Wednesday, July 12, 2023

येसगी व शेवाळा येथे स्वस्त दरात वाळू डेपो सुरु ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे करता येईल खरेदी - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 येसगी व शेवाळा येथे स्वस्त दरात वाळू डेपो सुरु

ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे करता येईल खरेदी

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. या नवीन वाळू धोरणानुसार बिलोली तालुक्यातील मौ. येसगी व देगलूर तालुक्यातील शेवाळा येथे वाळू डेपो तयार करण्यात आला आहे. या डेपोवरुन नागरिकांना प्रती ब्रास 600 रुपये अधिक इतर कर 77 रुपये याप्रमाणे डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळूच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरुन वाळू खरेदी करता येणार आहेनागरिकांनी https://mahakhanij.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जाची प्रक्रीया पूर्ण करुन स्वस्त वाळू खरेदीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 19 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयान्वये नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौ. येसगी व देगलूर तालुक्यातील शेवाळा येथे वाळू डेपो तयार करण्यात आला आहे. नुकतेच या वाळू डेपोतून घरकुलाच्या लाभार्थ्यांना विनामुल्य 5 ब्रास वाळू देण्यासाठी तांत्रिक प्रक्रीया पूर्ण करुन प्रायोगिक तत्वावर वाळू वाटप करण्यात आली.

वाळू धोरण -2023 नुसार बुकींग करण्यासाठी प्रथम इंटरनेट ब्राऊजरवर https://mahakhanij.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर वरील बाजूस सॅन्ड बुकींग (SAND BOOKING) असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. सॅन्ड बुकींगवर क्लिक केल्यानंतर संकेतस्थळ नवीन विंडोमध्ये उघडेल. त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर (CONSUMER SIGN UP) कन्सुमर साइन अप वर क्लिक करुन आवश्यक ती माहिती भरावी. जसे नाव, मोबाईल क्रमांक व स्वत:चा  ई-मेल आयडी इ. माहिती भरावी. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगइन मध्ये युजर नेम म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळी दिलेला मोबाईल क्रमांक व मोबाईलमध्ये प्राप्त झालेला पासवर्ड (OTP) टाकून लॉग इन करावे. त्यानंतर प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनमध्ये आपले घर, इमारत, घरकुल इत्यादी माहिती भरुन प्रोजेक्ट रजिस्टर करावा. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेल्या वाळूची बुकींग करावी. आपल्या जवळील अथवा संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा स्टॉकयार्ड (STOCKYARD) निवडावा. शेवटी ऑनलाइन पावतीने बुकींग केलेल्या वाळूचे पेमेंट करुन त्याची प्रत प्राप्त करुन घ्यावी. संबंधित स्टॉकयार्ड (STOCKYARD) वर जावून पैसे भरल्याची प्रत जमा करुन वाळू प्राप्त करुन घ्यावी. याप्रमाणे ऑनलाईन अर्जाची प्रक्रीया पूर्ण करुन वाळू प्राप्त करुन घ्यावी असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...