Thursday, July 14, 2022

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

 शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन   

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी 21 जुलै 2022 पर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज करावेत. उशिराने आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही असे आवाहन जिल्हा कार्यालयाने केले आहे.  

  

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी, बारावी, पदवीपदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा ज्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील अशा मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार 3 ते 5 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे.  

 

अभ्यासक्रमात विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, उत्पनाचा दाखला, छायाचित्र, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्रासह जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज आदी कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर (दूरध्वनी क्रमांक 02462-220088) मो. नं. 9421865146 नांदेड येथे मुदतीत प्रत्यक्ष अर्ज करता येतील, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

0000000

 नांदेड जिल्ह्यात 11 व्यक्ती कोरोना बाधित 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 152 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, उस्मानाबाद  1, धर्माबाद 1, हिंगोली 1 , देगलूर 1, किनवट 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे मुखेड 1, बिलोली 1 असे एकूण 11 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 989 एवढी झाली असून यातील 1 लाख 261 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 36 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 2  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 2 असे एकुण 4  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 14, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 18, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, अश्विनी हॉस्पिटली 3 असे एकुण 36 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 10 हजार 489
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 90 हजार 156
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 2 हजार 989
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 261
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.36 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-36
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.
0000

"नीट" परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 14 :- "नीट परीक्षा 2022" ही रविवार 17 जुलै 2022 रोजी सकाळी 9 ते 5 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण 42 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. 

परीक्षा केंद्राच्या परिसरात 17 जुलै  रोजी  9  वाजेपासून ते सांयकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतच्या सर्व झेरॉक्स मशीन  भ्रमणध्वनी व पेजर चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.

000000

 लेख 

अन्यथा ती दोन गावे वाहून गेली असती ! 

नांदेड जिल्ह्यातील तेलंगणाच्या सिमेवर असलेले शेवटचे गाव अप्पारावपेठ. गत तीन दिवसाच्या सलग पावसाने किनवट तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगेसह सर्वच लहान-मोठ्या नदी, नाल्याचे पाणी धोक्याच्या पातळीवर आलेले. विशेष म्हणजे माहूरच्या डोंगररांगा या संपूर्ण किनवट तालुक्यासह आदिलाबाद पर्यंत पोहचलेल्या आहेत. याच डोंगररांगावर किनवट तालुक्यातील सिमेवरचे गाव म्हणून अप्पारावपेठ ओळखले जाते. या गावाची दुसरी ओळख म्हणजे या गावाने आपल्या पंचक्रोशित जपून ठेवलेला निजामकालीन तलाव. हा तलाव गावाच्या माथ्यावर व पायथ्याशी गाव अशी येथील रचना आहे. हा तलाव पाझर तलावात मोडतो. अप्पारावपेठच्या जवळ मलकजाम हे आणखी एक अडीच हजार वस्तीचे गाव आहे. या दोन्ही गावासाठी हा तलाव म्हणजे आधार. 

गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे हा तलावही भरत आला होता. काल दिनांक 13 जुलै रोजी या तलावातून पाणी लिक होत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. ग्रामपंचायतीने महसूल विभाग व पंचायत समितीशी तात्काळ संपर्क साधून हकीकत कळविली. प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले. एक तर पावसामुळे सर्व नदी, नाले तुडुंब भरून वाहत असल्याने मोठी वाहने गावात नेणे शक्य नव्हते. यंत्र सामुग्री असलेली वाहने त्या तलावाच्या काठापर्यंत पोहचविणेही शक्य नव्हते. 

हे लिकेच वेळेच्या आत थांबवणे हाच सर्वात मोठा यावर उपाय असल्याचे किनवटचे उपविभागीय अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी ओळखले. तहसिलदार मृणाल जाधव, जलसंपदा विभाग, तलाठी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, ग्रामपंचायत यांच्याशी त्यांनी तात्काळ संपर्क साधून लोकसहभागातून हे काम पूर्ण करण्याचे निश्चित केले. जलसंपदा विभागाकडून याबाबत तांत्रिक शहानिशा करून घेतली. गावकऱ्यांना आवाहन केले. काही गावकरी आपल्या श्रमदानासह अगोदरच तत्पर झालेले होते. 

अभियांत्रिकी स्वरूपातील माहिती आल्यानंतर ही गळती तात्पुरत्या स्वरुपात थांबविण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लहान मोठी दगडे, माती, माती वाहून जाऊ नये म्हणून त्याला रिकाम्या सिमेंटच्या पोत्यात भरून ती पोती ज्या ठिकाणातून पाणी वाहत होते त्या ठिकाणावर लाऊन मोठी संरक्षक तटबंदी तयार केली. गावकरी सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत याठिकाणी काम करत होते. अखेर ती गळती काही प्रमाणात थांबवून पुढे उद्भवू पाहणाऱ्या मोठ्या नुकसानीपासून गावाला आणि गावातील ग्रामस्थांना वाचविण्यात यश मिळविले. 

लोकांच्या मनामध्ये आपल्या गावातील नैसर्गिक संसाधनाच्या जपवणुकी विषयी असलेली आस्था जागृत झाल्यामुळे हे मोठे कार्य निर्माण होऊ शकले अशी निर्मळ भावना उपविभागीय अधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी व्यक्त केली. जी गावे लोकसहभागासाठी दक्ष असतात त्या गावात कोणताही प्रश्न मोठे स्वरुप धारण करण्या अगोदर चुटकीसरशी मार्गी लागू शकतो याचा आदर्श मापदंड आप्पारावपेठच्या नागरिकांनी घालून दिला आहे. 

विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड  

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...