Wednesday, July 12, 2023

गुरुवारी आयटीआय शिकाऊ उमेदवारासाठी भरती मेळाव्याचे आयोजन

गुरुवारी आयटीआय शिकाऊ उमेदवारासाठी भरती मेळाव्याचे आयोजन नांदेड (जिमाका) दि. 12 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने गुरुवार 13 जुलै 2023 रोजी आयटीआय उमेदवारांकरिता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयटीआय उत्तीर्ण व चालू वर्षात शिकत असलेल्या उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 13 जुलै रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन अंशकालीन प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी यांनी केले आहे. या मेळाव्यात पुढील व्यवसायासाठी प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. टर्नर 30, ग्राइंडर 20, मशिनीस्ट 20, वेल्डर 80, फिटर 30, एमएमव्ही 20 अशा एकूण 200 उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. 0000

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने खाजगी बस तपासणी मोहिमेत 92 वाहनांवर कारवाई

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने खाजगी बस तपासणी मोहिमेत 92 वाहनांवर कारवाई § खाजगी बस तपासणी मोहिमेत 2 लाख 5 हजार रुपयांचा दंड वसूल नांदेड (जिमाका) दि. 12 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने खाजगी बस तपासणी मोहिम सुरु आहे. या तपासणी दरम्यान आतापर्यत 92 वाहनांवर कारवाई करुन 2 लाख 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरी सर्व खासगी बस चालक/मालक यांनी मोटार वाहन कायदा 1988 व 2019 तसेच नियमानुसार आपल्या बसेसची सर्व अटी व शर्ती नुसार पूर्तता करुन प्रवासी वाहतुक करावी. अटी व शर्तीचा भंग करणाऱ्या बसेसवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, यांची नोंद खासगी बस चालक/मालक यांनी घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे. सर्व खाजगीबस चालक / मालक यांनी त्यांच्या वाहनाचे सर्व वैध कागदपत्रे वाहनासोबत ठेवावीत. तसेच वाहन तांत्रिकदृष्टया दोषमुक्त व सुस्थितीत ठेवावे. वाहनांचे कागदपत्र वैध नसल्यास त्यांनी सर्व कागदपत्रे वैध करुन घ्यावीत. या मोहिमेत विना परवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, प्रवासी बसमधून अवैधरित्या माल वाहतूक, रिफलेक्टर, इंडीकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादी बाबींची तपासणी वाहनामध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक, जादा भाडे आकारणे, अग्निक्षमन यंत्रणा कार्यरत असणे इ. बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी मोहिमेत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच खाजगी बस मालकांनी दिलेल्या वेगमर्यादेत वाहन चालविण्यास चालकांना निर्देश द्यावेत. तसेच बस चालकांनी नशा करुन वाहन चालवू नये, अन्यथा मोटार कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच त्या चालकास पुढे जाऊ दिले जाणार नाही, पर्यायी चालकांची व्यवस्था बस मालकांनी करावी, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे. 0000

येसगी व शेवाळा येथे स्वस्त दरात वाळू डेपो सुरु ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे करता येईल खरेदी - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 येसगी व शेवाळा येथे स्वस्त दरात वाळू डेपो सुरु

ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे करता येईल खरेदी

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. या नवीन वाळू धोरणानुसार बिलोली तालुक्यातील मौ. येसगी व देगलूर तालुक्यातील शेवाळा येथे वाळू डेपो तयार करण्यात आला आहे. या डेपोवरुन नागरिकांना प्रती ब्रास 600 रुपये अधिक इतर कर 77 रुपये याप्रमाणे डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळूच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरुन वाळू खरेदी करता येणार आहेनागरिकांनी https://mahakhanij.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जाची प्रक्रीया पूर्ण करुन स्वस्त वाळू खरेदीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 19 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयान्वये नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौ. येसगी व देगलूर तालुक्यातील शेवाळा येथे वाळू डेपो तयार करण्यात आला आहे. नुकतेच या वाळू डेपोतून घरकुलाच्या लाभार्थ्यांना विनामुल्य 5 ब्रास वाळू देण्यासाठी तांत्रिक प्रक्रीया पूर्ण करुन प्रायोगिक तत्वावर वाळू वाटप करण्यात आली.

वाळू धोरण -2023 नुसार बुकींग करण्यासाठी प्रथम इंटरनेट ब्राऊजरवर https://mahakhanij.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर वरील बाजूस सॅन्ड बुकींग (SAND BOOKING) असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. सॅन्ड बुकींगवर क्लिक केल्यानंतर संकेतस्थळ नवीन विंडोमध्ये उघडेल. त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर (CONSUMER SIGN UP) कन्सुमर साइन अप वर क्लिक करुन आवश्यक ती माहिती भरावी. जसे नाव, मोबाईल क्रमांक व स्वत:चा  ई-मेल आयडी इ. माहिती भरावी. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगइन मध्ये युजर नेम म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळी दिलेला मोबाईल क्रमांक व मोबाईलमध्ये प्राप्त झालेला पासवर्ड (OTP) टाकून लॉग इन करावे. त्यानंतर प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनमध्ये आपले घर, इमारत, घरकुल इत्यादी माहिती भरुन प्रोजेक्ट रजिस्टर करावा. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेल्या वाळूची बुकींग करावी. आपल्या जवळील अथवा संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा स्टॉकयार्ड (STOCKYARD) निवडावा. शेवटी ऑनलाइन पावतीने बुकींग केलेल्या वाळूचे पेमेंट करुन त्याची प्रत प्राप्त करुन घ्यावी. संबंधित स्टॉकयार्ड (STOCKYARD) वर जावून पैसे भरल्याची प्रत जमा करुन वाळू प्राप्त करुन घ्यावी. याप्रमाणे ऑनलाईन अर्जाची प्रक्रीया पूर्ण करुन वाळू प्राप्त करुन घ्यावी असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 

पीक विम्यासाठी जादा पैसे घेतल्यास आपले सरकार सेवा केंद्राचा परवाना होणार रद्द

 

पीक विम्यासाठी जादा पैसे घेतल्यास

आपले सरकार सेवा केंद्राचा परवाना होणार रद्द

नांदेड (जिमाका) दि. 12 :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केवळ 1 रुपया भरुन पीक विम्यासाठी नोंदणी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या पीक विमा हिस्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरली जात आहे. जिल्ह्यातील सामुहिक सेवा केंद्र चालकांनी पीक विमा नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून केवळ 1 रुपया एवढेच शुल्क घेतले पाहिजे. पीक विमा नोंदणी करताना कोणताही सामुहिक सेवा केंद्र चालक गैरप्रकार करीत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा त्यांच्या विरुध्द तक्रार प्राप्त झाल्यास त्याच्या केंद्राचा परवाना रद्द करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामातील तीन वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने केवळ 1 रुपया भरुन पीएमएफबीवाय पोर्टलवर https://pmfby.gov.in शेतकऱ्यांना स्वत: पीक विमा भरता येईल. तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्राच्या माध्यमातून पीक विमा भरणा केला तरी 1 रुपया व्यतिरिक्त अन्य कोणतेही शुल्क देवू नये.  सामुहिक सेवा केंद्र (सीएससी) धारकांना विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज प्रक्रीया शुल्क म्हणून 40 रुपये रक्कम देण्यात येते. जिल्ह्यातील काही सामुहिक सेवा केंद्रचालक शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. सामुहिक केंद्र चालकांनी अतिरिक्त पैशाची मागणी करणे, विनाकारण विमा नोंदणी करण्यास टाळाटाळ करणे असे गैरप्रकार केल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी,  तहसिलदार किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात आपली तक्रार नोंदवावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000

 

विशेष लेख

 विशेष लेख                                                            दि. 11 जुलै 2023

                                                                       

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अशी आहे प्रक्रिया !

लोक कल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याया अंतर्गत विविध योजनांना मागील वर्षभरात लोकाभिमूख स्वरूप दिले आहे. यात बहुजन मागासवर्ग व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दहावी व बारावी नंतर विविध प्रमाणपत्राची आवश्यकता भासते. यात आरक्षणातर्गत राखीव प्रवर्गात प्रवेश घ्यावयाचा झाल्यास जात वैधता प्रमाणपत्र हे एक महत्वाचा दस्ताऐवज आहे. या प्रमाणपत्रा अभावी कोणत्याही मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्हा पातळीवर विशेष मोहिम हाती घेण्यात आली. प्रत्येक माध्यमिक शाळाद्वारे जात वैधता प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे आवश्यक असतात त्याबाबतही जागृती करण्यात आली. सर्व सामान्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी जी प्रक्रिया अवलंबण्यात आली आहे त्याबाबत लागणारी माहिती महत्वाची आहे. ही प्रक्रीया आपल्याला पुढीलप्रमाणे समजून घेता येईल.  

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने सन 2023-24 या वर्षासाठी राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वच्या निमित्ताने माध्यमिक शालांत परीक्षा पास झालेल्या इ. 11 व 12 वीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी 26 जून ते 26 जुलै 2023 या कालावधीत विशेष मोहिम शिबिर राबविण्यात येत आहे. या कालावधीत विद्यार्थी व पालकांचे तालुकास्तरावर महाविद्यालयाच्या ठिकाणी विशेष मार्गदर्शन करण्यात येत आहे. जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रक्रिया काय आहे हे आपण सर्वजण समजून घेऊया

जात वैधता प्रमाणपत्राची गरज : 

जे विद्यार्थी 12 वी पास झाल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा असेल तर अशा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता भासते. बारावी विज्ञान शाखतील अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधोपचार, स्थापत्य, पशुवैद्यकिय, त्स्य, विधी शाखा, बॅचलर ऑफ फाईन आर्ट अशा प्रकारे बारावीच्या आधारे ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता लागते.

जात प्रमाणपत्र कुठे काढावे : 

राखीव प्रवर्गात असणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्याकडे जातीचे प्रमाणपत्र वर्ग दहावी पूर्वीच काढलेले असते. परंतु त्याने जातीचे प्रमाणपत्र काढण्यापूर्वी काही गोष्टीची माहिती घेऊनच जातीचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अर्जदाराच्या वाडवडीलांचे कायमस्वरूपी वास्तव्य एका निश्चित तारखेस ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी काढणे आवश्यक आहे. उदा.अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्जदार असल्यास 10 ऑगष्ट 1950 पूर्वी अर्जदाराचे पूर्वजवाडवडील ज्या ठिकाणी वास्तव्य होते त्याच ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाकरीता 13 ऑक्टोबर 1967, विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी 21 नोव्हेबर 1961 पूर्वी ज्या ठिकाणी वास्तव्य होते त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. वरीलप्रमाणे अर्जदाराच्या वाडवडीलांचे वास्तव्य नसतांना सक्षम प्राधिकाऱ्यांने (उपविभागीय अधिकारी) जातीचे प्रमाणपत्र दिल्यास ते जात प्रमाणपत्र जात पडताळणी समिती मार्फत अवैध ठरविले जाते. एखाद्या अर्जदाराने वाडवडील, शिक्षण, रोजगार निमित्त एखाद्या भागात मानीव दिनांकानंतर वास्तव्यास गेले असल्यास त्यांनी त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढू नये. त्यांचे मुळ वास्तव्याच्या ठिकाणी प्रमाणपत्र काढावे तेच प्रमाणपत्र ग्राह्य राहील याची दक्षता घ्यावी.

जातीचे प्रमाणपत्र अचूक असावे : 

आपण जे जातीचे प्रमाणपत्र काढतो ते पुन्हा तपासून पहावे. स्वत:चे जातीचे प्रमाणपत्र शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जे  नाव आहे अथवा वर्ग 10 वी च्या बोर्ड प्रमाणपत्रावरील शब्दाप्रमाणेच शब्दरचना असाव. तसेच प्रमाणपत्रावर रेव्हेन्यू क्रमांक नमुद असावा, प्रमाणपत्र निर्गमित दिनांक, जातीचे स्पेलींग व जातीचा प्रवर्ग अचूक आहे हे अर्जदारानेच पाहून खात्री करुन घ्याव. वरील बाबी अर्जदाराच्या प्रमाणपत्रामध्ये चुकीच्या असल्यास ज्या कार्यालयाकडून जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. त्या कार्यालयाकडून जातीचे प्रमाणपत्र दुरुस्ती करुन घ्यावे व त्याची पडताळणी करावी.

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन आहे :

जात प्रमाणपत्र पडताळणी साठी करावयाचा अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in/index.php या संकेतस्थळावर करावा. अर्ज करतांना अर्जदाराला मुळ कागदपत्रे अपलोड करावयाची असतात. सर्वप्रथम अर्जदाराने मुळ जातीचे प्रमाणपत्र, अर्जदाराचा प्राथमिक शालेय प्रवेश निर्गम उतारा, वडीलांचा प्राथमिक शालेय प्रवेश निर्गम उतारा अथवा वडील अशिक्षित असल्यास शपथपत्र, चुलते, आत्या, आजोबा, पंजोबा, चुलत आजोबा शिक्षीत असल्यास त्यांचे प्राथमिक शालेय प्रवेश निर्गम उतारा अथवा महसुल विषयक पुरावे उपलब्ध असल्यास अधिकार अभिलेख पंजी, पी-, पी-, बंदोबस्त मिसळ, जुने खरेदी-विक्रीपत्र, मेंटेनन्स खासरा, जुनी कर आकारणी, . या व्यतिरिक्त असा कुठलाही पुरावा जो अर्जदाराचे प्रवर्गानुसार मानीव दिनांकाच्या कालावधीत असून त्यावर वास्तव्याचे गाव व जात नमुद आहे असा पुरावा अपलोड करावा व प्रस्तावासोबत संलग्न करावा.

शपथपत्र 

जात प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रस्तावासोबत दोन शपथपत्र जोडणे आवश्यक आहे.  शपथपत्र कुठल्याही रकमेच्या स्टॅम्प पेपरवर आवश्यक नाही. साध्या कोऱ्या कागदावर लिहिलेले व नोंदणीकृत असावे. नमुना १७ व नियम १४ अन्वये कागदपत्रे खरे असल्याबाबत शपथपत्र असते. तसेच यामध्ये कागदपत्रे बनावट असल्यास शिक्षेस पात्र राहिल अशा आशयाचे शपथपत्र असते. तसेच यामध्ये कागदपत्रे बनावट असल्यास शिक्षेस पात्र राहिल अशा आशयाचे शपथपत्र असते. दुसरे शपथपत्र नमुना ३ नियम ४ नुसार कुटुंबाची वंशावळ असते. वंशावळी मध्ये कागदपत्रे संलग्न करतो त्या सर्वांचा वंशावळीमध्ये उल्लेख असावा.

सर्व मूळ कागदपत्रे व मूळ शपथपत्रे ऑनलाईन अपलोड करावी. यासोबत ज्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे त्या प्राचार्याच्या स्टॅम्प व स्वाक्षरीचे फॉर्म नं.15 () सुध्दा अपलोड करावे. सर्व कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन भरलेल अर्जाची प्रिंट काढावी व त्यासोबत अपलोड केलेली सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती स्वत: साक्षांकित केलेली असावी. मूळ शपथपत्रासह अर्ज कार्यालयात जमा करावा. त्यावर समिती 15 ते 30 दिवसांच्या आत कार्यवाही करुन निर्णय देते. आक्षेप असल्यास ऑनलाईन कळविल्या जातात. त्या आक्षेपांची पूर्तता करावी.

दक्षता 

अर्ज भरताना जात प्रमाणपत्रावरील माहिती अचुक भरावी. खरे कागदपत्रे अपलोड करावे व संलग्न करावे. सबंध नसलेली कागदपत्रे जोडू नये. तसेच खोटे व बनावट कागदपत्रे सादर करु नये. मानीव दिनांकाचे पुरावे नसल्यास दक्षता पथकामार्फत चौकशी करुन निर्णय दिला जातो. अशा प्रकारे खरा मागासवर्गीय अर्जदार योग्य कागदपत्रे असल्यास लाभापासून वंचित राहणार नाही याचा प्रयत्न समिती करते. तसेच खोटे व बनावट कागदपत्रे सलग्न केल्यास शिक्षेची तरतूद आहे.अर्जदारांना ऑनलाइन जात प्रमाणपत्र पडताळणी प्रणाली बाबत काही शंका असतील तर मुक्त शुल्क क्रमांक 18001208040 किंवा ईमेल आयडी cvcnanded@gmail.com या वर संपर्क साधता येइल.

संशोधन अधिकारी                                         

तथा सदस्य सचिव

बापु दासरी

 

शब्दांकन

अलका पाटील

उपसंपादक

जिल्हा माहिती कार्यालय

नांदेड

देगलूर येथील अपंग प्रशिक्षण केंद्रात 31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 देगलूर येथील अपंग प्रशिक्षण केंद्रात

31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत म.रा. व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंगमुकबधीरमतिमंदमुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. या प्रशिक्षण केंद्रात शिवण कर्तनकलाकॉम्प्युटर अकॉऊटींग व ऑफिस ऑटोमेशन व वेल्डरकम फॅब्रिकेटर इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशितांची निवासची व जेवणाची विनामुल्य सोय केलेली आहे.

 

इच्छूक अपंगमुकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी 31 जुलै 2023 पर्यंत प्राचार्य तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर येथे पत्रव्यवहार करावा किंवा समक्ष भेटावे. अधिक माहितीसाठी मो. 996090036994032071007378641136,9503078767 वर संपर्क साधावाअसे आवाहन कर्मशाळा अधिक्षक तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...