Friday, May 17, 2024

 वृत्त क्र. 432 

नविन पाच इंटरसेप्टर वाहनांद्वारे रस्ता सुरक्षा विषयी प्रबोधन

 

·     रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मदत

 

नांदेड दि. 17 :- नांदेड जिल्ह्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नविन 5 इंटरसेप्टर वाहन दाखल झाली आहेत. यामुळे इंटरसेप्टर वाहनांची संख्या आता एकुण 7 झाली आहे. या वाहनामध्ये वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर व हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी स्पीडगन, दारूपिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ अॅनलायझर, ब्लॅक फिल्म बसविलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टिंट मीटर इत्यादी अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. याद्वारे प्रत्येक तालुक्यात ही कारवाई करण्यात येणार आहे.

 

जिल्ह्यातील नागरिकांनी वाहन चालवितांना रस्ता वाहतुकीच्या नियमांचे व मोटार वाहन कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे. आपले वाहन सुस्थितीत ठेवावे तसेच वाहनांचे कागदपत्रे जसे विमा प्रमाणपत्रे, पीयुसी, योग्यता प्रमाणपत्र, कर पावती इत्यादी अद्यावत ठेवावीत.

 

नांदेड जिल्हयात दळणवळणचा विचार करता रस्त्याद्वारे होणाऱ्या वाहतुकीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात दरवर्षी किमान 350 ते 400 नागरिक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. यामध्ये प्रामुख्याने वाहतूक नियमांचे पालन न करणे, हेल्मेट व सिटबेल्टचा वापर न करणे, दारुपिऊन वाहन चालविणे, लेनची शीस्त न पाळणे, वेगमर्यादचे उल्लंघन करणे आदी कारणे दिसून येतात.

 

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक-चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व वाहनधारक-चालकांनी याची नोंद घेऊन परिवहन विभागास सहकार्य करावेअसे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

0000

वृत्त क्र. 431

लालवंडी येथे विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर

·     लालवंडी गावात 3 आरोग्य पथके तैनात

·    50 जणांना उपचार करुन घरी सोडले तर 61 रुग्णांवर उपचार सुरु

नांदेड दि. 17 :- नायगाव तालुक्यातील मौजे लालवंडी येथे 15 मे रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजेदरम्यान दिगंबर टोपेवाड यांच्या शेतात महाप्रसाद खाल्यानंतर जवळपास 200 पैकी 111 भाविकांना 16 मे रोजीच्या पहाटे 3 वाजेच्या दरम्यान अन्न विषबाधा झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळले. या विषबाधेमुळे सद्यस्थितीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे 48 रुग्ण उपचार घेत असून 50 रुग्णांना उपचार करुन घरी सोडले आहे. तसेच जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे संदर्भित करण्यात आलेल्या 13 रुग्णांवर उपचार सुरु असून सर्व रुग्णांची प्रकृती ही स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

याकामी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनवैद्यकीय महाविद्यालयसार्वजनिक आरोग्य विभाग हे समन्वयाने व तत्परतेने कार्यरत आहेत. महाप्रसादामध्ये शेतात तयार करण्यात आलेल्या भातवरण खीर हे अन्न पदार्थासमवेत वेगवेगळ्या 8 कुटुंबाने तयार करून एकत्रित करण्यात आलेले अंबील हे पदार्थ सेवन केल्याचे समजते. महाप्रसादात हे अन्नपदार्थ खाल्याने रुग्णांना मळमळउलटीसंडास व पोटदुखी अशी लक्षणे दिसून आली. सुरुवातीस पहाटे 3.30 पासून कालपर्यंत एकूण 111 रुग्ण ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी 29 रुग्णांना स्थानिक पातळीवर औषधोपचार करण्यात आलेला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. 

ग्रामीण रुग्णालय नायगाव येथून एकूण 13 रुग्ण हे श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे औषधोपचारासाठी संदर्भित करण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीमध्ये ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे 48 रुग्ण उपचार घेत असून 50 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे. सदर रुग्णांना नायगाव तालुक्याच्या मौजे लालवंडी या गावातून रुग्णालयात उपचारासाठी आणण्यासाठी टोल फ्री 108 क्रमांकाच्या 4 रुग्णवाहिका व इतर प्रवासी वाहतूक वाहनांचा वापर करण्यात आला. रुग्णांच्या औषधोपचारासाठी मुबलक औषधींचा साठा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा रुग्णालय औषधी भांडारजिल्हा परिषद नांदेड औषधी भांडार येथून ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे तात्काळ औषधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच रुग्णांच्या पुढील तपासण्यासाठी अन्नपाणी आणि उलटीचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत या गावामध्ये 03 आरोग्य पथके हे औषधोपचारसर्वेक्षण यासाठी कार्यरत करण्यात आलेली आहेत. या बाबीची सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासनाकडून रॅपीड रिस्पॉन्स (Rapid response) पथक गठीत करण्यात आलेले आहे.

0000

वृत्त क्र. 430

 सारथी प्रणाली 18 मेपर्यंत बंद

नांदेड दि. 17 :- अनुज्ञप्ती (लायसन्स) व अनुज्ञप्ती विषयक सर्व कामकाजासाठी परिवहन विभागाच्या सारथी 4. 0 या प्रणालीद्वारे केले जाते. या प्रणालीवर अर्ज व शासकीय शुल्क भरण्याची कार्यवाही केली जाते. 

परंतु सद्या सारथी प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या सर्व्हरच्या देखभाल/दुरुस्तीचे काम राष्ट्रीय सूचना केंद्राद्वारे सुरु आहे. सदर दुरुस्तीचे कामकाज सुरु असल्यामुळे 18 मे 2024 च्या सकाळी 10 वाजेपर्यत सारथी प्रणाली बंद राहील, यांची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

0000 

वृत्त क्र. 429

शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा उत्कृष्ट व रास्त भावात

मिळण्यासाठी जिल्ह्यात 17 भरारी पथकांची नियुक्ती

नांदेड दि. 17 :- खरीप हंगाम लवकरच सुरु होत असुन, शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, खते व किटकनाशके मिळण्याकरीता विक्रेते व उत्पादक यांच्या नियमित तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हयात जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुकास्तरावर एक असे एकुण 17 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही निविष्ठा विक्रेत्यांनी गैरव्यवहार, साठेबाजी, ज्यादा दराने विक्री, बोगस खते बियाणे विक्री करु नये, असे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एस. बऱ्हाटे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करताना काही अडचणी येत असतील किंवा विक्रेत्यांकडुन अडवणुक होत असेल तर तात्काळ संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

खरीप हंगामामध्ये कृषिसेवा केंद्र चालक किंवा खाजगी एजंन्ट मार्फत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे खते / बियाणे व किटकनाशके विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी कृषि विभागाकडुन कृषि सेवा केंद्राची नियमित तपासणी करण्यात येते. सर्व निविष्ठांचे व्यवस्थीत वाटप व चांगल्या प्रतीच्या निविष्ठा शेतकऱ्यांना मिळतील, त्यांची निविष्ठासाठी अडवणुक होणार नाही यासाठी भरारी पथक काम करणार आहे.

त्याचबरोबर कृषि निविष्ठा विक्रीमध्ये गैरव्यवहार, साठेबाजी, ज्यादा दराने विक्री, असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास उत्पादक, विक्रेत्यांचे परवाने निलंबित किंवा रद्य करण्यात येतील. गैरव्यवहाराचे स्वरुप गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा बोगस बियाणे, खते व किटकनाशकांची विक्री केल्यास संबंधिताविरुध्द भरारी पथकामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर भरारी पथकामध्ये तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती, निरीक्षक वजन व मापे व मंडळ कृषि अधिकारी यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकात कृषि विकास अधिकारी, मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, वजन मापे निरीक्षक यांचा समावेश आहे.

मागील वर्षात कृषि विभागामार्फत नांदेड जिल्हयात बोगस खते विक्री केल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बियाण्यांची अनधिकृत विक्री केल्यामुळे एका बियाणे उत्पादकावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच अप्रमाणीत बियाण्यांची विक्री केल्यामुळे उत्पादक व कृषि सेवा केंद्र चालक यांच्या विरुध्द 68 न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. येणाऱ्या खरीप हंगामामध्ये मोहिम राबवुन कृषि निविष्ठा विक्रेते व उत्पादकांच्या तपासण्या करण्यात येणार असुन त्यामध्ये अनियमितता आढळुन आल्यास संबंधितांचा परवाना निलंबित अथवा रद्य करण्यात येईल असेही कृषि विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वृत्त क्र. 428

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या  पात्र परिसरात कलम 144  

नांदेड दि. 17 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 मे 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जून 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 मे 2024  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जून 2024 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...