Friday, April 28, 2017

महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी
पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 28 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार 1 मे 2017 रोजी वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्राद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सकाळी 8 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.   
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 वाजेपूर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाने राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे. 

00000000
नांदेड शहरात यापुढे दर महिन्याच्या
पहिल्या गुरुवारी "नो-व्हेईकल डे"
वाहन न वापरण्याचे महापालिकेचे आवाहन 
नांदेड दि. 28 :-  शहरातील प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी यापुढे दर महिन्याचा पहिला गुरुवार हा "वाहन विरहीत दिन (नो-व्हेईकल डे)" पाळण्याचे आवाहन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
या आवाहनात म्हटले आहे की, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीत वाढते शहरीकरण, लोकसंख्या व सतत वाढणारी वाहन संख्या यामुळे प्रदुषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढणाऱ्या वाहन संख्येमुळे शहरामध्ये ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून शहरामध्ये प्रत्येक महिन्याचा पहिला गुरुवार हा "वाहन विरहीत दिन (नो-व्हेईकल डे )" म्हणून पाळण्याचे संकल्प नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. अशारीतीने "वाहन विरहीत दिन (नो-व्हेईकल डे)" चे पालन केल्याने शहरामध्ये ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण कमी करणे, वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी करणे, इंधनाची बचत करणे, तसेच नागरिकांमध्ये सायकल वापरण्याची सवय वृद्धींगत करणे या गोष्टी साध्य होतील. त्यामुळे महापालिकेतर्फे शहरातील सर्व नागरिकांना तसेच विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आदींना या दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी दुचाकी, चारचाकी वाहन न वापरता सार्वजनिक वाहनांचा किंवा सायकलचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000
वाहनचालक परवान्यासाठी
सुविधा केंद्रावर शुल्क भरण्याची सुविधा
नांदेड दि. 28 :- वाहन चालक परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संगणक, इंटरनेट इत्यादी सुविधा तसेच ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा नाही अशा अर्जदारांसाठी शासनाने नागरी सुविधा केंद्राद्वारे (सीएससी) अर्ज भरण्याची व ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी सीएससी केंद्र चालकांना अर्जदाराकडून विहित शुल्का व्यतिरिक्त 20 रुपये इतके शुल्क आकारुन अशा अर्जदारांचे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरुन देण्याची शासनाने परवानगी दिलेली आहे. आरटीओ कार्यालयातील कामकाज पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी या केंद्रावरील सेवेचा लाभ घेऊन मध्यस्थविरहीत कार्यपद्धती निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्यामार्फत आवाहन करण्यात आले आहे.   
जिल्ह्यातील सर्व सीएससी केंद्राची माहिती www.apnacsconline.in/csc-locator/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्जदारास त्याच्या नजीकच्या सीएससी केंद्राची माहिती याद्वारे उपलब्ध होईल. तसेच कार्यालयात देखील सीएससी केंद्रांची यादी नागरिकांच्या माहितीसाठी फलकावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहन चालक लायसन्ससाठी कोणत्याही कामासाठी अर्ज करण्यासाठी मध्यस्थाकडे न जाता या सीएससी केंद्रावरुन अर्ज व शुल्क भरुनच कार्यालयात अर्ज सादर करु शकतील.  प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणी व लायसन्सबाबत सर्व कामकाज parivahan.gov.in या संकेतस्थळावर सारथी 4.0 व वाहन 4.0 या ऑनलाईन प्रणालीचा वापर सुरु झाला आहे. लासन्सबाबत सर्व कामांसाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरावयाचा असून त्याचे शुल्क देखील ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

000000
संजय गांधी निराधार योजनेतील  
लाभार्थ्यांना 1 मे रोजी ओळखपत्राचे वितरण
नांदेड दि. 28 :-  संजय गांधी निराधार योजना समितीच्या 2 जानेवारी 2017 व 12 एप्रिल 2017 रोजी बैठकीत मंजूर झालेल्या पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री अर्जुन खोतकर  यांच्या हस्ते सोमवार 1 मे 2017 रोजी क्षत्रिय समाज श्री रेणुकामाता मंदिरासमोर एसजी रोड गाडीपुरा नांदेड येथे  ओळखपत्र वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी नांदेड शहरातील संबंधीत लाभार्थ्यांनी 1 मे रोजी सकाळी 11 वा. वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार संगांयो नांदेड (शहर) यांनी केले आहे.

000000
लेख.. . . .
क्रांतीकारी समाज सुधारक महात्मा बस्वेश्वर
यशवंत भंडारे, औरंगाबाद
महात्मा बसमेश्वारांनी केलेल्या सामाजिक सुधारणा आश्चर्य वाटतीज इतक्या नव्या होत्या. त्यांनी सांगितलेले आदर्श प्रत्यक्ष आचरनात आणले गेले. त्यांनी अंधश्रध्दा निर्मुलन आणि सामिजिक, आर्थिक विषमता यांच्यापर कडाडून हल्ला चढवला. समाजाला विषमतेच्या गर्देतून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. त्यांची 28 एप्रिल 2017 रोजी अक्षयतृतीयेला जयंती आहे. त्यानिमित्त हा लेख.. . . .
असं म्हटले जाते की, धर्माचे अंतरंग समजून घेण्यासाठी धर्म आणि समाज यांचे परस्पर संबंध विचारात घेणे तसेच धर्माचे हा समाजशास्त्रीय स्वरुप अभ्यासने अवश्यक असते धर्म हा सामाजिक यंत्रणेचा एक महत्वाचा भाग असतो. धर्माप्रमाणे लोक रुढी, लोकनीती, नीतिमत्ता, कायदा अदी सामाजिक नियमनांमुळे समाज व्यवस्थेतील व्यक्तींचे तसेच सामाजिक संस्था-संघटनांचे परस्पर संबंध नियमित होत असतात. एकंदरीत व्यक्ती, कुटूंब, समाज आणि धर्म यांचे प्रत्यक्ष अन् अन्योन्य संबंध असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोणताही समाज जाणून घेताना त्या समाजात धर्म अभ्यासणे आवश्यक असते. “धर्म हा मानवी समाजात इतका सार्वजनिक, शाश्वत आणि व्यापक असतो की धर्माचा व्यवस्थितपणे परिचय करुन घेतल्याशिवाय तो समाज समजावून घेणे आवश्यक असते ” असे किग्जले डेव्हिड यांनी नमूद केल्याचे सार्थ ठरते. त्यातच भारतीय समाज, संस्कृती, तत्वज्ञान आणि भारतीय जीवन पध्दती गांर्भीयाने समजून घेताना भारतातील विविध धर्मांचा अभ्यास करावा लागतो. त्यातून भारतातील विविध धर्मांचे आणि विविध संप्रदायांचे अनुबंध परस्परांशी सहजतेने गुंतलेले आढळतात.
धर्म हा भारतीयांच्या जीवन जगणाऱ्या पध्दतीचा अविभाज्य अंग राहिले आहे. धर्म आणि भारत यांच्यातील अतूट, अन्योन्य साधारण नातेसंबध स्पष्ट करतान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप उत्तमपणे नमूद केलय- “ भारतात धार्मिक संकल्पना या इतक्या अधिक प्रमाणात आढळतात की त्यांनी समाज जीवनाचे सर्व अंग व्यापून टाकलेले आहे. धर्माव्यतिरिक्त भारत काहीच नाही.” परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या अतिरेकी वापरामुळे ज्या मानवासाठी धर्म असतो तो धर्म खरा मानवकेंद्री धर्म न राहता त्याला कर्मकांडाचे स्वरुप प्राप्त होते. अंधश्रध्दांच्या जोखडात माणसाला जखडबंद करण्याचे केंद्र बनते. त्यामुळे धर्म माणसासाठी राहत नाही तर “धर्मासाठी माणूस असतो” असे धर्माचे स्वरुप बनते. अशा धर्माचे स्वरुप अखिल मानव समूहांसाठी धोकादायक असते, असेही नमूद केलय.
वरीशैव धर्माचा प्रसार या अशाच्या पार्श्वभूमीवर झाला. एवढेच नव्हेतर प्रस्थापित व्यवस्थेविरुध्दच्या बंडातून झाला. याबाबत डॉ. हुनशाळ यांनी यांचे खूप सुंदर विश्लेषण केलय, ते म्हणतात, “ जेव्हा बुध्द धर्म आणि जैन धर्माचा प्रसार कमी होत होता तेव्हा लिंगायत धर्माने शिवशक्तीच्या क्रांतीकारी झेंड्याखाली पुराणमतवादी परंपरिक, सनातनी धर्माला न जुमानता लढा दिला.” भारताचे दिवंगत उपराष्ट्रपती डॉ.बी.डी.जत्ती यांनी वीरशैव धर्माच्या उदयाच्या कारणांची मिमांसा नेमक्या शब्दात केली आहे. त्यांच्या मते “ भारतात जेव्हा जेव्हा धार्मिक अंधश्रध्दा, कर्मकांड,यांचा अतिरेक होऊन अनाचार माजला तेव्हा तेव्हा समाजाला या जाचांतून मुक्त करण्यासाठी धर्मसुधारणेसाठी आणि धर्मशुध्दीसाठी चळवळी झाल्या. अशा या चळवळीत वीरशैव धर्माला महत्वाचे स्थान आहे.” भारतीय समाज प्रामुख्याने कर्मठ असल्यामुळे त्यांच्या समाजशास्त्रीय चौकटीत अमुलाग्र स्वरुपाचे बदल होत नाहीत, असे म्हटले जाते. यात थोडासा सत्य अंश असल्याचे मान्य केले तरी या सामाजिक मूल्यांच्या बुर्जांना तडाखेबंद धक्के देणारे अनेक बंडखोर क्रांतीकारी धर्म सुधारक, धर्म संस्थापक आणि पंथ संस्थापकही निपजल्यांची अनेक उदाहरणे देता येतील. त्यात महावीर, तथागत भगवान बुध्दांपासून महात्मा बसवेश्वरांपर्यंत अनेकांची नावे घेता येतील. आपल्या विचारांचा अमिट ठसा समानमनावर बिंबवून नव्या समाजमनाला जन्म देण्याचे काम या बंडखोरांनी केले आहे. भारतीय धर्म संस्थेच्या इतिहासातील महात्मा बसवेश्वर हे असेच एक महनीय व्यक्तीमत्व होय. समाज सुधारक आणि क्रांतीकारक म्हणून त्यांचे अधिक महत्व वाटते तर त्यांच्या अनुयायांना आणि धर्म अभ्यासकांना समाज सुधारकांबरोबर एका धर्माचे, पंथाचे संस्थापक म्हणून त्यांचे कार्य कर्तृत्व कालातीत वाटते.
अनेक महापुरुषांकडे पाहण्याचे दोन दृष्टीकोण प्रामुख्याने दिसून येतात. एक तर दैवी विभूती म्हणून आणि दुसरा म्हणजे थोर महापुरुष म्हणून. परंतु महात्मा बसवेश्वरांनी केलेले कार्य अभ्यासताना त्यांच्याकडे एक थोर महापुरुष म्हणूनच पहिले पाहिजे, अशी माझी धारणा झाली आहे. कारण बसवेश्वरांनी आपल्या आयुष्यात केलेल्या कार्यातून त्यांचे महानतेचे गमक त्यांच्या माणूसपणात आणि चिरंतन मानवी मूल्यांसाठी त्यांनी केलेल्या कार्यातच दिसून येते.
महात्मा बसवेश्वरांचा जन्म आताच्या कर्नाटकातील आणि तेव्हांच्या म्हैसूर राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे झाला. आता हे गाव तालुक्याचे ठिकाण आहे. या गावाला बसवण्णाची बागेवाडी असेही म्हटले जाते. राजा किंवा इतर समृध्द व्यक्तीने ब्राम्हणांन दान दिलेल्या खेडयांना ‘अग्रहार’ असं म्हटले जात असे. बागेवाडी हे तेव्हा अत्यंत महत्वाचे ‘अग्रहार’ म्हणून प्रसिध्द होते. या गावात नेहमी विद्धवानांची वस्ती असे. उच्च शिक्षणासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येथे येत असत. येथे प्रामुख्याने वेद आणि त्यांची
सहा उपांगे, स्मृती, पुराणे, व्याकरण,छंदशास्त्र, तत्वज्ञानाची सहा व्यवस्था, काव्य, हत्ती आणि घोडे यांचे शास्त्र, वैद्यकशास्त्र आदींचे शिक्षण दिले जात असे. ज्या ब्राम्हणांची अग्रहारांवर सत्ता चाले त्यांना ‘महाजन’ म्हटले जात असे. ते सामूहिकरित्या अग्रहाराची कारभार चालवीत असत. काही वेळा महाजन आपला नेता निवडत आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली कारभार करीत असल्याचे पुरावे सापडतात. बसवेश्वर अशाच एका महाजन नेत्यांचा मुलगा होता. बसवेश्वराच्या जन्माच्या काळात बागेवाडीत पाचशे ब्राम्हण कुटूंबे होती. अग्रहारात केवळ ब्राम्हण कुटूंबे असावीत असा काही संकेत नसल्याचे तेथे इतर जातींचीही काही कुटूंबे होती. विशेष म्हणजे तत्कालीन शिलालेखात बागेवाडीचा उल्लेख ‘महाअग्रहार’ असा करण्यात आला आहे. येथील ब्राम्हणांची विद्धतेबद्दल मोठी ख्याती होती. विशेष म्हणजे येथील बहुतेक ब्राम्हण शैवपंथाचे अनुयायी होते. आणि तेथील शिव मंदिर सर्व धार्मिक कार्यांचे केंद्रस्थान असे.
‘मंण्डगेय मादिराज ’ हे बागेवाडीचे प्रमुख होते. ‘मदांबी’ ही त्यांची बायको. सांख्यायन ग्रोत्राच्या कम्मे घराण्यातील ते शैव ब्राम्हण होते. कम्मे या नावावरुन हे कुटूंब आंध्रातील गुंटूर आणि नेलोर भागातून कर्नाटकात स्थानिक झाले असावे, असा कयास केला जातो. अग्रहाराचा प्रमुख म्हणून मादिराजांना मोठा मान होता. त्यांचे व्यक्तिनत्वही तसेच भारदस्त होते. अनेक वर्षांपासून मुलगा होत नसल्याने मदांबीने ज्योतिबाच्या सल्याने ‘वृषभव्रत’ केले. म्हणजेच मुलगा व्हावा म्हणून नंदीला नवस केला., अन् होणाऱ्या मुलाला त्याचे नाव देण्याचे कबूल केले. कालांतराने मदांबीना मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी ‘बसव’ असे ठेवले (संस्कृतमध्ये वृषभ शब्दाचा उपभ्रंश ‘बसव’ असा आहे.) बालपणी चंद्रकिरणांप्रमाणे सुंदर आणि सदैव हसतमुख असलेले हे बालक सर्वांना हवेहवेसे वाटे.
वयाच्या आढव्या वर्षी बसवेश्वरांच्या आई-बापांनी त्यांचे उपनयन करण्याचा घाट घातला, पण बसवेश्वरांनी या वयातही त्या गोष्टीला विरोध केला. ‘धर्म ग्रंथांनी दाखविलेला मार्ग ब्राम्हण आचरीत नाहीत आणि म्हणूनच आदर्श, वस्तुस्थिती यांत महदंतर पडले आहे. शिवाय ब्राम्हणांच्या धर्माला कर्मकांडाच्या निरर्थक उजळणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. बहुतेकांना ज्ञान किंवा भक्तीपेक्ष कर्माचेच महत्व अधिक होते, त्यांचे ईश्वर प्रेम म्हणजे निव्वळ देखावा आहे. असेही त्यांचे या बालवयात मत झाले होते. जातीयतेच्या भिंती अभ्यद्य स्वरुपात उभ्या होत्या. गरीब आणि श्रीमंतीमध्ये प्रचंड मोठी तफावत होती. एकीकडे श्रीमंतांची अत्यंतिक सुखासिनता आणि दुसरीकडे रोजच्या भाकरीसाठी अहोरात्र कष्ट असणारे गरीब. ही सगळी परिस्थिती बसवेश्वर पहात हाते. त्याचा त्यांच्या बालपनावर खोलवर परिणाम झाला. अस्पृशांची स्थिती तर अधिकच करुणाजनक होती. त्यांना “होलेय” म्हणजे विटाळणारे किंवा बहिष्कृत अनामिक आणि ‘सन्बोली’ म्हणजे
आपले गावातील आगमन ओरडून सांगणारे अशी नावे होती. त्यांच्या ओरडण्यामुळे उच्च जातीतील लोकांना त्यांचा विटाळ टाळणे सुलभ होई. असे लोक गावकुसाबाहेर राहत आणि क्कचितच गावात येत असतं. बहिस्कृत जातीतील लोक हाच श्रमिकांचा मोठा वर्ग होता. हे लोक सामंतांचे चक्क गुलामच होते. समाजात असंख्य अंधश्रध्दा होत्या. काही निरुपद्रवी तर काही अतिशय भयानक स्वरुपाच्या या अंधश्रघ्दातूनही समाजाचे शोषण होत असे. त्याचाही बसवेश्वरांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.
बाराव्या शेतकाच्या पूर्वार्धात कर्नाटकात जैन, वैष्णव, शैव आणि बुध्द धर्म प्रमुख होते. जैन धर्माचा कर्नाटकात पहिल्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत प्रभाव होता. जैन धर्माला जवळजवळ सर्वच राजघराण्यांनी आश्रय दिला. अशोकाच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याने कर्नाटकात बौध्द धर्म स्थिरावला. पण बौध्दांच्या प्रभावाची ठिकाणं मर्यादित होती. पण बाराव्या शतकात कर्नाटकात केवळ शैववादच सगळ्यात लोकप्रिय धर्म होता. त्यात आलेल्या काही अनिष्ट परंपरांचा बसवेश्वरांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. या प्रथा परंपरा त्यांना पटत नव्हात्या. त्यामुळे त्यांनी त्यास विरोध करण्याची भूमिका घेतली. बाह्यावडंबरापेक्षा आंतरिक शुध्दता ईश्वराला हवी असते, असे त्यांचे मत बनले होते. जन्म किंवा कुळ-जात यावरुन ईश्वर माणसांचे मोल ठरवत नाही. उलट कुळ ईश्वरकृपा होण्यातील आडसरच होते. कारण उच्च कुळातील जन्मामुळे माणसांचा अहंभाव वाढीस लागतो. ईश्वर प्राप्तीसाठी भक्ती आणि उदिष्टांची मन:पूर्वकता यालाच महत्व असाव्यास हवे. आपल्या अपंग मुलावर माता ज्या प्रमाणे मायेची पाखरण करते, त्याप्रमाणे कदाचित ईश्वर गरीब आणि पददलितांचा पक्ष घेत असावा. ईश्वर प्राप्तीसाठी धर्मग्रंथांचे ज्ञान आवश्यक असेलही, परंतु तेवढा एकच मार्ग आवश्यक नाही, असेही त्यांचे मत बनले होते.
असे सांगितले जाते की अनिच्छेनेच ‘बसव’ ने उपनयन संस्कार करुन घेतले. उपनयन संस्कार करण्यास त्यांनी प्रथम विरोध केला होता. त्याला हा सगळा प्रसंग क्लेशदायक वाटला. आईच्या वत्सलतेने त्याचे मन वळवण्यात आले होते. परंतु त्यांच्या वडिलांना त्यांचीशी भूमिका पचविणे अत्यंत कष्टदायक गेले. वडिलांच्या भावनांची बसवेश्वरांनी फारशी तमा बाळगली नाही. त्यांच्या या स्वभावामुळे आणि विचारांमुळे समाजाचा जाच बसवेश्वरांना सहन करावा लागत होता. काही समस्यांना धैर्याने तोंडही दिले होते. पंरतु परिस्थिती अगदीच असह्य झाल्यानंतर त्यांनी मोठ्या बहिणीसह बागेवाडीचा निरोप घेतला. बहिण अक्कनागमा बरोबर ते ‘कूडलसंगम’(कप्पडीसंगम) येथे आले. कूडलसंगम हे विजापूर जिल्ह्यातील तेव्हाचे छोटेसे गाव होते. मलप्रभा आणि कृष्णा नदीच्या संगमावर बसलेल्या या रमणीय गावातील संगमेश्वरांच्या देवालयाच्या सेवेत बसवेश्वर चांगलेच रमले. येथे त्यांचा चांगलाच लौकिक वाढला. त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक सेवातील नेतेपणाची पायाभरणी याच गावात झाली, असेही म्हणता येईल.
//5//
कूडलसंगम काही बागेवाडीपेक्षा वेगळे नव्हते. हे सगळे त्याच्या मनोवृत्तीला सहन न होणारे होते आणि आपल्यापरीने वयाच्या आठव्या आणि सोळाव्या वर्षी त्यांनी याबाबतचे असमाधान व्यक्त केलेले होते. येथे अज्ञान आणि पिळवणूक याविरुध्द झगडण्याची त्यांची मूळ प्रकृती बळावू लागली. एक नवीन व्यवस्था निर्माण करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. येथेच त्यांना भोवतालच्या विशाल समाजात जाऊन अखिल मानव जातीसाठी कार्य करायला लावणारी प्रेरणा मिळाली. येथेच नोकरी पत्कारुन आपल्या उदरनिर्वाह करावा असे त्यांच्या मनाने घेतले. यातून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा एक संच तयार करुन आपली स्वप्नातला आदर्श समाज आपल्याला निर्माण करता येईल, असे त्यांना वाटले. कूडलसंगम येथे जातवेद मुनींकडून त्यांनी लिंग दिक्षा घेतली आणि आपल्या अंगावर शिवलिंग धारण केले. जातवेद मुनींकडे राहून त्यांनी वेदवेदांगाचे,षड्दर्शनांचे, इतिहास-पुराणांचे, आणि धर्म शास्त्रांचे अध्ययन केले. याशिवाय बसवेश्वरांनी जैन आणि बौध्द दर्शनही समजावून घेतली. त्यांनी संस्कृत, तामिळ, पाली आदींभाषांतील प्रमुख ग्रंथही वाचले. बसवेश्वर येथेच विद्या संपन्न झाले.
आयुष्यभर सन्यासी होऊन राहील्यास आपला समाजाला उपयोग होणार नाही, असेही त्यांच्या मनाने घेतले आणि त्यांनी कल्याण नगरीत येण्याचा निर्णय घेतले. त्या कल्याण नगरीस आता बसव कल्याण असे म्हटले जाते. तिथे बिज्जळ नावाच्या राजाकडे त्यांना नोकरी मिळाली. बसवेश्वर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर काखतरांने राज्याचे कोषाध्यक्ष झाले.
काही ग्रंथात कूंडलसंगम गावावरुन दक्षिण भारतातील मंगलीवेड (महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे) येथे बिज्जळ राजाकडे आले असे म्हटले आहे. बसवेश्वरांच्या बंडखोर विचारांची पाळेमुळे जनसामान्यांच्या सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीविषयीच्या साठलेल्या असंतोषात खोलवर रुजलेली होती. म्हणून त्यांची शिकवण जाणणारे आणि त्याप्रमाणे आचरण करणारे लोक बहुतेक समाजाच्या दारिद्रयाने गाजलेल्या वर्गातून आलेले होते. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आपल्या धर्माचा स्वीकार कोणालाही करता येईल अशी घोषणा त्यांनी केली. त्यांच्या धार्मिक शिकवणीवर भगवान बुध्दांच्या विचारांचा प्रभाव दिसतो. बुध्दाने पंचशिल आणि अष्टअंगिक मार्गात सांगितलेली शिकवण बसवेश्वरांच्या शिकवणीशी साधर्म्य साधणारी आहे. चोरी करु नको, हत्या करु नको, खोटे बोलू नको, दारु पिऊ नका, व्याभिचार करु नका असे बुध्दांने पंचशिलमध्ये सांगितले, तसेच बसवेश्वरांने सांगितले. कोणावरही रागवू नकोस, कोणाचाही तिरस्कार करु नको, स्वत:विषयी अभिमान बाळगू नको, कोणालाही दुषणे देऊ नकोस, प्रेम आणि करुणेविना धर्म तो कसला? सगळ्या जीवांविषयी करुणा हवी, सगळ्या धार्मिक श्रध्देचे मूळ करुणा होय….पहा! मर्त्यांच्या आणि देवांच्या विश्वात कसलाच भेद नाही! सत्य वचन म्हणजे देवलोक आणि असत्यावचन म्हणजे मृत्युलोक,

सत्कृते म्हणजे स्वर्ग आणि दुष्कृते म्हणजेच नरक होय, अशी शिकवण बसवेश्वरांनी दिली. बसवेश्वरांनी केवळ सामान्य आणि ज्ञानी जनांसाठीच असलेल्या वर्गीकृत आणि कर्मठ विधींचा संच म्हणजे धर्म या जनसामान्यांच्या मनातील अपसमजुतीला सुरूंग लावला. बसवेश्वरांनी धर्म म्हणजे जगण्याची आणि आचरण करण्याची पध्दती, अशी संकल्पना प्रसृत केली.
बसवेश्वरांनी समतेचा पुरस्कार केला. नव्याने वीरशैव धर्मात प्रवेश केलेल्या प्रत्येकाला इतर वीरशैवी धर्मियांनी समानतेची वागणूक देण्याची शिकवण होती. जो वीरशैव धर्म स्वीकारी त्याला भूतपूर्व धर्माशी असलेले सर्व संबंध तोडणे आवश्यक होते. स्वच्छा आणि सत्शील राहणीला पोषक आचार संहिता बसवेश्वरांनी तयार केली. चन्नबसवाने अशा पन्नास आचारांची नियमावली तयार केली होती. ह्यात नियमित स्नान, दात घासणे, हिंसा टाळणे, सत्यवचन, नवऱ्याने अर्थात बायकोनेही एकनिष्ठा राहणे वगैरे गोष्टींचा समावेश केला होता. आंतरिक शुध्दतेवर भर देताना बाह्यांगीच्या शुध्दतेचे, स्वच्छतेचे महत्व वीरशैववादाने कधीच नाकारले नव्हते.
शिवाची असंख्य मंदिरे पाशुपत शैव धर्माची बलस्थाने होती. धनिक आणि प्रतिष्ठित लोक अमाप संपत्ती खर्चून मंदिरे उभारीत. एखादे मंदिर उभारले की, लोक देणग्या देत, दान करीत. वर्षभर दिवा लावण्याची सोय करीत, मंदिरात नृत्यांगना असावी म्हणून तशी व्यवस्था केली जाई, वेगवेगळे सण साजरे करण्यासाठी किंवा मठातील साधूंच्या चरितार्थासाठी किंवा शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठी लोक दान करीत. अशा देणग्यांची माहिती अनेक शिलालेखांतून मिळते. परंतु अशा मंदिर आणि मठांमध्ये अस्पृश्यांना प्रवेश दिला जात नसे. त्यामुळे बसवेश्वरांना मंदिर म्हणजे धनिकांचा आणि माथेफिरूंचा विपर्यस्त सामाजिक व्यवहार वाटे. त्यामुळे बसवेश्वरांनी आपल्या अनुयायांनी आणि वीरशैवीयांनी मंदिर बांधू नयेत. तसेच मंदिरात जाऊ नये, अशी सक्त ताकिद दिली होती. इष्टलिंगाच्या रुपाने ईश्वर आपण आपल्या शरीरावर धारण केल्यामुळे पूजेची जरुर नाही, असे त्यांनी सांगितले. परमेश्वर त्याच्या सतरुपाने ह्दयस्था आहे. बसवेश्वर अंधश्रध्दांचा तिरस्कार करीत. त्यांनी आपल्या शिष्यांना अंधश्रध्दांचा त्याग करण्यास सांगितले. स्पर्शाने विटाळ होतो या कल्पनेची त्यांनी टर उडविली. शुभ कार्यासाठी ज्योतीषांकडून मुहूर्त पाहण्याची वीरशैवीयांना काही गरज नाही असा बसवेश्वरांनी आग्रह धरला. ज्या दिवशी ईश्वराचे स्मरण कराल, तो प्रत्येक दिवस शुभ, असे मत त्यांनी नोंदविले.
बसवेश्वरांना अस्पृश्यांविषयी अपार प्रेम होते. त्यांना ‘होलेय’ असे संबोधण्यास त्यांचा विरोध होता. अस्पृश्यांना शिवेबाहेर राहावे लागे. या पध्दतीला त्यांचा विरोध होता. ज्यांच्या विषयी आदर वाटे असे अनेक संत अस्पृश्य होते. बसवेश्वरांनी जातिसंस्थेविषयी खूप विचार केला होता. व्यवसायांमुळे विविध जातींचे अस्तित्वा निर्माण होते, असा निष्कर्ष त्यांनी काढला. वेदाध्यना करणारा ब्राह्मन, कापड करणारा विणकर, जोडे
//7//
बनविणारा चांभार-वास्तविक सगळे समानच होते. बसवेश्वर म्हणत कोणीही आपल्या आईच्या मानातून जन्मलेला नाही. त्यामुळे भारतातच अशी अस्पृश्यता आहे, जगात का नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कल्याण शहराबाहेरच्या अस्पृश्य वस्तीतील अनेक जण वीरशैव झाले होते. त्या वस्तीमधे जाणाऱ्या रस्त्याचे नाव बसवेश्वरांनी ‘दिव्या माहेश्वरांचा’ रस्त असे ठेवले. माहेश्वरचा अर्थ “शिवाचा भक्त” असा होतो. या रस्त्याने बसवेश्वर नेहमी जात. एकदा त्या रस्त्याने जातांना त्यांनी शिवाचे स्तुतिगान ऐकले. चौकशी केल्यावर सम्बोली नागीदेव उर्फ शिवनागय्या हा अस्पृश्य शिवस्तुती गात होता, हे त्यांना कळले. शिवनागप्पाच्या शिवभक्तीमुळे आणि आचरणामुळे स्पृश्यांचा त्यांच्यावर राग होता. तरीही बसवेश्वरांनी शिवनागप्पांच्या घरी जाऊन त्याच्याबरोबर जेवण केले. त्यांच्या विरोधकांनी ही बातमी हेरांकरवी राजा बिज्जळाकडे पोहचवली. राजा पारंपरिक धर्माचा पुरस्कार करणारा, वर्णधर्म मानणारा होता. त्यामुळे राजा आणि बसवेश्वरांमधील दरी वाढत गेली.
बसवेश्वर गरीबांचे कैवारी होते. त्यांनी गरीब भक्ताला वाईट रितीने वागवू नका, त्याला बोलावून त्यांचे आदरातिथ्या करा, असे सांगितले. दारिद्रया काही पाप नाही आणि गरीबांना न्यूनगंडाची बाधा होण्याची काही एक गरज नाही, असेही ते म्हणत असत. लोकांच्या अस्मितेला त्यांनी आवाहन केले. दरिद्री लोकांच्या घरी जाण्याला करचले नाहीत. ते त्यांच्यात आत्मियतेने मिसळत आणि त्यांच्या सोबत भोजनही करत. आपल्या सर्व शिष्यांनी व्यवसाय करावेत, खूप परिश्रम करावेत आणि सुखी व्हावे, असे त्यांना मनोमन वाटे. त्यांची ही विचारसरणी म्हणजे आधुनिक समाजवादच होय. व्यवसाय करुन अर्थार्जन करावे म्हणून त्यांनी ‘कायाक’ नावाच्या तत्वाचीही शिकवण दिली. कायाकचा शब्दशा: अर्थ देहाशी निगडित ते ते सर्व असा होतो. कायाक म्हणजे शरीर किंवा देह. बसवेश्वरांच्या मते प्रत्येकाने कोणता तरी व्यवसाय केला पाहिजे. व्यक्तीने समाजावर बोजा टाकू नये, अशी त्यांची या मागे भूमिका होती.
स्त्रियांचा सामाजिकदृष्ट्या दर्जा कनिष्ठ होता. त्यांची सर्व कृतीशीलता घरापुरती मर्यादित होती. त्यामुळे बसवेश्वरांनी स्त्रियांना या जोखडातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. स्त्रियांना त्यांचे न्याय हक्क मिळवून दिले. त्यांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली. स्त्रियांना चांगले शिक्षण, मतस्वातंत्र्य, सभेतील मोकळीक, चर्चेत सहभाग आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आध्यात्मिक उपासनेची परवानगी देण्याचा आग्रह धरला. स्त्रियांना विविध व्यवसाय करण्यासाठी आणि कुटुंबासाठी कमाई करण्याकरिता बसवेश्वरांनी प्रोत्साहन दिले. गीत आणि काव्यरचनेतून स्वत:ला व्यक्त करण्याची मुभा दिली.
जातीव्यवस्था संपवण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले पाहिजे, जातीतच विवाह करण्याची प्रथा थांबवली पाहिजे आणि स्त्रियांना स्वत:चा जोडीदार निवडण्याची मुभा दिली पाहिजे, असे मत

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विसाव्या शतकात मांडले, पण बसवेश्वरांनी बाराव्या शतकात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. स्वत: तसेच वर्तन केले. बसवेश्वरांनी अस्पृश्यांच्या मुलींशी उच्च वर्णियांनी विवाह करावा, असे प्रतिपादन केले. त्यामुळे परंपरावादी आणखीणच भडकले. पारंपरिक धर्म शास्त्राप्रमाणे वर्णाश्रम धर्माचे संरक्षण करणे राजकर्तव्यच होते. त्यात असाही नियम होता की राजाने वर्ण संकर होणार नाही म्हणजे जाती-जातीत विवाह होणार नाहीत, याचीही खबरदारी घेतली पाहिजे. बसवेश्वारांच्या शत्रुंनी राजा बिज्जळ यांना याबाबत चांगलेच पटवून देऊन बसवेश्वरांचा बंदोबस्त करण्यास त्यांचे मन वळवले. कल्याणलाच अल्लय्या आणि मधवय्या नावाचे दोन शिवभक्ता राहत होते. अल्लय्या अस्पृश्या तर मधुवय्या जन्माने ब्राह्मन होता. दोघांची घनिष्ठ मैत्री होती; आणि ते बसवेश्वरांचे शिष्या होते. मधुवय्याच्या मनात आपली मुलगी अल्लय्याच्या मुलाला द्यावी असे होते. त्यास बसवेश्वरांची परवानगी होती. त्यामुळे सगळा बसवेश्वर समाज आनंदित झाला होता. प्रतिगाम्यांनी सवर्ण अस्पृश्यांकडे जेवतात असे ऐकले आणि पाहिले होते, परंतु आता विवाहापर्यंत या गोष्टी गेल्याचे पाहुण त्यांचा राग अनावर झाला. याबाबत राजा बिज्जळकडे तक्रार केली. राजाने विवाह थांबविण्याचे आदेश दिले. पण काहीही झाले तरी विवाह होणारच असे म्हणून त्या दोघांनी राजाची आज्ञा ठोकारली. बिज्जळ राजाने संतापाने त्यांचे डोके फोडले आणि दोघांचेही डोळे काढले. या घटनेने वीरशैव समाजात विद्रोहाचे वादळ उठले. यातून बिज्जळच्या राज्यात यादवीला सुरूवात झाली. बिज्जळचा वध करण्यात आला. बसवेश्वरांना कल्याण सोडून कुडल संगमावर जावे लागले आणि 1167-68 मध्ये कूडलसंगमावर बसवेश्वरांनी अखेरचा श्वास घेतला.
बसवेश्वरांनी केलेल्या सामजिक सुधारणा आश्चर्य वाटतील इतक्या नव्या होत्या. त्यांनी प्रतिपादलेले आदर्श प्रत्यक्ष वागणुकीत रुपांतरीत झाले होते. सर्वसामान्या लोकांना त्यांची शिकवण समाजली होती आणि ते त्यांचे अनुयायी झाले होते. याचा पुरावा उपलब्ध आहे. भारताच्या इतिहासात एवढ्या मोठ्या स्वरुपाची धार्मिक चळवळ बुध्दानंतर दिसत नाही. कर्नाटकच्या इतिहासतही हीच पहिली क्रांतीकारी चळवळ झाली, असेच म्हणावे लागेल.
यशवंत भंडारे
‘सुगत’ त्रिमुर्ती नगर, प्लॉट क्रं.29/30,
न्यू पहाडसिंगपूरा, हनुमान टेकडीजवळ, औरंगाबाद
मो.क्र. 9860612328
ई-मेल-yeshwantbhandare1964gmail.com
-*-*-*-*-*-*



प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
उच्चांकी पाचशे दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई
तत्कालिन जिल्हाधिकारी काकाणी यांच्या प्रयत्नांचे यश

नांदेड दि. 28 :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 2016-17 च्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी नांदेड जिल्ह्यास तब्बल पाचशे दोन कोटी रुपयांची विमा रक्कम म्हणून जाहीर झाले आहेत. राज्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असा उच्चांकी पीक विमा मिळाला आहे. खरीप हंगाम 2016 मध्ये सात लाख 67 हजार 973 शेतकऱ्यांनी 30 कोटी 40 लाखांचा हप्ता भरला. त्यामुळे नुकसान भरपाईपोटी 4 लाख 44 हजार 74 शेतकऱ्यांना पाचशे दोन कोटी तीन हजार रुपयांची विमा रक्कम मिळणार आहे. यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे यांनी केलेल्या सातत्यपुर्ण  प्रयत्नांना यश मिळाले आहे. नुकसान भरपाई मिळालेल्या पिकांत प्रामुख्याने मुग, उडीद, ज्वार, सोयाबीन यांचा समावेश आहे.

पीक विम्याबाबत जिल्हा महसूल प्रशासन, कृषी, सहकार आणि बँकांनी समन्वयाने राबविलेल्या प्रयत्नामुळे आणि शेतकऱ्यांमध्ये पीक विमा संरक्षणाबाबत निर्माण झालेल्या जाणीव-जागृतीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात विमा रक्कम मिळाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सन 2014-15 च्या खरीप हंगामापासूनच पीक विमा भरण्याबाबत सकारात्मक जाणीव-जागृती झाल्याचे आकडेवारीवरूनही स्पष्ट झाले आहे. सन 2015 च्या खरीप हंगामासाठीही 245 कोटी 52 लाख रुपये विमा संरक्षणापोटी मिळाले होते. त्यानुसार सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात विमा संरक्षणाचा दिलासा देण्यात यश आले आहे.
 शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी व्हावे यासाठी अनेक स्तरावरून प्रयत्न करण्यात आले. यामुळे खरीप हंगाम 2016 मध्ये शेतकऱ्यांनी विमा योजनेत मोठ सहभाग नोंदविला. जिल्हयामध्ये 2016 च्या खरीप हंगामात 7 लाख 69 हजार 250 हेक्टरवर पेरणी झाली होती. यात जिल्ह्यातील 7 लाख 67 हजार 973 शेतकऱ्यांनी 30.48 कोटी विमा हप्ता बँकांद्वारे भारतीय कृषि पिक विमा कंपनी, मुंबई यांच्याकडे कंपनीकडे भरला होता. ज्यामुळे 3 लाख 83 हजार 69.38 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विमा संरक्षण मिळाले. या कंपनीकडून खरीप हंगाम 2016  साठी नुकताच नुकसान भरपाई म्हणून नांदेड जिल्ह्यास पाचशे दोन कोटी तीन हजार रुपयांची विमा रक्कम पिक संरक्षणापोटी जाहीर करण्यात आली. ही नुकसान भरपाई प्रामुख्याने मुग, उडीद, ज्वार, सोयाबीन या पिकांना मिळाली. या पिकांसाठी जिल्ह्यातील 5 लाख 55 हजार 872 शेतकऱ्यांनी 17 कोटी 96 लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. त्याद्वारे 2 लाख 92 हजार 8 हेक्टरवरील पीकसंरक्षित झाले होते. त्यातील 4 लाख 44 हजार 74 शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी कंपनीने पाचशे दोन कोटी तीन हजार रुपयांचे विमा लाभ देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय विमा हप्ता भरलेल्या कापूस व तूर या पिकांची विमा नुकसान भरपाई अजूनही जाहीर होणे बाकी आहे.
गत  खरीप हंगाम 2015-16 मध्येही 4 लाख 72 हजार 617 शेतकऱ्यांनी  पीक विमा हप्त्यापोटी 17 कोटी 24 लाख रुपये भरले होते. त्यातून त्यांना नुकसान भरपाई पोटी 245 कोटी 52 लाख रुपये मिळाले होते. यामुळे पीक विमा भरलेल्या 7 लाख 7 हजार 565 हेक्टर पैकी 2 लाख 80 हजार 501.54 हेक्टरवरील पिकांना संरक्षणापोटी रक्कम मिळाली.
पिकांच्या विमा संरक्षणपोटी मिळणारी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची बँक खातीही काढण्याची मोहिमही यशस्वी ठरली आहे.
पीक विमा योजनेत वाढला शेतकऱ्यांचा जागरूक सहभाग

वर्ष
भाग घेतलेले शेतकरी
नुकसान भरपाई पोटी मिळालेले रक्कम  
संख्या
विमा हप्ता रक्कम
2011-12
80 हजार 183
1 कोटी 20 लाख
15 लाख
2012-13
5 हजार 793
28 लाख
2 कोटी 4 हजार
2013-14
14 हजार
51 लाख
53 हजार
2014-15
1 लाख 39 हजार 27
4 कोटी 79 लाख
74 कोटी 44 लाख  
2015-16
4 लाख 72 हजार 617
17 कोटी 24 लाख
245 कोटी 52 लाख
2016-17
7 लाख 67 हजार 973
30 कोटी 48 लाख
502 कोटी 3 हजार
( कापूस,  तूर वगळता )

महसूल, कृषी, सहकार विभाग आणि बँकांमध्ये समन्वय
सलग टंचाई सदृश्य परिस्थिती तसेच अतिवृष्टीचा फटका यामुळे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्याचा चंगच बांधला. सन 2015 मधील शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून, सन 2016-17 च्या खरीपासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वयासाठी बैठका घेण्यात आला. त्यामध्ये महसूल, कृषी आणि सहकार विभाग तसेच बँक यंत्रणांना प्रेरीत करण्यात आले. शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी कृषी सहायकापासून, कृषी पर्यवेक्षक,तलाठी यांचा सक्रीय सहभाग घेण्यात आला. व्हॅाटसॲपस ग्रुपचाही प्रभावी वापर करण्यात आला. शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी शेतकरी गट, शेतकरी मित्र, वृत्तपत्रे, आकाशवाणी, मोबाईल एसएमएस, ईलेक्ट्रॅानीक माध्यमे यांचा पुरेपूर वापर करण्यात आला.
तत्कालिन जिल्हाधिकारी श्री. काकाणी, डॉ. मोटे यांचे सातत्यपुर्ण प्रयत्न
पीक विमा भरण्यात शेतकऱ्यांना कोणत्याही टप्प्यांवर अडचण येऊ नये यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करण्यात आले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या टप्प्यांबाबत वारंवार शेतकऱ्यांना अवगत करण्यात आले. कृषी विभागांच्या कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांना आवर्जून पीक विमा भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्याकडून कागदपत्रांची पुर्तता करून घेण्यात आली. हप्ता भरण्याची अंतिम मुदत जवळ आल्यावर एका विशेष मोहिमेद्वारे जिल्ह्यात बँकामध्ये कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक आणि तलाठी यांना नियुक्त करून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तिथेच पुर्तता करून घेण्यात आली. यामुळे बँक यंत्रणेलाही हप्ते भरून घेणे सोयीचे झाले आणि शेतकऱ्यांचीही मोठी सुविधा मिळाली. अशा प्रयत्नांमुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षणाचा मोठा दिलासा मिळाल्याचे डॅा. मोटे यांनी सांगितले.

000000
महात्मा बसवेश्वर यांचे विचार पुढच्या
पिढीपर्यंत पोहचवावेत - जिल्हाधिकारी डोंगरे
जिल्हाधिकारी कार्यालयात बसवेश्वर यांना अभिवादन

नांदेड दि. 28 :- महात्मा बसवेश्वर यांचे जीवनच एक दार्शनिक होते. त्यामुळे नव्या पिढीपर्यंत महात्मा बसवेश्र्वरांचे विचारांची महती पोहचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे केले. जगज्योती महात्मा बसवेश्र्वर यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. डोंगरे बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, तहसिलदार ज्योती पवार, तहसिलदार अरविंद नरसीकर आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले की, महात्मा बसवेश्र्वरांचे जीवन हाच एक संदेश आहे. त्यांनी समजोन्नतीसाठी केलेल्या कार्याची महती पुढच्या पिढीपर्यंत पोहचणे महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना, महात्मा बसवेश्र्वरांची कर्मभुमी म्हणून परिचित असलेल्या मंगळवेढा परिसरात ग्रंथालय, प्राचीन ठेव्यांचे जतन तसेच संशोधनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांत सक्रीय सहभागी होण्याची संधी मिळाल्याचेही नमूदही केले.
सुरवातीला महात्मा बसवेश्र्वर यांच्या प्रतिमेस नूतन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. लिपीक दिपाली घाटोळ तसेच अप्पर कोषागार अधिकारी श्री. पाचंगे यांची महात्मा बसवेश्र्वर यांच्या जीवन चरित्र-कार्याविषयी समयोचित भाषणे झाली. तहसिलदार श्री. नरसीकर यांनी आभार मानले.

000000
लोकाभिमुख प्रशासनाद्वारे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास – नूतन जिल्हाधिकारी डोंगरे
पदभार स्विकारला, विविध घटकांकडून स्वागत
नांदेड दि. 28 :- नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास राहील. हा ध्यास पुर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव लोकाभिमुख राहील असा प्रयत्न राहील, असा मनोदय नूतन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे व्यक्त केला. श्री. डोंगरे यांनी आज नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर ते सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. डोंगरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून तसेच विविध घटकांकडून त्यांना शुभेच्छा देऊन स्वागतही करण्यात आले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पदावरून श्री. डोंगरे यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. श्री. डोंगरे यांच्याकडे प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांना 2016 मध्ये  भारतीय प्रशासकीय सेवा श्रेणी मिळाली आहे. तत्त्पुर्वी ते सन 1991 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी-अमरावती, उपायुक्त महसूल व सामान्य प्रशासन-अमरावती, अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांना सन २००३ साली शासनाचा उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कालावधीत अमरावती महापालीकेस केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतील आटो डीसीआर प्रणालीसाठी तसेच ई-इंडीया पुरस्कार मिळाला
           
मे 2015 पासून ते सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोलापूर जिल्हा परिषदेतही त्यांनी माहिती-तंत्रज्ज्ञानाद्वारे ई-ओपीडी, ई-ऑफिस, ई-लायब्ररी यासह ग्रामविकासाच्या विविध संकल्पना यशस्वीपणे राबविल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यास जलयुक्‍त शिवार अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन 2015-16 चा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे. तर सोलापूर जिल्हा परिषदेस यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामविकास विभागाचा सन 2016-17 चा द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
नांदेड जिल्हाधिकारी म्हणून रुजू होताच श्री. डोंगरे यांचे जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आदी घटकांकडून स्वागत करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, सहायक करमणूक कर अधिकारी मकरंद दिवाकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रूजू होताच जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी प्रशासनातील विविध बाबींचा तसेच योजनांचा आढावाही घेतला.
तत्पुर्वी शासकीय विश्रामगृह येथेही उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, दिपाली मोतीयेळे, अजित थोरबोले, तहसिलदार किरण अंबेकर आदींनीही नूतन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे स्वागत केले.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...