Tuesday, April 2, 2024

 वृत्त क्र. 301 

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत

एमपीडीए अंतर्गत धाडसी कारवाई

 

नांदेड दि. 2 :- वारंवार शिक्षा होऊनही सुधारणा न होऊ शकलेल्या एका गुन्हेगारावर महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी (एमपीडीए) कायद्याअंतर्गत नांदेडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. एक वर्षासाठी गुन्हेगाराची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

 

नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कुणाल बाबुलाल जयस्वाल या गुन्हेगारावर महाराष्ट्र दारूबंदी गुन्ह्याच्या कलम 93 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारची शिक्षा अथवा दंडाची भीती नसणाऱ्याअवैध मद्य व्यवहारातील आरोपींनी वारंवार गुन्हा केल्यास महाराष्ट्र दारूबंदी गुन्ह्याच्या कलम 93 अंतर्गत घेण्यात आलेल्या बंद पत्राचे उल्लंघन केल्यास किंवा कुठल्याही प्रकारच्या अवैध मद्य विक्री केल्यास  एमपीडीए प्रस्ताव दाखल करून गुन्हेगाराची रवानगी थेट कारागृहात करण्यात येते याची नोंद घ्यावीअसेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

अवैध मध्ये निर्मिती विक्री वाहतूक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १८००२३३९९९९ व व्हॉटस अॅप ८४२२००११३३ तसेच दूरध्वनी क्र. ०२४६२-२८७६१६ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्र. 300 

एमसीएमसी समितीची बैठक 

नांदेड दि. 2 – जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांच्‍या अध्‍यक्षतेखाली काम करणा-या माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण (एमसीएमसी ) समितीची बैठक सोमवारी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथील माध्‍यम कक्षात पार पडली. उमेदवारी  निश्चित झाल्‍यानंतर प्रमाणिकरण व संनियंत्रण कार्यामध्‍ये गती देण्‍यात यावी, असे निर्देश यावेळी जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी दिले. 

यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे माधव जायभाये, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विश्‍वास वाघमारे, वरिष्‍ठ पत्रकार राजेश निस्‍ताने, जनसंपर्क अधिकारी मिलींद व्‍यवहारे, सायबर सेलचे प्रतिनिधी  तसेच मिडीया कक्षाच्‍या सर्व सदस्‍यांची उपस्थिती यावेळी होती. 

सारखा मजकूर, एकाच सभेचे सारखे वृत्‍तांकन, उमेदवारांच्‍या विजयी निश्चितीचे दावे, जनतेचे पाठबळ मिळत असल्‍याचे दावे तशा पध्‍दतीचे वाक्‍य वापरुन पेरण्‍यात येणा-या वृत्‍तांची दखल घेण्‍यात यावी. तसेच जाहिरातीच्‍या दरानुसार उमेदवारांच्‍या खर्चामध्‍ये त्‍यांची नोंद करण्‍यात यावी तशी माहिती खर्च विभागाला देण्‍यात यावी. तसेच रेडीओवर येणा-या जाहिरातीचीही नोंद घेण्‍याचे यावेळी समितीने निश्चित केले. माध्‍यमांना तसेच राजकीय पक्षांना याबाबतची माहिती देण्‍यात आली आहे. तथापि, वारंवार याबाबत माध्‍यमांना अवगत करण्‍यात यावे, असेही यावेळी समिती सदस्‍यांनी स्‍पष्‍ट केले. सोशल माध्‍यमांच्‍या रोजच्‍या शंभरावर खात्‍याची तपासणी होत असल्‍याची माहिती यावेळी सायबर सेलमार्फत देण्‍यात आली.

00000











 वृत्त क्र. 299 

निवडणुकीच्‍या काळातील वृत्‍तांकनाची पत्रकारितेच्‍या विद्यार्थ्‍यांनी जाणून घेतली माहिती 

नांदेड दि. 2 – एमजीएम महाविद्यालयाच्‍या एमजे एमएस अभ्‍यासक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यानी निवडणूक काळामध्‍ये निवडणूक  आयोग तसेच प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाला अपेक्षित असणारे वृत्‍तांकन व  माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमार्फत या काळात होणारी देखरेख यासंदर्भातील माहिती माध्‍यम कक्षाला भेट देवून जाणून घेतली. 

जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात माध्‍यम कक्ष स्‍थापन करण्‍यात आला आहे. याठिकाणी प्रिंट, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, ऑडीयो व सोशल मिडीयाचे संनियंत्रण केले जात आहे.  माध्‍यम कक्ष आणि निवडणुकीचे कव्‍हरेज हे पत्रकारांसाठी अत्‍यंत महत्‍वाचे कार्य आहे. सध्‍या लोकसभेची आदर्श आचारसंहिता सुरु असून  निवडणूक प्रक्रियेबाबतची अचूकता राहावी व प्रशासनामार्फत द्यावयाची सर्व माहिती माध्‍यमांना वेळेत देण्‍यासाठी माध्‍यम प्रमाणिकरण व संनियत्रण समितीची स्‍थापना करण्‍यात आली आहे.  या समितीच्‍या माध्‍यमातून जाहिरातीच्‍या मजकुराला प्रमाणित करणे,  प्रिंट माध्‍यमात येणा-या जाहिराती व मजकूर पेडन्‍युज तर नाही यावर देखरेख, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व सोशल मिडीयावर येणा-या आक्षेपार्ह वृत्‍तांकडे लक्ष ठेवणे ही कामे माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमार्फत केले जातात. पत्रकारितेची पदवी घेणा-या विद्यार्थ्‍यांनी या बाबीची प्रक्रीया व माहिती जाणून घेतली. 

काल माध्‍यम कक्षाची माहिती घेण्‍यासाठी एमजीएम महाविद्यालयाचे एमजे एमएस या पदवीस शिक्षण घेणारे विद्यार्थी  -विद्यार्थी यांनी भेट देवून माहिती घेतली. यावेळी माध्‍यम कक्षाचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजूषा कापसे, क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे अधिकारी माधव जायभाये, जनसंपर्क अधिकारी मिलींद व्‍यवहारे तसेच मिडीया कक्षाच्‍या सर्व सदस्‍यांची उपस्थिती यावेळी होती. 

यावेळी सर्व पत्रकारितेच्‍या विद्यार्थ्‍यांना माध्‍यम कक्षाबाबत चालणा-या कार्याची माहिती जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी दिली. सोशल मिडीयावरील संनियंत्रण, फेकन्‍युज, वृत्‍तपत्राच्‍या जाहिरातीना  परवानगी याबाबत सविस्‍तर माहिती यावेळी देण्‍यात आली.

0000









 वृत्त क्र. 298 

जिल्‍ह्यात एकाच दिवशी तीन बालविवाह रोखले 

नांदेड दि. 2 :- नांदेड जिल्‍हा बालविवाह मुक्‍तीकडे वाटचाल करीत असताना नांदेड जिल्‍ह्यातील वेगवेगळ्या तालुक्‍यात बालविवाहाच्‍या एकाच दिवशी घडणा-या तीन घटनांना महिला व बाल विकास विभाग व जिल्‍हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्‍या सहकार्याने रोखण्‍यात यश आले. बाल विवाह रोखण्‍यासाठी ग्राम बाल संरक्षण समितीने आपली भूमिका कर्तव्‍यदक्षपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

नांदेड जिल्‍हा बालविवाह मुक्‍त करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत हे अथक  परिश्रम घेत आहेत.  जिल्‍ह्यात अजानतेपणी बालविवाह घडत असल्‍याच्‍या तक्रारी महिला बाल विकास विभागास प्राप्‍त होताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात बालविवाह थांबविण्‍यासाठी महिला व बाल विकास विभाग कसोशिने प्रयत्‍न करीत असून यासाठी महत्‍वाचे योगदान देत आहे. परंतु नुकतेच नांदेड जिल्ह्यातील मुखेड व कंधार येथे उच्‍च शिक्षित मुलासमवेत अल्‍पवयीन मुलीचे बालविवाह होत असल्‍याबाबतची गोपनीय माहिती जिल्‍हा प्रशासनाला मिळाली. हे बालविवाह रोखण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित यंत्रणाना तात्‍काळ निर्देश दिले. 

त्‍यानुसार जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी आर.आर.कांगणे, जिल्‍हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी सदर घटनेची गोपनियरित्‍या शहानिशा करुन कर्मचा-यांना घटनास्‍थळी पाठवून होणारे बालविवाह समुपदेशनाच्‍या माध्‍यमातून थांबविण्‍यात आले. हे बालविवाह रोखण्‍यात पोलीस प्रशासनाने अत्‍यंत महत्‍वाची भूमिका पार पाडली. त्‍यामुळे हे बालविवाह रोखणे सहज शक्‍य झाले. हे बाल विवाह रोखण्‍यासाठी कल्‍पना राठोड, शितल डोंगे, ऐश्‍वर्या शेवाळे, दिपाली हिंगोले, निलेश कुलकर्णी यांचे महत्‍वाचे योगदान लाभले.

0000

वृत्त क्र. 297 

सावधान ! तुमच्‍या सोशल मिडीया खात्‍याची निगराणी होत आहे

 

·  आक्षेपार्ह पोस्‍ट, फेकन्‍यूज, अफवा पसरविणा-यांवर करडी नजर

 

नांदेड दि. 2 :- लोकसभा निवडणुकीच्‍या काळात माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्‍ये सदस्‍य असणाऱ्या सायबर विभागाच्‍यामार्फत जिल्‍ह्यातील शेकडो अकांउट दररोज तपासले जात आहेत. निवडणूक आचारसंहिता घोषित झाल्‍यापासून गेल्‍या 18 दिवसांत दिड हजारावर अकांऊट तपासण्‍यात आले आहेत.  प्रत्‍येक अकांऊटवर लक्ष असून नागरिकांनी सावधानी बाळगण्‍याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

समाज माध्‍यमे सर्वाच्‍या हाती असून याचा दुरुपयोग होता कामा नये. एखादी तथ्‍यहीन बातमी वाऱ्यासारखी पसरविण्‍याचे सामर्थ्‍य समाज माध्‍यमात आहे. त्‍यामुळे व्‍हॉटसअप व तत्‍सम प्रसार माध्‍यमांचा वापर करताना आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्‍याची दक्षता प्रत्‍येकांने घेणे आवश्‍यक आहे. ग्रुप अॅडमिनने याबाबत विशेष काळजी घ्‍यावी, असे आवाहन एमसीएमसीमधील समाज माध्यमांचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे. 

उमेदवारांसाठी सूचना

सर्व उमेदवारांना स्‍वतः च्‍या समाज माध्‍यमांची अधिकृत खाती (फेसबुक, व्टिटर, इन्‍स्‍टांग्राम, ब्‍लॉग,) निवडणूक आयोगाकडे नोंद करणे आवश्‍यक आहे. निवडणूक काळात सर्व समाज माध्‍यम प्रतिनिधीनी आपल्‍या माध्‍यमांची नोंद आयोगाकडे करावी. समाज माध्‍यमांवरुन अफवा पसरविणे, जाती-जातीमध्‍ये तेढ निर्माण करणे, भीतीदायक, दहशत निर्माण होणाऱ्या पोस्ट, परवानगी न घेता टाकलेल्या जाहिराती, याबाबत गंभीर गुन्‍ह्याची नोंद होवू शकते. त्‍यामुळे निवडणुकीतील उमेदवारांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. 

सामान्‍यांसाठी सूचना

निवडणूक काळामध्‍ये आपल्‍या समाज माध्‍यम खात्‍यावरुन आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. सांप्रदायिक जातीय मुद्दयावर प्रचाराच्‍या पोस्‍ट टाकणे, धर्म, जात, पात, भाषा या मुद्यावरुन तेढ निर्माण होणा-या पोस्‍ट प्रसारित करणे. तथ्‍यहीन बातम्‍या प्रसारित करणे टाळावे, अशी निवडणूक आयोगाची सूचना आहे.

0000

 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...