Monday, August 26, 2024

वृत्त क्र. 772

पालकमंत्री गिरीश महाजन यांचा दौरा 

नांदेड दि. 26  ऑगस्ट :- राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. मंगळवार 27 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.30 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 8.40 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.   

000


 वृत्त क्र. 771 

वसंतराव चव्हाण यांच्यावर नायगावात

आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार  

नांदेड दि. 26  ऑगस्ट :- नांदेडचे विद्यमान खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे 26 ऑगस्टला पहाटे हैद्राबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.      

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड मतदार संघातून ते विजयी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वस्थामुळे प्रथम नांदेड येथे व नंतर हैद्राबाद येथे उपचार घेत होते. मात्र 26 ऑगस्ट रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आदी मान्यवरांनी दुखवटा व्यक्त केला आहे. राज्य शासनाने त्यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात घेण्याचे निर्देश नांदेड जिल्हा व पोलीस प्रशासनाला दिले आहेत. 

वसंतराव चव्हाण यांचा परिचय

खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या वडीलाचे नाव कै. बळवंतराव अमृतराव चव्हाण होते. त्यांचा जन्म दिनांक 15 ऑगस्ट 1954 रोजी झाला होता. त्यांचे जन्मस्थळ नांदेड जिल्हयातील  नायगाव (बा.) आहे.  त्यांचे शिक्षण बीकॉम (दुसरे वर्ष) असे होते.

राजकीय कार्य

स्व. वसंतराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य सरपंच अशी केली आहे. सन 1978 ते 2002 पर्यत सलग 24 वर्ष ते नायगाव ग्रामपंचायतचे सरपंच होते. बिलोली सरपंच संघटनेचे अध्यक्ष होते. सन 1990-95 या काळात जिल्हा परिषद सदस्य नांदेड. सन 2002 मध्ये जिल्हा परिषदेला  दुसऱ्यांदा निवड झाली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथे नांदेड, सन 2002-2008 विधान परिषद सदस्य होते. 2009-2014 या काळात ते राज्याच्या विधानसभेमध्ये विधानसभा सदस्य (अपक्ष) होते. त्यांनी  रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य समितीचे सदस्य म्हणूनही पद भूषविले. संसदीय कामकाज पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी युरोपचा अभ्यास दौरा केला. पुन्हा एकदा 2014-2019 या काळात काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून ते निवडून आले. सदस्य अंदाज समिती महाराष्ट्र राज्य. सन 2016-2022 सभापती कृ.ऊ.बा समिती नायगांव, सन 2021-2023 चेअरमन, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली आणि 29 फेब्रुवारी 2024 पासून मुख्य समन्वयक नांदेड ग्रामीण कॉग्रेसची जबाबदारी त्यांनी घेतली. नायगाव तालुका निर्मितीचे ते शिल्पकार आहेत. 4 जून 2024 पासून ते कॉग्रेस पक्षाकडून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. खासदार म्हणून त्यांचे कामकाज नुकतेच सुरू झाले होते. राजकीय कारकीर्दीसोबतच त्यांचे सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यातही खूप मोठा सहभाग होता.

00000



 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

छत्रपती संभाजीनगर, दि.26, (विमाका) :- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या सत्रातील अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर तात्काळ सादर करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी केले आहे.

आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातुर जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना व इतर योजनेचे शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in  प्रणाली कार्यान्वीत झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातुर जिल्हयातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या सत्रातील (fresh) नविन तथा (Renewal) नुतनीकरण अर्ज महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीमती मोरे यांनी केले आहे.

*****

वृत्त क्र. 770

जिल्हा परिषद गट-क सरळसेवा परीक्षा-2023

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड, दि. 26 ऑगस्ट :-  नांदेड जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या  आयऑन डिजीटल झोन, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नं.18 आणि 22 नांदेड या परीक्षा केंद्रावर 28 ऑगस्ट 2024 दोन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 769

मुख्यमंत्री वयोश्री व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेबाबत बैठक संपन्न

नांदेड दि. 26  ऑगस्ट :- राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. सर्व धर्मातील जेष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेतत्यांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनाराबविण्यात येत आहे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी व पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील समाज कल्याण कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली.


या बैठकीला समाज कल्याण विभाग लातूरचे समाज कल्याण अधिकारी गट-ब प्रादेशिक उपायुक्त, व्ही.एस. केंद्रे, जनसंपर्क अधिकारी एस.आर. देवकत्ते हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये समाज कल्याण कार्यालय अधिनस्त कार्यरत गृहपाल, मुख्याध्यापक अनुदानित वसतिगृहाचे वसतिगृह अधिक्षक अनु.जाती आश्रम शाळेचे मुख्याध्यापकदिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक असे जवळपास 200 ते 250 कर्मचारी यांची उपस्थिती होती.


या बैठकीत प्रादेशिक उपायुक्त व्ही.एस.केंद्रे यांनी नांदेड जिल्हयातील पात्र लाभार्थ्याचे जास्तीत जास्त अर्ज 31 ऑगस्ट 2024 पर्यंत भरण्याचे निर्देश उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले. नांदेड जिल्हयातील पात्र ज्येष्ठ नागरीकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा व मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा एकही लाभार्थी वंचीत राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना दिल्या. अधिकारी कर्मचारी यांनी पात्र लाभार्थ्यांचे वैयक्तीक भेट देवून अर्ज भरून घ्यावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची पहीली बस किंवा रेल्वेही नांदेड जिल्हयातून निघेल अशी सकारात्मक अपेक्षा व्यक्त करुन सर्व कार्यालयीन यंत्रणांना जोमाने काम करण्याबाबत बैठकीत सूचना दिल्या. या बैठकीचे सुत्रसंचलन तालूका समन्वयक गजानन पंपटवार यांनी केले.

00000



वृत्त क्र. 768

नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणीस 30 ऑगस्टपासून सुरवात 

नांदेड दि. 26  ऑगस्ट :- नांदेड जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेला अनुशेष पुर्ण करण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन 30 ऑगस्ट 2024 पासून पोलीस मुख्यालय, नांदेड येथे केले आहे. सुधारित वेळापत्रकाबाबत सविस्तर माहिती  https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login१.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी दिली आहे.

 

तसेच 14 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login१.php या संगणक प्रणालीमध्ये नोंदणी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुढीलप्रमाणे दिलेल्या अर्ज क्रमांकानुसार शैक्षणिक कागदपत्रे व आवश्यक प्रमाणपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीसाठी पोलीस मुख्यालय नांदेड येथे नमूद दिनांकास उपस्थित राहावे. पुरुष उमेदवारांनी पुढील आवेदन क्रमांकाप्रमाणे उपस्थित राहावे. 30 ऑगस्ट रोजी आवेदन क्रमांक 1 ते 1500, 31 ऑगस्ट रोजी 1501 ते 4500, 1 सप्टेंबर रोजी 4501 ते 7500, 2 सप्टेंबर रोजी 7501 ते 10500, 3 सप्टेंबर रोजी 10501 ते 13500, 4 सप्टेंबर रोजी 13501 ते 16500, 5 सप्टेंबर रोजी 16501 ते 17495 या आवेदन क्रमांकाप्रमाणे उपस्थित राहावे.

 

5 सप्टेंबर रोजी आवेदन क्रमांक 1 ते 17495 सर्व महिला उमेदवारांनी उपस्थित राहावे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेप्रमाणे पोलीस मुख्यालय वजीराबाद नांदेड येथे सर्व आवश्यक मुळ शैक्षणिक प्रमाणपत्र व मुळ आवेदन तसेच सर्व स्वसाक्षांकित छायाकिंत प्रती तसेच 2 पासपोर्ट आकाराचे फोटोसह सकाळी 6 वाजता हजर राहावे, असे जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000 

ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले नेतृत्व म्हणून खासदार चव्हाण यांची ओळख कायम राहील. नायगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच लोकसभा सदस्य असा त्यांचा राजकीय आलेख राहिला आहे. घरातून मिळालेला समाजकारण, राजकारणाचा वारसा चालवताना त्यांनी नेहमीच लोकाभिमुख भूमिका घेऊन सहकार तसेच विविध क्षेत्रांत काम केले. नायगाव एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही कार्य केले. नायगाव विधानसभा क्षेत्र आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी झटणारे ज्येष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे. त्यांच्या निधनामुळे चव्हाण कुटुंबियांवर आघात झाला आहे. ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करतो. ज्येष्ठ नेते, खासदार वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली!


 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...