अंतिम मतदार यादी जाहीर
नवमतदारांच्या संख्येत वाढ
नांदेड (जिमाका) दि. 23 :- यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरण यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली. या राबविण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नव मतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. आज अंतिम मतदार यादीच्या प्रकाशनानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात ते बोलत होते.
या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर 2023 च्या प्रारूप मतदार यादीत 40 हजार 306 मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच 48 हजार 493 मतदारांची वगळणी करण्यात आली आहे. तर एकूण ३ हजार 401 मतदारांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये 3 हजार 258 मतदारांची निव्वळ वाढ होऊन एकूण मतदारांची संख्या 26 लाख 71 हजार 537 इतकी झालेली आहे. त्यानुसार पुरुष मतदारांची संख्या 1 हजार 95 ने कमी झाली असून महिला मतदारांची संख्या 4 हजार 351 ने आणि तृतीयपंथी मतदारांची २ ने निव्वळ वाढ झालेली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर 943 इतके झाले आहे.
या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये 18 ते 19 या वयोगटामध्ये 20 हजार 948 मतदारांची नव्याने भर पडली आहे. तसेच 20 ते 29 या वयोगटात 21 हजार 269 मतदारांची वाढ झाली आहे. प्रारूप यादीत 18 ते 19 या वयोगटाची मतदार संख्या 11 हजार 412 (०.42 टक्के) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत 32 हजार 360 (1.21 टक्के) इतकी झालेली आहे. तर 20 ते 29 वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या 5 लाख 46 हजार 518 (20.48 टक्के) होती, ती अंतिम यादीत 5 लाख 67 हजार 787 (21.25 टक्के) इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.
निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून 2024 च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. हा कार्यक्रम 27 ऑक्टोबर ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत राबवला गेला.
नांदेड जिल्ह्यात कोलाम हे विशेष आदिम आदिवासी समूह आहेत. यंदाच्या अंतिम मतदार यादीत या समूहातील 100 टक्के मतदारांचा समावेश आहे.
दिव्यांग मतदारांना ये-जा करण्याच्या दृष्टीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर निश्चित करणे बाबत निर्देश प्राप्त आहेत. जिल्ह्यात सर्व ३ हजार ४१ मतदान केंद्रे तळमजल्यावर सुनिश्चित करण्यात आले असून त्या ठिकाणी मतदानाकरीता रॅम्पची व्यवस्था असणार आहे. तसेच शहरातील लोकांची व्यग्र जीवनशैली, मतदानाबद्दल अनास्था यामुळे मोठ्या शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी असते.
येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व परिपूर्ण करण्यात येत आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी जुलै ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या सर्वेक्षणात आढळलेल्या मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, तसेच दुबार मतदार यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पूर्ण करण्यात आला. त्यानुसार 45 हजार 167 मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्यांपैकी ऐशीपेक्षा अधिक वय असलेले 14 हजार 442 मतदार मयत झाले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांची नावेही वगळण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये 18 हजार 167 एकसारखे फोटो असलेले मतदार (फोटो सिमिलर एन्ट्रीज PSE) असल्याचे निदर्शनास आले, त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत 5 हजार 503 मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली. मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले (डेमोग्राफिकल सिमिलर एन्ट्रीज - DSE) ६ हजार 156 मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करून 1 हजार 113 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ही वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून, तसेच पूर्ण तपासणीअंती कायदेशीररीत्या करण्यात आलेली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे.
मतदार यादी जितकी सर्वसमावेशक तितकी वंचित समाजघटक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये मतदार नोंदणीबरोबरच आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला यांचेही या जमातीतील लोकांना वाटप करण्यात आले. त्यामध्ये भटक्या व विमुक्त जमातीच्या एकूण 385 लोकांची मतदार नोंदणी करण्यात आली.
यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच १ एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या बहु-अर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑक्टोबर 2024 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवांनाही या मोहिमेत आगाऊ किंवा पूर्वनोंदणी करता आली. पूर्व नोंदणीचे एकूण 4 हजार 308 अर्ज (1 एप्रिल 150, 1 जुलै 229, 1 ऑक्टोबर 182) प्राप्त झाले आहेत. त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वनोंदणी केलेल्या युवांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे.
दिनांक २३ जानेवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदारांनी 'मतदाता सेवा पोर्टल' या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/) यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का पाहावे. सोबतच मतदान केंद्र सुद्धा तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड यांनी केले.
सर्व राजकीय पक्षांनीही आपल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या (BLA) नियुक्त्या करून त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस साहाय्य करावे. नागरिकांना मतदार नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल. तसेच 'मतदाता सेवा पोर्टल' आणि 'वोटर हेल्पलाइन अॅप' यांवर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
00000