हिवताप आजाराची नागरिकांनी काळजी
घ्यावी
आरोग्य विभागाचे आवाहन; आज जागतिक हिवताप दिन
नांदेड दि. 24 :- जागतीक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषीत केला आहे. या पार्श्वभुमीवर
जिल्हयातीन सर्व आरोग्यसंस्थेत मंगळवार 25 एप्रिल 2017 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. भविष्यात या आजाराचा
उद्रेक होवू नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्यादृष्टिने
नागरिकांनी जागरुक रहावे व या आजाराची लक्षणे आढळुन आल्यास वेळीच नजीकच्या प्राथमिक
आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले
आहे.
जिल्हयात डेंग्यु, हिवताप आजार वाढणार नाहीत
यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा परिषदेचे जिल्हा
आरोग्य अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. हिवताप आजारात रुग्णास थंडी वाजून ताप
येतो व हुडहुडी भरते. हा ताप एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड येतो. अंग दुखणे,
डोके दुखणे तसेच रुग्णास पांघरुण घ्यावे वाटते व नंतर घाम येवून ताप
कमी होतो आणि रुग्णास थकवा येतो. यासाठी हिवतापाचे लवकर निदान व त्वरीत उपचार करुन
घ्यावेत. उपचार न केल्यास वारंवार ताप येवून रुग्ण बेशुध्द होवू शकतो. डेंग्युच्या
लक्षणात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोकेदुखी, सांधेदुखी,
स्नायु दुखी होवून उलटया होणे, डोळयाच्या आतील
दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड
यातुन रक्त स्त्राव होणे, अशक्तपणा, भुख
मंदावणे, तोंडाला कोरड पडणे ही लक्षणे दिसून येतात.
हिवताप आजारावर मात करण्यासाठी पुढील साधे व
सोपे प्रतिबंधात्मक उपाययोजना जनतेने राबविणे गरजेचे आहे. घराभोवताली पाणी साचू
देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून
एक दिवस निश्चित करुन रिकामे करावेत या साठयातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरडा
करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत.
आंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत. त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी
घ्यावी. झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावे. पांघरुन घेवून झोपावे. संध्याकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना
चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास
आपले घर संपूर्ण फवारुन घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवू किंवा रंगरंगोटी
करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स,
कप, मडकी इत्यादीची वेळीच विल्हेवाट लावावी. संडासच्या
पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवडयाला
नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.
या सर्व रोगाची तपासणी व उपचार जिल्ह्यातील
प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. वरील दक्षता
प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी
व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवील त्यासाठी किटकजन्य
आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून
करण्यात आले आहे.
00000