विशेष लेख / नांदेड
साहित्य संमेलनाने जगविली मराठी भाषा संस्कृती
मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर काही लेखनकृतींनी वा ताम्रपट, शिलालेख यांनी मराठी भाषा दस्तऐवजीकरण करण्यास हातभार लावला आहे. या लिपीबद्ध संसाधनांमुळे भाषेच्या इतिहासाचा नेमका शोध घेता आला. या तुलनेत साहित्य संमेलनाचा इतिहास हा केवळ दीडशे वर्ष जुना आहे. ब्रिटिशांच्या आगमनानंतर आपल्याकडे लेखक-कवी ही व्यक्तिमत्वे स्वतंत्रपणे अस्तित्वात आली. समूहापेक्षा आपण निराळे आहोत, आणि वेगळा विचार करत आहोत, ही जाणीव या व्यक्तींकडे होती. (मध्ययुगात ही जाणीव असली तरी लेखक-कवी व्यापक लोकसमूहाचा भाग होते.)
साहित्य संमेलनाचा प्रारंभ
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रंथ व्यवहाराशी संबंधित काही मंडळी पुण्यात एकत्र आली आणि १८७८ मध्ये त्यांनी पहिले ग्रंथकार संमेलन घडवून आणले.
साधारणतः तेव्हापासून साहित्य संमेलनांना सुरुवात झाली असे म्हणता येते.
साहित्य संमेलनाचे बदलते स्वरूप
गेल्या दीडशे वर्षात साहित्य संमेलनांचे स्वरूप बदलले. कथा, कविता, कादंबरी व अन्य वाङ्मय प्रकार यांना केंद्रस्थानी ठेवून स्वतंत्रपणे कथा संमेलन, कविता संमेलन, कादंबरी संमेलन, अनुवादकांचे संमेलन,बालकुमार साहित्य संमेलन, गझल संमेलन यांचे आयोजन होऊ लागले.
वाङ्मयीन प्रवाहांची समृद्धी
दरम्यानच्या काळात उदयास आलेल्या विविध वाङ्मयीन प्रवाहांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी साहित्य संमेलनाचा मार्ग स्वीकारला. त्यातून ग्रामीण साहित्य संमेलन, सत्यशोधकी साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, विज्ञान साहित्य संमेलन, विचारवेध साहित्य संमेलन, भटके विमुक्त साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन अशा संमेलनाची सुरुवात झाली.
प्रादेशिक साहित्य संमेलन
मराठी प्रांतातील विविध भौगोलिक प्रदेशांनी स्वतःची स्वतंत्र ओळख जपणारी साहित्य संमेलने पुढील काळात सुरू केली. यातून मराठवाडा साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, गोमंतकीय साहित्य संमेलन, बृहनमहाराष्ट्र साहित्य संमेलन, कोंकण मराठी साहित्य संमेलन अशी संमेलने प्रादेशिक विभागानुसार जिल्हा वा तालुका पातळीवरही त्या त्या भूगोलाप्रमाणे आयोजित करण्यात येऊ लागली.
मराठी बोलीचे भरणपोषण
मराठी ही अत्यंत समृद्ध भाषा आहे. तिची नानाविध रूपे एकाच वेळी अस्तित्वात आहेत. तिच्या असंख्य प्रादेशिक, क्षेत्रीय बोली आहेत. बोलींमुळे मराठी भाषेला चैतन्य प्राप्त झाले आहे. कधीकाळी बोलींना दुय्यम समजण्याची मानसिकता समाजात होती, तथापि अलीकडच्या काळात बोलींविषयीचा अभिमान जाणीवपूर्वक व्यक्त होऊ लागला आहे. यातून त्या त्या बोलीत लिहिणाऱ्या लेखकांनी बोली विषयक भान निर्माण करणारी साहित्य संमेलने आयोजित करण्यास सुरुवात केली. यातून बोली विषयक साहित्याचे भरण पोषण झाले. झाडीबोली साहित्य संमेलन, वऱ्हाडी साहित्य संमेलन, अहिराणी साहित्य संमेलन, मराठवाडी बोलींचे साहित्य संमेलन, कोंकणी साहित्य संमेलन अशा भाषाभान जागृत करणाऱ्या संमेलनाची निर्मिती याचाच परिपाक आहे.
विचारधारांचा प्रचार प्रसार
विशिष्ट विचारधारा लक्षात घेऊन, विशिष्ट व्यक्तिमत्व व ऊर्जाकेंद्र लक्षात घेऊन फुले-आंबेडकरी साहित्य संमेलन, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, गुणिजन साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन अशा संमेलनांचे आयोजन होऊ लागले. अस्मितादर्श या नियतकालिकाने अनेक वर्ष लेखक मेळावे आयोजित केले, त्यांचे स्वरूप साहित्य संमेलनाचेच होते. विशिष्ट व्यवसाय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींनी वैद्यकीय साहित्य संमेलन, शासकीय अधिकारी साहित्य संमेलन, शिक्षक साहित्य संमेलन, विद्यार्थी साहित्य संमेलन, उद्योजक साहित्य संमेलन, कामगार साहित्य संमेलन यांच्या आयोजनात सुरुवात केली. यातील कामगार साहित्य संमेलनांस शासकीय पातळीवरून भरीव अर्थसहाय्य मिळते.
प्रतिभा संगम : विद्यार्थी साहित्यिकांचे व्यासपीठ
प्रतिभा संगम हे विद्यार्थी साहित्य संमेलन विद्यार्थी चळवळीच्या वतीने आयोजित केले जाणारे अभिनव साहित्य संमेलन आहे. लेखक कवींना ज्या विशिष्ट टप्प्यावर मार्गदर्शनाची गरज असते आणि व्यासपीठांची आवश्यकता असते, अशा टप्प्यावर 'प्रतिभा संगम' साहित्य संमेलन त्यांना अभिव्यक्तीसाठी मंच उपलब्ध करून देते. तीन दशकांची परंपरा असणाऱ्या प्रतिभा संगमने महाराष्ट्राला अनेक नामवंत साहित्यिक दिले आहेत.
साहित्य संस्कृती मंडळाचे भरीव अर्थसहाय्य
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग अंतर्गत असणाऱ्या साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने राज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध साहित्य संमेलनांना आर्थिक सहाय्य देण्यास सुरुवात केली, त्यातून साहित्य संमेलनांना मोठे बळ मिळाले व गावोगावी साहित्य संमेलने आयोजित होऊ लागली. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील गावांमध्ये तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात खेड्यापाड्यात साहित्य संमेलने होतात आणि त्यात मोठ्या प्रमाणात गावकरी सहभागी होऊन साहित्यविषयक चर्चांची व समकालीन प्रश्नांची चर्चा करतात असे दिसते.
विश्व मराठी साहित्य संमेलनाचा जागर
राज्य मराठी विकास संस्थेच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षात विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात येत आहे. हे संमेलन साहित्यकेंद्री नसले तरी यात होणारी भाषाविषयक चर्चा महाराष्ट्री समाजाच्या हिताची असते.
मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने दरम्यानच्या काळात विश्व मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली होती. याशिवाय विविध साहित्य संस्थांची विश्व संमेलने मागील काळात संयुक्त अरब अमिरात, मॉरिशियस, थायलंड, श्रीलंका, नेपाळ, मालदीव या देशात आयोजित करण्यात आली आहेत. 'मुक्तसृजन' साहित्य पत्रिकेच्या वतीनेही विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे, डॉ. विश्वनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुबई येथे डिसेंबर महिन्यात हे संमेलन आयोजित करण्यात आले. गेल्या अनेक दशकांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या जागतिक मराठी संमेलनांचेही वेगळेपण अधोरेखित करण्यासारखे आहे. विश्व साहित्य संमेलनाच्या या जागरामुळे मराठी भाषेचा विस्तार सर्वदूर होताना दिसतो.
मराठवाड्यातील साहित्य संमेलने
मराठवाडा ही मराठी भाषेची जन्मभूमी आहे. निजामी राजवटीत हा प्रदेश भाषिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या दडपशाही खाली होता. तथापि विसाव्या शतकात येथील लेखक कवींनी एकत्र येऊन जुलमी राजवटीविरुद्ध आवाज उठवून साहित्य परिषदेची स्थापना केली व मराठवाडा साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. ही संमेलने भाषा विकासासाठी व राजकीय आत्मभानासाठी अत्यंत महत्त्वाची होती. मराठवाड्याला निजामाच्या जोखडाखालून मुक्त करण्यासाठी जे प्रयत्न केले गेले, त्यात मराठवाडा साहित्य संमेलनांचा उल्लेख अपरिहार्य आहे.
आजही मराठवाड्याच्या बहुतेक जिल्ह्यात वेळोवेळी साहित्य संमेलने होत असतात. अगदी या दोन महिन्यांची नोंद घ्यायची झाली तरी एकट्या नांदेड जिल्ह्यात आठ ते दहा साहित्य संमेलनाचे आयोजन केले गेले. भोकर या ठिकाणी लोकसंवाद साहित्य संमेलन, सावरगाव या ठिकाणी बालकुमार साहित्य संमेलन, सगरोळी या गावात साहित्य संस्कृती मंडळाच्या साह्याने राज्यस्तरीय साहित्य संमेलन, तसेच सोनखेड व मुदखेड या ठिकाणीही साहित्य संमेलने आयोजित केली गेली. नजीकच्या काळात जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या वतीने जिल्हा ग्रंथोत्सवाचेही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने अनुवादित मराठी साहित्याचे संमेलन आयोजित केले जाणार आहे. नांदेडच्या आजूबाजूला शिरूर अनंतपाळ, धर्मापुरी या ठिकाणी संमेलने झाली. माजलगाव, अंबाजोगाई, जालना, वाळूज छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी या दोन महिन्यात साहित्य संमेलने आयोजित केली गेली. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे एप्रिल महिन्यात साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच नांदेड येथे समरसता साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
साहित्य संमेलने भाषा समृद्धीसाठी आवश्यक
साहित्य संमेलनाची ही रेलचेल भाषिक आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची आहे. साहित्य हा एकूण भाषा व्यवहाराचा अत्यंत छोटा भाग आहे, तरी साहित्यामुळे भाषासंस्कृती आणि समाजसंस्कृती प्रवाहित होत असते. विचारांची आदान प्रदान करण्यासाठी व प्रचार प्रसार करण्यासाठी साहित्याइतका दुसरा उत्तम मार्ग नाही समाजातील सर्वच घटकांनी साहित्य संमेलनांचे महत्त्व ओळखले आहे.
अलीकडच्या काळात जेव्हा मराठी भाषेवर आक्रमणे वाढली आहेत. इंग्रजीचा अतिरिक्त वापर सभोवताली होऊ लागला आहे. अनेक इंग्रजी शब्दांचे बस्तान आमच्या दैनंदिन जीवनातही बसले आहे, अशावेळी साहित्य संमेलनातून केल्या जाणाऱ्या भाषाविषयक चर्चा समाजाच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणाऱ्या आहेत.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर बहुतेक साहित्य संमेलनातून अभिजात मराठीच्या संदर्भात चर्चासत्रे आयोजित केली गेली, भाषेचा अभिमान मनामनापर्यंत पोहोचवणारी घटना आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी समाजाचा अभिमानबिंदू आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व दिवाळी अंक हे मराठी भाषक समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अशा घटना अन्य भाषिक प्रांतामध्ये होत नाहीत.
मराठी भाषेच्या संवर्धनामध्ये प्रत्येक व्यक्तीचे व घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. मागच्या दीडशे वर्षात भाषा संस्कृतीच्या संवर्धनामध्ये साहित्य संमेलनाचे योगदान लक्षात घेण्याजोगते आहे, असे म्हणता येईल.
प्रो.डॉ. पृथ्वीराज तौर
मराठी विभाग प्रमुख
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.
संपर्क - ९४२३२७४५६५
(डॉ .पृथ्वीराज तौर हे प्राध्यापक असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषा विभागप्रमुख व ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.)
No comments:
Post a Comment