गोजातीय प्रजातीचे गुरे, म्हशींच्या बाजारास मनाई
-जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश
· जनावरांच्या खरेदी विक्रीसाठीचे सर्व बाजार बंद राहणार
नांदेड (जिमाका) दि. 12 :- लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात लम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध, निर्मुलन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर नियोजन केले आहे. याअनुषंगाने गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची कोणत्याही ठिकाणाहून ने-आण करणे, बाजार भरविणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांच्या जत्रा भरविणे, प्रदर्शन भरविणे किंवा प्राण्यांना एकत्र आणून कार्यक्रम करण्यास प्रतिबंध आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण खुशालसिंह परदेश यांनी निर्गमित केले आहेत.
लम्पी चर्मरोगाच्याबाबत नांदेड जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातीची कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यांसाठी असलेली गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांच्या शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी नियमित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करत आहे. गोजातीय प्रजातीचे गुरे व म्हशीचा कोणत्याही प्राणी बाजारास मनाई, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्याच्या जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियोजित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांच्या गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे.
नियमित क्षेत्रामधील बाजार पेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जनावरांमध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या बाधित झालेलया गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करण्यास मनाई करण्यात आली आहे. जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी चे जिल्ह्यातील सर्व बाजार पुढील आदेश होईपर्यत बंद ठेवण्यात येणार आहेत. लम्पी चर्मरोग असल्याने संशयित असलेल्या किंवा संक्रमित किंवा संक्रमित झालेल्या प्राण्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात असंक्रमित क्षेत्रामध्ये अनुसूचित रोगाच्या प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी सीमा तपासणी नाक्यावर काटेकोर अंमलबजावणी व कार्यवाही करण्यात येईल असेही कळविले आहे.
00000