Monday, September 22, 2025

वृत्त क्रमांक 994

उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन 

नांदेड दि. 22 सप्टेंबर :- उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात.  पावसाळयातील वातावरण बूरशीच्या वाढीसाठी अनूकुल असते, अशी बूरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी उपवासाला भगर खाताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

भगर खाताना काय काळजी घ्यावी 

बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. ब्रँड नाव नसलेली  किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा. भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकण बंद डब्यात ठेवा, जेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बूरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका. शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामूळे पिठाला बूरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी  खिचडी खावी. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच  दळा. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तिन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन ॲसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्ती नुसार मर्यादेतच करावे. भगरीचे सेवन करतांना या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे संभाव्य अपाय टाळता येईल. 

भगर विक्रेत्यांसाठी सूचना 

विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी. भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या. मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये. सुटी भगर व खुले भगर पीठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये. 

अन्न व औषध प्रशासनाचेवतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

0000

वृत्त क्रमांक 993

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 47 उमेदवारांची प्राथमिक निवड 

नांदेड, दि. 22 सप्टेंबर :- नांदेड जिल्हृयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , नांदेड व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 19 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण अर्धापूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

या मेळाव्यात एकूण 7 नामांकित उद्योजक, शाळा तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात आल्या. तर एकूण 377 रिक्तपदांसाठी 220 उमेदवारांनी मुलाखत दिल्या. त्यापैकी 47 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त, डॉ. रा.म.कोल्हे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वादे दिली आहे.

000000

वृत्त क्रमांक 992

पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती

अंत्योदय दिवस म्हणून होणार साजरी

नांदेड, दि. 22 सप्टेंबर :- श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे गुरुवार 25 सप्टेंबर रोजी पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती अंत्योदय दिवस म्हणून सकाळी 11 वाजता साजरा करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी  केले आहे.

राज्यातील औदयोगिक प्रशिक्षण संस्थामध्ये विदयार्थ्यांना तांत्रिक ज्ञान देउन उदयोगास आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्यात येते.  बदलत्या काळात औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षणार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबरच सामाजिक जबाबदारी त्यांचे अधिकार व कर्तव्य या संदर्भात मार्गदर्शन असणे आवश्यक आहे.

त्या अनुशंगाने राज्याचे कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व शासकीय, खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामध्ये महिन्यातून एक सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 

00000

वृत्त क्रमांक 991

हलका ते मध्यम स्वरूपाचा जिल्ह्यात 

तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस

नांदेड, दि. 22 सप्टेंबर :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक २२, २५ व २६ सप्टेंबर २०२५ या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. २२ व २५ सप्टेंबर २०२५ हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा व  दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. 

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

0000

 वृत्त क्रमांक 990

नांदेड जिल्ह्यातील ऑगस्ट अखेरील सर्व बाधित शेतक-यांना १०० टक्के मदत निधी मंजुर

सोमवारपासून प्रत्यक्षात ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा निधी वितरणाला सुरुवात होणार

खरडून गेलेल्या व गाळयुक्त जमिनींसाठी मिळणार २०.८१. कोटी निधी

नांदेड दि. २० सप्टेंबर: "नांदेड जिल्हा अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण बाधित पीक क्षेत्राच्या प्रमाणात १०० नुकसान भरपाई मिळवणारा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील या शेतकऱ्यांसाठी १०० टक्के मदत निधी मंजुर करण्यात आला आहे. शासनाने तिसऱ्या टप्यात नांदेडसाठी ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा निधी मंजुर केला आहे. तर खरडून गेलेल्या व गाळयुक्त जमिनींसाठी २० कोटी ८१ लाखांचा निधी दिला जाणार आहे. पीक नुकसानग्रस्त शेतक-यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम विशेष मोहीमेव्दारे सुरु असून मंजुर करण्यात आलेला निधी सोमवारपासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात शेती पिकाचं झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार आहे." अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याच्या पिंपळगावला भेट देत बाधित क्षेत्राची पाहणी केली. यावेळी कृषीमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यासोबत सरकारने शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेल्या निधीबाबत माहिती देऊन, सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास दिला. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ६४८,५३३.२ हेक्टर क्षेत्राचा नुकसान झालं आहे. यात जवळपास ७,७४,३१३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील एकूण खरीप हंगाम पेरणी क्षेत्रापैकी अतिवृष्टी व सततचे पाऊसमानामुळे ८६ टक्के क्षेत्रावरील पीके बाधित होऊन नुकसान झालेली आहेत. जिल्हा प्रशासनाने या क्षेत्रावरील पीक व शेत जमीन नुकसानीचे पंचनामे अंतिम केलेले असून त्यानुसार सादर केलेल्या प्रस्तावात एकूण ५७४ कोटी २९ लाख ४३ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली होती. नांदेड जिल्हा अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण बाधित पीक क्षेत्राच्या प्रमाणात १०० नुकसान भरपाई मिळवणारा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे. 

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नांदेड जिल्हा दौऱ्यादरम्यान दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अर्धापूर, नांदेड, मुदखेड, कंधार, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्मावाद, नायगाव, किनवट, माहूर, हदगांव, ही. नगर, भोकर आणि उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने खरीप हंगामातील जिरायत, बागायत आणि फळ पिकांना मोठा फटका बसला. यात सोयबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, ज्वारी, भाजीपाला, हळद आणि केळी पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यांचसोबत खरडून गेलेल्या व गाळ साचलेल्या जमिनीसाठी एकूण २०.८१ कोटी निधी देण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब  व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मदत जाहीर करण्यात आली असून शासन शेतक-यांना सर्वतोपरी मदत करण्यााृसाठी युद्धपातळीवर काम करत असल्याचेही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नमुद केले.

सरकारने अतिवृष्टीतील पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात मदत निधी जाहीर केला आहे. पहिल्या टप्यात जून आणि जुलै महिन्यातील नुकसानग्रस्तांसाठी 73 कोटी 54 लाख 3 हजार रुपये इतका निधी मंजूर झाला असून यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, सोलापूर,  रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग  या जिल्ह्याचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्यात नांदेड जिल्ह्याला 553 कोटी 48 लाख 62 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. यात जिरायती पिकांना ८५०० रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांना १७००० रुपये प्रति हेक्टर आणि फळ पिकांना २२५०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या राज्यात पंचनाम्यांचं काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित जिल्ह्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाणार आहे."

नांदेड जिल्ह्यातील आमदार राजेश पवार, आमदार तुषार राठोड व आमदार बालाजी कल्याणकार यांनी या दौ-यादरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन अतिवृष्टीसंदर्भात चर्चा केली.

0000000

कृषी मंत्री श्री.दत्तात्रय भरणे यांचा अतिवृष्टी व पूर पाहणी दौरा

(दि. 20 सप्टेंबर 2025)

दुपारी - 4 वाजता : पिंपळगाव ता. अर्धापुर जि.नांदेड

तसेच नांदेड जिल्ह्याला मिळालेल्या मदतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथे पीक नुकसानीची केली पाहणी.यावेळेस चे छायाचित्र व व्हिडिओ.










दि. 20 सप्टेंबर 2025

वृत्त क्रमांक 989

स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानांतर्गत शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

शिबिरात ८५ महिलांची आरोग्य तपासणी

नांदेड दि. 20 सप्टेंबर : 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिला पतंजली योग समिती, नांदेड यांच्या वतीने योग साधना शिबिरासोबत आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच घेण्यात आले. श्री. गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयाच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं.) डॉ. राजाभाऊ बुट्टे, एनसीडी नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील, आरएमओ डॉ. पुष्पा गायकवाड व डॉ. एच.के. साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात एकूण ८५ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महिलांचे उच्चरक्तदाब, मधुमेह तपासणीसह विविध रक्त तपासण्या (CBC, LFT, KFT, HBA1C) घेण्यात आल्या.

या उपक्रमासाठी पतंजली योग समिती नांदेडच्या प्रांत संवाद महिला प्रभारी उर्मिला साजने, डॉ. दिपक हजारी, डॉ. वैजवाडे, विजय उदगीरकर, जगन्नाथ अमिलकंठ्वार, विठ्ठल कदम, हनुमंत ढगे, सौ. सुरेखा चिद्रावर यांची उपस्थिती लाभली. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. विखारुनिसा खान, शिल्पा सोनाळे, रूपा गजभारे, सुवर्णकार सदाशिव व सुरज वाघमारे यांच्या वैद्यकीय टीमने विशेष परिश्रम घेतले.

संपूर्ण शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियान अधिक परिणामकारक ठरले.

०००००



दि. 20 सप्टेंबर 2025

वृत्त 

समाजाचा कणा बळकट करणारे उद्योजक व्हा – मा.ना. चंद्रकांत दादा पाटील

महाराष्ट्र शासनाकडून स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा विविध योजनाद्वारे नव्या पिढीला साठी संधीची द्वारे उघडली आहेत. त्यातून नवीन प्रयोग, नवीन वाटचाली घडविण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. उद्योजकतेला आणि करिअरला मूल्यांची आणि समाजसेवेची जोड द्या. तुमच्या प्रत्येक कृतीत प्रमाणिकपणा, जबाबदारी आणि पर्यावरणाबद्दलची आस्था असावी, असा मूलमंत्र महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभास उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर संपन्न झालेल्या या समारोहाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर हे होते. त्यांच्या समवेत प्रमुख पाहुणे म्हणून अवंतिका विद्यापीठ उज्जैनचे कुलपती तथा आय.आय.टी., कानपुरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय गोविंद धांडे, विद्यापीठाचे प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषदचे सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. संगीता माकोने, डॉ. संतराम मुंढे, नरेंद्र चव्हाण, नारायण चौधरी, हनमंत कंधारकर, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सुरेखा भोसले, सहसंचालक डॉ. बाबासाहेब भोसले, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, वित्त व लेखाधिकारी डॉ.पराग भालचंद्र, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांची उपस्थिती होती.

पुढे ते म्हणाले, आज गुरुगोविंद सिंगजी यांच्या समाधी चरणी मराठवाडा सुजलाम, सुफलाम होऊ दे, येथे शिक्षणाचे प्रमाण वाढू, रोजगार वाढू दे अशी प्रार्थना केली. विद्यापीठांनी सध्या एनआयआरएफ मधील रँकिंग कडे लक्ष देण्याची गरज आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी अवंतिका विद्यापीठ, उज्जैनचे कुलपती तथा आयआयटी कानपूरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय धांडे विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही आता आयुष्यभर शिकण्याच्या नवीन विद्यापीठात, प्रवेश करत आहात. या विद्यापीठात परीक्षा नाहीत, गुण नाहीत, प्रमाणपत्रे नाहीत, व्याख्याने नाहीत आणि प्रयोगशाळाही नाहीत. मात्र या विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थी अनुभवातून शिकत असतो. खरे जग हे गतिशील प्रणाली आहे. ते सतत बदलत असते. कोविडनंतर या बदलांचा वेग अधिक वाढला आहे. या बदलत्या परिस्थितीत काही कौशल्य कालबाह्य होतात, तर काही नवीन कौशल्यांची निर्मिती होते आणि ह्याच कौशल्यांची मागणी असते. स्वतः नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची क्षमता ही आजच्या जगातली खरी आवश्यकता आहे. या संदर्भात मला एकलव्याची कथा फार महत्त्वाची वाटते. त्यांनी धनुर्विद्या स्वतः शिकली आणि आत्मसात केली. गुरुदक्षिणा म्हणून त्याने आपला अंगठा अर्पण केला आणि त्यानंतर आपल्या पायांच्या साहाय्याने धनुर्विद्या अवगत केली. त्यामुळे आजच्या काळात आपल्याला अनेक असे एकलव्य घडवावेत लागतील. अशा व्यक्तीला आपण डिजिटल एकलव्य म्हणू शकतो.

यावेळी दीक्षान्त समारोहाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यापीठाच्या वैशिष्ठेपूर्ण उपक्रमासह विद्यापीठाच्या महत्त्वपूर्ण बाबींचा अहवाल सादर केला.

याप्रसंगी विद्यापीठातून विविध विषयामध्ये सर्वाधिक गुण घेणारे सयदा तयबा, सागर गोरगिळे, तनिषा चव्हाण, रत्नशील सोनकांबळे, प्रसाद बोडखे, जहीर काझी, नाजिया शेख, वैष्णवी साकोळे, गायत्री चव्हाण, अंजुम बानू, सना गाडीवान, पद्मश्री मुसळे, अवंतिका पवार, अकिब अहेमद, अंजली बिरादार, आरती रोडगे, ऐश्वर्या नादे, हुडा दुरानी, बलजींदरकौर कांचवाले, गोविंद टीथे, कोमल धुमार, मनदीप तुलसाणी, गीता गुणाळे, सरस्वती लंगुटे, जीगिशा देशपांडे, सिंधुताई पाटील, नेहा कुरील, प्रतिभा जाधव, ऐश्वर्या कुलकर्णी, व्यंकट पांचाळ, कल्पना गाजरे, सुषमा पाटील, संयुक्ता कोचुरे, गायत्री सोळंकी, काजल वाघमारे, दीपिका यादव, विजया कांबळे, प्रतिमा मजगे, कैलास आघाव आणि नरसिंग बुगडे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये मान्यवराच्या हस्ते विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. विठ्ठल यांनी केले. ज्ञानदंडासह दीक्षांत मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यांनतर राष्ट्रगीत, राज्यगीत आणि विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. तर राष्ट्रगीताने दीक्षांत समारोहाचे सांगता झाली. यावेळी विद्यापरिषद सदस्य, अधिसभा सदस्य यांच्यासह प्राधिकरण, विविध समीतीचे सदस्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

००००००







दि. 20 सप्टेंबर 2025

 वृत्त क्रमांक 988

नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून काळजी घेण्याचे जिल्हाप्रशासनाचे आवाहान

नांदेड २० सप्टेंबर:- दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 06 वाजता भोकर तालुक्यातील पांडुरणा या गावाच्या पूर्वेला व पश्चिमेला भूगर्भातून आवाज आल्याची ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली. त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता या आवाजाची/ धक्क्याची कुठलीही नोंद झाली नसल्याचे आढळून आले. तरीही अजून सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार यांना देखील माहिती घेण्यास सांगितले होते पण अर्थ सायन्स विभागात सुद्धा कुठलीही नोंद झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. 

पुन्हा आज दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 व 10:15 वाजता भोकर शहरात 1. शाहू शाळा शेखपरीत नगर, 2. हनुमान नगर 3. किनवट रोड परिसर या ठिकाणी जमिनीतून आवाज येऊन दोन वेळा जमीन हादरल्याची माहिती शहरवासियांनी प्रशासनाला दिली. त्यानुसार पुन्हा एकदा राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता या धक्क्याची कुठलीही नोंद संकेतस्थळावर झाली नसल्याचे दिसून आले परंतु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागात सदर दोन धक्क्यांपैकी दहा वाजता बसलेल्या धक्क्याची नोंद झाली असून या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 1.1 एवढी नोंदविण्यात आली असून याचा केंद्रबिंदू बोरवाडी गावाच्या आसपास असल्याचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉक्टर टी. विजयकुमार यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे. सदर धक्का हा अतिसौम्य प्रकारचा आहे व अशा पद्धतीचे कंपन हे अतिवृष्टीमुळे भूजल पातळीत होणाऱ्या पुनर्भरण अथवा उपसा यामुळे निर्माण होणाऱ्या हायड्रोस्टॅटिक दबावामुळे होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आल्याचे डॉ. टी. विजयकुमार यांनी जिल्हा प्रशासनास कळविले आहे. ही सामान्य बाब असून प्रतिवर्षी बऱ्याच भागात असे जाणवते. गूढ आवाज येणे ही स्थानिक स्वरुपातील बाब असल्याचे यापूर्वी देखील निर्दशनास आले आहे. या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याबाबत तहसीलदार भोकर यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे. 

तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरित दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्ट ने फिट करून घ्यावीत. पुन्हा असा आवाज आलाच तर पटकन घराबाहेर मोकळ्या जागेत गोळा व्हावे व प्रशासनाला (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करून कळवावे तसेच कोणत्याही अफवांनावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जनतेला केले आहे.

०००००

दि. 20 सप्टेंबर 2025

 राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले नांदेड येथील श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे दर्शन.











 

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...