Tuesday, May 8, 2018


धर्मादाय सामुहिक विवाह सोहळ्याचे
नांदेड येथे 12 मे रोजी आयोजन
नांदेड दि. 8 :- आत्महत्याग्रस्त व गरीब शेतकरी कुटुंबातील, अपंग व समाजातील गरजू गरीबांचा सर्वधर्मीय 26 जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा शनिवार 12 मे 2018 रोजी विमान गुरुद्वारा बिल्डींग कौठा नांदेड येथे आयोजित केला आहे. या सोहळ्यास दहा हजार नागरिक आणि प्रतिष्ठीत अतिथी उपस्थित राहणार आहेत. सामुहिक विवाह सोहळ्याची समिती गठीत करण्यात आली असून धर्मादाय उपआयुक्त कार्यालयामार्फत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. असे नांदेडचे धर्मादाय उपआयुक्त प्रणिता श्रीनीवार यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
0000000



शासकीय निवासी शाळेत
 प्रवेश अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 8 :-   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत उमरी येथील अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेत शैक्षणिक सत्र 2018-19 च्या इयत्ता 6 वीत सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
अनु. जाती, अनु. जमाती, विजाभज, विमाप्र व अपंग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी या शाळेत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 जून आहे. प्रवेश शासनाच्या सामाजिक आरक्षाण व ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार दिले जाणार आहे, असे शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


एमएच-सीईटी परीक्षा केंद्र
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड दि. 8 :- एमएच-सीईटी परीक्षा-2018 परीक्षा गुरुवार 10 मे 2018 रोजी नांदेड शहरातील 34 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
नांदेड शहरातील विविध 34 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी 10 ते सायं 5 या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी 10 हजार 176 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज स्वच्छ व सुसंगत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात 10 मे रोजी सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.
000000


कर्करोग उपचार शिबिराचे शनिवारी आयोजन
नांदेड दि. 8 :- कर्करोग निदान व उपचार शिबीर शनिवार 12 मे 2018 रोजी श्री गुरु गोविंद सिंघजी शासकीय रुग्णालय नांदेड येथे सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये कर्करोग तज्ज्ञ डॉ. सतीश पवार (हैद्राबाद), तसेच डॉ. गुलाटी, डॉ. मोरे, मोनार्क  कॅन्सर हॉस्पिटल नांदेड हे कर्करोग रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत.   
कर्करोग निदान व उपचार मोहिम जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात ये आहे. जिल्ह्यातील स्त्रीपुरुषांची कर्करोग आरोग्य तपासणी व उपचार येथील जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मोनार्क हॉस्पिटल तसेच नरगीस दत्त कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे महात्मा ज्योतिबा फुले योजनेतर्गत करण्यात येणार आहे. याचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मेकाने यांनी केले आहे.
000000




रेडक्रॉस दिनानिमित्त विशेष लेख:
पांढऱ्यावरची लाल फुली: अर्थात रेडक्रॉस

            जगभरातील 170 देशात असणारी संघटना ज्याचे सुमारे 9 कोटी 70 लाख स्वयंसेवक आहे. या संघटनेच्या कामाची मदत जगातल्या गरजू अशा 24 कोटींहून अधिक जणांना आजवर झाली आणि आपल्या कार्याबद्दल एकदा नव्हे तर तब्बल 3 वेळा शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे. अशी संघटना अशी खूप मोठी ओळख जपण्याचं काम केलय ' रेडक्रॉस ' ने. हो जगाच्या पाठीवर मानवाधिकार क्षेत्रात सर्वात मोलाचे काम या रेडक्रॉसने केले आहे.
            8 मे हा रेडक्रॉस दिवस म्हणून जगात साजरा होतो. 1939 ते 1945 या चार वर्षांच्या कालावधीत दुसरं महायुध्द झालं या काळात केवळ एकच नोबेल पुरस्कार दिला गेला तो देखील रेडक्रॉसला अर्थात रेडक्रॉसचे संस्थापक हेनरी डुनान्ट यांना देण्यात आला. 
            8 मे 1948 रोजी पहिला रेडक्रॉस दिन साजरा झाला त्या नुसार यंदा 70 वा रेडक्रॉस दिन येत्या मंगळवारी अर्थात 8 मे ला साजरा होईल. मात्र या रेडक्रॉसचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपणास 19 व्या शतकापर्यंत मागे जावे लागेल. 
            स्वित्झलँड मधील व्यापारी हेनरी डुनान्ट यांना अल्जिरिया या देशात व्यापार सुरु करायचा होता त्यात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी ते नेपोलियन( तिसरा ) याची भेट घेण्यासाठी इटालीला गेले कारण अल्जिरिया त्यावेळी फ्रेन्च वसाहतींचा भाग होता.
            ते अल्जिरियाच्या सोल्फेरिनो गावात पोहचले त्यावेळी ऑस्ट्रीया -आणि सरदनिया च्या युध्दात 24 जून 1859 रोजी एकाच दिवसात दोन्ही बाजूच्या सैन्याचे तब्बल 40 हजार सैनिक ठार झालेले त्यांनी पाहिले असंख्य जण उपचाराअभावी तडफडत होते. युध्दानंतर उद्भभवलेल्या स्थितीचा डयुनान्ट यांना धक्का बसला. 
औषधोपचार तर सोडा साध्या सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध नव्हता. माणुसकीच्या भूमिकेतून डुनान्ट यांनी आपल्या प्रवासाचा मूळ बेत बाजूला ठेवून अनेक दिवस या ठिकाणी या जखमी जवानांची सेवा व औषधोपचार केले. स्थानिकांच्या मदतीने त्यांनी मोठया प्रमाणावर मदत गोळा करुन दोन्ही बाजूच्या सैनिकांना देण्याचे काम त्यांनी केले.
 
            त्यानंतर जिनिव्हा येथे परतल्यावर 1862 साली त्यांनी ' अ मनरी ऑफ सोल्फरिनो ' हे पुस्तक लिहून स्वखर्चाने प्रकाशित केले. या पुस्तकाच्या प्रती त्यांनी युरोपातील सैन्यप्रमुख व राजकीय नेत्यांना पाठवल्या. या युध्दानंतर निर्माण झालेल्या स्थितीचे वर्णन करताना त्यांना या पुस्तकात सामाजिक दायित्व म्हणून अशा स्थितीत मदत करणाऱ्या व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थाची गरज का आहे याचे विवेचन विस्ताराने केले होते.
            अशा स्वरुपाची वैद्यकीय मदत पुरविणाऱ्या संस्थाना युध्दाच्या स्थितीत संरक्षण असावे व त्यांना जखमी कैद्यांवर उपचार करण्यास मुभा द्यावी याकरिता आंतरराष्ट्रीय कराराद्वारे हमी द्यावी अशी आग्रही मागणी देखील डुनान्ट यांनी केली .
           


या पुस्तकाची प्रत जिनिव्हाचे महापौर गुस्ताव्ह मोयनियर यांना प्राप्त झाली. डुनान्ट यांनी सुचवलेल्या सर्व बाबींचा विचार करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर असे संघटन उभे करण्याचा निर्धार मोयनियर यांनी केला. त्यानंतर एक विख्यात शल्यचिकित्सक लुईस अपिया जिनिव्हा आरोग्य व स्वच्छता आयोगाचे अध्यक्ष अपिया यांचे मित्र थिओडोर मॉनिर स्वीस आर्मीचे जनरल गिलाम हेनरी डयूफोर यांच्यासह डुनान्ट यांना घेऊन ' जखमी व्यक्तींना मदत करणारी पाच सदस्यीय आंतरराष्ट्रीय समिती स्थापन केली ज्याला ' कमिटी ऑफ फाईव्ह म्हणून ओळखले जाते.
            ' कमिटी ऑफ फाईव्ह ' ने 26 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत पुढील संघटन उभारणासाठी जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय परिषद घेतली. या परिषदेला 18 शासकीय प्रतिनिधींसह सहा समाजसेवी संस्था आणि सात विदेशी अशासकीय प्रतिनिधींसह एकूण 36 जणांनी हजेरी लावली. 
याच्या एक वर्षाने 22 ऑगस्ट 1864 रोजी एक परिषद झाली ज्यात युरोपातील सर्व देशासंह अमेरिका, ब्राझील आणि मेक्सिकोच्या सरकारांना निमंत्रण पाठवण्यात उपस्थिती होती.
            अशा स्वरुपाची मदत युध्दप्रसंगी पुरवणाऱ्यांना संरक्षण देण्यास 12 देशांनी यात मान्यता दिली ज्याला ' जिनिव्हा करार ' म्हणून ओळखले जाते.नंतर 1867 च्या आसपास अल्जिरियातील व्यवसाय असफल ठरल्याने हेन्री डयुनान्ट यांना दिवाळखोरी जाहीर करावी लागली. त्यामुळे निराश होवून त्यांचे या कामावरील लक्ष उडाले परंतु त्यांची मुळ संकल्पना मान्य झालेल्या देशांनी याचा पाठपुरावा सुरु ठेवला व 1876 साली ' इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेडक्रॉस ' ( ICRC ) अर्थात आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समितीची स्थापना झाली. आजही रेडक्रॉस ची अधिकृत ओळख हीच आहे. याच्या 5 वर्षांनंतर देशात सर्वप्रथम 'रेडक्रॉस ' ला स्थान देत ' अमेरिकन रेड क्रॉस ' ची स्थापना सुरु झाली. 
            स्थापनेपासून मानवाधिकारांची जपणूक करणारी संस्था म्हणून रेडक्रॉस ओळख जगभरात वाढत गेली. 1901 साली जीन हेनरी डयुनान्ट यांच्या या महान कार्यांची दखल घेऊन नॉर्वेजियन नोबेल समितीने आंतरराष्ट्रीय शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर या क्षेत्रात कार्य करणारे फ्रेडरिक पसी आणि हेनरी डयुनान्ट यांना हा पुरस्कार संयुक्तरित्या प्रदान केला.
 
            जिनिव्हा करारानंतर हेग मध्ये झालेल्य रेडक्रॉसच्या 10 व्या परिषदेत नव्या हेग करारास मान्यता प्रदान करण्यात आली एव्हाना याचा विस्तार 45 देशांमध्ये झाला होता. चळवळीत रुपांतर होवून रेडक्रॉस आता युरोप बाहेर उत्तर , मध्य आणि दक्षिण अमेरिका आफ्रिका आणि आशिया पोहचले होते. अर्जेटिना , ब्राझील क्युवा मेक्सिको तसेच चीन जपान कोरिया सारख्या देशात रेडक्रॉस विस्तारल्याने याला खरे आंतरराष्ट्रीय स्वरुप आले.
            1914 मध्ये पहिले विश्वयुध्द झाले त्यात युरोपातील देशांसह अमेरिका आणि जपान हे देशदेखील ओढले गेले. युध्द सुरु होताच आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समितीने आंतरराष्ट्रीय युध्दकैदी समिती गठीत केली. या समितीने युध्दकाळात केलेल्या कार्याला तोडच नाही. केवळ 1200 स्वयंसेवक असणाऱ्या या समितीने युध्दकाळात तब्बल 2 कोटी पत्र व संदेशांची देवाण घेवाण केली. सुमारे 1 कोटी 9 लाख पार्सल पोहचविले.
 
या युध्दात हानी झालेल्या देशांमध्ये 1 कोटी 8 लाख स्वीस फ्रॅन्क रक्कमेची मदत साहित्य पूरविले इतक्यावर हे थांबत नाही. तर युध्दबंदी असलेल्या देशांमध्ये संवादसेतू निर्माण करण्याचे महत्वाचे काम रेडक्रॉस ने केले ज्यामुळे विविध देशात युध्दबंदी असणाऱ्या 2 लाख सेनिकांना परत आपल्या कुटुंबापर्यंत पोहचणे शक्य झाले.
युध्द काळातील या अतुलनीय मदत कार्यासाठी रेडक्रॉसला 1917 साली नोबेलचा शांतता पुरस्कार देवून गौरवण्यात आले. हा रेडक्रॉसचा दुसरा नोबेल पुरस्कार होता.
            दुसऱ्या विश्वयुध्द काळात 3000 स्वयंसेवकाच्या बळावर रेडक्रॉस ने साडेचार कोटी पोस्टकार्ड आणि तब्बल 12 कोटी संदेश पोहचविण्याचे काम केले. या कामाचे मोल यासाठी की त्या काळी आजच्याइतकी प्रभावी दळण-वळण साधने नव्हती. 
            दुसऱ्या महायुध्दाला मोठी वांशिक किनार होती. नाझी साम्राजात जर्मनीची चॅन्सलर हिटलर ने ' ज्यूं ' चे शिरकाण करण्याचा चंग बांधला होता त्यासाठीच्या त्या छळछावण्या आणि त्याच्या कटू कहाण्या आजही कानावर येतात.
            या छळछावण्यात आरोग्य सेवेची संधी मिळावी ही रेडक्रॉसची विनंती होती. युध्द संपेपर्यंत मदत करणाऱ्या स्वयंसेवकांना येथून बाहेर पडता येणार नाही या अटीवरच मान्यता देवू अशी भूमिका नाझी सैन्याने घेतली. त्याला आव्हान म्हणून दहा जणांनी मान्यता दिली. या 10 स्वयंसेवकांनी जवळपास 60 हजार ' ज्यू ' नागरिकांचे प्राण या युध्दात वाचविले.
            रेडक्रॉसच्या या कार्याची दखल युध्दग्रस्त सर्वच देशात घेतल्या गेली. युध्दकालावधीत 1939 ते 1945 या काळात युध्दामुळे नोबेल पुरस्कार देण्यात आले नाहीत मात्र युध्द संपल्यावर 1044 सालच्या अतुलनीय कामगिरी बद्दल रेडक्रॉस शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कार पुन्हा प्रदान करण्यात आला हा रेडक्रॉसचा तिसरा पुरस्कार होता.
रेडक्रॉस आणि भारत
            रेडक्रॉसचा जगभरात प्रचार आणि प्रसार होत होता त्या काळात अर्थात 1947 पूर्वी भारत ब्रिटीश सत्तेच्या अंमलाखाली होता. त्यामुळे भारतात रेडक्रॉस चा प्रवेश ब्रिटीश रेडक्रॉस म्हणूनच झाला. मात्र 1920 साली म्हणजे पहिल्या विश्वयुध्दानंतर 17 मार्च 1920 रोजी भारतीय रेडक्रॉस सोसायटी कायदा 1920 पारित झाला . याला सांसदीय कायदा XV 1920 म्हणून तत्कालीन गर्व्हनर जनरल यांनी मान्यता दिली.
या कायद्या संदर्भातील विधेयक भारतीय व्हाईसरॉय कार्यकारी समितीचे सदस्य सर क्लाऊड हिल यांनी 3 मार्च 1920 रोजी सभागृहात मांडला होता. पहिल्या विश्वयुध्दात ब्रिटीश रेडक्रॉसचा भाग असलेल्या भारतीय स्वयंसेवकांनी मदतकार्य केले होते. 
            संयुक्त युध्द समितीचे सर विल्यम माल्कम हेली यांच्या अध्यक्षतेखाली 50 सदस्यीय व्यवस्थापन समिती स्थापन करुन 7 जून 1920 रोजी औपचारिकरित्या भारतीय रेडक्रॉस समिती अधिकृतपणे अस्तित्वात आली. याच भारतीय रेडक्रॉसने नंतरच्या काळात देशांतर्गत आरोग्य समस्या तसेच दुसऱ्या विश्वयुध्दात आपल्या कामाचा वाटा उचलला.
            15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले व पाकिस्तानचीही निर्मिती झाली. यामुळे पहिल्या कायद्यात दुरुस्तीव्दारे 1947 मध्ये भारतीय रेडक्रॉसची नव्याने स्थापना झाली. ज्यात अखेरची दुरुस्ती 1992 साली झालेली आहे. 
            आजची भारतीय रेडक्रॉस देशभरात विस्तारित झाली आहे. कायद्यानुसार भारतीय रेडक्रॉसचे पदसिध्द अध्यक्ष देशाचे राष्ट्रपती आहेत. राष्ट्रीय स्तरावर असलेल्या व्यवस्थापन परिषदेत 19 सदस्य असतात. व्यवस्थापन परिषद अध्यक्ष म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री आहेत.
या 19 सदस्यांपैकी 6 जणांची नेमणूक राष्ट्रपती स्वत: करतात तर उर्वरित 12 सदस्य विविध राज्यातील रेडक्रॉस शाखांमधून निवडणुकीव्दारे परिषदेत सामील होतात. या निर्वाचित 12 आणि नियुक्त 6 सदस्यांनी नंतर उपाध्यक्ष निवडण्याची पध्दत आहे. कामकाजाची मुख्य जबाबदारी रेडक्रॉसचे सरचिटणीस यांची असते.
भारतीय रेडक्रॉस देशाच्या 700 जिल्हयात आणि त्याखाली प्रांत व गावपातळीपर्यंत पोहोचलेली संघटना आहे. देशभरात आरोग्य यंत्रणा आणि त्याच्याशी निगडीत संस्थांच्या माध्यमातून रेडक्रॉस कार्यरत आहे. सोबत रेडक्रॉसचे स्वयंसेवकही वेगवेगळया प्रसंगी मानवतावादी दृष्टीकोणातून सेवा देत असतात.
रेडक्रॉसची कार्यपध्दती सात सत्वांवर आधारित आहे. यात.....

1) मानवता- मानवतेच्या दृष्टीकोणातून व्यक्तीव्यक्ती मधील संबंध मैत्रीपूर्ण व्हावे. सर्वांनी एकमेकांना समजून घ्यावे व मानवतेचा आदर करावा. 
2) नि:पक्षपातीपणा- राष्ट्र, धर्म, प्रांत, भाषा आणि वंश असा कोणताही भेद न बाळगता केवळ व्यक्तींची गरज पाहून प्रदान करणे.
 3) तटस्थता- धार्मिक, वांशिक, राजकीय तसेच कोणत्याही वैचारिक वादात न अडकता तटस्थपणे सेवा देण्याचा विश्वास असणे. 
4) स्वातंत्र्य- जगाच्या वेगवेगळया देशात कार्य करताना त्या त्या देशाचे स्वत:चे कायदे असले तरी सेवा देताना रेडक्रॉस मुळ तत्वाची स्वायत्तपणे अंमलबजावणी करण्याचे स्वातंत्र्य. 
5) स्वयंसेवी सेवा- कोणत्याही लाभाची अपेक्षा न बाळगता स्वयंस्फुर्तीने सेवा प्रदान करणे. 
6) ऐक्य- रेडक्रॉसने मानवतावादी व्यवहार सर्वत्र एकसारखाच राखावा. 
7) वैश्विकता- आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस-रेडक्रिसेंड चळवळीने सर्व समाज व मानवांप्रती समान भुमिका ठेवणे , समान दायित्व, आणि कर्तव्य मानत जगात सर्वत्र एकमेकांना मदत करणे.
रेडक्रॉसचे काम खूप मोठे आणि अतुलनीय असे आहे. समाजात आपण सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा द्यावी अशी ही लोकचळवळ आहे. सध्या रेडक्रॉसचे राज्य स्तरावर सरचिटणीस म्हणून पी. बी. शाकोथ कार्यरत आहेत, तर देशपातळीवर मनीष चौधरी हे प्रभारी सरचिटणीस आहेत. 
आपणापैकी प्रत्येकाला रेडक्रॉसचा अल्पपरिचय असावा आणि आपणही योगदान जरुर द्यावे यासाठी हा लेखन प्रपंच. 2016 साली रेडक्रॉसची जी थिम होती ती बरच काही सांगून जाणारी आहे. 

सर्वांसाठी सर्वत्र - रेडक्रॉस आता सवाल आपण कुठे आहात.......!

-प्रशांत दैठणकर-
 9823199466
Redcross Life Member

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...