Friday, April 28, 2017

लोकाभिमुख प्रशासनाद्वारे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास – नूतन जिल्हाधिकारी डोंगरे
पदभार स्विकारला, विविध घटकांकडून स्वागत
नांदेड दि. 28 :- नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास राहील. हा ध्यास पुर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव लोकाभिमुख राहील असा प्रयत्न राहील, असा मनोदय नूतन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे व्यक्त केला. श्री. डोंगरे यांनी आज नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर ते सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. डोंगरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून तसेच विविध घटकांकडून त्यांना शुभेच्छा देऊन स्वागतही करण्यात आले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पदावरून श्री. डोंगरे यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. श्री. डोंगरे यांच्याकडे प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांना 2016 मध्ये  भारतीय प्रशासकीय सेवा श्रेणी मिळाली आहे. तत्त्पुर्वी ते सन 1991 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी-अमरावती, उपायुक्त महसूल व सामान्य प्रशासन-अमरावती, अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांना सन २००३ साली शासनाचा उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कालावधीत अमरावती महापालीकेस केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतील आटो डीसीआर प्रणालीसाठी तसेच ई-इंडीया पुरस्कार मिळाला
           
मे 2015 पासून ते सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोलापूर जिल्हा परिषदेतही त्यांनी माहिती-तंत्रज्ज्ञानाद्वारे ई-ओपीडी, ई-ऑफिस, ई-लायब्ररी यासह ग्रामविकासाच्या विविध संकल्पना यशस्वीपणे राबविल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यास जलयुक्‍त शिवार अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन 2015-16 चा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे. तर सोलापूर जिल्हा परिषदेस यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामविकास विभागाचा सन 2016-17 चा द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
नांदेड जिल्हाधिकारी म्हणून रुजू होताच श्री. डोंगरे यांचे जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आदी घटकांकडून स्वागत करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, सहायक करमणूक कर अधिकारी मकरंद दिवाकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रूजू होताच जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी प्रशासनातील विविध बाबींचा तसेच योजनांचा आढावाही घेतला.
तत्पुर्वी शासकीय विश्रामगृह येथेही उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, दिपाली मोतीयेळे, अजित थोरबोले, तहसिलदार किरण अंबेकर आदींनीही नूतन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे स्वागत केले.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1158 नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर ...