Friday, May 14, 2021

 

45 वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी

कोविशिल्डचा दुसरा डोस 

जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर 100 डोसचा पुरवठा

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यातील 45 पेक्षा अधिक वय वर्षे असलेल्या ज्या नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे अशा नागरिकांना आज कोविशील्डचा दुसरा डोस उपलब्ध केला आहे. डोसच्या उपलब्धतेप्रमाणे जिल्ह्यातील 91 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. 15 मे साठी प्रत्येक केंद्रनिहाय प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे कोविशिल्ड मिळाले आहेत. ज्या नागरिकांनी पहिला कोविशिल्डचा डोस घेतला आहे त्यांनी लसीकरण केंद्रावर उपलब्धतेप्रमाणे लस घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांनी केले आहे. ज्या प्रमाणात जिल्ह्यातील केंद्रांसाठी लस उपलब्ध होत आहेत त्याप्रमाणात लसीकरणासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कटिबद्ध असून टप्याटप्यात सर्वांना लसीकरण केले जाईल. नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करुन लसीकरणाबाबतची वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

 

जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण व्हावे याची खबरदारी कुटुंबातील सदस्यांनी घेऊन तसे नियोजन करणे उचित राहिल. लसीकरण केंद्रावर 18 ते 45 वयोगटातील युवक-नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन अनावश्यक गर्दी करु नये. नांदेड शहरात पुढीलप्रमाणे लसीकरण केंद्र आहेत. यात श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको असे एकूण 8 केंद्र आहेत. शहरी हद्दीत सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय असे एकूण 16 केंद्र आहेत. ग्रामीण हद्दीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु असून एकूण 67 केंद्र आहेत. या प्रत्येक केंद्रावर आजच्यासाठी कोविशिल्ड या लसीचे 100 डोस उपलब्ध मिळाले आहेत. लसीकरणाच्या या मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे. नांदेड जिल्ह्यात 14 मे पर्यंत कोविशिल्डचे 3 लाख 34 हजार 930, कोव्हॅक्सिनचे 96 हजार 440 डोस असे एकुण 4 लाख 31 हजार 370 डोस मिळाले आहेत. जिल्ह्यात 13 मे 2021 पर्यंत एकुण 3 लाख 91 हजार 721 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

 

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 12 ते 16 आठवडे या कालावधीत म्हणजेच 84 दिवसानंतर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उपलब्ध असलेला कोविड-19 लसीचासाठा हा केवळ 45 वर्षावरील लाभार्थ्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यासाठी व दुसरा डोसचे लाभार्थी नसल्यास प्रथम डोससाठी वापरण्यात येणार आहे. 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबवण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावून अनावश्यक गर्दी करु नये. तसेच कोविड-19 लसीकरण कार्यक्रमास सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत केले आहहे.

0000

 

 

महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके,

बियाणे मिनिकीट यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनिकीट या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी गुरुवार 20 मे 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे. 

जिल्हयामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातर्गंत अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके कार्यक्रम पुढील नमूद पिकांसाठी राबविण्यात येतो. यात कडधान्य तुर, मुग, उडिद, पौष्टिक तृणधान्य ज्वारी. गळीतधान्य सोयाबीन ,तीळ. व्यापारी पिके कापुस, ऊस या पिकांचा समावेश आहे. 

बियाणे वितरणात नमूद केलेल्या कडधान्य बियाण्यासाठी 10 वर्षा आतील वाणास 50 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 25 रुपये प्रती किलो, ज्वारी सरळ वाणाचे बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास 30 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास रु. 15 प्रती किलो. सोयाबीन बियाण्यासाठी 10 ते 15 वर्षाचे वाणास 12 रुपये प्रती किलो याप्रमाणे आहे. एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. 

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार २ हजार ते 4 हजार रुपये प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. 

बियाणे मिनिकीटसाठी सोयाबीन/ज्वारी/कापूस या पिकांमध्ये मिनिकीट कडधान्याचे आंतरपीक घेणे अनिवार्य आहे. जिल्हयामध्ये बियाणे मिनिकीटसाठी तूर , मुग , उडीद या पिकाचा समावेश आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2021 मध्ये तूर, मुग आणि उडीद यापैकी एका पिकाचे 4 किलोचे एक बियाणे मिनिकीट देण्यात येईल. तूर 412 रुपये प्रती 4 किलो मिनिकीट, मुग 407 रुपये प्रती 4 किलो मिनिकीट, उडीद 349 रुपये प्रती 4 किलो मिनिकीट प्रमाणे अनुदान देय असून बियाणे मिनिकीटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्यांनी अदा करावयाची आहे.

शेतकऱ्यांची निवड होणार ऑनलाईन लॉटरी पद्धतीने

या कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ईमेलवर 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

0000

 

डेंग्युताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावी काळजी

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- डेंगी ताप विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रुपांतर डासात होते. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नाही. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला जनतेचे सहकार्य आवश्यक आहे.  

नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राष्ट्रीय डेंग्यु दिन रविवार 16 मे 2021 रोजी साजरा होत आहे. मागील वर्षापासून कोविड-19 या महामारीस तोंड देत आहोत. यावर्षी सुद्धा कोविड-19 विरुद्ध आरोग्य खात्यातील अधिकारी, कर्मचारी लढत आहेत. या कठीन प्रसंगी आरोग्य खात्यातील कर्मचारी कोविड-19 या आजारासोबत डेंगू या आजारावर नियमितपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहेत.   

त्याअनुषंगाने सध्या उन्हाळा सुरु असल्याने जिल्ह्यात पाण्याचा तुटवडा असल्याने नागरिकांकडून पाणी साठविण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. त्याअनुषंगाने साठविलेल्या पाण्यात एडिस इजिप्टाय डास अंडी घालतात. त्यातून डासोत्पत्ती होते. 

या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. जसे सिमेंट टाक्या, रांजन, प्लॉस्टिकच्या रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंड्या, घरातील शोभेच्या कुंड्या, निरुपयोगी वस्तु, टायर्स व कुलर इत्यादी. जास्त दिवस पाणी साठलेल्या ठिकाणी एडिस इजिप्टाय डासाची मादी अंडी घालते. एक डास एकावेळेस दिडशे ते दोनशे अंडी घालते. यातून या डासचा मोठा फैलाव होतो. 

डेंगी ताप आजारात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो. अशक्यतपणा, भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करुन घेणे आवश्यक आहे. 

नांदेड जिल्ह्यात मागील चार वर्षांची डेंग्युची परिस्थिती पुढीलप्रमाणे आढळते. (घेतलेले तपासलेले रक्तजल नमुने) कंसाबाहेर डेंग्यु दुषित रुग्ण, नंतरच्या (कंसात मृत्यू रुग्ण).  सन 2018 - (1245) 378 (निरंक), सन 2019 - (1527) 473 (निरंक), सन 2020 (320) 97 (निरंक) तर एप्रिल 2021 अखेर (53) 19 (निरंक). 

भविष्यात डेंगीताप या आजाराचा उद्रेक होवू नाही. यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपायांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी. आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवडयातून एकदा रिकामे करावीत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडा करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. आंगणात व परिसरातील खड्डे बुजवावेत, त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत. झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावीत. पांघरन घेवून झोपावे. सायंकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवून रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे. डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिली आहे. 

नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती थांबविण्यास मोठी मदत होईल व डास चावणार नाहीत. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी केले आहे.

00000

 

522 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 208  व्यक्ती कोरोना बाधित

13 जणांचा मागील दोन दिवसात मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 980  अहवालापैकी 208 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 149 तर अँटिजेन तपासणीद्वारे 59 अहवाल बाधित आहेत.जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 86 हजार 443 एवढी झाली असून यातील 80 हजार 472 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 827 रुग्ण उपचार घेत असून 137 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक 13 व 14 मे 2021 या दोन दिवसाच्या कालावधीत 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 785 एवढी झाली आहे. दिनांक 13 मे 2021 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उमरी येथील 35 वर्षाची महिला, बिलोली तालुक्यातील दगडपूर 41 वर्षाच्या पुरुषाचा, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे लोहा येथील 60 वर्षाचा पुरुष, नायगाव येथील 70 वर्षाचा पुरुष, मुखेड तालुक्यातील अंबुलगाव येथील 40 वर्षाची महिला, उस्माननगर नांदेड येथील 75 वर्षाची महिला, हिमायतनगर येथील 65 वर्षाचा पुरुष, महावीर सोसायटी नांदेड येथील 77 वर्षाची महिला, गोदावरी कोविड रुग्णालयात देगलूर तालुक्यातील आलूर येथील 55 वर्षाचा पुरुष, नारायणा कोविड रुग्णालयात अंबिकानगर नांदेड येथील 72 वर्षाचा पुरुष, मेडिकेअर कोविड रुग्णालय लोहा येथे कंधार तालुक्यातील बाबुलगाव येथील 60 वर्षाचा पुरुषाचा तर 14 मे 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे इतवारा नांदेड येथील 60 वर्षाची महिला, देगलूर येथील 83 वर्षाचा पुरुषाचा समावेश आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 58, हिमायतनगर 2, नायगाव 1, मुखेड 5, बीड 1, नांदेड ग्रामीण 22, कंधार 6, उमरी 5, तेलंगणा 1, भोकर 1, किनवट 9, अर्धापूर 9, हिंगोली 5, हदगाव 3, लोहा 3, देगलूर 16, परभणी 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे मनपा नांदेड 11, धर्माबाद 1, नायगाव 6, किनवट 5, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 4, हदगाव 2, उमरी 4, लोहा 1, अर्धापूर 1, हिमायतनगर 1, माहूर 1, हिंगोली 2, बिलोली 14, कंधार 2, मुखेड 2, परभणी 1 असे एकूण 208 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 522 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 11, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंबो कोविड सेंटर 322, मालेगाव टी.सी.यू. कोविड रुग्णालय 3, धर्माबाद तालुक्यांतर्गत 3, बारड कोविड केअर सेंटर 6, माहूर तालुक्यातंर्गत 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 17, मुखेड कोविड रुग्णालय 24, मुदखेड कोविड केअर सेंटर 12, किनवट कोविड रुग्णालय 6, उमरी तालुक्यातंर्गत 6, खाजगी रुग्णालय 87, शासकीय आयर्वेदिक महाविद्यालय नांदेड 3, नायगाव तालुक्यातंर्गत 1, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 2, हदगाव कोविड रुग्णालय 1, लोहा तालुक्यातंर्गत 13, व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 3 हजार 827 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 115, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 65, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 78, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 26, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 61, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 43, देगलूर कोविड रुग्णालय 6, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 19, बिलोली कोविड केअर सेंटर 92, नायगाव कोविड केअर सेंटर 7, उमरी कोविड केअर सेंटर 21, माहूर कोविड केअर सेंटर 13, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 26, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 24, कंधार कोविड केअर सेंटर 5, धर्माबाद कोविड केअर सेंटर 29, मुदखेड कोविड केअर सेंटर 6, अर्धापूर कोविड केअर सेंटर 13, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7,  बारड कोविड केअर सेंटर 17, मांडवी कोविड केअर सेंटर 1, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 6, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 11, एनआरआय कोविड केअर सेंटर 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 02, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 417, खाजगी रुग्णालय 716 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 47, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 75, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 59, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 94 हजार 689,

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 98 हजार 34

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 86 हजार 443

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 80 हजार 472

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 785

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.09 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-08

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-41

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-245

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 827

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-137

00000

 

सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना

काम वाटप करण्यासाठी समितीची बैठक

नांदेड, (जिमाका) दि. 14 :-जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना लॉटरी पद्धतीने काम वाटप करण्यासाठी गठीत केलेल्या काम वाटप समितीची बैठक शुक्रवार 21 मे 2021 रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड येथे दुपारी 12 वा. घेण्यात येणार आहे. इच्छुक सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी याची नोंद घेऊन आवश्यक त्या कागदपत्रासह बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन काम वाटप समितीचे अध्यक्ष तथा अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांनी केले आहे.

0000

 

 

शेतकऱ्यांनी अनाधिकृत एचटीबीटी बियाण्याची खरेदी करु नये

नांदेड (जिमाका) दि. 14 :-  खरीप हंगामात इतर राज्यातुन अनाधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे येण्याची शक्यता आहे. एचटीबीटी कापुस बियाण्याला राज्यात विक्रीची परवानगी नाही. शेतकऱ्यांनी या अनाधिकृत बियाण्याची लागवड करु नये. असे अनाधिकृत बियाणे बाळगल्यास कापुस बियाणे अधिनियम -2009 व पर्यावरण सरंक्षण अधिनियम -1986 च्या तरतुदीनुसार 5 वर्षापर्यत कारावास व एक लाख रुपयाचा दंड होऊ शकतो. शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे एचटीबीटी बियाण्याची खरेदी करु नये व त्या बियाणांची शेतात लागवड करु नये असे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

सध्या बाजारात परराज्यातून अनाधिकृत मार्गाने  एचटीबीटी कापुस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एचटीबीटी कापुस बियाणे हे बोंडअळी प्रतिकार नसल्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. या कापुस बियाण्याच्या लागवडीमुळे तणनाशकांचा अनावश्यक वापर वाढुन जैव विविधतेला बाधा येऊन जमिन व मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या बियाण्यास उत्पादनासाठी अधिकृत मान्यता नसल्याने या बियाणे पुर्णपणे अनधिकृतरित्या उत्पादित केले जाते. तसेच या बियाण्याच्या सत्यतेची तपासणी कोणत्याही शासकीय यंत्रणेमार्फत केली जात नाही.

00000

 

शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी

शेतकऱ्यांनी 1 जूननंतर कापूस बियाणाची लागवड करावी 

नांदेड (जिमाका) दि. 14 :-  शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खरीप हंगाम 2021 मध्ये बियाणे विक्रेत्यांनी 1 जून पूर्वी शेतकऱ्यांना कापुस बियाण्याची विक्री करु नये. तर शेतकऱ्यांनी पण 1 जुनच्या अगोदर कापुस बियाण्याची शेतात लागवड करु नये. हंगामपूर्व कापसाची लागवड केल्याने शेंदरी बोंडअळीचा पुर्न: उत्पतीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामूळे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना हंगामपुर्व बियाणे उपलब्ध करुन न दिल्यास व शेतकऱ्यांनी हंगामपूर्व लागवड न केल्यास शेंदरी बोंडअळीचा होणारा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. त्यामूळे शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कापूस बियाण्याची लागवड करु नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...