लातूर जिल्ह्यातील बालसाहित्य
लातूर जिल्ह्यातील बालसाहित्यिकांची ओळख करुन द्यावयाची झाली तर या जिल्ह्यातील बाललेखकांची, कवींची लेखनी सकस आणि समृद्धच आहे. मराठी, कानडी, तेलगू आणि दखनी भाषेचा वावर या जिल्ह्यात आहे. तीन राज्याच्या सीमा असल्याने या परिसरातील बोली भाषेचा गोडवा बालसाहित्य लेखनात उमटलेला दिसतो. दिल्लीच्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त बालासाहित्यावर प्रकाश टाकणारा हा लेख.
“मुलांसाठी अक्षरांचे सेतू बांधणं खूपच कठीण असते.” साहित्याच्या प्रांगणात विविध वाङ्मयप्रकार हाताळणाऱ्या लेखकांची संख्या खूप असली तरी बालसाहित्य लेखन करणाऱ्या लेखकांची संख्या खूप कमी आहे. बालकांचे बालविश्व घडविण्यासाठींचे लेखन करणे तितके सोपे नसते. मुलांसाठी अक्षरांचे सेतू बांधणं खूपच कठीण काम असते. लेखक वयाने मोठा असला तरी बालसाहित्य लेखन करतांना बालकांचे बालमन होऊनच पालकांच्या बालमनांशी नाते जोडण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करावा लागतो. तेव्हाच ते लेखन अजरामर टिकून राहते. हसऱ्या, वाढत्या वयात फुलपाखरांसोबत आनंदाने खेळणारी मुले खूपच कल्पक आणि अनुकरण करणारी असतात. पुस्तकांच्या पानांवरचे रंगीत चित्र बालकांच्या मनाला खुणवत असतात. म्हणूनच चित्रांचे जग त्यांना खूप आवडते.
आपल्या अवतीभोवती, घरातील परिसरातील सजीव असो, की निर्जीव ते आपल्या नाजूक पापणीतून न्याहळत असतात. प्रत्येक वस्तूंचे नवल त्याला वाटू लागते आणि कोवळ्या बोटांनी त्या पकडण्याचा आणि तोंडात टाकण्याचा प्रयत्न करत असतात. तर गालातल्या गालात हसतात आकाशातला चंद्र जरी दूर असला तरी त्याच्याकडे पाहत आपलंसं करुन घेतात. आजी आजोबांच्य गोष्टीत रममाण होऊन पुस्तकांची रंगीत पाने चाळत, पानावरील गोष्टीत मिसळून जातात. अशातूनच बालकांच्या बालमनाची जडण-घडण होत जाते. बालवयात झालेले संस्कार हे दीर्घकाळ टिकणारे असतात. राष्ट्रप्रेम, निसर्ग प्रेम, मित्र प्रेम, परोपकार, पशुप्राण्यांवरील प्रेम, विज्ञाननिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता, अशा अनेक मुल्यांची पेरणी याच वयात नीटपणे करता येते. मनोरंजनातून प्रबोधन करत मुलांचे भावविश्व घडविण्याचा आणि फुलवण्याचा प्रयत्न आपल्या लेखनीतून बालसाहित्यिकच करु शकतात. आणि मग ही मुले कथा, कवितेला बोबड्या बोलीतून सूर लावत ठेका धरुन जमेल, तसे नाचू लागतात.
“झुक झुक झुक झुक अगीनगाडी | धुरांच्या रेषा हवेत काढी |
पळती झाडे पाहूया | मामाच्या गावाला जावूया || ’’
ही बालकविता असो किंवा चिऊताईच घरटं,चांदोमामा चांदोमामा, फुलपाखरु, येरे येरे पावसा, नाच रे मोरा, वासुदेव आला, चल गं सई, नंदीबैल, धरतीची आम्ही लेकरं, जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, अशा शेकडो कविता आजही मुलं गुणगुणायला लागतात. अमरेंद्र गाडगीळ, सुधाकर प्रभू, भा.रा. भागवत, लीलावती भागवत, सरिता पत्की, राजा मंगळवेढेकर, यदुनाथ थत्ते, पंढरीनाथ रेगे, सुमती पायगावकर, साने गुरुजी, ना.धो.ताम्हणकर, प्र.के. अत्रे, विं. दा. करंदीकर, वि.वा. शिरवाडकर, लीला दिक्षीत, बालकवी मंगेश पाडगावकर, महावीर जोंधळे ते अगदी अलीकडे ल.म. कडू, विजया वाड, एकनाथ आव्हाड, सुरेश सावंत पर्यंत अनकानेक सकस लेखकांनी बालसाहित्याचे दालन यथाशक्ती सुंदर सजवलेलं आहे.लातूर जिल्ह्यातील बालसाहित्यिकांची ओळख करुन द्यावयाची झाली तर या जिल्ह्यातील बाललेखकांची, कवींची लेखनी सकस आणि समृद्धच आहे. मराठी, कानडी, तेलगू आणि दखनी भाषेचा वावर या जिल्ह्यात आहे. तीन राज्याच्या सीमा असल्याने या परिसरातील बोली भाषेचा गोडवा बालसाहित्य लेखनात उमटलेला दिसतो. गुरंढोरं, शेतीमाती आणि आपल्या संस्कृतीशी इमान राखत राबणाऱ्या हातातून पिकलेले आणि बहरलेले कष्टांचे मळे येथील बालसाहित्यिकांच्या लेखनीला बळ देणारे नक्कीच आहेत. श्री. दि. इनामदार यांची जन्मभूमी ही लातूरच आहे. बालकवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. लातूर जिल्ह्यातील खामगाव (खाडगाव) येथे निजामाच्या राजवटील शिक्षण पूर्ण केले. त्यांची घरी पाळलेल्या बैलावरची कविता बालभारतीच्या शालेय पुस्तकात होती.
“तुझ्या शेतात राबुन माझी सरली हयात
नको करु हेटाळणी आता उतार वयात
नाही राजा ओढवत चार पाऊल नांगर
नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर”
श्री. दि. इनामदार यांनी चांदोबा येरे ये, झुक झुक गाडी, फूल फुलता राहिना, नभ मातीच्या कुशीत, हे माय मातृभूमी इ. बालकवितासंग्रह प्रकाशित केलेले आहेत. अजबगाणी, डरॉव डरॉव, बागडणारी गाणी, अक्षरगाणी, धम्माल गाणी, आगळ्यावेगळ्या कविता, मजेचे थेंब, डिंग डाँग डिंग प्राण्यांची गाणी, एक टाळी गाण्याची, गाणी वेचू चला… ही त्यांची गाजलेली बालगीतांची संपदा आहे.
बालसाहित्य लेखनातला हा मोहरा लातूर जिह्याच्या मातीतून उगवला. दिल्ली येथे झालेल्या भारतीय बालशिक्षा परिषदेच्या संमेलनात मराठी भाषेतील वैशिष्टयेपूर्ण बालवाङ्मयाच्या लेखनासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. विनोदी शैलीतून कविता सादर करत मुलांचे मने जिंकणारे विनय अपसिंगेकर यांची ढगांचा गाव, ढगांची शाळा, कोल्ह्याचा दवाखाना बालकवितासंग्रह प्रकाशित आहेत.
रमेश चिल्ले यांचे निळे तळे, गोष्टी आजोबांच्या, येरे येरे पावसा, फुगा गेला फुटुन (बालकविता), भारत सातपुते यांचे नागू वेडा कसा ? (बालकादंबरी) वृषाली पाटील पैशांचं झाड (बालकविता), विश्वनाथ मुडपे अंबारी, आटोळा (बाल कविता) मुडपे यांची कविता बालमनोभावाचे सर्वांगसुंदर दर्शन घडवणारी आहे. मुलांच्या अवती भोवतीचं जग समजावं, मनोरंजनाबरोबर मुलांवर संस्कार व्हावे या उद्देशाने अत्यंत साध्या सोप्या शब्दातून लयबद्धतेने त्यांच्या कविता वाचताना दिसून येतात.
रामदास केदार यांचा “बन्याची शाळा” (कथासंग्रह ) “गंप्या गुराखी (बालकादंबरी),” चिमणी चिमणी खोपा दे (बालकथा) “कपाटातील पुस्तक” (बालकविता) डोळयात दाटले पाणी, शामची आई कवितेतून बालसाहित्य वाटा आणि वळणे (समीक्षा ग्रंथ) प्रकाशित झालेला आहे. परभणी आकाशवाणी केंद्रावरुन बालमंडळ या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 52 बालसाहित्यिकांची ओळख त्यांनी करुन दिलेली आहे.
विलास सिंदगीकर पाठ्यपुस्तकातील कवी आहेत. ढगा ढगा धाव रे, पाऊसझडी, आनंदगाणी, अमृतधारा (बालकविता) राज्य शासन पुरस्कारप्राप्त कवी असून ग्रामीण कथाकार म्हणून महाराष्ट्रात मोठी ओळख त्यांची आहे. संजय ऐलवाड यांचे पिंटुची आकाशवारी, भित्रा थेंब, बिबट्याचे पिल्लू (बालकथा) मुलाफुलांची गाणी (बालकविता), वारूळ (बालकादंबरी) प्रकाशित झाले असून पुणे येथे केसरी वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून काम करतात. बालकांच्या मानसिकतेचा विचार करुन अर्थगर्भीत आणि चेतनायुक्त कविता संजय ऐलवाड यांच्या आहेत. दत्तप्रसाद झवतर “जंगलाची शाळा”, पळा रे पळा देवा मला पाव (बालकविता), निवृत्ती शिंदे जाईन सदैव पुढेच, वाघोबांची शाळा (बालकविता), नागनाथ कलवले “झोपडी”, भास्कर बडे आंजीमाय (बालकादंबरी), प्रकाश घादगीने “नक्कल पडली महाग, गोप्याची दोस्त मंडळी(बालकथा) श्रीराम गुंदेकर ढगांची तहान, रसुल पठाण निसर्गाशी जुळवू नाते (बाल कविता) सुबोध, सरळ भाषाशैली, कृतीयुक्त शब्द रचना अर्थपूर्ण आशय आणि सामर्थ्य प्रसन्नता रसुल पठाण यांच्या कवितेला लाभलेली दिसते.
धनंजय गुडसुरकर चिवचिवाट (बालकविता), बाबा आमटे यांच्या जीवनावर शालेय मुलांसाठी 150 हून अधिक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. बालाजी बिरादार कावळ्याची शाळा (बालकविता) नंदकुमार बालुरे माय (बालकादंबरी), अनंत कदम अ. आईचे (बालकविता) प्रकाशित असून वाचक संवाद ही चळवळ सातत्याने ते घेतात. त्यांचा वाचक संवाद हा कार्यक्रम दखलपात्र ठरणारा आहे.
डॉ. हंसराज वैद्य पक्षांची झाली फुले, राजाई (बालकविता) लोहारा ही जन्मभूमी असून नांदेड येथे व्यवसायाने ते डॉक्टर आहेत. त्यांची काही बालगीते प्रसिद्ध गायकांनी स्वरबद्ध केलेली आहेत. अंकुश सिंदगीकर हसरी फुलं (बालकथा), सुगंध माझ्या मातीचा(बालकविता), मुरहारी कराड चांदोबाच्या घरी, नव्या जगातील मुले (बालकविता), अनिता येलमटे घे भरारी असे साहित्य आहेत. स्मिता मेहकरकर स्वच्छतेचे पाईकआम्ही (बालकविता) प्रकाशित असून मनोरंजन आणि परिवर्तन यांचा सुरेख संगम करून प्रसाद युक्त आणि ओजस्वीतेने काव्याला स्मिता मेहकरकर यांनी फुलविले आहे. शंकर बोईनवाड यांचा चिवचिव चिमणी कोल्हेवाडीचा बाजार (बालकाव्य) प्रकाशित झालेली आहेत.
ऋषीकेश गुजलवार येरे येरे पावसा (बालकविता) प्रतीक्षा लोहकरे वडील समजून घेताना (बालकविता), ताजोद्यीन पठाण शाळेतील दिवस (बालकादंबरी), चंद्रदीप नादरगे पानाफुलांच्या दुनियेत, बालमित्र हे बालकविता संग्रह इत्यादी साहित्यिक लेखन करतात.
बालकांच्या मनावर उत्तम संस्कार व्हावा, त्यांची मने प्रज्वलित व्हावी. उद्याचा उत्तम युवा नागरिक बनावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मनोरंजनातून प्रबोधन कसे करता येईल ? मुलांच्या मनात वाचनाची गोडी कशी निर्माण होईल, म्हणून या जिल्ह्यात बालकांसाठी काही सांस्कृतिक चळवळी निर्माण झाल्या. 1990 पूर्वी उदगीर येथील विद्यावर्धिनी विद्यालयात नि.म.वडगावकर यांनी बालकुमार साहित्य संमेलन दत्ता ससे यांच्या अध्यक्षतेखाली घेतले. यावेळी बाबा भांड, महावीर जोंधळे, भालचंद्र देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. तर बालकांसाठी श्यामलाल विद्यालयात अखिल भारतीय साने गुरुजी कथा मालेचे अधिवेशन घेण्यात आले. चंद्रशेखर धर्माधिकारी या अधिवेशनाचे उद्घाटक होते. 2001 ला रमेश चिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथे बालकुमार साहित्य प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. शाळेत जाऊन कविसंमेलनाचा उपक्रम राबविला गेला. या प्रतिष्ठानांतर्गत बालसाहित्यिकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुण्याची शाखा रामदास केदार यांच्या अध्यक्षतेखाली उदगीरात स्थापन झाली. या संस्थेंतर्गत लाल बहादूर शास्त्री विद्यालयात विभागीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन घेण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष स्वाती राजे, प्रसाद अक्कानूर, तत्कालीन राज्यमंत्री संजय बनसोडे तर समारोप कवीवर्य इंद्रजीत भालेराव, केंद्रीय कार्यकारीणी मसापचे सदस्य रामचंद्र तिरुके होते. भव्यदिव्य असे बालकांसाठीचे संमेलन घेण्यात आले. बालसाहित्य लेखकांचा पुरस्कार देऊन ही संस्था सन्मान करते.
ज्ञान विज्ञान- तंत्रज्ञानाने प्रगती करुन यशांचे उंच शिखर गाठत असलो तरी या धावत्या वेगात मुलांचे बालपण आपण हरवून बसलो. आनंदाने खेळणारी मुले पेन, वही आणि सुंदर अक्षरांपेक्षा मोबाईलच्या स्क्रीनवर खूप प्रेम करतो आहे. मुले हसण्यापेक्षा चिडचिड स्वभावाची होत आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी मुलांचे वय आणि मन लक्षात घेऊन शाळा परिसर आणि निसर्गाशी त्यांचे नाते जोडले पाहिजे. आनंददायी शिक्षणाची गरज आहे. धास्तीच्या धडयांपेक्षा शिस्तीचे धडे खूप महत्वाचे आहेत. नाहीतर ही कोमलमनांची बालके सतत तणावात राहून अनेक मनोविकृतीला बळी पडतील. म्हणून आज अशा बालकुमार मेळाव्याची गरज आहे.
- प्रा.रामदास केदार, शिवाजी महाविद्यालय , वाढवणा (उदगीर, जि. लातूर)
मो.क्रं.9850367185
पुनर्मुद्रित लेख : 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अश्मक स्मरणीकेतून साभार
000000000000000000000
No comments:
Post a Comment