Tuesday, July 6, 2021

 

लोहा तालुक्यात गोदावरी नदीपात्र परिसरात 144 कलम लागू

नांदेड (जिमाका) दि. 6 :- लोहा तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळुचा उपसा होऊ नये यासाठी तालुक्यातील भारसवाडा, अंतेश्वर, पेनूर, बेटसांगवी, शेवडी बा. येळी, कामळज, कौडगाव, चिंचोली, डोंगरगाव, आडगाव, बोरगाव, भेंडेगाव, जवळा, पळशी, शेलगाव धा. या गावातील गोदावरी नदीपात्रापासून वाहनाना प्रवेश करण्यास शनिवार 24 जुलै 2021 रोजीच्या 24 वाजेपर्यंत प्रतिबंध केले आहे. लोहा तहसिलदार यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 आणि अन्य सर्व प्राप्त अधिकारानुसार हा आदेश निर्गमीत केला आहे.   

कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शासकीय कर्तव्यावरील महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वाहन तसेच क्षेत्रात वाहनास प्रवेश करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांने परवानगी दिलेल्या वाहनास हा आदेश लागू होणार नाही. लोहा तहसिलदार यांनी 25 जून रोजी हा आदेश निर्गमीत केला आहे.

00000

 

हत्तीरोग निमुर्लन मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे -     जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर   

नांदेड (जिमाका) दि. 6 :- हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम जिल्ह्यात 1 ते 15 जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य खात्यातील अधिकारी व कर्मचारी हे लाभार्थ्यांच्या घरोघरी जावून पात्र लाभार्थ्यांना डिईसी व अलबेंडाझॉल गोळयाची एक मात्रा खाऊ घालणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेस प्रतिसाद देऊन हत्तीरोगापासून मुक्त रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

नांदेड जिल्हा हा हत्तीरोग जोखीमग्रस्त असून नागरिकांना या आजाराचा धोका होवू नये म्हणून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे जिल्ह्यात सन 2004 पासून दरवर्षी हत्तीरोग एकदिवशीय सामुदायिक औषधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे.  

हत्तीरोग हा दिर्घ मुदतीचा व व्यक्तीची एकूणच शारीरीक व मानसिक क्षमता कमी करणारा आजार आहे. हा आजार वुचेरेरिया बॅक्रॉप्टाय व ब्रुगीया मलायी या नावाच्या कृमीमुळे होतो. याचा प्रसार क्युलेक्स क्विकिफॅसिएटस् या डासाच्या मादीपासून होतो. हत्तीरोग झाल्यास रोग्यास अपंगत्व व विद्रुपता येते. हाता-पायावर सुज, जननेंद्रीयावर व इतर अवयवावर कायमची सुज येवून विद्रुपता येते. त्यामूळे रुग्णास सामाजिक उपेक्षेस तोंड द्यावे लागते, आर्थिक नुकसान होते. मुला-मुलींचे लग्न होत नाहीत. त्यामूळे रुग्ण मानसिक दबावाखाली वावरतो व जन्मभर दु:ख वेदना सहन कराव्या लागतात. 

सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 ते 31 ऑगस्ट 2020 हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम अहवालानुसार अंडवृध्दीचे 746 व हत्तीपायाचे 2 हजार 553 असे एकत्रित 3 हजार 299 हत्तीरोगाचे बाह्य लक्षणेयुक्त रुग्ण आहेत. आपला जिल्हा हत्तीरोगासाठी जोखीमग्रस्त असल्याने जिल्ह्यात हत्तीरोग जंतुचे संक्रमण चालु असल्याने यावर एकच उपाय म्हणजे प्रत्येक नागरिकांनी ज्यांच्या शरीरात मायक्रोफायलेरीयाचे जंतु असोत किंवा नसोत, हत्तीरोगाचे लक्षणे असोत किंवा नसोत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना डिईसी व अलबेंडाझॉल गोळयाची एक मात्रा वर्षातून एकदा खाणे आवश्यक आहे. फक्त दोन वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रियांना व खुप आजारी रुग्णांना हा औषधौपचार देण्यात येत नाही. 

डिईसी व अलबेंडाझॉल गोळया खाऊ घालण्यासाठी आरोग्य खात्यातील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा स्वयंसेविका व इतर स्वयंसेवक 1 ते 15 जुलै 2021 दरम्यान प्रत्येकांच्या घरी जात आहेत. नागरिकांनी या गोळया जेवण करुन कर्मचाऱ्यासमक्ष घेवून शासनाच्या या मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगापासून मुक्त रहावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी केले आहे.

0000

 

नांदेड जिल्ह्यात 9 व्यक्ती कोरोना बाधित तर 20 कोरोना बाधित झाले बरे   

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 246 अहवालापैकी  9 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 6 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 286 एवढी झाली असून यातील 88 हजार 717 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 67 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, हदगाव 3, भैसा 1, तर ॲटीजन तपासणीद्वारे मुखेड  1, हिमायतनगर 1, हिंगोली 1 असे एकूण 9 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 20 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात हिमायतनगर तालुक्यातर्गत 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन, गृह विलगीकरण व जम्बो कोविड सेंटर मधील 17 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 67 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 9,  हदगाव कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 30, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 19, खाजगी रुग्णालय 2 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 126, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 139 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 20 हजार 28

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 16 हजार 993

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 286

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 717

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 906

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.18 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-22

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-78

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-67

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1                       

00000

 

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  जिल्ह्यातील माजी सैनिकांचे व सेवारत सैनिकांच्या कुटूंबातील सदस्यांच्या अडी-अडचणी व विविध विभागात प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 22 जुलै  2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11.30 वा. बैठकीचे आयोजन केले आहे.  

प्रलंबित प्रकरणाचा वेळेत व तातडीने निपटारा करण्यासाठी प्रत्येक महिण्याच्‍या तिसऱ्या बुधवारी या बैठकीचे आयोजन करण्यात येते. माजी सैनिकांनी त्यांच्याकडील प्रलंबित अर्जांची  एक  प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सोमवार 12 जुलै  पर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.  

00000

 

दहावी परीक्षेच्या सुधारित मुल्यमापन कार्यपद्धतीनुसार

संगणकीय प्रणालीत गुणांच्या नोंदी घेण्याचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- माध्यमिक शाळांना संगणक प्रणालीत विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करताना काही अडचणी आल्या आहेत, त्यांनी त्या संबंधिच्या मूळ अभिलेखासह शुक्रवार 9 जुलै 2021 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाशी त्यांनी निश्चित केलेल्या नियोजनानुसार संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

 

इयत्ता दहावी परीक्षा सन 2021 सुधारित मूल्यमापन कार्यपद्धती संदर्भात तपशिलवार सूचना सर्व संबंधित माध्यमिक शाळा व विभागीय मंडळांना एका परिपत्रकाद्वारे यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी निहाय गुण नोंदणी करण्यासाठी मंडळामार्फत प्रथमच संगणकीय प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली होती. या प्रणालीमध्ये विद्यार्थी निहाय गुणांची नोंद करताना शाळा स्तरावर काही त्रुटी / चुका राहिल्याची बाब निदर्शनास आली आहे. या त्रुटी / चुकांची पडताळणी करुन यथानियम कार्यवाही करण्याबाबत विभागीय मंडळाना तपशीलवार सूचना देण्यात आल्या आहेत.

 

शाळांना संगणक प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करताना आलेल्या अडचणी या पुढीलप्रमाणे आहेत. संगणक प्रणालीमध्ये विहित मुदतीत काही विद्यार्थ्यांचे गुण भरलेले नाहीत. विद्यार्थी निहाय गुण भरले, निश्चित केले नाहीत. विद्यार्थी निहाय गुण भरले, निश्चित केले पण त्रुटी राहिल्या व चुका झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे एखाद्या विषयाचे / भागाचे गुण / श्रेणी भरलेले नाहीत. इयत्ता 9 वी, इयत्ता 5 वी ते 9 वी (लागू असल्याप्रमाणे) टक्केवारी भरलेली नाही. पुनर्परिक्षार्थीच्या बाबतीत श्रेणी विषयाची श्रेणी दर्शवितांना सध्याच्या तीन श्रेणी विषयांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे जुने श्रेणी विषय असल्यास 4 श्रेणी / 1,2,3 श्रेणी दर्शविण्यात आलेली आहे. उशीराने अर्ज भरल्यामुळे बैठक क्रमांक प्राप्त झाला नाही व त्यामुळे संगणक प्रणालीत विद्यार्थ्याचे गुण / श्रेणी भरता आले नाही. आवेदन पत्र भरताना परीक्षार्थी प्रकार (जसे नियमित, पुनर्परिक्षार्थी, खाजगी, तूरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी) चुकल्याने संगणक प्रणालीत गुण / श्रेणी भरता आले नाही. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना विषयास सूट असताना प्रविष्ट दाखविणे / प्रविष्ट असताना सूट दाखविणे यामुळे संगणक प्रणालीत गुण / श्रेणी भरता आले नाही. याबाबत जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा, शिक्षक व इतर सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

000000

 

जिल्ह्यातील 52 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 52 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. बुधवार 7 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील शासकीय डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे कोविशील्ड लसीचे 100 डोस तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत.  ग्रामीण रुग्णालय बिलोली, मुदखेड येथे कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस, उपजिल्हा रुग्णालय हदगाव, ग्रामीण रुग्णालय मांडवी, उमरी या केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी या 14 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्यातील 13 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर 6 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 5 जुलै पर्यंत एकुण 6 लाख 40 हजार 203 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 5 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 13 हजार 530 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 6 लाख 92 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...