Wednesday, August 4, 2021

 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेतील 

पात्र शेतकऱ्यांनी त्वरीत आधार प्रमाणिकरण करावे

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांपैकी अजूनही 6 हजार 480 शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण करुन घेतले नाहीत. यामुळे त्यांना या योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी तात्काळ नजिकच्या सेवा केंद्राला भेट देऊन प्राधान्याने हे काम करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसिलदारांनी संबंधित बँक, उपनिबंधक यांच्याशी संपर्क साधून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेबाबत आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. या बैठकीसाठी जिल्हा उपनिबंधक अनिल चव्हाण व जिल्ह्यातील सर्व संबंधित बँक अधिकारी उपस्थित होते. 

जिल्ह्यात 2 लाख 9 हजार 99 पात्र शेतकऱ्यांनी आपली माहिती बँकांद्वारे पोर्टलवर अपलोड केली आहे. यातील 1 लाख 87 हजार 521 शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण केले असून उर्वरीत 6 हजार 480 शेतकऱ्यांनी अद्यापही आपले आधार प्रमाणिकरण केले नाही.  

बँकांनीही अधिकाधिक सकारात्मक दृष्टिकोण घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. आजही जे पात्र शेतकरी आहेत त्यांना कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी व निवेदन आमच्या कार्यालयाला प्राप्त होतात. संबंधित बँक अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन पात्र शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ वेळेवर न दिल्यास त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, उपनिबंधक यांनी सहभाग घेतला. 

00000

 

नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 8 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 784 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 195 एवढी झाली असून यातील 87 हजार 497 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 43 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 8 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 8 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 43 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, किनवट कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 34 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 67 हजार 925

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 65 हजार 724

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 195

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 497

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-31

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-43

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

00000

 

जिल्ह्यातील 79 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 79 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. गुरुवार 5 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाण हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 18 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर स्त्री रुग्णालयात कोविशील्ड लसीचे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.  

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, कंधार, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 13 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय मांडवी या केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.   

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर ग्रामीण भागातील 32 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 12 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे 50 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 3 ऑगस्ट पर्यंत एकुण 8 लाख 36 हजार 630 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 4 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 63 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 9 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 8 लाख 72 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.00000

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा सुधारित नांदेड दौरा

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा सुधारित नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

गुरुवार 5 ऑगस्ट 2021 रोजी मुंबई येथून सकाळी 10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.05 वा. नांदेड विमानतळ येथून वाहनाने प्रशासकिय भवन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. विद्यापिठ येथे आगमन. सकाळी 10.30 वा. विद्यापीठ संदर्भातील दृकश्राव्य सादरीकरणासाठी राखीव. सकाळी 10.45 वा. विद्यापीठ परिसरातील पावसाच्या पाण्याच्या पूनर्भरण उपक्रमाच्या पाहणीसाठी प्रस्थान. सकाळी 10.47 वा. ते 11.10 वाजेपर्यंत विद्यापीठातील विविध पूनर्भरण  उपक्रमांच्या ठिकाणी भेट व पाहणी आणि विद्यापीठातील श्री गुरु गोबिंद सिंघजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्रीय इमारतीबाबत आढावा. सकाळी 11.10 वा. विद्यापीठातील जल पूनर्भरण उपक्रमांची पाहणी. सकाळी 11.12 वा. विद्यापीठ परिसरातील अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृह इमारत येथे आगमन. सकाळी 11.12 ते 11.17 पर्यंत अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन. सकाळी 11.17 वा. विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतीगृहाकडे प्रयाण. सकाळी 11.19 वा. मुलांचे वसतीगृह येथे आगमन. सकाळी 11.19 ते 11.24 वाजेपर्यंत विद्यापीठ परिसरातील अल्पसंख्यांक मुलांच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन. सकाळी 11.24 वा. अल्पसंख्यांक मुलांचे वसतीगृह येथून प्रस्थान. सकाळी 11.26 वा. विद्यापीठातील बॉटनिकल आणि बायोडायर्व्हसिटी पार्ककडे प्रस्थान व दुपारी 12 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 12 वा. येथून विद्यापीठातील विश्रामगृहाकडे प्रस्थान व दुपारी 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 वा. विद्यापीठातील विश्रामगृह येथून नांदेड शहरातील तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराकडे प्रयाण व दुपारी 2.15 वा. आगमन. दुपारी 2.15 ते 3 वाजेपर्यंत तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथील प्रशासकिय प्रमुखांसमवेत बैठक व राखीव. दुपारी 3 वा. वाजता येथून तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथून प्रयाण. दुपारी 3.10 वा. विश्रामगृह नांदेड येथे आगमन. शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील कार्यालय प्रमुखासमवेत बैठकीसाठी  राखीव. बैठकीनंतर नांदेड येथे शासकीय विश्रामगृहात मुक्काम. 

शुक्रवार 6 ऑगस्ट 2021 रोजी शासकिय विश्रामगृह नांदेड येथून सकाळी 9 वा. वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण करतील. 

शनिवार 7 ऑगस्ट 2021 रोजी परभणी येथून वाहनाने दुपारी 3 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 3.15 वा. नांदेड विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

000000


 

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथीलता 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमीत केलेल्या आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन काही प्रमाणात शिथीलता दिली आहे. जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता 26 जून रोजीच्या आदेशानुसार लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करुन शासनाच्या पुढील आदेशापर्यंत  3 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सेवाचा तपशिल व निश्चित करण्यात आलेल्या वेळा पुढीलप्रमाणे राहतील.   

सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा- सर्व अत्यावश्यक व अत्याश्यक नसलेली (शॉपींग मॉल सहीत) हे दररोज रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहतील व शनिवार दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहतील (अत्यावश्यक दुकाने वगळून) रविवारी बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणे आणि खुली मैदाने- व्यायम, चालणे, जॉगींग आणि सायकलींग यासाठी चालू राहतील. सर्व शासकीय कार्यालये व खाजगी कार्यालये- पुर्ण क्षमतेने चालू राहतील. प्रवासाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची होणारी गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन कामाचे तास नियंत्रीत करावे. ज्या कार्यालयांची कामे वर्क फार्म होम पध्दतीने चालू आहेत ते त्याप्रमाणेच राहतील. सर्व कृषी विषयक, बांधकामे, औद्योगिक कारखाने, वाहतूक तसेच माल वाहतूक संबंधीत कामे- पुर्ण क्षमतेने सुरू राहतील. व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर्स, स्पा, योगा सेंटर्स- 50 टक्के क्षमतेसह पूर्वसूचना देऊन वेळ निश्चित केलेल्यासाठीच सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत, शनिवार दुपारी 3 वाजेपर्यंत आणि रविवार पुर्णपणे बंद राहतील. एसी, वातानुकुलिन यंत्रणा चालू ठेवण्यास मुभा असणार नाही. सिनेमा हॉल, थिएटर, ड्रामा थिएटर, नाटयगृह, मल्टी प्लेक्स (स्वेतंत्र तसेच मॉल्स मधील)- पुढील आदेशापर्यंत पुर्णपणे बंद राहतील. सर्व प्रार्थना स्थळे- पुढील आदेशापर्यंत पुर्णपणे बंद राहतील. शाळा व महाविद्यालये- राज्य शिक्षण विभागाचे तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे आदेश लागू राहतील. रेस्टॉरंटस- कोविड-19 च्या नियमाचे पालन करण्याच्या अटीसह 50 टक्के क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. सायंकाळी 4 नंतर पार्सल सेवा सुरु राहील. जमावबंदी, संचारबंदी- रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत वैध कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई असेल. वाढदिवस कार्यक्रम, राजकीय, सामाजीक व सांस्कृ तिक कार्यक्रम, निवडणुका, निवडणूक प्रचार, रॅलीज, निषेध मोर्चे- यापुर्वीचे निर्बंध कायम राहतील.


कोविड-19 च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय

मास्करचा वापर, शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक सामाजिक अंतर ईत्याकदीचे पालन नागरीक काटेकोरपणे करतील. या उपायाचे पालन न करणारे नागरीक भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्तीअ व्यरवस्थापन अधिनियम 2005, मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. आदेशात नमुद नसलेल्या बाबी यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे निर्बंधीत राहतील. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गटविकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत मुख्याधिकारी यांची राहिल. या आदेशाची अंमलबजावणी करताना सद्भावनेने केलेल्या, कृत्यांसाठी कोणत्यांही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, तहसिलदार यांची राहिल.

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या मधील तरतुदीनुसार संदर्भात नमूद अधिसूचना 14 मार्च 2020 अन्व‍ये प्रादुर्भाव रोखण्यांसाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यात करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन जिल्हादंडाधिकारी यांना घोषित केले आहे. हा आदेश 3 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केला आहे.

00000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...