वंचित घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी
प्रयत्नशील रहावे - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 14 :- समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी
संबंधीत अधिकाऱ्यांनी अधिक प्रयत्नशील रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे यांनी आज येथे दिले.
नांदेड जिल्हाधिकारी
यांच्या निजी कक्षात वंचित घटकासाठी करावयाच्या उपाय योजनाबाबतची बैठक
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे
सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रवीणकुमार घुले व जी. बी. सुपेकर, जिल्हा माहिती व बाल
विकास अधिकारी डी. पी. शाहू, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी
चंदनसिंग राठोड, समाज कल्याण विभागाचे बी. एस. दासरी, सहाय्यक जिल्हा पुरवठा
अधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे, लीड बॅक व्यवस्थापक विजय उशीर, स्टेट बँक ग्रामीण
स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक दिलीप शिरपुरकर आदी उपस्थित होते.
समाजातील वंचित घटकांना
विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार
आहे. सध्या नांदेड तालुक्यातील सांगवी व लोहा या दोन गावातील वंचित कुटुंबाचा
सर्वे करण्यात आला असून सांगवी येथे 182 व लोहा येथे 113 कुटुंबे आढळून आली आहेत.
या सर्व कुटुंबांचे पुनर्वसन, आरोग्य, निवारा, शिक्षण, व्यवसाय, अन्नधान्य,
प्रशिक्षण आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी अधिक प्रयत्नशील
रहावे, शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळवून दयावा. त्यासाठी येत्या 15 दिवसात
अधिकाऱ्यांनी कुटुंबांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी. त्यांना आवश्यक
असणाऱ्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी प्रत्येक शासकीय
विभागाने सुक्ष्म नियोजन करावे, असा सूचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी
दिल्या.
प्रारंभी जिल्हा पुरवठा
अधिकारी संतोष वेणीकर यांनी वंचित घटकांसाठी आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती
यावेळी दिली.
00000