Tuesday, April 2, 2024

वृत्त क्र. 297 

सावधान ! तुमच्‍या सोशल मिडीया खात्‍याची निगराणी होत आहे

 

·  आक्षेपार्ह पोस्‍ट, फेकन्‍यूज, अफवा पसरविणा-यांवर करडी नजर

 

नांदेड दि. 2 :- लोकसभा निवडणुकीच्‍या काळात माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्‍ये सदस्‍य असणाऱ्या सायबर विभागाच्‍यामार्फत जिल्‍ह्यातील शेकडो अकांउट दररोज तपासले जात आहेत. निवडणूक आचारसंहिता घोषित झाल्‍यापासून गेल्‍या 18 दिवसांत दिड हजारावर अकांऊट तपासण्‍यात आले आहेत.  प्रत्‍येक अकांऊटवर लक्ष असून नागरिकांनी सावधानी बाळगण्‍याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

समाज माध्‍यमे सर्वाच्‍या हाती असून याचा दुरुपयोग होता कामा नये. एखादी तथ्‍यहीन बातमी वाऱ्यासारखी पसरविण्‍याचे सामर्थ्‍य समाज माध्‍यमात आहे. त्‍यामुळे व्‍हॉटसअप व तत्‍सम प्रसार माध्‍यमांचा वापर करताना आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्‍याची दक्षता प्रत्‍येकांने घेणे आवश्‍यक आहे. ग्रुप अॅडमिनने याबाबत विशेष काळजी घ्‍यावी, असे आवाहन एमसीएमसीमधील समाज माध्यमांचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे. 

उमेदवारांसाठी सूचना

सर्व उमेदवारांना स्‍वतः च्‍या समाज माध्‍यमांची अधिकृत खाती (फेसबुक, व्टिटर, इन्‍स्‍टांग्राम, ब्‍लॉग,) निवडणूक आयोगाकडे नोंद करणे आवश्‍यक आहे. निवडणूक काळात सर्व समाज माध्‍यम प्रतिनिधीनी आपल्‍या माध्‍यमांची नोंद आयोगाकडे करावी. समाज माध्‍यमांवरुन अफवा पसरविणे, जाती-जातीमध्‍ये तेढ निर्माण करणे, भीतीदायक, दहशत निर्माण होणाऱ्या पोस्ट, परवानगी न घेता टाकलेल्या जाहिराती, याबाबत गंभीर गुन्‍ह्याची नोंद होवू शकते. त्‍यामुळे निवडणुकीतील उमेदवारांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. 

सामान्‍यांसाठी सूचना

निवडणूक काळामध्‍ये आपल्‍या समाज माध्‍यम खात्‍यावरुन आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. सांप्रदायिक जातीय मुद्दयावर प्रचाराच्‍या पोस्‍ट टाकणे, धर्म, जात, पात, भाषा या मुद्यावरुन तेढ निर्माण होणा-या पोस्‍ट प्रसारित करणे. तथ्‍यहीन बातम्‍या प्रसारित करणे टाळावे, अशी निवडणूक आयोगाची सूचना आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

मंत्री आणि राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे #पालकमंत्री , #सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली ...