Thursday, February 3, 2022

 इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत : बदल   

नांदेड (जिमाका) दि. 3 :- महाराष्ट्र  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा दिनांक 4 ते 30 मार्च 2022 या कालावधीत घेण्यात येणार आहे. यानुसार परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावी परीक्षेतील अर्धमागधी (16) या विषयासह अन्य विषयांची परीक्षा 7 मार्च रोजी दुपारी 3 ते 6.30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. याविषयापैकी फक्त अर्धमागधी (16) या विषयाच्या वेळापत्रकामध्ये अशंत: बदल करण्यात आला आहे. 

यापूर्वी अर्धमागधी (16) या विषयासाठी वेळापत्रकामध्ये निश्चित केलेला तपशिल पुढील प्रमाणे आहे. सोमवार दिनांक 7 मार्च 2022 रोजी दुपारचे सत्र  3 ते 6.30 वाजेपर्यंत विषय सांकेताक  अर्धमागधी (16) या विषयासाठी सुधारित तपशिल मंगळवार 8 मार्च 2022 दुपारी 3  ते 6.30 वाजेपर्यंत विषय साकेतांक अर्धमागधी (16) आहे. 

इयत्ता 12 वी लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील उपरोक्त अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळविले आहे.

000000

 नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत

शेतकऱ्यांना 50 कोटी अनुदान वितरीत 

नांदेड (जिमाका) दि. 3 :  लहान शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाला जुळवुन घेण्यास सक्षम करणे व शेती व्‍यवसाय किफायतशीर करण्‍यासाठी शासनातर्फे विविध योजनाद्वारे प्रयत्न केले जात आहेत. यात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्‍प जिल्ह्यात राबविण्‍यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांना विविध योजनांच्यामाध्यमातून 50 कोटी रुपये डिबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून नांदेड जिल्ह्यात लक्षणीय काम झाल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कृषि विभागामार्फत 75 कोटी अनुदानाचा टप्पाही पार पाडला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

नांदेड जिल्ह्यातील 12 हजार 750 शेतकऱ्यांना फळबाग लागवड, ठिबक, तुषार, रेशीम लागवड, शेडनेट इत्यादी कामापोटी 45 कोटी वितरीत केले आहेत. तसेच शेतकरी गट व कंपनी यांना कृषि औजारे बँक आणि प्रक्रिया उद्योगासाठी  3.50 कोटी व जलसंधारण कामासाठी 1.50 कोटी वितरीत केले आहेत. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत नांदेड जिल्‍ह्यात दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील 314 गावांपैकी 292 गावाच्या एकुण 45567.88 लक्ष रुपये रकमेच्या गाव विकास आराखड्यांना 14 जानेवारी 2022 रोजीच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये नांदेड उपविभाग 8022.06 लक्ष रुपये, देगलुर उपविभाग 22388.82 लक्ष रुपये व किनवट उपविभागातील 15157 लक्ष रुपये रक्कमेच्या आराखड्यांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये मृद व जलसंधारण कामे 5897.88  लक्ष रुपये, वैयक्तिक लाभाच्या बाबी 11230.73 लक्ष रुपये व शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी 2687.22 लक्ष रुपये रक्कमेच्या कामांचा समावेश आहे. प्रकल्प गावात मृद व जलसंधारणाची माथा ते पायथा पर्यंतची कामे केली जातात, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी दिली. 

शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या बाबीमध्ये ठिबक-तुषार सिंचन, फळबाग लागवड, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, शेत तळ्यातील मत्स्य पालन, बांबू लागवड, शेडनेट, पॉली हाऊस, बांधावर वृक्ष लागवड इत्यादी बाबींसाठी 60 ते 80 टक्क्यापर्यंत अनुदान देय आहे. समुदाय आधारित घटकात प्रकल्पासाठी निवड झालेल्या गावातील कोणत्याही यंत्रणेकडे नोंदणी झालेले शेतकरी /भूमिहीन व्यक्तीचे इच्छुक गट, जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी उत्पादक संघ यांना प्रामुख्याने शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, गोदाम, कृषि औजारे बँक या बाबींचा लाभ घेता येईल. आणि प्रक्रियाप्रकल्पासाठी आवश्यक बांधकाम खर्चाच्या 60 टक्के अनुदान देय आहे.

00000


 नांदेड जिल्ह्यात 205 व्यक्ती कोरोना बाधित

तर 320 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 595 अहवालापैकी 205अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 176 तर अँटिजेन तपासणीद्वारे 29 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 56 एवढी झाली असून यातील 97 हजार 315 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 64 रुग्ण उपचार घेत असून यात 8 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे बुधवार 2 फेब्रुवारी रोजी मुखेड तालुक्यातील आबादीनगर येथील 42 वर्षाच्या एका पुरुषाचा, परभणी जिल्ह्यातील पालम येथील 78 वर्षाच्या एका पुरुषाचा तर खाजगी रुग्णालयात 3 फेब्रुवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 677 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 90, देगलूर 10, लोहा 7, नायगाव 1, लातूर 1, परभणी 2, नांदेड ग्रामीण 4, हदगाव 4, माहूर 23, उमरी 4, बुलढाणा 2, बिहार 2, अर्धापूर 2, कंधार 1, मुदखेड 3, अकोला 1, हिंगोली 5, तेलंगना 1, बिलोली 4, किनवट 4, मुखेड 3, औरंगाबाद 1, नागपूर 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा  14, किनवट 3, अर्धापूर 1, उमरी 3, देगलूर 1, बिलोली 3, धर्माबाद 1, मुखेड 3 असे एकुण 205 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 217, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, खाजगी रुग्णालय 20, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 80 असे एकुण 320 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 29, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, देगलूर कोविड रुग्णालय 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 121, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 872, खाजगी रुग्णालय 34 असे एकुण 2 हजार 64 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 49 हजार 997

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 31 हजार 794

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 56

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 97 हजार 315

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 677

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.35 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-05

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-76

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 64

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-8.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...