Tuesday, September 7, 2021

 नांदेड जिल्ह्यात 9 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 789 अहवालापैकी 9 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 9 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 768 एवढी झाली असून यातील 88 हजार 80 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 26 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 662 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 7, नांदेड ग्रामीण 1, लोहा 1  तर ॲटीजन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 9 बाधित आढळले.

आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, लोहा तालुक्यातर्गत 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 26 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 8, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 13, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 4 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 128, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत.

 जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 16 हजार 936

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 13 हजार 830

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 768

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 80

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 662

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-26

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. बुधवार 8 सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस लस उपलब्ध करुन दिले आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर,हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर हदगाव, गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत.

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 6 सप्टेंबर 2021 पर्यंत एकुण 10 लाख 89 हजार 781 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 7 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 9 लाख 67 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 88 हजार 160 डोस याप्रमाणे एकुण 12 लाख 55 हजार 190 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणी सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 जिल्ह्यातील प्रकल्प साठ्याच्या पाणी पातळीत वाढ ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 7 :- आज 7 सप्टेंबर 2021 रोजी निम्न दुधना प्रकल्पातून 4 हजार 320 क्युसेस विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव या मोठया प्रकल्पातून 97 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. पुर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिध्देश्वर पाणलोट क्षेत्रात पूर्णा नदीत 6 हजार 242 क्युसेस विसर्ग सुरु आहे. सिध्देश्वर धरणाखाली मोठया प्रमाणावर पाऊस झाल्याने पुर्णा पुलाजवळ 76 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. या सर्व नद्याचे पाणी गोदावरी नदीला मिळते. पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने विसर्गात वाढ होत आहे. सद्यस्थितीत नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण सुध्दा 100 टक्के भरले असून तेथून 3 लाख 6 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. पोचमपाड प्रकल्प धरल्याने गोदावरी नदीत फुगवटा निर्माण होतो. 

विष्णुपुरी प्रकल्पाच्या 12 दरवाज्यातून 1 लाख 72 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे. नदीमधून येणारा येवा जास्त असला तरी विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील व विसर्ग नियंत्रित केला जाईल. तथापि संततधार पावसामूळे येव्यात मोठया प्रमाणात वाढ होत आहे.

सध्या जुन्या पुलावर पाणीपातळी 351.10 मिटर आहे. इशारा पातळी 351 मिटर, तर धोका पातळी 354 मिटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2 लाख 13 हजार क्युसेस व धोका पातळीचा विसर्ग 3 लाख 9 हजार 774 क्युसेस आहे. 

विष्णुपुरी प्रकल्पातून सोडलेला विसर्ग व शहरात सुरु असलेल्या संततधार पावसामूळे पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. त्यामूळे शहरातील नदी काठच्या सर्व नागरीकांना अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. उर्ध्व मानार प्रकल्प व निम्न मानार प्रकल्पही 100 टक्के भरले असल्याने त्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस / अतिवृष्टी झाल्याने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. उर्ध्व मानार प्रकल्पातून आज सायंकाळी 4 वाजता 25 हजार क्युसेसने पाणी नदीपात्रात सोडले आहे. उर्ध्व पैनगंगा धरण 91 टक्के भरल्याने धरण्याच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास तेथील दरवाजे उघडुन पाणी सोडण्यात येईल. गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार, नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे व वेळोवेळी सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची माहिती जलसंपदा विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या दु. क्र. 02462 263870 या क्रमांकावर उपलब्ध होईल, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता स.को.सब्बीनवार यांनी केले आहे.

000000

 इसापूर धरणात 90.10 टक्के पाणीसाठा पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मंगळवार 7 सप्टेंबर रोजी इसापूर धरण 90.10 टक्के भरले आहे. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांनी आपली जनावरे, घरगुती व शेती उपयोगी वस्तूसह स्वत: सुरक्षित स्थळी रहावे, असे आवाहन नांदेडचे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 कार्यकारी अभियंता अ.बा.जगताप यांनी केले आहे. 

इसापूर धरणाची पाणी पातळी 439.98 मी. एवढी असून इसापूर धरणाचा जलाशय प्रचलन आराखडा मंजूर आहे. पाण्याचा येवा पाहता इसापूर धरणाचा मंजूर जलाशय प्रचलन आराखडा (आरओएस) (90 टक्के विश्वासाहर्ता) नुसार 15 सप्टेंबर 2021 पर्यंत 440.85 मी. ठेवावी लागणार आहे. धरण सुरक्षिततेच्यादृष्टिने इसापूर धरणातून वक्रदारद्वारे कोणत्याही क्षणी धरणात येणारे अतिरिक्त पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडवे लागेल. यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 कार्यकारी अभियंता अ.बा.जगताप यांनी कळविले आहे.

00000

 संततधार पावसाने नांदेड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी

नांदेड जिल्हा मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन 

नांदेड, (जिमाका) दि. 7 :- नांदेड जिल्ह्यात गत काही दिवसांपासून पाऊसाचे प्रमाण वाढल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढल्याने आज 7 सप्टेंबर रोजी 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदी पात्रातील वाहते पाणी, जिल्ह्यातील विविध तालुक्यात झालेली संततधार यामुळे लहान मोठ्या नदी-नाल्यांना आज पूर आल्याने अनेक ठिकाणची वाहतुक खोळंबली तर नदीकाठच्या काही सखल भागात पाणी शिरले. जिल्ह्यातील संभाव्य‍ परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला सज्जतेच्या सूचना देऊन लोकांपर्यंत सर्वतोपरी सहकार्य पोहचविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे प्रत्यक्ष विविध ठिकाणी भेट देऊन प्रशासनाला सूचना देत असून संपुर्ण परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. त्यांनी आज देगलूर, लोहा, मुखेड, कंधार, नायगाव, नांदेड, बिलोली तालुक्यातील परिस्थितीची पाहणी करुन संबंधित यंत्रणांना सूचना करुन मदत कार्याला गतीमान केले.    

मेथी येथील यादव जळबा हिवराळे हे 52 वर्षाचे पुरुष वाहून गेल्याने त्यांचे शोधकार्य सुरु असल्याची माहिती मुखेड तहसिलदार यांनी दिली आहे. मुखेड-कौठा रोडवरील नाल्याच्या पुलावरुन माजी आमदार किशनराव राठोड यांचे पुत्र भगवान राठोड व त्यांचा मुलगा संदिप राठोड हे आपल्या चारचाकी वाहनात वाहून गेले. ते मुखेडकडे येत होते. त्यांच्यासोबत असलेला त्यांचा सेवक उद्धव देवकते हा सुखरुप बाहेर पडल्याची माहिती देगलूर उपविभागीय अधिकारी  शक्ती कदम यांनी दिली. 

दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री अचानक पाऊसाचा जोर वाढल्यामुळे नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे एक व्यक्ती पुरात अडकली होती. या व्यक्तीची प्रशासनामार्फत सुखरुप मुक्तता करण्यात आली. मुखेड तालुक्यातील मोतिनाल्यात एक व्यक्ती अडकला होता. या व्यक्तीचीही सुखरुप मुक्तता करण्यात आली आहे. याचबरोबर बाऱ्हाळी, थोटवाडी नाल्यात 3 व्यक्ती अडकले असून  त्यांना सुखरुप काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. 

नरसी-देगलूर व नरसी-बिलोली या महामार्गावर दुपारी 1.30 वाजल्यापासून वाहतूक बंद झाल्याचे बिलोली तहसीलदार यांनी कळविले. अर्धापूर तालुक्यातील शेलगाव (बु) व सांगवी या गावाचा दुपारी 3.15 पासून तात्पुरता संपर्क तुटला आहे. देगलूर तालुक्यातील लाखा, तपशेलगाव, सुगाव, मनसकरगा या गावाचा दुपारी 3.30 पासून संपर्क तुटला आहे. बिलोली तालुक्यातील आरळी, अटकळी, दुगाव, कासराळी, लघुळ या गावातील कुटुंबे तात्पुरती स्थलांतरीत करण्यात आली आहेत. याचबरोबर लोहगाव येथील लघुपाटबंधारे विभागांतर्गत जिल्हा परिषदेचा तलाव, कंधार तालुक्यातील गनातांडा, पानशेवडी येथील तळे फुटल्या बाबत संबंधित तहसिलदाराने कळविले आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील संतोष सुर्यवंशी यांचे दोन बैल 6 सप्टेंबरला वीज पडून मयत झाल्याबाबत संबंधित तहसिलदार यांनी कळविले आहे. कंधार तालुक्यातील कवठा येथील मारोती घोरपे यांची एक म्हैस पुरात वाहून मयत झाली आहे. बिलोली तालुक्यातील सावळी येथे आज एक गाय, एक वासरू पुरात वाहून मयत झाल्याची माहिती संबंधित तहसिलदार यांनी दिली आहे. 

जिल्हा प्रशासनातर्फे पूरसदृश्य परिस्थितीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्हा मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यात जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार विजय अवधाने, नायब तहसिलदार राजेश लांडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपअभियंता गावंडे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता निळकंठ गव्हाने, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता महेश गट्टुवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरमीटवार यांचा समावेश आहे.

0000

 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...