Wednesday, July 14, 2021

 

राष्ट्रीय लोकअदालतीचे 1 ऑगस्टला आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने नांदेड जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयात, कौटुंबिक, कामगार व सहकार न्यायालयात रविवार 1 ऑगस्ट 2021 रोजी या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रमुख न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत आणेकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी केले आहे. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायायलयातील दिवाणी, फौजदारी, एन.आय. अॅक्टची प्रकरणे, बॅंकची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायदा खालील प्रकरणे, कौटुंबिक वादांची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी अॅक्टची समाझोता प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या आगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांना त्यांची प्रलंबित अथवा दाखलपूर्व प्रकरणे या लोकअदालतीत ठेवावयाची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा.   

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हयातील सर्व विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसूल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी पक्षकार व नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सामंजस्याने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन केले आहे.

*****

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   94 ​ राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक नांदेड दि २४ :- गेल्या तीन...