Tuesday, July 6, 2021

 

हत्तीरोग निमुर्लन मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे -     जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर   

नांदेड (जिमाका) दि. 6 :- हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम जिल्ह्यात 1 ते 15 जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य खात्यातील अधिकारी व कर्मचारी हे लाभार्थ्यांच्या घरोघरी जावून पात्र लाभार्थ्यांना डिईसी व अलबेंडाझॉल गोळयाची एक मात्रा खाऊ घालणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेस प्रतिसाद देऊन हत्तीरोगापासून मुक्त रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

नांदेड जिल्हा हा हत्तीरोग जोखीमग्रस्त असून नागरिकांना या आजाराचा धोका होवू नये म्हणून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे जिल्ह्यात सन 2004 पासून दरवर्षी हत्तीरोग एकदिवशीय सामुदायिक औषधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे.  

हत्तीरोग हा दिर्घ मुदतीचा व व्यक्तीची एकूणच शारीरीक व मानसिक क्षमता कमी करणारा आजार आहे. हा आजार वुचेरेरिया बॅक्रॉप्टाय व ब्रुगीया मलायी या नावाच्या कृमीमुळे होतो. याचा प्रसार क्युलेक्स क्विकिफॅसिएटस् या डासाच्या मादीपासून होतो. हत्तीरोग झाल्यास रोग्यास अपंगत्व व विद्रुपता येते. हाता-पायावर सुज, जननेंद्रीयावर व इतर अवयवावर कायमची सुज येवून विद्रुपता येते. त्यामूळे रुग्णास सामाजिक उपेक्षेस तोंड द्यावे लागते, आर्थिक नुकसान होते. मुला-मुलींचे लग्न होत नाहीत. त्यामूळे रुग्ण मानसिक दबावाखाली वावरतो व जन्मभर दु:ख वेदना सहन कराव्या लागतात. 

सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 ते 31 ऑगस्ट 2020 हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम अहवालानुसार अंडवृध्दीचे 746 व हत्तीपायाचे 2 हजार 553 असे एकत्रित 3 हजार 299 हत्तीरोगाचे बाह्य लक्षणेयुक्त रुग्ण आहेत. आपला जिल्हा हत्तीरोगासाठी जोखीमग्रस्त असल्याने जिल्ह्यात हत्तीरोग जंतुचे संक्रमण चालु असल्याने यावर एकच उपाय म्हणजे प्रत्येक नागरिकांनी ज्यांच्या शरीरात मायक्रोफायलेरीयाचे जंतु असोत किंवा नसोत, हत्तीरोगाचे लक्षणे असोत किंवा नसोत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना डिईसी व अलबेंडाझॉल गोळयाची एक मात्रा वर्षातून एकदा खाणे आवश्यक आहे. फक्त दोन वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रियांना व खुप आजारी रुग्णांना हा औषधौपचार देण्यात येत नाही. 

डिईसी व अलबेंडाझॉल गोळया खाऊ घालण्यासाठी आरोग्य खात्यातील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा स्वयंसेविका व इतर स्वयंसेवक 1 ते 15 जुलै 2021 दरम्यान प्रत्येकांच्या घरी जात आहेत. नागरिकांनी या गोळया जेवण करुन कर्मचाऱ्यासमक्ष घेवून शासनाच्या या मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगापासून मुक्त रहावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...