआयपी रोड, कुसूम सभागृह परिसर व  रेल्वे स्थानक परिसरात भरणारा आठवडी बाजार शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी ऐवजी सोमवारी २४ फेब्रुवारीला भरणार आहे. कृपया शेतकरी ग्राहक व्यापारी या सर्वांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा येत्या 21, 22 व 23 फेब्रुवारी रोजी नांदेड शहरात पार पडणार आहेत. त्याअनुषंगाने नांदेड शहरात शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी भरणारा आठवडी बाजार बंद राहणार आहेत. शुक्रवारी २१ फेब्रुवारी भरणारा आठवडी बाजार हा सोमवार २४ फेब्रुवारी २०२४ रोजी भरणार आहे.

याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज आदेश निर्गमीत केले आहेत. 

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यातून जवळपास 3 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार आहेत. श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम तसेच यशवंत कॉलेज मैदान या परिसरात या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेच्या ठिकाणच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होऊ नये ,यासाठी मार्केट अँड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 5 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन  जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी हा आदेश काढला आहे. 

0000

महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 21, 22, 23 फेब्रुवारीला होत आहे. यानिमित्ताने आयोजित आज पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहिती दिली.

















 विशेष लेख /

 बोलीभाषांनी समृद्ध झालेली मायमराठी 

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती एक संस्कृती आहे.तिच्या मातीत असंख्य उपभाषांचे,बोलींचे रोप बहरलेले आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बोलीभाषांचे वैविध्य आढळते. जशी गंगा अनेक उपनद्यांना सामावून घेत समुद्राला जाऊन मिळते, तशीच मराठी भाषा विविध बोलीभाषांना आपल्या प्रवाहात सामावून घेत समृद्ध झाली आहे.या बोली भाषेतील विविधतेमुळे मराठी भाषेची ताकद वाढली असून तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे.

 बोलीभाषांचे वैविध्य आणि त्यांचे योगदान 

महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा प्रचलित आहेत. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी, मराठवाडी, झाडीबोली, खानदेशी, नागपुरी याशिवाय गोंडी, बंजारा, कोलामी या बोलीभाषांनी मराठी भाषेला बळ दिले आहे. म्हणतात, "दर बारा कोसांवर भाषा बदलते," हे महाराष्ट्राच्या भाषिक वैशिष्ट्यांवर अगदी तंतोतंत लागू होते. या बोलीभाषांमधील साहित्य, लोकसंस्कृती, गाणी, नाटकं, प्रवचनं यांनी मराठीला अधिक व्यापक आणि जिवंत बनवले आहे. या बोलीभाषा मधील काही शब्दांना अर्थ आहे. हजारो उखाणे या बोली भाषांमध्ये आहे. शेकडो वाक्प्रचार या भाषेत आढळतात, विविध शब्दांसाठी एक शब्द म्हणून आशयघनता असणारे अनेक शब्द बोली भाषेत आहे. प्रेम, राग, व्देष, आनंद व्यक्त करणारे वैशिष्ट्यपूर्ण शब्द या बोलीभाषांचे महत्व सांगते.

 वऱ्हाडी बोलीभाषेचे वैशिष्ट्य 

वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी बाज हा तिचा खास गुणधर्म आहे. वऱ्हाडी बोलीत बोलताना एक वेगळीच गंमत असते. शब्दांच्या उच्चारांतील लयबद्धता आणि लहेजा मराठीला एक वेगळेच सौंदर्य प्रदान करतो.

 वऱ्हाडी भाषेचे महत्त्व

 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देताना वऱ्हाडी भाषेतील लिखाण अलिकडच्या काळात विशेष अधोरेखित झाले आहे. लीळाचरित्र या महानुभव पंथाच्या ग्रंथात वऱ्हाडीचा प्रभाव आढळतो. आद्य मराठी कवी मुकुंदराज यांच्या लेखनातही वऱ्हाडीचा वापर दिसतो. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथात वऱ्हाडीचा प्रभावी वापर केला आहे. कर्मयोगी गाडगेबाबांचे प्रवचनदेखील अस्सल वऱ्हाडी भाषेत असायचे. पुरुषोत्तम बोरकर यांची मेड इन इंडिया, उद्धव शेळके यांची धग कादंबरी त्यातील वऱ्हाडी भाषा यांनी अनेक पिढ्यांना वेड लावले आहे. अनेक अशा अशा कादंबऱ्या, कथा मान्यवर लेखकांनी मराठी वाचकांना दिल्या आहेत.

 वऱ्हाडीतील साहित्यिक योगदान 

वऱ्हाडी भाषेत विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती झाली आहे. कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्र, नाटके, सिनेमा अशा विविध माध्यमांद्वारे ही भाषा आपल्या भाषिक परंपरेत एक ठसा उमटवत आहे. अनेक लेखक आणि साहित्यिकांनी वऱ्हाडी भाषेत उत्कृष्ट लेखन केले आहे. वेगवेगळ्या टीव्ही सिरीयल,कॉमेडी शो आणि चित्रपटात या बोली भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हिंदी भाषेनंतर हास्य कवी संमेलनाची संस्कृती वऱ्हाडी भाषेने सर्वाधिक जोपासली आहे. माध्यमांमुळे या बोलीभाषा आता आपल्या सीमा भेदून सार्वत्रिक होत आहे.

प्रा. देविदास सोटे, पुरुषोत्तम बोरकर, उद्धव शेळके, मनोहर तल्हार, बाजीराव पाटील, गो. नी. दांडेकर, महेश दारव्हेकर, पांडुरंग गोरे, विठ्ठल वाघ, डॉ. मिर्झा रफी अहमद बेग,शंकर बडे, मधुकर केचे, ज्ञानेश वाकुडकर,शाम पेठकर, नाना ढाकूलकर, मनोहर कवीश्वर, मधुकर वाकोडे, गौतम गुडदे, डॉ. प्रतिमा इंगोले, शरदचंद्र सिन्हा, जगन वंजारी, राजा धर्माधिकारी, बापुराव झटाले, अॅड. अनंत खेळकर, किशोर बळी, रमेश ठाकरे, बापुराव मुसळे, रावसाहेब काळे,सदानंद देशमुख, नरेंद्र लाजेवार, नरेंद्र इंगळे,आदी मान्यवरांसह शेकडो लेखकांनी वऱ्हाडी भाषेतील साहित्य समृद्ध केले आहे.

वऱ्हाडी भाषेतील नाटक आणि गझलसुद्धा विशेष प्रसिद्ध आहेत. कविवर्य सुरेश भट यांनी मराठीत गझल लेखन केले, पण खासगी संभाषणात ते अस्सल वऱ्हाडीच वापरत. वऱ्हाडी भाषेतील सहज संवाद साधण्याची शैली, विनोदी प्रकृती, आणि लयदार उच्चार हा एक वेगळाच अनुभव देतात.

 विदर्भाच्या 11 जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्याच्या सीमावरती भागात, तसेच मध्य प्रदेशातील तेलंगाना व आंध्र प्रदेशातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वऱ्हाडी भाषा बोलली जाते. अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने तर अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये त्यामध्ये थोडा बदल होऊन भाषा बोलली जाते. नागपूर शहरातील बोलली जाणारी भाषा ही देखील एक वेगळी वऱ्हाडी शैली आहे. नागपूर मेट्रोने तर खास नागपुरी शब्दांच्या जाहिराती केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या त्या भागातील नागरिक एकमेकांना भेटल्यानंतर या शब्दांचा भरपूर वापर करतात. भाषिक जवळीकता साधण्यासाठी हे शब्द ओळखीचे काम करते. पुढे हीच भाषा भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये वेगळा हेल घेते. तिचे उच्चार वेगळ्या पद्धतीने केले जाते. मात्र हजारोंनी या भाषेचे संवर्धन केले आहे. मराठी भाषेच्या समृद्धीचा विचार करताना मोठ्या संख्येने बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा, त्यांचे संवर्धन आणि त्याचा अभ्यास करण्याचे व्यासपीठ अशी मोठी संमेलन असतात. दिल्लीच्या व्यासपीठावर अभिजात भाषेचा गुणगौरव होताना बोलीभाषेच्या सुप्त प्रवाहावरही चर्चा करावी लागणार आहे. बोलीचे वैभव,भाषेची संपन्नता वाढवणारे आहे. 

मराठीची अस्मिता आणि बोलीभाषांचे स्थान 

पु. ल. देशपांडे यांना वऱ्हाडी भाषेच्या विनोदी बाजाचे फार आकर्षण होते. सुरेश भट लतादीदी ,आशा भोसले आणि मंगेशकर घराण्यातील व्यक्तीशी वऱ्हाडी भाषेतून संवाद साधायचे. त्यांच्या वऱ्हाडी संवादाचे मैफिलीमध्ये खास आकर्षण असायचे. खरे तर भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती तिच्या संस्कृतीचा, अस्मितेचा अभिव्यक्त होण्याचा मार्ग असते. उर्दूची अदब, गुजरातीची गोडी, आणि वऱ्हाडीची मिश्किलता, विनोदी शैली हे वैशीष्टय आहे.

म्हणूनच बोलीभाषांचे अस्तित्व टिकवणे आणि त्यांना जपणे हे मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आवश्यक आहे. महाराष्ट्रात बोलीभाषांनी जो भाषिक गोतावळा तयार केला आहे, त्याने मराठीला अधिक समृद्ध केले आहे. मराठीने आपल्या अंगाखांद्यावर या उपभाषांना वाढवले, संगोपन केले आणि त्यांना भाषिक अस्मिता बहाल केली.

आजच्या काळातही बोलीभाषांचे संवर्धन हे मराठीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण मातृभाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असते. आई जी भाषा बोलते तीच मुलाची भाषा होते आणि तीच त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते.

मराठी भाषा ही केवळ एक संवादमाध्यम नसून एक संस्कृती आहे. बोलीभाषा ही तिच्या समृद्धीचा गाभा आहेत. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी यासारख्या अनेक उपभाषांनी मराठीच्या प्रवाहाला अधिक खोल आणि विस्तारलेले स्वरूप दिले आहे.

आजही मराठी भाषेच्या जडणघडणीत या बोलीभाषांचा मोलाचा वाटा आहे. बोलीभाषांचे संवर्धन आणि त्यांचे लेखन-साहित्यिक योगदान पुढे नेणे, हे मराठी भाषेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मराठी भाषा ही केवळ बोलीभाषांच्या आधाराने अधिकाधिक समृद्ध होत राहील. नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मायमराठीच्या या उपभाषांच्या संवर्धनासंदर्भातही वैचारिक मंथन अपेक्षित आहे.मराठी भाषा ही समुद्र आहेत तर तिच्यात मिसळणाऱ्या बोलीभाषा या विविध नदयांप्रमाणे आपले भाषिक सौंदर्य तिच्यामध्ये कायम मिसळत राहते. हा ओघ असाच कायम असणे खूप गरजेचे आहे. शब्दांचे वैशिष्ट्य, शब्दांचा गोडवा, शब्दांचे अर्थ, त्याची आशयघनता, काळाच्या गतीमध्ये लुप्त होऊ नये. थोडक्यात वऱ्हाडी शब्दांचा वापर करून सांगायचे झाल्यास असा 'बैताडपणा, छपरीपणा, इचकपणा, नंबरीपणा, उपटपणा, घरावर गोटे आणण्याचे धंदे अन् ' जांगडबुत्ता ' मराठी भाषेवर चिंतन करताना होऊ नये ,एवढीच अपेक्षा आहे.

प्रवीण टाके

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

९७०२८५८७७७



  वृत्त क्रमांक 209 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा दौरा   नांदेड दि.   21 फेब्रुवारी   ...