





वृत्त क्रमांक 191
राज्यातील 25 हजार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार
- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
नांदेड ( किनवट ) दि. 17 फेब्रुवारी :- राज्यातील 25 हजार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह उभारणार असून, यात किनवट, माहूर व हिमायतनगरचा समावेश असेल, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी रात्री किनवट येथे केली.
किनवट येथील समतानगरात आयोजित चौदाव्या जागतिक धम्म परिषदेला मार्गदर्शन करताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट बोलत होते. यावेळी किनवटचे आमदार भीमराव केराम, हदगावचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर ,उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे, धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ.मोहनराव मोरे, संयोजक दया पाटील, अध्यक्ष सुनील भरणे आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा शासनाचा मानस आहे.किनवटमध्ये १०० मुलांसाठी तर माहूर व हिमायतनगरमध्ये 100 मुलींसाठी 15 ते 20 कोटी रुपयांची वसतिगृह उभारण्यात येणार असून, येत्या 3 ते 4 महिन्यात या कामाच्या भूमिपुजनाला आपण स्वतः येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
किनवटमध्ये सातत्याने चौदा वर्षांपासून धम्म परिषद होते, ही बाब कौतुकास्पद आहे. बाबासाहेबांनी काय निर्माण केले, हे पाहायचे, ऐकायचे असेल, तर धम्म परिषदेत आले पाहिजे. समाज जागरुक होत असला, तरी समाजव्यवस्था परिपूर्ण नाही. अन्याय, अत्याचार सुरूच आहेत. समाजाने मागणारे नव्हे, तर देणारे व्हावे. बाबासाहेबांची ताकद इतकी प्रचंड आहे की, त्यांच्या नावाशिवाय राजकारणच होवू शकत नाही. समाजाने चिंता न करता संघर्षातून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार भिमराव केराम, आमदार बाबूराव कदम, विजय खडसे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. अॅड.सुनील येरेकार यांनी आभार मानले. मंत्री संजय शिरसाट यांनी शहरातील गजानन महाराज मंदिर तसेच संथागार वृद्धाश्रमास भेट दिली. त्यांच्यासमवेत महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
00000
वृत्त क्रमांक 190
शिवजयंती निमित्त वाहतूक मार्गात बदल
नांदेड दि. 17 फेब्रुवारी :- बुधवार 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंती निमित्त शहरात मिरवणूका काढण्याची शक्यता आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी. यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये बुधवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पुढील मार्गावरील वाहतूक बंद ठेवून, पर्यायी मार्गाचा वापर करण्याची अधिसूचना पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी निर्गमीत केली आहे.
वाहतूकीसाठी बंद असलेले मार्ग जुना मोंढा, देना बँक, महावीर चौक, तरोडेकर मार्केट, वजीराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर ते आय.टी.आय चौकापर्यंत जाण्या-येण्यासाठी पूर्णपणे बंद, राज कार्नर कडून आय.टी.आय कडे येण्यासाठी राज कार्नर, वर्कशॉप टी पॉईट, श्रीनगर ते आय.टी.आय पर्यत डावी बाजू वाहतुकीसाठी बंद. राज कार्नर ते तरोडा नाकाकडे जाण्यासाठी डावी बाजू वाहतुकीसाठी बंद, बर्की चौक ते जूना मोंढाकडे येण्यासाठी बंद, सिडको/ हडको ते जुना मोंढयाकडे येण्यासाठी बंद.
वाहतूकी करीता पर्यायी मार्ग- जुना मोंढा ते राज कार्नर मार्गावरील वाहतुक अबचलनगर-यात्रीनिवास –साठेचौक-नागार्जूना टी पॉईट-आनंदनगर भाग्यनगर-वर्कशॉप कॉर्नर-राज कॉर्नर ते पुढे जाण्या येण्यास वापर करतील. वजीराबाद चौकाकडून श्रीनगर, वर्कशॉपकडे जाणारी वाहतूक वजिराबाद चौक, तिरंगा चौक, पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रिज, शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईटकडे जाण्या-येण्यासाठी वापर करतील. रविनगर जुनाकौठा, गोवर्धनघाट पुलावरुन नांदेड शहरात येणारी वाहतुक तिरंगा चौक-पोलीस मुख्यालय कॉर्नर-लालवाडी अंडरब्रिज-शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईटकडे जाण्या-येण्यासाठी वापर करतील.
राज कॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतुक राज कॉर्नर-वर्कशॉप कॉर्नर- भाग्यनगर-आनंदनगर-नागार्जूना टी पॉईट –अण्णाभाऊ साठे चौक-यात्री निवास पोलीस चौकी-अबचलनगर ते जाण्या-येण्यासाठी वापर करतील.
बर्की चौकाकडून जुना मोंढाकडे येणारी वाहतुक महमद अली (गणेश टॉकीज) रोडचा जाण्या-येण्यासाठी वापर करतील. सिडको/हडको कडून येणारी वाहतूक साई कमान-गोवर्धन घाट नवीन पुल-तिरंगा चौक-पोलीस मुख्यालय कॉर्नर –लालवाडी अंडरब्रीज-शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईटकडे जाण्यासाठी वापर करतील.
तरी शिवजयंतीच्या दिवशी सकाळी 11 ते मध्यरात्री पर्यत वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे अधिसूचनेनी कळविले आहे.
0000
वृत्त क्रमांक 189
राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे
21, 22 व 23 फेब्रुवारी कालावधीत आयोजन
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार स्पर्धेचे उद्घाटन
नांदेड दि. 17 फेब्रुवारी :- राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2025 या येत्या 21, 22 व 23 फेब्रुवारी कालावधीत नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शुक्रवार 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे राहणार आहेत. तर गृह, महसूल, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच सर्व विभागीय आयुक्त, नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी, इतर जिल्हातील जिल्हाधिकारी व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धा छत्रपती संभाजीनगर विभागाच्यावतीने घेण्यात येत आहेत.
या स्पर्धेसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबीची जिल्हाधिकारी राहूल कर्डिले व इतर अधिकारी यांच्यासमवेत आज 17 फेब्रुवारी रोजी पाहणी करण्यात आली. तसेच स्पर्धेसाठी उभारण्यात येणारे गुरूगोविंदसिंघ स्टेडियम नांदेड येथील मंडपाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले आहे. त्याच्यासोबत महसूल अधिकारी, इतर अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
000000
वृत्त क्रमांक 188
नांदेडला जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन
नांदेड दि. 17 फेब्रुवारी :- आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती 19 फेब्रुवारी 2025 निमीत्त "जय शिवाजी- जय भारत पदयात्रा" चे आयोजन केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वा. "जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे " आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयापासुन सुरुवात होणार आहे. पुढे ही पदयात्रा चिखलवाडी कॉर्नरमार्गे तहसिल कार्यालय ते अण्णाभाऊ साठे पुतळा ते आयटीआय चौक (महात्मा ज्योतिबा फुले पुतळा) मार्गे शिवाजीनगर ते वजिराबाद चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन या पदयात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्हयातील सर्व मान्यवर, लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी, सर्व शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी, खेळाडू, विविध क्रीडा संघटनेचे खेळाडू मुले-मुली, प्रशिक्षक व पदाधिकारी, विद्यापीठे, एनजीओ, एनएसएस, एन.वाय.के संस्था व My Bharat Volunteers, एनसीसी व आदींनी या पदयात्रेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन सहभाग नोंदवावा व शासकीय उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग (प्राथ./माध्य), जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 187
रस्ता व रेल्वे पुलाच्या कामामुळे
वाहनासाठी पर्यायी मार्ग
नांदेड दि. 17 फेब्रुवारी :-निळा जं. शंकरराव चव्हाण चौक-गाडेगाव-ब्राम्हणवाडा-मुगट-आमदुरा-वासरी-शंखतिर्थ-माळकौठा-बळेगाव-कारेगाव फाटा-बाभळी फाटा-बेलूर-नायगाव ते राज्य सिमा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तसेच प्रजिमा-83 जि. नांदेड याकामांतर्गत गाडेगाव येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम प्रगतीत असल्याने जडवाहने पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत अधिसुचना निर्गमीत करण्यात आली आहे.
मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी राहूल कर्डिले यांनी संबधीत विभागाने दिलेल्या अटी व शर्तीनुसार उपाययोजना करतील या अटीवर तसेच, संबधीत विभागाने पुढील उपाययेाजना करुन तसेच 20 फेब्रुवारी ते 20 मार्च 2025 पर्यंत नमुद केलेल्या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
वाहनांसाठी प्रतिबंधीत करण्यात आलेला मार्ग निळा जं. शंकरराव चव्हाण चौक-गाडेगाव-ब्राम्हणवाडा-मुगट व निळा जं.शंकरराव चव्हाण चौक-गाडेगाव-ब्राम्हणवाडा-मुगट आहे. या मार्गासाठी पर्यायी मार्ग (जाणे-येणेसाठी) जड वाहनांकरीता शंकरराव चव्हाण चौक-बोंढार तर्फे हवेली-वाजेगाव-शिकारघाट-मुगट राहील. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांकरीता- गाडेगाव-बोंढार तर्फे हवेली ते देगलूर नाका ग्रामीण मार्ग 37 हा राहील.
पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करावी. ही अधिसुचना कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांच्या कार्यालयामार्फत स्थानिक मराठी, हिन्दी, इंग्रजी व ऊर्दु वर्तमानपत्रात प्रसिद्धी द्यावी. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी रस्ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही करावी. ही अधिसूचना आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी निर्गमीत करण्यात आली आहे.
00000
वृत्त क्रमांक 186
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदेड येथे उत्सुकता
मराठी सारस्वतांचा महामेळाव्याला लेखक, प्रकाशक व भाषा तज्ज्ञांच्या शुभेच्छा
नांदेड दि. १७ फेब्रुवारी :- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आणि त्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य होणे हा दुग्ध शर्करा योग आहे. या साहित्य संमेलनाला मराठी साहित्यिक, सारस्वतांचा महामेळावा दिल्लीत भरणार असून मराठी व अमराठी रसिकांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे. यानिमित्ताने नांदेड येथील लेखक, साहित्यिक, संपादक यांनी या संमेलनाला उपस्थित राहून अनेक ग्रंथसंपदाचा आनंद घेणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.
तमाम मराठी साहित्यिक, रसिक या संमेलनाची आतुरतेने वाट पाहत असतो. आता तो क्षण समिप आला आहे. या क्षणाला साक्षीदार होण्यासाठी अनेक मराठी साहित्यिक, रसिक, वाचक दिल्ली येथे हजेरी लावणार आहेत. अशा नांदेड जिल्ह्यातील कवि, विचारवंत, मराठी साहित्यीकांच्या बोलक्या प्रतिक्रीया ....
नांदेड येथील मराठी भाषा प्रमुख प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर हे सांगतात की , ‘माझी मराठी मराठाच मी’ ना.गा. नांदापूरकर यांच्या कवितेतून स्वातंत्र्यपूर्व काळात दिलेली निजामी राजवटी विरोधात घोषणा या 98 व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आठवण होते. एके काळी मराठयांनी आपला सैन्य तळ दिल्लीत ठोकला होता, त्याच ठिकाणी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर साहित्य संमेलन होत आहे. मराठीवर प्रेम करणाऱ्या, सर्व व्यक्तीसाठी तसेच मराठी संस्कृतीचा आग्रह धरणाऱ्यासाठी ही घटना महत्वाची आहे. दिल्ली येथे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून उच्चारला जाणारा आवाज जगभर जावा ही मराठी भाषा, संस्कृतीची पताका जगभर फडकविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासोबत त्यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऋण व्यक्त केले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक ,कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर या सांगतात की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी दिल्ली येथे सुरु आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे. मराठी भाषा संत ज्ञानेश्वरानी म्हटल्यासारखे अमृता सोबत पैज जिंकल्यासारखे मधुर आहे. या संमेलनाला मराठी, अमराठी भाषिकांनी पहावे, एकावे, मराठीची मधूरता चाखावी असे आवाहनही त्यांनी केले. साहित्य संमेलन व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाने अचूक मराठी बोलावे, इतर भाषेचे शब्द न वापरता शुध्द मराठी भाषा बोलावी. यामुळे मराठी भाषा जगणार आहे. तसेच या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा साहित्यिक मा. डॉ. ता.रा. भवाळकर यांची निवड झाल्याबाबात त्यांना कवयित्री डॉ. किन्हाळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
कवि कादंबरीकर मनोज बोरगावकर यांनी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले आहेत की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यादाच दिल्लीत 98 वे मराठी साहित्य संमेलन होत आहे. याबाबत त्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले असून दिल्लीकराचे स्वागत केले आहे.
विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून तीजला भिती नव्हती पराभवाची
जन्मासाठी नव्हती कधी हटून बसली, म्हणून तिजला नव्हती मरणाची या सुंदर भावनेने साहित्यीकांचा हात लिहता राहतो. खेड्यात लहान मुले जसे जत्रेची आतुरतेने वाट पाहत असतात. तसा तमाम मराठी साहित्यिक या संमेलनाची वाट पाहत असतो. आज हा सोहळा दिल्लीत असून यानिमित्ताने सर्व साहित्यीकांना भेटता येईल, विचाराची शिदोरी बरोबर घेता येईलअसे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रकाशक, संपादक, राम शेवडीकर यांनी या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी सारस्वतांचा मेळावा दिल्लीत भरणार असून यांचे आकर्षण तर सर्वाना आहेच, तसेच अभिमान ही वाटतो असे सांगितले. तसेच दिल्लीत मराठीचा झेंडा असाच उंच फडकत राहो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या साहित्य संमेलनाच्या सर्व मराठी, अमराठी भाषिकांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा मराठी भाषा समितीच्या सदस्या प्रा. प्रतिक्षा तालंगकर या आपल्या शब्दातून व्यक्त होतात की, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ ही कवी कल्पना नसून वास्तव आहे. 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हे दाखवून दिलेले आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्या मराठी माणसाची मुले इंग्रजी शाळेत भाषेत शिकतात, त्या मराठी माणसाने घरात, समाजात वावरताना मुलांसोबत मराठीत बोलले पाहिजे. मराठी भाषेचा वारसा देणे ही आपली जबाबदारी व कर्तव्य आहे. चला तर मग मराठी भाषेला ज्ञान भाषा बनविण्याची सुरवात आपल्या घरापासून करु यात व समृध्द मराठी भाषा बनवुयात, दिल्लीतील मराठी जागराचा आनंद घेऊ या !
0000
महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 21, 22, 23 फेब्रुवारीला होत आहे. यानिमित्ताने आयोजित आज पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राहुल कर...