Wednesday, July 14, 2021

 

उर्दू घराच्या माध्यमातून नव्या सांस्कृतिक पर्वाचा प्रारंभ

- पालकमंत्री अशोक चव्हाण

उर्दू घरचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 14:- उर्दू भाषेने साहित्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान आणि भाषा म्हणून यात असलेली गोडी ही कोणत्याही धार्मिक चौकटीत बंदिस्त करता येणार नाही. इथल्या लोकांनीही उर्दू भाषेला आपली भाषा मानून शिक्षण-संवेदनेसह प्रगतीचे नवे मार्ग खुले केले आहेत. या उर्दू घर च्या माध्यमातून नव्या सांस्कृतिक पर्वाचा प्रारंभ होत असल्याचा मला अधिक आनंद आहे, अशा भावना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या "उर्दू घर" इमारतीचे उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. 

राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यास राज्याचे सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, माजी मंत्री नसीम खान, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार माधवराव पाटील-जवळगावकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, उपमहापौर मसुद अहेमद खान, अल्पसंख्यांक विकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह विविध मान्यवर, ऊर्दू साहित्यिक, ऊर्दू प्रेमी यांची विशेष उपस्थिती होती. 

हे उर्दू घर कला, साहित्य आणि भाषिक विकासाच्या अंगाने इथल्या जनसामान्यासाठी, उर्दू भाषिकांसाठी महत्वाची भूमिका निभावेल या दूरदृष्टीतून निर्माण करण्यात आले आहे. व्यवस्थापन समितीने उर्दू व इतर भाषावरील अनेक वैविध्य असलेले व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम येथे कसे आयोजित करता येतील यांचे नियोजन केले पाहिजे. हे उर्दू घर कला, साहित्य यांचे माहेरघर झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करुन याचे रुपांतर शादीखाना किंवा अन्य कामासाठी होणार नाही, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करुन नव्या पिढीच्या शिक्षणाला अधोरेखीत केले. 

अल्पसंख्याक समाजात बदलत्या शैक्षणिक संदर्भानुसारही विचार करण्याची वेळ आली आहे. यादृष्टीने त्यांच्या स्वयं रोजगाराला चालना देणारे कौशल्य विकासाचे केंद्रही या ठिकाणी कसे आकारात येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. येथील अल्पसंख्याक समाजातील मुलांची संख्या लक्षात घेवून कौशल्य विकासाचे उपकेंद्र देण्याची मागणी त्यांनी ना. नवाब मलिक यांच्याकडे केली. 

अल्पसंख्याक विकास विभागाला किमान एक हजार कोटी रुपयांचा वार्षिक निधी असला पाहिजे यासाठी आम्ही मंत्रीमंडळ पातळीवर प्रयत्न करु, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करुन जिल्ह्यातील शादीखाना, कब्रस्तान व इतर उपक्रमासाठी तुर्तास जिल्हा वार्षिक योजनेतून जेवढे यथाशक्य होईल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. नांदेड येथे ईदगाह साठी असलेले मैदान कमी पडते. हे लक्षात घेता याचाही विकास करण्याचे मी असल्याचे सांगितले.

अल्पसंख्यांकांच्या विकासाच्या योजना व उर्दू घर सारखे प्रकल्प हे पुढच्या पिढीसाठीही तितकेच महत्वाचे आहेत. ज्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्या चांगल्या स्थितीत ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. प्रशासकीय पातळीवरुन यांची देखरेख जरी समितीमार्फत केली जाणार असली तरी इथे येणाऱ्या प्रत्येकाने या उर्दू घर कडे आपल्या घराच्या जबाबदारीने पाहून त्यात सर्वतोपरी योगदान दिले पाहिजे असे आवाहनही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या उदघाटन पर भाषणात केले . उर्दू घरचे भूमिपूजन ज्यांच्या हस्ते झाले ते तत्कालिन मंत्री नसीम खान यांनी उर्दू घर ला दिलीपकुमार यांचे नाव देण्याबाबत केलेल्या मागणीला त्यांनी होकार देवून यासाठी एकमताने निर्णय घेवू असे स्पष्ट केले.

भाषेच्या आदानप्रदानाचे उर्दू घर प्रतिक ठरेल

- अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक

हिंदी आणि उर्दू भाषेकडे सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून पाहिले जाते. ही भाषा इथल्या भागाची जुबान आहे, बोली आहे. उर्दू भाषा याच मातीत जन्माला आली. ज्या भाषेतून आपण शिकतो त्या भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून उर्दू घरची संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा दृष्टीकोन असल्याचे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले. उर्दू भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या योगदानातून उर्दूच्या विकासासाठी प्रयत्नाची गरज आहे. आज नांदेड येथे सुरु झालेले उर्दू घर हे केवळ उर्दू भाषेपुरते मर्यादीत नव्हे तर मराठीसह इतर भाषेच्या प्रसाराचे, एकामेकांच्या आदान-प्रदानातून भाषिक विकासाचे प्रतिक ठरेल असा विश्वास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. 

स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे उर्दूतील शिक्षण, उर्दू भाषेची त्यांना असलेली आवड आणि अल्पसंख्याकापोटी त्यांनी जपलेली कटिबध्दता ही सर्वश्रुत आहे. आज त्यांच्या जयंती दिनानिमित्त उर्दू घरचे उद्घाटन व्हावे हे काळानेही मंजूर केलेले आहे. वास्तविक यांचे उदघाटन मागच्या वर्षी मार्चमध्ये नियोजीत होते. कोरोना मुळे ते पुढे ढकलावे लागले. ज्यांनी उर्दू भाषेसाठी योगदान दिले अशा स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीचा दिवस या वास्तूच्या उद्घाटनाला मिळाल्याचा मला विशेष आनंद असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी उद्घाटन पर केलेल्या भाषणातील मागणीचा संदर्भ घेवून त्यांनी याठिकाणी समितीकडून जे प्रस्ताव येतील त्याबाबत सकारात्मक विचार करुन अल्पसंख्यांकासाठी कौशल्य विकासाचे उपकेंद्र देण्याचा प्रयत्न करु असे स्पष्ट केले. अल्पसंख्याक समाजात गरीबीमूळे न शिकता येणारा वर्ग मोठा आहे. अशा वर्गातील शिक्षणासाठी मुले जर पुढे येत असतील तर त्यांचाही प्राधान्याने विचार करु, त्यांना शिकवू असे त्यांनी सांगितले. अल्पसंख्याक वर्गातील मुलांसाठी वसतीगृहाबाबत धोरणात्मक निर्णय होण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे ते म्हणाले. 

मोठया कष्टातून आकारास आलेल्या या उर्दू घरला अल्पसंख्याक समाजातील बांधवांनी, उर्दू साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी, साहित्यीकांनी योगदान देण्याची गरज आहे. गुणवत्तापूर्वक उपक्रमाच्या माध्यमातून ही संस्था अधिक नावारुपास येईल, असे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले. नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे हे उर्दू घर असून याला दिलीपकुमार यांचे नाव देणे अधिक समर्पक ठरेल. त्यांचे नाव उर्दू घरला देण्यात यावे अशी मागणी तत्कालिन मंत्री नसीम खान यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी करुन या केंद्रात ई-शिक्षण केंद्र आकारास कसे आणता येईल याबाबत समितीतर्फे प्रयत्न केले जातील असे स्पष्ट केले.

00000












 

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 41 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात बुधवार 14 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 41.0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 199.4 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात बुधवार 14 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 24.6 (235.6), बिलोली- 88.3 (254.4), मुखेड- 38.9 (177.9), कंधार- 54.4 (181.5), लोहा- 51.4 (183.8), हदगाव-निरंक (120.6), भोकर- 13.0 (173.9), देगलूर- निरंक (116.3), किनवट- निरंक (169.7), मुदखेड- 22.4 (255.8), हिमायतनगर-निरंक (123.7), माहूर-निरंक (132.8), धर्माबाद-22.3 (216.0), उमरी- 35.9 (264.7), अर्धापूर-75.8 (295.3), नायगाव- 47.8 (208.2) मिलीमीटर आहे.

0000

 

जिल्ह्यातील 55 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 55 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. गुरुवार 15 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील शहरी दवाखाना सांगवी व अरबगल्ली येथे कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 80 डोस, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), खडकपुरा, करबला, तरोडा, विनायकनगर, पोर्णिमानगर या 8 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, माहूर, मुदखेड, बारड या 6 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर, लोहा, उमरी या 5 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

 

उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 13 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

जिल्ह्यात ग्रामीण भागातील 17 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर 3 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 13 जुलै पर्यंत एकुण 6 लाख 99 हजार 210 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 14 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 53 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 32 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

नांदेड जिल्ह्यात 8 व्यक्ती कोरोना बाधित तर 7 कोरोना बाधित झाले बरे                                  

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 391 अहवालापैकी  8 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 6 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 347 एवढी झाली असून यातील 88 हजार 788 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 55 रुग्ण उपचार घेत असून यात एकाही बाधितांची प्रकृती अतिगंभीर नाही. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, कंधार तालुक्यांतर्गत 2, हिंगोली 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे मुखेड तालुक्यांतर्गत 2 असे एकूण 8 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 7 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, लोहा तालुक्यांतर्गत 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील एका व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 55 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 10,  किनवट कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 23, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 12, खाजगी रुग्णालय 1 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 129, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 138 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 34 हजार 834

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 31 हजार 682

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 347

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 788

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 906

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.19 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-26

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-68

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-55

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक                       

00000

 

राष्ट्रीय लोकअदालतीचे 1 ऑगस्टला आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने नांदेड जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयात, कौटुंबिक, कामगार व सहकार न्यायालयात रविवार 1 ऑगस्ट 2021 रोजी या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रमुख न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत आणेकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी केले आहे. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायायलयातील दिवाणी, फौजदारी, एन.आय. अॅक्टची प्रकरणे, बॅंकची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायदा खालील प्रकरणे, कौटुंबिक वादांची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी अॅक्टची समाझोता प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या आगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांना त्यांची प्रलंबित अथवा दाखलपूर्व प्रकरणे या लोकअदालतीत ठेवावयाची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा.   

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हयातील सर्व विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसूल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी पक्षकार व नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सामंजस्याने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन केले आहे.

*****

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...