Tuesday, March 11, 2025

 वृत्त क्रमांक 285

जिल्ह्यात 22 मार्च रोजी  राष्ट्रीय लोकअदालतीचे  आयोजन

 

नांदेड दि. 11 मार्च :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई  व नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे 22 मार्च 2025 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबीक न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष श्रीमती सुरेखा कोसमकर व न्यायाधीश नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे.

 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, धनादेश अनादरीत झाल्याबाबत प्रकरणे, तसेच कौटुंबिक न्यायालयातील तडजोड होण्यायोग्य प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

 

याशिवाय सदर लोक अदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलीफोन बिल, विविध बॅंकांचे कर्ज वसुली प्रकरण, थकीत पाणी बिल इत्यादी प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आाहेत.

 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये झालेल्या निवाडयाविरुद्ध अपील नाही. प्रलंबीत प्रकरणात भरलेली कोर्ट फी  रक्कम 100 टक्के परत मिळते. नातेसंबंधात कटुता निर्माण होत नाही. अशाप्रकारे लोकन्यायालयाच्या माध्यमातुन सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो.  सर्व पक्षकारांनी येतांना आपले अधिकृत ओळखपत्र घेवून यावे. सर्व संबंधित पक्षकारांनी शनिवार 22 मार्च 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचा  लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

 वृत्त क्रमांक 284

लाभार्थ्याना रेशन कार्ड ई-केवायसी करणे अनिवार्य

 

शेतकऱ्यांनी प्राधान्याने ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 11 मार्च :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेअंतर्गत शासकीय अनुदानित अन्न धान्याचा लाभ सुरु ठेवण्यासाठी कुटूंबातील रेशनकार्डमध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रास्तभाव दुकानदारांशी संपर्क करुन तात्काळ ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन तहसिलदार संजय वारकड यांनी केले आहे.

 

ई-केवायसी करण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानात समक्ष उपस्थित राहून ई-पॉश मशिनवर बायोमॅट्रीक ऑथेंटिकेशन पूर्ण करावे, किंवा राज्य सरकारने एनआयसीच्या सहकार्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी मेरा ई केवायसी ॲप मोबाईलमध्ये सुरु केले आहे. यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रास्त भाव दुकानावर न जाता घरबसल्या मोबाईलद्वारे ई-केवायसी पूर्ण करता येईल.

ई-केवायसी पूर्ण न केल्याने अन्नधान्याचा लाभ बंद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत लाभार्थ्यांची राहील यांची नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने केले आहे.

 

ई-केवायसी साठी आवश्यक कागदपत्रे-

कुटूंबातील सर्व लाभार्थ्यांचे मुळ आधार कार्ड, झेरॉक्स प्रती, रेशनकार्ड इ.

एपीएल शेतकरी डीबीटी- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्य ऐवजी प्रतिमहा प्रति लाभार्थी 150 व 170 इतक्या रोख रकमेची थेट हस्तांतरणाची डीबीटी द्वारे योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने एपीएल शेतकरी लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानदार यांचेकडे सादर करावयाचे कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत, राशनकार्ड झेरॉक्स प्रत, महिलांच्या नावाची पासबुक झेरॉक्स प्रत, सातबारा झेरॉक्स प्रत इ.

ॲग्रीस्टॅक-

केंद्र व राज्य सरकारने शेतीच्या लाभार्थ्यांस प्रत्येक शेतकऱ्यांना आवश्यक कृषी क्षेत्रात डिजीटल सेवाचा वापर करुन शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी ॲग्रीस्टॅक म्हणजे शेतकरी आोळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रीया सुरु आहे. पीएम किसान, सन्मान योजना, नैसर्गिक आपत्ती, मृदा परीक्षण, खत सक्ती आधुनिक शेतीसाठी मदत हवामान अंदाज, अवजारे आणि सिंचन योजना, शेततळे, ठिंबक सिंचन इत्यादी फायदे ॲग्रीस्टॅक कार्डमुळे शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या गावामधील सीएससी, सेतु धारक यांच्याकडे जाऊन अथवा कॅम्पमध्ये ॲग्रीस्टॅक मध्ये नाव नोंदणी करुन घ्यावी.

आयुष्यमान भारत-

आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स प्रत, मोबाईल इ.

नागरिकांनी सीएसी, सेतु सुविधा धारक यांना संपर्क करावा, सध्या गावो-गाव कॅम्प चालू आहेत. नागरिकांनी या कॅम्पच्या ठिकाणी उपस्थित राहून रेशनकार्ड ई-केवायसी, ॲग्रीस्टॅक व आयुष्यमान कार्ड काढून घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000 

 वृत्त क्रमांक 283

एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा!

नांदेड दि. 11 मार्च :-  ज्या वाहनांची 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाहीअशा वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन 30 एप्रिल 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावीअसे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम,1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते  महामार्ग मंत्रालयनवी दिल्ली यांच्या G.S.R. 1162 (E) 04 डिसेंबर 2018  S.O. 6052(E) दि.06.12.2018 नुसार 01 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट विहित वेळेत  बसविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार परिवहन विभागातर्फे दंड आकारणी करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी दंड टाळण्यासाठी  30 एप्रिल 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड  बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणेरस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे  तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची  अंमलबजावणी  नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 01.04.2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरिता मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची/उत्पादकाची निवड करण्यात आली आहे. वाहनधाकारंनी वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. या व्यतिरीक्त कुठल्याही इतर संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे. मोटार सायकल  ट्रॅक्टरसाठी दर रु.450/-, तीन चाकी वाहनांसाठी रु.500/-  सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांसाठी रु. 745/- इतका दर आकारला जाणार आहे.  या व्यतिरीक्त जीएसटी चा दर भरावा लागणार आहे  हे शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे. 01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे एचएसआरपी बसविण्याकरिता ॲपाईटमेंट घेण्याची कार्यपध्दती  इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 282

शेतकरी व ग्राहकांनी जिल्हा कृषि व धान्य महोत्सवात सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी

 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर

17 व 18 मार्च रोजी जिल्हा कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन

 

नांदेड दि. 11 मार्च :-  महाराष्ट्र कृषी विभाग व रोटरी क्लब, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2025 दिनांक 17 ते 18 मार्च 2025 या कालावधीत आयोजित केला आहे. हा कृषी महोत्सव कृषि उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा, नांदेड येथे सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यत आयोजित केला आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या कृषी व धान्य महोत्सवास भेट देवून शेतमाल खरेदी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

 

या कृषी महोत्सवात परिसंवाद व चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व कृषि प्रदर्शन, कृषि विज्ञान केंद्र, कृषी विद्यापिठाचे स्टॉल, विविध कृषी निगडित तंत्रज्ञानाचे प्रदर्शन व कृषी संलग्न शासकीय विभागाचे 50 स्टॉल  उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला गटांचा सक्रिय सहभाग या महोत्सवात राहणार आहे.

 

या महोत्सवांच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल गहु, ज्वारी, तांदुळ, तुर, मुग, उडीद, चनादाळ, हळद, मिरची, मसाले विविध प्रकारचे सेंद्रीय उत्पादने गुळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी तसेच नाविण्यपूर्ण उत्पादने जसे. मध, गुळाचा पाक व महिला बचतगटांची उत्पादने चटणी, लोणचे, पापड, कुरडई इत्यादी. तसेच टरबूज, खरबूज आदी फळे व भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. तसेच जात्यावरील सेंद्रीय डाळ, गोदाकाठची ज्वारी, सेंद्रीय हिरव्या भाज्या, फळभाज्या व फूलभाज्या व रानफळे विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांनी विविध उत्पादित केलेले लाकडी घाण्याचे करडई, भुईमुग, जवस, तीळाचे तेल, बांबुपासून तयार करण्यात आलेले वस्तु केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. डिंक, बिब्याची गोडंबी आदी कच्चा माल उपलब्ध राहणार आहे.

 

या महोत्सवामध्ये शहरातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भेटी द्याव्यात याचे नियोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव नांदेड शहरवासियांना मेजवानी असून सर्वानी यास भेट देवून शेतमाल खरेदी करावा व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून त्यांचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्माचे दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

0000 



वृत्त क्रमांक 281

रस्ता व रेल्वे पुलाच्या कामामुळे 

वाहनासाठी पर्यायी मार्ग  

नांदेड दि. 11 मार्च :-निळा जं. शंकरराव चव्‍हाण चौक-गाडेगाव-ब्राम्‍हणवाडा-मुगट-आमदुरा-वासरी-शंखतिर्थ-माळकौठा-बळेगाव-कारेगाव फाटा-बाभळी फाटा-बेलूर-नायगाव ते राज्‍य सिमा रस्‍त्‍याची सुधारणा करण्यासाठी तसेच प्रजिमा-83 जि. नांदेड  याकामांतर्गत गाडेगाव येथील रेल्‍वे ओव्‍हर ब्रिजचे काम प्रगतीत असल्‍याने जडवाहने पर्यायी मार्गाने वळविण्‍याबाबत अधिसुचना निर्गमीत करण्यात आली आहे. 

मोटार वाहन  कायदा 1988  चे कलम 115 मधील  तरतुदीनुसार  जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबधीत विभागाने दिलेल्या अटी व शर्तीनुसार उपाययोजना करतील या अटीवर तसेचसंबधीत विभागाने  पुढील उपाययेाजना  करुन तसेच 21 मार्च ते 19 एप्रिल 2025 पर्यंत  नमुद  केलेल्‍या  पर्यायी मार्गाने  सर्व प्रकारची वाहने वळविण्‍यास  मान्‍यता  देण्‍यात आली आहे.

वाहनांसाठी प्रतिबंधीत करण्यात आलेला मार्ग निळा जं. शंकरराव चव्‍हाण चौक-गाडेगाव-ब्राम्‍हणवाडा-मुगट व  निळा जं.शंकरराव चव्‍हाण चौक-गाडेगाव-ब्राम्‍हणवाडा-मुगट आहे. या मार्गासाठी पर्यायी मार्ग (जाणे-येणेसाठी) जड वाहनांकरीता शंकरराव चव्‍हाण चौक-बोंढार तर्फे हवेली-वाजेगाव-शिकार घाट-मुगट राहील. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांकरीता- गाडेगाव-बोंढार तर्फे हवेली ते देगलूर नाका ग्रामीण मार्ग 37 हा राहील. 

00000

 वृत्त क्रमांक 280

निवडणूक कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या बिएलओंच्या वारसांना सानुग्रह अनुदान 

नांदेड दि.११ मार्च : निवडणूक काळात कार्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना निवडणूक आयोगाकडून  सानुग्रह निधी देण्यात आला.

विधानसभा सार्वत्रिक व लोकसभा पोट निवडणूक 2024 च्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने 90 देगलूर विधानसभा मतदारसंघातील सर्व बिएलओची  बैठक दिनांक 17 ऑक्टोबरला  बोलविण्यात आलेली होती. सदरील बैठक आटोपून परत जात असताना कुन्मारपली मतदार केंद्र क्रमांक 350 चे बि. एल. ओ. श्री. योगेश शेषेराव पाटिल यांचा अपघाती मृत्यु झाला होता. 

निवडणूक कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्याचा  मृत्यू झाल्यास भारत निवडणूक आयोगाकडून 15 लक्ष इतके सानुग्रह अनुदान देय आहे. त्यानुषंगाने मयत बिएलओ यांचा सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्यात आलेला होता.

तत्कालिन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, उपजिल्हाधिकारी निवडणूक  राजकुमार माने , 90 देगलूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी भरत सुर्यवंशी इत्यादीनी सदर अनुदानासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

शासनाकडे सादर केलेला प्रस्ताव दिनांक 17.02.2025 रोजी मंजुर केले आहे. दिनांक 10.03.2025 रोजी सहा. जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा यांच्या हस्ते संबधित कर्मचारी यांचे वारस पत्नी प्रणिता योगेश बिरादार यांना 15 लक्ष रुपयाचा धनादेश देण्यात आला.

0000



वृत्त क्रमांक 279

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभ घ्या : शिवानंद मिनगीरे

चित्ररथामार्फत जिल्ह्यात प्रचार प्रसिद्धी

नांदेड दि. ११ मार्च : विशेष सहाय्य विभागाच्या महत्त्वपूर्ण योजना मार्फत ज्येष्ठ नागरिकांना असाहय नागरिकांना, विधवा महिलांना केंद्र व राज्य शासनामार्फत मदत केली जाते. त्यामुळे या योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात घेतला गेला पाहिजे, असे आवाहन जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग शिवानंद मीनगिरे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्यावतीने श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, तसेच डीबीटी पोर्टल आदी योजनांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी चित्ररथ सुरू करण्यात आला आहे.

यामध्ये जवळपास सर्व वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य दिल्या जाते. असाह्य गरीब कुटुंबातील 18 ते 65 वर्षाखालील पात्र लाभार्थ्यांना या सर्व योजनांमधून दीड हजारापर्यंत मदत केली जाते. या योजनांचा फायदा घ्यावा तसेच या योजनांचा लाभ आपल्या गावातील नागरिकांना मिळावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा,असे आवाहन त्यांनी केले. 

अधिक माहितीसाठी संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

00000




  वृत्त क्रमांक 285 जिल्ह्यात  22 मार्च रोजी    राष्ट्रीय लोकअदालतीचे     आयोजन   नांदेड दि.   11   मार्च  :-   राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकर...