Wednesday, July 11, 2018

धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समितीची
निवडणूक प्रक्रिया तूर्त स्थगित
नांदेड दि. 11 :- मा. उच्‍च न्‍यायालय औरंगाबाद यांनी 11 जुलै रोजी दिलेल्‍या आदेशानुसार धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया तूर्त पूढील आदेशापर्यंत स्‍थगित करण्‍यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.
राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्‍या आदेशान्वये धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली होती. निवडणुकीची अंतीम मतदार यादी प्रकाशीत झाली असून मतदार यादी प्रकाशीत झाल्‍यानंतर निवडणूक प्रक्रिया 10 ते 20 दिवसात सुरु करण्‍याबाबत राज्‍य सहकार निवडणूक प्राधिकरण पुणे यांचे आदेश प्राप्त होते. परंतु मा. उच्‍च न्‍यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे या‍चिकाकर्ते धर्माबाद येथील संजय रामपुरे यांनी रिट याचिका क्र. 6942 / 2018 दाखल करुन धर्माबाद तालुक्‍यातील मौ. माष्‍टी, पाटोदा थडी व शेळगाव ही गावे धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये समाविष्‍ट करण्‍यासाठी विनंती केली होती.  
ही तीन गावे राज्‍य सहकार निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी दिलेल्‍या अर्हता दिनांक 31 डिसेंबर 2017 पर्यंत कुंडलवाडी कृषि उत्पन्न बाजार समितीमध्‍ये समाविष्‍ट होती. जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड यांचेकडील अधिसुचना दिनांक 30 जानेवारी 2018 नुसार ही गावे धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आली. त्‍यामुळे याचिकाकर्ते यांनी मागणी केल्‍यानुसार बुधवार 11 जुलै रोजी मा. उच्‍च न्‍यायालय औरंगाबाद यांनी आदेश देऊन या तीन गावातील शेतकऱ्यांचा समावेश धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या मतदार यादीमध्‍ये घेण्‍यात येऊन निवडणूकीची प्रक्रिया सुरु करावी, असे आदेश झाल्‍याचे राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांचे मा. उच्‍च न्‍यायालय औरंगाबाद पॅनलमधील वकील एस. के. कदम यांनी भ्रमणध्‍वनीवरुन जिल्हाधिकारी कार्यालयास बुधवार 11 जुलै 2018 रोजी सायं 5 वा. कळविले आहे. त्यानुसार मा. उच्‍च न्‍यायालय औरंगाबाद यांनी दिलेल्‍या आदेशाप्रमाणे धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया तूर्त पूढील आदेशापर्यंत स्‍थगित करण्‍यात येत आहे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000

मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक
आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड, दि. 11 :- मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. 
मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक विषयक पूर्वतयारी व आचारसंहिता अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी यांचे कक्षात घेण्यात आली, त्यावेळी श्री. डोंगरे बोलत होते.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक एन. व्ही. सांगडे, सहायक निवडणूक अधिकारी तथा मुदखेडचे तहसिलदार सुरेश घोळवे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे राहूल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, निवडणूकीची आचारसंहिता बाजार समितीची निवडणूक घोषीत झाली आहे अशा बाजार समितीच्‍या क्षेत्रात तिच्‍याशी निगडीत बाबींसाठी लागू आहे. आचारसंहिता नामनिर्देशन पत्र सुरु होण्याच्या तारखेपासून लागु होईल व ती मतमोजणी संपेपर्यंत राहील. बाजार समितीच्‍या निवडणूकीमध्‍ये आचारसंहितेचे पालन करणे सर्व संबंधीतांना बंधनकारक आहे. बाजार क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडणारे निर्णय निवडणूकीच्‍या तोंडावर विद्यमान संचालक मंडळाने घेवू नयेत अथवा अशी कोणतीच कृती करू नये. निवडणूक जाहीर झाल्यानंतर बाजार क्षेत्रामध्‍ये बाजार समितीच्‍या खर्चाने पुर्ण झालेल्‍या कामांचे उद्घाटन समारंभ इत्‍यादी आयोजीत करता येणार नाहीत. संस्‍थेच्‍या विश्रामगृहाचा वापर संचालकास, उमेदवारास अथवा इतर कोणासही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही. निवडणूकीच्‍या कालावधीत बाजार समितीची सर्व वाहने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अधिपत्‍याखाली राहतील व त्‍याचा वापर केवळ निवडणूक कामकाजासाठी करण्‍यात येईल. निवडणूका जाहीर झाल्‍यापासून निवडणूकीशी संबंधीत व्‍यक्‍तीस शस्‍त्रात्रे बाळगता येणार नाहीत. ही बंदी निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत अंमलात रा‍हील. आचारसंहितेच्‍या कालावधीत पदाधिकाऱ्यांना ध्‍वजारोहण करता येईल. परंतु निवडणूकीचा कोणताही प्रचार करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
श्री. डोंगरे पुढे म्हणाले, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर विहीत कालावधी पुरताच व्हिडीओ पथकाचा वापर करावा. मतदान केंद्राची प्रत्‍यक्ष पाहणी करुन मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या सोयी-सुविधा असल्‍याबाबत खात्री करावी. पोलीस यंत्रणेशी समन्‍वय साधून सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक पोलीस बंदोबस्‍त उपलब्‍ध करून घ्‍यावा. मतदान केंद्राची संख्‍या लक्षात घेवून पुरेसे अधिकारी / कर्मचारी यांच्‍या नियुक्‍त्‍या कराव्‍यात. नामनिर्देशन पत्रासोबत स्‍वतः प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिका-याने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र जोडलेले असले पाहिजे. निवडणूक निर्णय अधिका-यांची खात्री होण्‍यासाठी उमेदवाराने अधिनियमाच्‍या कलम 2 (1) (ख) नुसार तो हा शेतकरी व बाजार समितीच्‍या कार्यक्षेत्रातील रहिवाशी असल्‍याबाबत संबंधीत गावच्‍या तलाठ्याने दिलेला दाखला नामनिर्देशनपत्रासोबत जोडला पाहिजे व तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. कृषि उत्‍पन्‍न  बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया अचूकरित्‍या पार पाडून प्रत्‍येक टप्‍प्‍याचा वेळोवेळी अहवाल पाठविण्‍याची दक्षता घ्‍यावी, असेही निर्देश श्री. डोंगरे यांनी दिले. 
मुदखेड कृषि बाजार समिती निवडणूक कार्यक्रमातील महत्‍वाचे टप्‍पे पूढीलप्रमाणे आहेत.  नामनिर्देशन पत्र दाखल करण्‍याचा कालावधी 12 ते 18 जुलै 2018 आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 19 जुलै 2018 (सकाळी 11 वा.). वैध नामनिर्देशन पत्राची सुची प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक 20 जुलै 2018. उमेदवारांने नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍याचा दिनांक 20 जुलै ते 3 ऑगस्ट 2018. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक निशाणीचे वाटप दि. 4 ऑगस्ट 2018. अंतीम यादीचे प्रकाशन करण्‍याचा दिनांक 4 ऑगस्ट 2018. प्रत्‍यक्ष मतदानांचा दिनांक व वेळ  11 ऑगस्ट 2018 (सकाळी 8 ते सायं. 5). मतमोजणीचा दिनांक व वेळ 12 ऑगस्ट 2018 (सकाळी 10 वाजेपासुन) राहील. 
यात शेतकरी मतदारसंघातून 15, व्‍यापारी मतदार संघातील 2 प्रतिनिधी व हमाल / मापाडी मतदार संघातील 1 प्रतिनिधी असे एकुण 18 सदस्‍य निवडण द्यावयाचे आहेत. मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी एकुण 15 गणात 8 हजार 713 मतदारांची संख्या असून व्‍यापारी मतदारांची संख्‍या 153 तर हमाल / मापाडी मतदारांची संख्‍या 33 एवढी आहे. अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली. 
यावेळी मतदान केंद्र, नामनिर्देशनपत्र, घोषणापत्र व इतर कागदपत्रे, नामनिर्देशनपत्रासोबत द्यावयाचे कागदपत्रे, आचारसंहिता अंमलबजावणी, अधिकारी व कर्मचारी नियुक्‍ती, मतपेटी व इतर साहित्‍य, अधिकारी व कर्मचारी यांचे निवडणूक प्रशिक्षण, मतमोजणी, निवडणूक चिन्‍ह वाटप, निवडणूक नि‍रीक्षक, निवडून आलेल्‍या सदस्‍यांची नावे प्रसिध्‍द करणे, राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडील संपर्क क्रमांक आदी विषयांचा आढावा घेऊन उपयुक्त सुचना देण्यात आल्या.
000000


कृषि विभागामार्फत गोदाम बांधकामासाठी अनुदान
            नांदेड दि. 11 :- कृषि विभागाच्यावतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियानांतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये गोदाम बांधकामासाठी लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या आधीन राहून शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छूक लाभार्थ्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकंडून अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डिझा/ स्पेसिफीकेशन व खर्चाच्या अंदाजपत्रकासह तालुका कृषि अधिकारी यांचेकडे मंगळवार 31 जुलै 2018 अखेर  पर्यंत सादर करावा.
या योजनेंर्गत ज्या ठिकाणी गोदामांची व्यवस्था नाही व ज्या गावात हा दोन्ही कार्यक्रम राबविण्यात येतात अशा परिसरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य व गळीतधान्य अंतर्गत गोदाम बांधकाम कार्यक्रम देण्यात येतो. या योजनेतर्गत कमाल 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12.50 लक्ष रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे.
             अटी व शर्तीच्या आधीन राहुन शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर प्रस्ताव बँक कर्जाशी निगडीत आहे.  च्छूक शेतकरी उत्पादक संघ / कंपनी, केंद्र शासनाची ग्रामीण भांडार योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे असावा.
लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने निवड करण्यात येईल. वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषाप्रमाणे लाभार्थ्यांनी जागेची निवड करावी व त्याची खात्री जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी हे करतील. या योजनेचा एकदाच लाभ देण्यात येईल. बांधकाम चालु आर्थिक वर्षात पुर्ण करणे बंधनकारक आहे.  अपुर्ण बांधकाम, मंजूर डिझाईन, स्पेसिफिकेशनमध्ये बदल केल्यास अनुदान देय राहणार नाही. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषि माल साठवणकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दरात करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
000000


माजी सैनिकासाठी कंत्राटी क्रीडा शिक्षक
/ क्रीडा मार्गदर्शक पदाची भरती
नांदेड, दि. 11 :- प्रकल्प कार्यालय एकात्मिक अदिवासी  विकास प्रकल्प किनवट यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळेत क्रीडा शिक्षक / क्रीडा मार्गदर्शक हे पद कंत्राटी पद्वतीने 11 महिण्याच्या कराराने एकत्रित मानधन 25 हजार रुपयावर भरण्यात येणार आहे. 
अर्ज वाटप व जमा करण्याचे तसेच परिक्षा शुल्क 300 रुपये स्विकारण्याचे ठिकाण प्रकल्प कार्यालय, एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प, किनवट आहे. अर्हता- किमान विद्यापीठ स्तरावर कोणत्याही मैदानी  खेळाचे  प्रतिनिधीत्व केले असावे. उमेदवाराचे वय 45  वर्षेपेक्षा जास्त नसावे.  अधिक माहितीसाठी माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड  किंवा  प्रकल्प अधिकारी, एकात्मिक अदिवासी  विकास प्रकल्प, किनवट यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर  सुभाष सासने यांनी  केले आहे.
0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...