Thursday, December 1, 2016

अलोट जनसागराच्या साक्षीने शहीद कदम
यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
जानापुरीच्या वीर जवानाला साश्रुपुर्ण निरोप

नांदेड, दि. 1 :- अलोट जनसागराच्या साक्षीने आणि वीर जवान संभाजी कदम अमर रहे , भारत माता की जय अशा घोषणांच्या निनादात नांदेडचे वीर पुत्र शहीद जवान संभाजी यशवंत कदम पंचत्वात विलीन झाले. जम्मू-काश्मिरमधील नागरोटा येथील लष्करी तळावरील अतिरेक्यांच्या हल्ल्यातील चकमकीत 5- मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संभाजी कदम यांना वीर मरण आले होते. त्यांच्या पार्थीवावर आज लोहा तालुक्यातील जानापुरी येथे लष्करी इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात आले. या वीर पुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी नांदेडच्या श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळापासून ते जानापुरीतील अंत्यदर्शनाच्या प्रांगणापर्यंत अलोट गर्दी झाली होती.  
शहीद जवान संभाजी कदम अमर रहे... जब तक चाँद सुरज रहेगा संभाजी तेरा नाम रहेगा, भारत माता की जय, देश का बेटा कैसा हो.. शहीद संभाजी कदम जैसा हो.. अशा त्वेषपुर्ण घोषणांनी अनेकदा परिसर दणाणून गेला.
जानापुरी येथे अंत्यदर्शनाची व्यवस्था केलेल्या ठिकाणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, आमदार श्रीमती अमिता चव्हाण, आमदार वसंतराव चव्हाण, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी यांच्यासह जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार, जानापुरीच्या सरंपच कमलाबाई लोखंडे, उपसरपंच बळी पाटील, विविध संस्था, संघटना, पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह या प्रांगणात हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. 
सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास नागपूरहून लष्कराच्या हेलिकॉप्टरने शहीद संभाजी यशवंत कदम यांचे पार्थिव नांदेड येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळ येथे पोहचले. विमानतळावर हेलिकॉप्टरमधून लष्कराच्या औरंगाबाद मुख्यालयाचे कर्नल आर. शर्मा, कर्नल लिवो मुथ्थु, सुभेदार एस. एम. शिंदे, सुभेदार नाईक गणेश सस्ते आदींनी पार्थीव वाहून आणले. यावेळी महापौर शैलजा स्वामी यांच्यासह जिल्हाधिकारी काकाणी आदी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. विमानतळावरुन फुलांनी सजविलेल्या रथावर शहीद कदम यांचे पार्थीव ठेवण्यात आले. तेथून ते विमानतळ-तरोडानाका-श्रीनगर-आयटीआय चौक, शिवाजीनगर-वजिराबाद-कौठा-विष्णुपुरी या मार्गावरुन पार्थीव जानापुरी येथे नेण्यात आले.
नांदेड शहरात तसेच अंत्ययात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी शहीद कदम यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव झाला. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या गर्दीने शिस्तीत अंत्ययात्रेस मार्ग मोकळा करुन दिला. असंख्य तरुण मोटर सायकलींसह अंत्ययात्रेत विमानतळापासून सहभागी झाले. कित्येक ठिकाणी रस्ते पाकळ्यांनी सजवले गेले. ठिकठिकाणी शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनीही फुलांचा वर्षाव केला. नांदेड शहरासह जानापुरी पर्यंतच्या अनेक ठिकाणी  शहीद संभाजी कदम अमर रहे, त्यांना आदरांजली वाहणारे  आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते.
जानापुरी  येथे शहीद कदम यांच्या घरी त्यांच कुटुंबीय वडील यशवंत , आई लताबाई, पत्नी शीतल, मुलगी तेजस्वनी आदी नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी अनेकांना शोक अनावर झाला. यानंतर जानापुरी येथे नांदेड-लातूर रस्त्यालगत जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी पार्थीव ठेवण्यात आले. येथेही मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. तसेच शहीद संभाजी कदम यांच्या कुटुंबियांचे भेट घेऊन सांत्वन केले व आधार दिला. शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी पुष्पचक्र अर्पण केले. जानापुरीतीलही अनेकांनी शहीद कदम यांना साश्रुपूर्ण नयनानी आदरांजली वाहिली.
लष्करी प्रथेप्रमाणे कदम कुटुंबियांकडे शहीद जवान कदम यांच्या पार्थिवावरील तिरंगा यथोचित सन्मानाने सुर्पुदही करण्यात आला. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी शहीद कदम यांना जिल्हा पोलीस दलाच्यावतीने तसेच लष्कराच्यावतीनेही बंदुकीच्या हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. या फैरीच्या निनादातच चिमुरड्या तेजस्वीनीने आपल्या वीरपित्याच्या चितेला भडाग्नी दिला. यावेळी उपस्थित जनसमुदयाने वीर संभाजी कदम अमर रहेच्या त्वेषपुर्ण  घोषणा दिल्या. भारत माता की जय...वंदे मातरम अशा घोषणांच्या निनादात वीर संभाजी कदम पंचत्वात विलीन झाले.

0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...