Wednesday, July 11, 2018


मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक
आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड, दि. 11 :- मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. 
मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक विषयक पूर्वतयारी व आचारसंहिता अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी यांचे कक्षात घेण्यात आली, त्यावेळी श्री. डोंगरे बोलत होते.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक एन. व्ही. सांगडे, सहायक निवडणूक अधिकारी तथा मुदखेडचे तहसिलदार सुरेश घोळवे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे राहूल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, निवडणूकीची आचारसंहिता बाजार समितीची निवडणूक घोषीत झाली आहे अशा बाजार समितीच्‍या क्षेत्रात तिच्‍याशी निगडीत बाबींसाठी लागू आहे. आचारसंहिता नामनिर्देशन पत्र सुरु होण्याच्या तारखेपासून लागु होईल व ती मतमोजणी संपेपर्यंत राहील. बाजार समितीच्‍या निवडणूकीमध्‍ये आचारसंहितेचे पालन करणे सर्व संबंधीतांना बंधनकारक आहे. बाजार क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडणारे निर्णय निवडणूकीच्‍या तोंडावर विद्यमान संचालक मंडळाने घेवू नयेत अथवा अशी कोणतीच कृती करू नये. निवडणूक जाहीर झाल्यानंतर बाजार क्षेत्रामध्‍ये बाजार समितीच्‍या खर्चाने पुर्ण झालेल्‍या कामांचे उद्घाटन समारंभ इत्‍यादी आयोजीत करता येणार नाहीत. संस्‍थेच्‍या विश्रामगृहाचा वापर संचालकास, उमेदवारास अथवा इतर कोणासही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही. निवडणूकीच्‍या कालावधीत बाजार समितीची सर्व वाहने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अधिपत्‍याखाली राहतील व त्‍याचा वापर केवळ निवडणूक कामकाजासाठी करण्‍यात येईल. निवडणूका जाहीर झाल्‍यापासून निवडणूकीशी संबंधीत व्‍यक्‍तीस शस्‍त्रात्रे बाळगता येणार नाहीत. ही बंदी निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत अंमलात रा‍हील. आचारसंहितेच्‍या कालावधीत पदाधिकाऱ्यांना ध्‍वजारोहण करता येईल. परंतु निवडणूकीचा कोणताही प्रचार करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
श्री. डोंगरे पुढे म्हणाले, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर विहीत कालावधी पुरताच व्हिडीओ पथकाचा वापर करावा. मतदान केंद्राची प्रत्‍यक्ष पाहणी करुन मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या सोयी-सुविधा असल्‍याबाबत खात्री करावी. पोलीस यंत्रणेशी समन्‍वय साधून सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक पोलीस बंदोबस्‍त उपलब्‍ध करून घ्‍यावा. मतदान केंद्राची संख्‍या लक्षात घेवून पुरेसे अधिकारी / कर्मचारी यांच्‍या नियुक्‍त्‍या कराव्‍यात. नामनिर्देशन पत्रासोबत स्‍वतः प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिका-याने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र जोडलेले असले पाहिजे. निवडणूक निर्णय अधिका-यांची खात्री होण्‍यासाठी उमेदवाराने अधिनियमाच्‍या कलम 2 (1) (ख) नुसार तो हा शेतकरी व बाजार समितीच्‍या कार्यक्षेत्रातील रहिवाशी असल्‍याबाबत संबंधीत गावच्‍या तलाठ्याने दिलेला दाखला नामनिर्देशनपत्रासोबत जोडला पाहिजे व तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. कृषि उत्‍पन्‍न  बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया अचूकरित्‍या पार पाडून प्रत्‍येक टप्‍प्‍याचा वेळोवेळी अहवाल पाठविण्‍याची दक्षता घ्‍यावी, असेही निर्देश श्री. डोंगरे यांनी दिले. 
मुदखेड कृषि बाजार समिती निवडणूक कार्यक्रमातील महत्‍वाचे टप्‍पे पूढीलप्रमाणे आहेत.  नामनिर्देशन पत्र दाखल करण्‍याचा कालावधी 12 ते 18 जुलै 2018 आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 19 जुलै 2018 (सकाळी 11 वा.). वैध नामनिर्देशन पत्राची सुची प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक 20 जुलै 2018. उमेदवारांने नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍याचा दिनांक 20 जुलै ते 3 ऑगस्ट 2018. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक निशाणीचे वाटप दि. 4 ऑगस्ट 2018. अंतीम यादीचे प्रकाशन करण्‍याचा दिनांक 4 ऑगस्ट 2018. प्रत्‍यक्ष मतदानांचा दिनांक व वेळ  11 ऑगस्ट 2018 (सकाळी 8 ते सायं. 5). मतमोजणीचा दिनांक व वेळ 12 ऑगस्ट 2018 (सकाळी 10 वाजेपासुन) राहील. 
यात शेतकरी मतदारसंघातून 15, व्‍यापारी मतदार संघातील 2 प्रतिनिधी व हमाल / मापाडी मतदार संघातील 1 प्रतिनिधी असे एकुण 18 सदस्‍य निवडण द्यावयाचे आहेत. मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी एकुण 15 गणात 8 हजार 713 मतदारांची संख्या असून व्‍यापारी मतदारांची संख्‍या 153 तर हमाल / मापाडी मतदारांची संख्‍या 33 एवढी आहे. अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली. 
यावेळी मतदान केंद्र, नामनिर्देशनपत्र, घोषणापत्र व इतर कागदपत्रे, नामनिर्देशनपत्रासोबत द्यावयाचे कागदपत्रे, आचारसंहिता अंमलबजावणी, अधिकारी व कर्मचारी नियुक्‍ती, मतपेटी व इतर साहित्‍य, अधिकारी व कर्मचारी यांचे निवडणूक प्रशिक्षण, मतमोजणी, निवडणूक चिन्‍ह वाटप, निवडणूक नि‍रीक्षक, निवडून आलेल्‍या सदस्‍यांची नावे प्रसिध्‍द करणे, राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडील संपर्क क्रमांक आदी विषयांचा आढावा घेऊन उपयुक्त सुचना देण्यात आल्या.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...