Monday, July 6, 2020


वृत्त क्र. 616   
फळबाग लागवड करुन उत्पन्न वाढवा
-         खासदार प्रताप पाटील चिखलीकर 
नांदेड (जिमाका) दि. 6 :- कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत जिल्ह्यात 1 ते 7 जुलै यादरम्यान कृषी संजीवनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील गावात कृषी योजनांचा जागर सुरू आहे. यामध्ये उत्पादन  तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती  मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जाते आहे.

रविवार 5 जुलै रोजी कंधार तालुक्यात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या उपस्थितीत चिखली येथे फळबाग लागवडीचा शुभारंभ व जलपुजन करण्यात आले. यावेळी चिखलीचे सरपंच श्रीमती ललीताबाई चिखलीकर, संतोष क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, बारूळ मंडळ कृषी अधिकारी आर. एम. भुरेकृषी पर्यवेक्षक बालाजी डफडेकृषी सहाय्यक सौ. उज्वला देशमुखपरमेश्वर मोरेगोविंद तोटावाड, एम. एम. राठोड, गोगदरेशेतकरी प्रकाश तोटावाड, सतीश पवळेमाजी सरपंच पांचाळयांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

कंधार तालुक्यात आज अखेर कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत तालुक्यातील 85 गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कंधार तालुक्यातील पानभोसी, बहादरपुरा, शिरढोण, आलेगाव, हाळदा, चिंचोली प क येलूर, अंबुलगा, उस्माननगर, लाठ खू,  फुलवळ,  पानशेवडी, बारुळ या गावासह एकूण 85 गावात हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात गावातील सरपंच, प्रगतशील शेतकरी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शेतकरी बैठका  घेऊन विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. विविध गावांना भेटी देत शेतकऱ्यांना पीक  उत्पन्नावाढीच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे.
तालुक्यातील विविध गावात मंडळ कृषी अधिकारी पवनसिंह बैनाडे, विकास नारळीकरआर. एम. भुरे,  कृषी पर्यवेक्षक रोहीणी पवारआत्माराम धुळगुंडेअहेमद खॉ पठाण, बालाजी डफडेसंभाजी डावळेदत्ता रामरूपे यांच्यासह कृषी सहाय्यक सोपान उबाळेपरमेश्वर मोरेशिवाजी सूर्यवंशीसुनील देशमुख,  गोविंद तोटावाडमाधव गुट्टे, कल्पना जाधवभूषण पेटकर, एन. बी.  कुंभारे, गजानन सूर्यवंशीसंतोष वाघमारेजी. एम. कळणे यांच्यासह तालुक्यातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गाव बैठका घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहितीशेतकऱ्यांना मार्गदर्शनरुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड एकात्मिक किड रोग व्यवस्थापन एकात्मिक खत व्यवस्थापन, लिंबोळी अर्क तयार करणेसोयाबीन उगवण यासह पिक विमा राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना, ठिबक सिंचनकृषी यांत्रिकीकरण फळबाग लागवडशेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजना याबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात येत आहे. गावा-गावात माहितीपत्रके शेतकरी मासिके देऊन नवीन वर्गणीदार करून घेण्यासाठी माहिती दिली. कंधार अंतर्गत प्रचार वाहन व त्यावर  ध्वनिक्षेपक लावून  गावोगावी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्यातील संपूर्ण गावात जनजागृती करून कार्यक्रम घेण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, पोखर्णी तसेच  कापूस संशोधन केंद्र नांदेड येथील शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
00000







वृत्त क्र. 615   

कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
नांदेड (जिमाका) दि. 6 :- कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत जिल्ह्यात 1 ते 7 जुलै यादरम्यान कृषी संजीवनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील गावात कृषी योजनांचा जागर सुरू आहे. यामध्ये तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मार्गदर्शन फळबाग लागवड कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. याअंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी रविवार 5 जुलै रोजी कंधार तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधला.  

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत उस्माननगर येथील बालाजी मारोती गाडे  यांच्या शेतातील आंबा फळबाग लागवडीची पाहणी केली. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या 5 शेडनेटचे उद्घाटन करण्यात आले. या शेडनेटमध्ये यावर्षीपासून भाजीपाला बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. यावेळी संतोष गव्हारे, विष्णु इंगोले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सोबत तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, कृषी पर्यवेक्षक बालाजी डफडे, कृषी सहाय्यक सोपान उबाळे यांची उपस्थिती होती.
हळदा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत लागवड केलेल्या यशवंतराव शिंदे, राजू पटलेवाड यांच्या मोसंबी या फळपिकाची पाहणी करण्यात आली. मौजे भूकमारी येथे सामूहिक शेततळ्यातील पाण्याचे जलपूजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चलवदे यांच्या हस्ते करण्यात आले. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत राहुल कोळंबीकरमिलींद कोळंबीकर यांनी लागवड केलेल्या पेरू आंबा डाळिंब सीताफळ या फळपिकांची पाहणी व लागवड करण्यात आली. ठिबक सिंचन, कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत औजारे यांची पाहणी त्यांनी केली.
00000












कोरोनातून 13 व्यक्ती बरे
तर 14 व्यक्ती बाधित
नांदेड (जिमाका) दि. 6 :- कोरोना आजारातून आज 13 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 4 बाधित व्यक्ती, तसेच औरंगाबाद येथे संदर्भित झालेला 9 बाधित व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण  334 व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत.  आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्यू व्यक्तीची संख्या 20 एवढी झाली आहे. 
सोमवार 6 जुलै रोजी प्राप्त झालेल्या 140 अहवालापैकी 112 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. तसेच 14 बाधित व्यक्ती पॉझिटिव्ह आढल्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तींची संख्या 442 एवढी झाली आहे. यात देगलूर नाका मोसिन कॉलनी येथील 20 वर्षाचा 1 पुरुष व 16 वर्षाची 1 महिला. शामनगर येथील 20 वर्षाची 1 महिला व 50 वर्षाचा 1 पुरुष. श्रीनगर येथील 49 वर्षाची 1 महिला, नांदेड विष्णुनगर येथील 29 वर्षाचे 2 पुरुष. किनवट येथील 45 वर्षाचा 1 पुरुष. हिमायतनगर वनारसी गल्ली येथील 41 वर्षाचा 1 पुरुष. नायगाव बोमनाळे गल्ली येथील 54 वर्षाचा 1 पुरुष. मुखेड तगलीन गल्ली येथील 65 वर्षाचा 1 पुरुष. देगलूर नाथनगर येथील 35 वर्षाचा 1 पुरुष. मुखेड येथील 74 वर्षाचा 1 पुरुष. हिंगोली मस्तानशहा नगर येथील 22 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे.
आतापर्यंत 442 बाधितांपैकी 334 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 88 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 12 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 6 महिला व 6 पुरुष बाधिताचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 88  बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 40 बाधित, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 34 बाधित तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 2,  हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे 4, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 2, हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2 बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 1 बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तर 2 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. सोमवार 6 जूलै रोजी 186 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 323,
घेतलेले स्वॅब- 7 हजार 98,
निगेटिव्ह स्वॅब- 6 हजार 13,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 14,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 442,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 14,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 20,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 334,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 88,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 186 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


वृत्त क्र. 613
नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 9.06 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यात 6 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 9.06 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 144.92 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 211.46 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 23.72 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 6 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 0.13 (213.30), मुदखेड- निरंक (128.00), अर्धापूर- 0.67 (140.67) भोकर- 7.25 (229.98), उमरी- 2.00 (181.00), कंधार- 3.83 (138.17), लोहा- 2.50 (203.66), किनवट- 25.00 (200.09), माहूर- 10.50 (191.25), हदगाव- 15.86 (219.43), हिमायतनगर-39.67 (414.33), देगलूर- 6.17 (183.44), बिलोली- 10.20 (225.00), धर्माबाद- 13.00 (268.65), नायगाव- 5.00 (206.80), मुखेड- 3.14 (239.55). आज अखेर पावसाची सरासरी 211.46 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 3383.32) मिलीमीटर आहे.
                                                                       00000



वृत्त क्र. 612   
 दिव्यांगापर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी
दिव्यांग मित्र ॲप” मोलाची उपलब्धी
-         पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड (जिमाका) दि. 6 :- समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या दिव्यांगाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे दिव्यांगापर्यंत पोहचविण्यासाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या “दिव्यांग मित्र ॲपची मोलाची मदत होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात या ॲपचे ऑनलाईन उद्घाटन पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी  जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती ॲड. रामराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अभिनव गोयल, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.  यशवंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या दिव्यांग मित्र ॲपमध्ये  दिव्यांग व्यक्तींना आपली नोंदणी करुन विविध योजनांची माहिती त्यांना घेता येणार आहे. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती या ॲपवरुन मिळणार आहे.  शासनाकडून पाठविण्यात आलेल्या सूचना अथवा संदेश या ॲपद्वारे पाहता येतील. दिव्यांगानी या ॲपद्वारे सोप्या पध्दतीने आपली नोंदणी करुन स्वत:चे नाव, स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक,  आधार क्रमांकासह इतर माहिती भरणे आवश्यक आहे. माहिती नोंदणी झाल्यावर ती डॅशबोर्डवर दिसते. यामध्ये आर्थिक, वैयक्तिक माहिती, स्वत:ची कागदपत्रांच्या माहितीची नोंदणी करणे आवश्यक आहे.  पुर्ण माहिती भरल्यानंतर समाजकल्याण अधिकारी सदर माहिती पडताळणी करुन अप्रु करतात. दिव्यांग व्यक्तीची डॅशबोर्डवरुन बँकेची, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी माहिती घेतली जाते.
         दिव्यांग मित्र ॲपद्वारे अगदी सोप्या पद्धतीने स्वत:चे सेल्फी छायाचित्र, आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, वयाचा दाखला आदि माहिती भरता येणे शक्य आहे. या ॲपद्वारे विविध योजनेची अंतर्गत मदत शासनाकडून दिली जाऊ शकते. जिल्हा परिषदेकडून दिव्यांग व्यक्तीला ॲपच्या माध्यमातून दिव्यांग यादी, मदतीची विनंती यादी, शासकीय योजनेची यादी डॅशबोर्डवर पाहता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
                                                                 00000


जिल्हा विकास योजनेत सर्वाधिक प्राधान्य
जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी
- पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यातील विविध विकास कामांमध्ये आता अधिक प्राधान्य हे स्वाभाविकच आरोग्याला देणे अत्यावश्यक झाले आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजनेत सर्वाधिक प्राधान्य हे आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर असल्याचे सुतोवाच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
येत्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेंतर्गत 103.95 कोटी रुपयांची सुधारीत तरतूद असून यात जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकटीकरण, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी 41.54 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 5 कोटी 28 लक्ष 66 हजार रुपये एवढा निधी किनवट आणि माहूर तालुक्यातील आदिवासी भागात आरोग्य सेवा बळकटी करणासाठी खर्च करण्यात येणार आहे. 
यातून जिल्ह्यातील जनतेला अधिकाधिक शासकिय आरोग्य सुविधा कशा उपलब्ध करुन देता येतील यावर आमचा भर असल्याचे ते म्हणाले. नव्याने उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक सुविधा या अधिकाधिक चांगल्या गुणवत्तेच्या कशा निर्माण करता येतील, याचा ध्यास संबंधित विभाग प्रमुखांनी घेतला पाहिजे. शासकिय निधीतून होणाऱ्या या कामांच्या गुणवत्तेत कोणतीही त्रुटी राहता कामा नये याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.   
आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 ची आढावा बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे सभापती ॲड रामराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. अभिनव गोयल, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.  यशवंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध तालुक्यात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले. आजच्या घडिला ज्या काही वैद्यकिय सेवा-सुविधा उपलब्ध आहेत त्यात स्वच्छतेचा भाग खूप महत्वपूर्ण आहे. नागरिकांच्या बहुसंख्य तक्रारी या शासकिय दवाखाण्यातील स्वच्छतेशी निगडित आहेत. कोणत्याही रुग्णाला दवाखान्यातील वातावरण अधिक परिणाम करणारे असते, हे लक्षात घेऊन दवाखान्यातील स्वच्छता आणि वार्डाची रचना ही अधिकाधिक कशी चांगली होईल यावर संबंधित विभाग प्रमुखांनी अधिक लक्ष दिले पाहिजे.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील कचरा व्यवस्थापन आणि तेथील घाण पाण्याचा प्रश्न अधिक आव्हानात्मक आहे. याबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. येथील अस्वच्छतेच्या अनेक तक्रारी येत असून याची योग्य खबरदारी घेण्याचे निर्देश अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. महानगरपालिका व वैद्यकिय महाविद्यालय यांनी एकत्र बसून येथील अस्वच्छ पाणी व्यवस्थापन व इतर बाबीबाबत त्वरीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आयुष अंतर्गत विविध उपाय योजना महत्वाच्या आहेत. नांदेड येथील शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयाची उपलब्धी लक्षात घेता आयुर्वेदाच्या दृष्टिनेही जन आरोग्य सुविधेवर लक्ष केंद्रीत केले आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयाची इमारत व इतर सुविधांची स्थिती पाहता यात लवकरच कायापालट करू, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सूचित केले. बारड येथे आयुर्वेदिक महाविद्यालयाअंतर्गत असलेल्या 100 एकर जमिनीवर आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची अधिक चांगल्या प्रकारे लागवड करण्यासाठी कृषि विभागातील एका अधिकाऱ्याकडे याचे नियोजन सुपूर्द करण्याबाबतचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...