Wednesday, July 12, 2023

पीक विम्यासाठी जादा पैसे घेतल्यास आपले सरकार सेवा केंद्राचा परवाना होणार रद्द

 

पीक विम्यासाठी जादा पैसे घेतल्यास

आपले सरकार सेवा केंद्राचा परवाना होणार रद्द

नांदेड (जिमाका) दि. 12 :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केवळ 1 रुपया भरुन पीक विम्यासाठी नोंदणी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या पीक विमा हिस्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरली जात आहे. जिल्ह्यातील सामुहिक सेवा केंद्र चालकांनी पीक विमा नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून केवळ 1 रुपया एवढेच शुल्क घेतले पाहिजे. पीक विमा नोंदणी करताना कोणताही सामुहिक सेवा केंद्र चालक गैरप्रकार करीत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा त्यांच्या विरुध्द तक्रार प्राप्त झाल्यास त्याच्या केंद्राचा परवाना रद्द करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामातील तीन वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने केवळ 1 रुपया भरुन पीएमएफबीवाय पोर्टलवर https://pmfby.gov.in शेतकऱ्यांना स्वत: पीक विमा भरता येईल. तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्राच्या माध्यमातून पीक विमा भरणा केला तरी 1 रुपया व्यतिरिक्त अन्य कोणतेही शुल्क देवू नये.  सामुहिक सेवा केंद्र (सीएससी) धारकांना विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज प्रक्रीया शुल्क म्हणून 40 रुपये रक्कम देण्यात येते. जिल्ह्यातील काही सामुहिक सेवा केंद्रचालक शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. सामुहिक केंद्र चालकांनी अतिरिक्त पैशाची मागणी करणे, विनाकारण विमा नोंदणी करण्यास टाळाटाळ करणे असे गैरप्रकार केल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी,  तहसिलदार किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात आपली तक्रार नोंदवावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...