Tuesday, September 7, 2021

 संततधार पावसाने नांदेड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी

नांदेड जिल्हा मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन 

नांदेड, (जिमाका) दि. 7 :- नांदेड जिल्ह्यात गत काही दिवसांपासून पाऊसाचे प्रमाण वाढल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढल्याने आज 7 सप्टेंबर रोजी 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदी पात्रातील वाहते पाणी, जिल्ह्यातील विविध तालुक्यात झालेली संततधार यामुळे लहान मोठ्या नदी-नाल्यांना आज पूर आल्याने अनेक ठिकाणची वाहतुक खोळंबली तर नदीकाठच्या काही सखल भागात पाणी शिरले. जिल्ह्यातील संभाव्य‍ परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला सज्जतेच्या सूचना देऊन लोकांपर्यंत सर्वतोपरी सहकार्य पोहचविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे प्रत्यक्ष विविध ठिकाणी भेट देऊन प्रशासनाला सूचना देत असून संपुर्ण परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. त्यांनी आज देगलूर, लोहा, मुखेड, कंधार, नायगाव, नांदेड, बिलोली तालुक्यातील परिस्थितीची पाहणी करुन संबंधित यंत्रणांना सूचना करुन मदत कार्याला गतीमान केले.    

मेथी येथील यादव जळबा हिवराळे हे 52 वर्षाचे पुरुष वाहून गेल्याने त्यांचे शोधकार्य सुरु असल्याची माहिती मुखेड तहसिलदार यांनी दिली आहे. मुखेड-कौठा रोडवरील नाल्याच्या पुलावरुन माजी आमदार किशनराव राठोड यांचे पुत्र भगवान राठोड व त्यांचा मुलगा संदिप राठोड हे आपल्या चारचाकी वाहनात वाहून गेले. ते मुखेडकडे येत होते. त्यांच्यासोबत असलेला त्यांचा सेवक उद्धव देवकते हा सुखरुप बाहेर पडल्याची माहिती देगलूर उपविभागीय अधिकारी  शक्ती कदम यांनी दिली. 

दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री अचानक पाऊसाचा जोर वाढल्यामुळे नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे एक व्यक्ती पुरात अडकली होती. या व्यक्तीची प्रशासनामार्फत सुखरुप मुक्तता करण्यात आली. मुखेड तालुक्यातील मोतिनाल्यात एक व्यक्ती अडकला होता. या व्यक्तीचीही सुखरुप मुक्तता करण्यात आली आहे. याचबरोबर बाऱ्हाळी, थोटवाडी नाल्यात 3 व्यक्ती अडकले असून  त्यांना सुखरुप काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. 

नरसी-देगलूर व नरसी-बिलोली या महामार्गावर दुपारी 1.30 वाजल्यापासून वाहतूक बंद झाल्याचे बिलोली तहसीलदार यांनी कळविले. अर्धापूर तालुक्यातील शेलगाव (बु) व सांगवी या गावाचा दुपारी 3.15 पासून तात्पुरता संपर्क तुटला आहे. देगलूर तालुक्यातील लाखा, तपशेलगाव, सुगाव, मनसकरगा या गावाचा दुपारी 3.30 पासून संपर्क तुटला आहे. बिलोली तालुक्यातील आरळी, अटकळी, दुगाव, कासराळी, लघुळ या गावातील कुटुंबे तात्पुरती स्थलांतरीत करण्यात आली आहेत. याचबरोबर लोहगाव येथील लघुपाटबंधारे विभागांतर्गत जिल्हा परिषदेचा तलाव, कंधार तालुक्यातील गनातांडा, पानशेवडी येथील तळे फुटल्या बाबत संबंधित तहसिलदाराने कळविले आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील संतोष सुर्यवंशी यांचे दोन बैल 6 सप्टेंबरला वीज पडून मयत झाल्याबाबत संबंधित तहसिलदार यांनी कळविले आहे. कंधार तालुक्यातील कवठा येथील मारोती घोरपे यांची एक म्हैस पुरात वाहून मयत झाली आहे. बिलोली तालुक्यातील सावळी येथे आज एक गाय, एक वासरू पुरात वाहून मयत झाल्याची माहिती संबंधित तहसिलदार यांनी दिली आहे. 

जिल्हा प्रशासनातर्फे पूरसदृश्य परिस्थितीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्हा मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यात जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार विजय अवधाने, नायब तहसिलदार राजेश लांडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपअभियंता गावंडे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता निळकंठ गव्हाने, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता महेश गट्टुवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरमीटवार यांचा समावेश आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...