Tuesday, September 7, 2021

 जिल्ह्यातील प्रकल्प साठ्याच्या पाणी पातळीत वाढ ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 7 :- आज 7 सप्टेंबर 2021 रोजी निम्न दुधना प्रकल्पातून 4 हजार 320 क्युसेस विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव या मोठया प्रकल्पातून 97 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. पुर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिध्देश्वर पाणलोट क्षेत्रात पूर्णा नदीत 6 हजार 242 क्युसेस विसर्ग सुरु आहे. सिध्देश्वर धरणाखाली मोठया प्रमाणावर पाऊस झाल्याने पुर्णा पुलाजवळ 76 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. या सर्व नद्याचे पाणी गोदावरी नदीला मिळते. पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने विसर्गात वाढ होत आहे. सद्यस्थितीत नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण सुध्दा 100 टक्के भरले असून तेथून 3 लाख 6 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. पोचमपाड प्रकल्प धरल्याने गोदावरी नदीत फुगवटा निर्माण होतो. 

विष्णुपुरी प्रकल्पाच्या 12 दरवाज्यातून 1 लाख 72 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे. नदीमधून येणारा येवा जास्त असला तरी विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील व विसर्ग नियंत्रित केला जाईल. तथापि संततधार पावसामूळे येव्यात मोठया प्रमाणात वाढ होत आहे.

सध्या जुन्या पुलावर पाणीपातळी 351.10 मिटर आहे. इशारा पातळी 351 मिटर, तर धोका पातळी 354 मिटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2 लाख 13 हजार क्युसेस व धोका पातळीचा विसर्ग 3 लाख 9 हजार 774 क्युसेस आहे. 

विष्णुपुरी प्रकल्पातून सोडलेला विसर्ग व शहरात सुरु असलेल्या संततधार पावसामूळे पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. त्यामूळे शहरातील नदी काठच्या सर्व नागरीकांना अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. उर्ध्व मानार प्रकल्प व निम्न मानार प्रकल्पही 100 टक्के भरले असल्याने त्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस / अतिवृष्टी झाल्याने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. उर्ध्व मानार प्रकल्पातून आज सायंकाळी 4 वाजता 25 हजार क्युसेसने पाणी नदीपात्रात सोडले आहे. उर्ध्व पैनगंगा धरण 91 टक्के भरल्याने धरण्याच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास तेथील दरवाजे उघडुन पाणी सोडण्यात येईल. गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार, नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे व वेळोवेळी सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची माहिती जलसंपदा विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या दु. क्र. 02462 263870 या क्रमांकावर उपलब्ध होईल, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता स.को.सब्बीनवार यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...