Thursday, February 20, 2025

 विशेष लेख                                                  18 फेब्रुवारी, 2025

 

 

मराठी संपादकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

"सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?" असा अग्रलेख लिहिणारे लोकमान्य टिळक नि इंग्रजांना प्रखर लढा देणारे संपादक पंडित बाबुराव पराडकर नि माधवराव सप्रे यांचा वारसा पुढे नेणारे निर्भिड संपादक आजही कधी नव्हे तेवढे हवे आहेत. जेव्हा जनसामांन्यावर अन्याय, महागाई, रोगराई व रोजगार नि शेतकरी - दलितांचे व महिलांचे जीवन असह्य होते तेव्हा तेजस्वी पत्रकारिता पुढे येते. लोकशाही व्यवस्था पारतंत्र्यात असताना जे लोकमान्य टिळक, पराडकर नि सप्रे, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दिनकर जवळकर, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील, दिनबंधूकार कृष्णराव भालेकर यांना  जमले ते आज लोकशाही व्यवस्था असताना का जमू नये याचा विचार आजच्या संपादक नि पत्रकारितेने करायला हवा. नाही का ?

 

पत्रकारिता हे क्षेत्र जनजागरणाचं  नि लोकशिक्षणाचं  प्रभावी माध्यम आहे, हे सर्वज्ञात आहे. लोकशाही व्यवस्थेतील पत्रकारितेला गुणवत्ता नि अर्थवत्तेचे नवे धुमारे फुटतात. लोकशाहीचं रक्षण नि संवर्धन पत्रकारितेचं मुलभूत काम आहे. कारण लोकशाही नसेल तर पत्रकारिता निर्जीव ठरू शकते व ठरतेही. तसेच हुकुमशाहीत ती पत्रकारिता नव्हे तर भाटकारिता ठरते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा पत्रकारितेचा मूलाधार नि तो स्वातंत्र्यातच प्राप्त होऊ शकतो. लोकशाही व्यवस्थेत स्वाभिमानानं नि  निर्भयपणे पत्रकारिता करणे आज किती कठीण जातंय हे आपण पाहतोच. पत्रकारितेला येनकेन प्रकारेन मिंधे करण्याचे प्रयत्न सत्तावान, धनवान, बलवान करताना आपण पाहतोच आहोत. तरीही लोकशाहीतच पत्रकारिता बहरू शकते, फुलू शकते आणि आपल्या शक्तीचा प्रभाव दाखवून सत्तेलाही हलवू शकते हे सत्य कोणी नाकारू शकत नाही.  म्हणूनच प्रगल्भ लोकशाहीसाठी प्रगल्भ लोकमत बनवावे लागते नि लोकमत (Public Opinion) घडविण्याचं काम पत्रकारिता करते. ते शक्य होते ते पत्रकारिताही प्रगल्भ नि निर्भय असेल तरच. म्हणूनच लोकशाही व्यवस्थेतच पत्रकारिता फुलते-फळते आणि पत्रकारितेचा जीव लोकशाहीच्या मुठीत असतो तर लोकशाहीचे अस्तित्वच पत्रकारिता टिकवून ठेऊ शकते. कार्यपालिका, विधीपालिका व न्यायपालिका या तिन्ही खांबावर नजर ठेवणे, चूकत असतील, घटनेची चौकट मोडत असतील तर निर्भयपणे टीका करणे हे पत्रकारितेचं मूळ काम आहे. जनतेचे स्वातंत्र्य व पत्रकारितेचंही स्वातंत्र्य अबाधित राखणं नि गरज पडली तर त्यासाठी लढा देणे हा पत्रकारितेचा धर्म आहे. त्यामुळेच स्वातंत्र्य लढ्यातील मराठी संपादक-पत्रकारांचं तेजस्वी योगदान पाहणं उदबोधक ठरते.

मराठी पत्रकारिता नि स्वातंत्र्य लढा : टिळक-आगरकरपूर्व संपादक मराठी पत्रकारितेचा आरंभ 1832 साली हा ब्रिटिश आमदानीत झाला हे आपण जाणतोच. दर्पणकार पंडित बाळशास्त्री जांभेकर या थोर विद्वान संपादकाने मराठी पत्रकारितेचा पाया रचला. त्यांनी दिग्दर्शन नावाचा मराठीतील पहिला ज्ञानसंग्रह प्रकाशित केला. मराठी नवसुशिक्षितांना अनेक विषयांचं ज्ञान बाळशास्त्री यांत देत असत. थोडक्यात दिग्दर्शनच्या माध्यमातून नवविचारांची व वैज्ञानिक दृष्टीतून व समाज सुधारणांची पेरणी ते मराठी समाजात करीत होते. नवा मानव व नवविचारी तरूणांचं मन घडवित होते. वैचारिक परिवर्तन करीत होते. आठ भाषांचा अभ्यास असणारे ते ज्ञानमहर्षिच होते पं. बाळशास्त्री जांभेकर. जनजागरण नि लोकशिक्षण व आधुनिकतेचे मूल्यं आपल्या मराठी समाजात रूजविणं यासाठी ते झटले. संपादक या नात्याने ते समाजशिक्षण होतेच ; पण शिक्षक म्हणूनही त्यांनी मौलिक जबाबदारी पार पाडली. एक उदाहरण पुरेसे आहे-स्वातंत्र्य लढ्यात पुढे अग्रणी ठरलेल्या दादाभाई नौरोजी यांचे ते गुरू होते. काँग्रेस संघटना स्थापन करण्यातील त्यांचे योगदान मौलिक राहिलेले आहे हे आपण जाणतोच. ब्रिटिश सरकार विरोधी संघटना बांधणारा नेता एका मराठी संपादकाने घडवावा हे केवढं मोठं देशपातळीवरील योगदान आहे बाळशास्त्री जांभेकरांचे.!

पंडित बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण मधील सहकारी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन यांचा आदराने उल्लेख करावा लागेल. समाजाला नवे वैज्ञानिक नि पाश्चात्य ज्ञान, प्रबोधनकारक विचार देण्यात भाऊ महाजन आघाडीवर होते. संपूर्ण मराठीतील पहिले नियतकालिक प्रभाकर या नावाने त्यांनी काढले. दोन दशकं त्यांनी आपले पत्र चालविले. त्याशिवाय त्यांनी ज्ञानदर्शन हे त्रैमासिकही प्रकाशित केले. शिवाय 'धुमकेतू' हे नियतकालिकही भाऊ महाजनांनी सुरू केले. मराठी समाजाचे प्रबोधन व्हावं, समाज जागृत व्हावा हेच ध्येय या थोर पत्रकार, संपादक नि प्राध्यापकाचं होतं. भाऊ महाजन यांचे कार्य मौलिक असूनही त्यांचे नाव फारसे माहिती नाही. मराठी समाजमन आधुनिकतेकडे घेऊन जाण्यात त्यांचं कार्य नाकारता येत नाही. पहिले मराठी कादंबरीकार म्हणूनही संपादक गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन यांचेच अमूल्य योगदान आहे. साहित्य, गद्य नि वैचारिक, विज्ञान साहित्याचे जनकही संपादक - पत्रकार आहेत, कारण पंडित बाळशास्त्री जांभेकर, प्रभाकरकार भाऊ महाजन हे वैचारिक नि ज्ञानविज्ञानाच्या गद्य साहित्याचे प्रारंभबिंदू आहेत. समाजसुधारणांचे नि प्रबोधन युगाचे कर्ते - करविते आहेत हे आपणास मान्य करावे लागेल असे पुरावे आता पुढे आले आहेत. बाळशास्त्रींचे दिग्दर्शन व भाऊ महाजनांचं ज्ञानदर्शनचे अंक त्याचा सबळ पुरावा आहे.

प्रभाकरकार गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन : धारदार लेखनाचा प्रबोधक व पहिले मराठी कादंबरीकार ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश नि दिनबंधू ज्ञानक्रांतीचा महाराष्ट्रात आरंभ करण्याचे सातत्यपूर्ण श्रेय मराठी संपादकांनाच द्यावं लागेल. ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, दिनबंधू, निबंधमाला, विविधज्ञानविस्तार आदि प्रारंभिक मराठी नियतकालिकांनी  जे वैचारिक लेखन, गद्यलेखन, ज्ञानविज्ञान लेखन मराठीत करून मराठी भाषेला समृद्धीच्या नव्या पर्वात नेले आहे, त्याचा चिकित्सक अभ्यास नि संशोधन आजवर नीटपण व समग्रतेने झालेले नाही, असे मला म्हणावेसे वाटते.

 

वृत्तपत्रांच्या सामर्थ्याविषयी बाळशास्त्रींना यथार्थ जाणीव होती. त्यासंबंधी आपल्या' दर्पण' च्या दुसऱ्याच अंकात त्यांनी असे लिहिले होते की, ' ही शक्ती आपल्या देशात पूर्वी असल्याचा इतिहासात दाखला नाही. सर्व जगामध्ये पाश्चात्य राष्ट्रांची जी प्रगती झाल्याचे आपणास दिसते, त्याचे प्रमुख कारण म्हणजे वृत्तपत्रे. ज्ञानप्रसाराचे आणि लोकजागृतीचे हे अद्भुत साधन आहे. ज्ञान आणि विज्ञान यांचा पुरस्कार करणे, सार्वजनिक नीतिमत्ता सुधारणे, जनतेला तिची कर्तव्ये सांगणे, राज्यकर्त्यांच्या हुकुमशाहीला लगाम घालणे हे सामर्थ्य वृत्तपत्रांच्या अंगी आहे.

महात्मा जोतीबा फुले हे महाराष्ट्रातील बहुजन जागरणाचे (शेतकरी जमाती, शेतमजूर, दलित, महिला) अध्वर्यू राहिले आहेत. या बहुजन जागरणांनं या अज्ञानी व अंधश्रद्ध बहुजनांना मानवी अधिकारापासून  चातुर्वर्ण्य चौकटीमुळं शोषित रहावं लागलं. त्यांना सामाजिक न्याय उपलब्ध करण्यासाठी महात्मा फुले यांनी व सत्यशोधक समाजानं ग्रामजीवनात नि बहुजनात जागृती करण्यासाठी सत्यशोधक विचारधारेची नियतकालिकं निघाली नि त्याची सुरुवात महात्मा फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी 1877 साली केली. टिळक-आगरकर यांचे काही वर्षे आधी ही पत्रकारिता उदयाला आली व त्यातून दीनमित्र, हंटर, विजयी मराठा, ब्राह्मणेतर आदि अनेक वृत्तपत्रं पुढील 60-70 वर्षात निघाली व खेड्यापाड्यातील अठरापगड जातींचे जनजागरण घडले नि ते पुढे लाखोंच्या संख्येने महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले हे विसरता येत नाही. हा मुद्दा बरेचदा अनेकांच्या लक्षात येत नाही हे खरे आहे.

 

 

टिळक-आगरकरांचे अनमोल पर्व

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्र व बंगालचे नेतृत्व अनमोल आहे. मराठीतील महान व लढवय्या संपादकांनी महाराष्ट्रात तेजस्वी योगदान दिलंच; पण ते भारतातील महान संपादकांना प्रेरक राहिले. त्यामुळे हिंदी, दक्षिणेतील व पूर्वेतील अनेक थोर संपादकांस मराठी पत्रकारितने ज्वलंत प्रेरणा दिली.

 लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व सहकारी देशभक्तांनी केसरी व मराठा ही अनुक्रमे मराठी व इंग्रजीतील वृत्तपत्रं सुरू केली. अनेकांना हे माहिती नाही की, प्रारंभिक सहा वर्षे थोर समाजसुधारक नि देशभक्त गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे संपादक होते व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे इंग्रजी नियतकालिक  मराठाचे संपादक होते. काही वर्षांनी आधी राजकीय का सामाजिक सुधारणा या वैचारिक मतभेदातून आगरकर बाहेर पडले व स्वतःचे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. पुढे आपल्या अंतापर्यंत लोकमान्य टिळक हे केसरीचे आक्रमक संपादक होते आणि ब्रिटिश सरकारविरोधी आग ओकणारी त्यांची पत्रकारिता होती. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे व अनेक भाषांमधील महान संपादकांचे प्रेरणास्रोत राहिले ही मराठी सारस्वताला नि माणसांना अभिमानानं छाती फुगून यावी असेच हे कार्य. लोकमान्य टिळक यांच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन हिंदी या राष्ट्रभाषेच्या पत्रकारितेत दोन मराठी संपादकांनी केलेलं मौलिक योगदान अजरामर आहे. हिंदी पत्रकारितेचे पितामह मानले गेलेले स्वातंत्र्यसेनानी पंडित बाबुराव पराडकर हे अत्यंत प्रखर पत्रकारिता करणारे मूळ मराठी संपादक होऊन गेले. आपली लेखनी त्यांनी तलवारीगत धारदार केली होती. निर्भय पत्रकारिता कायम असते व बलदंड इंग्रजी साम्राज्यास आव्हान देण्याची हिंमत अनेकदा त्यांनी केली. जुलमी सरकारविरोधी आवाज उठवणं हे पत्रकारितेचं मूलभूत साहसी काम त्यांनी केलं. हिंदी पत्रकारितेत देशभक्तीचा नवा इतिहास रचला पंडित पराडकर यांनी. परंतु आजही अनेक पत्रकारांनाही त्यांची फारशी माहिती नाही हे खेदजनक होय. पं. बाबुराव पराडकर यांच्याप्रमाणेच मध्यप्रदेशात ज्वालाग्रही लढाऊ पत्रकारिता करणारे दुसरे महान पत्रकार- संपादक आहेत पंडित माधवराव सप्रे. त्यांनी हिंदी पत्रकारितेत जहाल पत्रकारिता केली व त्यांनी हिंदी केसरी सुरु केला नि इंग्रजीविरुद्ध झुंजारपणे लढा दिला. ते लेखक – कथाकार व साहित्यिकही होते. हिंदी कथेचे ते जनक मानले जातात. पत्रकारिता नि साहित्य क्षेत्रात या दोघांनी महान कामगिरी केली.

 

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा अग्रलेख लिहिणारे पारतंत्र्यात लिहिणारे लोकमान्य टिळक नि इंग्रजांना प्रखर लढा देणारे संपादक पंडित बाबुराव पराडकर नि माधवराव सप्रे यांचा वारसा पुढे नेणारे निर्भिड संपादक आजही कधी नव्हे तेवढे हवे आहेत. जेव्हा जनसामांन्यावर अन्याय, महागाई, रोगराई व रोजगार नि शेतकरी - दलितांचे व महिलांचे जीवन असह्य होते तेव्हा तेजस्वी पत्रकारिता पुढे येते. लोकशाही व्यवस्था पारतंत्र्यात असताना जे लोकमान्य टिळक, पराडकर नि सप्रे, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दिनकर जवळकर, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील, दिनबंधूकार कृष्णराव भालेकर यांना जमले ते आज लोकशाही व्यवस्था असताना का जमू नये याचा विचार आजच्या संपादक नि पत्रकारितेने  करायला हवा. नाही का ?

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक दास्यमुक्तीची पत्रकारिता महान समाजक्रांतिकारक व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता थेटपणे स्वातंत्र लढ्याशी संबंधित आहे, कारण त्यांचा लढा हा स्वकियांच्या दास्यातून – चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या शतकानुशतकांच्या गुलामीतून दलित समाजाला मुक्त करणारा नि त्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळवू पाहणारा होता. त्यातूनच त्यांनी 1920 च्या व 30 च्या दशकात आपत्ती वृतपत्रे अन्यायाला व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी काढली. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता व प्रबुद्ध भारत ही त्यांची नियकालिकं Voice of the voiceless मुक समाजाचा आवाज बनलेली  मानवी  हक्काची व सामाजिक स्वातंत्र्याचीच लढाई होती. ही लढाई स्वकियांशीच असल्यानं व स्वकियांनी लादलेल्या जातीय गुलामीविरुध्दची  जटिल नि कठीण अशी स्वातंत्र्याची लढाई होती. विषमतेची पाळेमूळं नष्ट करण्याची लढाई होती. ती त्यांनी आपल्या नियतकालिकांच्या माध्यमातून मोठ्या ताकदीनं लढली. यश मिळवलं, ते भारतीय घटनेत समानता देऊन नि कायद्यानं अस्पृश्यता नष्ट करून… मराठवाडाचे पत्रमहर्षि आ. कृ. वाघमारे यांची एकमेवाव्दितीय झुंजार पत्रकारिता मराठवाडा प्रदेश हैद्राबादच्या निजामाच्या हुकुमशाही राजवटीच्या जुलमी राजवटीत होता. भारतातील स्वातंत्र्य युद्ध शिगेला पोहचल्यावर स्वातंत्र्यसेनानी पत्रमहर्षि मराठवाडाकार आ. कृ. वाघमारे यांनी 1938 साली पुण्यातून मराठवाडा साप्ताहिकाचा आरंभ केला. हैद्राबाद मुक्तीचे आंदोलन मुखपत्र असल्याने कधी निजामाने तर कधी इंग्रजांनी त्यावर बंदी आणली. अशा जुलमी राजवटीला भिणारे आ. कृ. वाघमारे थोडेच होते. निर्भयपणे ते या बंदीविरूद्ध लढले. आपली जिद्द नि झुंजारवृत्ती तसूभरही ढळू दिली नाही. लढाऊ बाण्याच्या या शूर संपादकाने एका अंकावर बंदी आली की दुसरे नाव घेऊन दुसरे गाव गाठून आपला अंक नि लढा चालूच ठेवला. कधी पुणे, कधी औरंगाबाद(आत्ताचे छत्रपती संभाजीनगर), कधी मुंबई तर कधी हैद्राबाद गाठलं पण अंक बंद पडू दिला नाही ते नाहीच. एकूण बारा नावं बदलली. आधी मराठवाडा मग नागरिक, संग्राम, समरभूमी, हैद्राबाद स्वराज्य, मोगलाई, सत्याग्रह, कायदेभंग, रणदुदुंभी, संजिवनी व कथाकल्प अशी वेगवेगळी नावं घेतली. एका नावावर बंदी आली की दुसरं नाव तयार.. जगाच्या इतिहासात अशी लढाई एखाद्या वृत्तपत्रांनं दिली नसेल. 1948 ला मग औरंगाबादहून (आत्ताचे छत्रपती संभाजीनगर) मराठवाडा नावावर प्रकाशन सुरू केलं. 1964 ला ते दैनिक केलं नि दुर्दैवानं त्याच दिवशी ते निधन पावले नि थोर संपादक अनंत भालेराव पुढे दै. मराठवाडाचे संपादक झाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सत्तेविरूद्ध असं लढण्याची हिंमत बाळगणारे संपादक व पत्रकार आज लोकशाहीतही हवेत.

 

-डॉ. सुधीर गव्हाणे,

      माजी कुलगुरू(यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,     

                    नाशिक तथा एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

      पुर्नमुद्रित लेख

उदगीर येथील 95 व्या अ.भा.म.सा.संमेलनाच्या   

                                                         ‘अश्मक’स्मरणिकेतून साभार
0000000000


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.  77 9 मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य ...