Friday, May 17, 2024

वृत्त क्र. 431

लालवंडी येथे विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर

·     लालवंडी गावात 3 आरोग्य पथके तैनात

·    50 जणांना उपचार करुन घरी सोडले तर 61 रुग्णांवर उपचार सुरु

नांदेड दि. 17 :- नायगाव तालुक्यातील मौजे लालवंडी येथे 15 मे रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजेदरम्यान दिगंबर टोपेवाड यांच्या शेतात महाप्रसाद खाल्यानंतर जवळपास 200 पैकी 111 भाविकांना 16 मे रोजीच्या पहाटे 3 वाजेच्या दरम्यान अन्न विषबाधा झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळले. या विषबाधेमुळे सद्यस्थितीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे 48 रुग्ण उपचार घेत असून 50 रुग्णांना उपचार करुन घरी सोडले आहे. तसेच जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे संदर्भित करण्यात आलेल्या 13 रुग्णांवर उपचार सुरु असून सर्व रुग्णांची प्रकृती ही स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

याकामी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनवैद्यकीय महाविद्यालयसार्वजनिक आरोग्य विभाग हे समन्वयाने व तत्परतेने कार्यरत आहेत. महाप्रसादामध्ये शेतात तयार करण्यात आलेल्या भातवरण खीर हे अन्न पदार्थासमवेत वेगवेगळ्या 8 कुटुंबाने तयार करून एकत्रित करण्यात आलेले अंबील हे पदार्थ सेवन केल्याचे समजते. महाप्रसादात हे अन्नपदार्थ खाल्याने रुग्णांना मळमळउलटीसंडास व पोटदुखी अशी लक्षणे दिसून आली. सुरुवातीस पहाटे 3.30 पासून कालपर्यंत एकूण 111 रुग्ण ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी 29 रुग्णांना स्थानिक पातळीवर औषधोपचार करण्यात आलेला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. 

ग्रामीण रुग्णालय नायगाव येथून एकूण 13 रुग्ण हे श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे औषधोपचारासाठी संदर्भित करण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीमध्ये ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे 48 रुग्ण उपचार घेत असून 50 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे. सदर रुग्णांना नायगाव तालुक्याच्या मौजे लालवंडी या गावातून रुग्णालयात उपचारासाठी आणण्यासाठी टोल फ्री 108 क्रमांकाच्या 4 रुग्णवाहिका व इतर प्रवासी वाहतूक वाहनांचा वापर करण्यात आला. रुग्णांच्या औषधोपचारासाठी मुबलक औषधींचा साठा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा रुग्णालय औषधी भांडारजिल्हा परिषद नांदेड औषधी भांडार येथून ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे तात्काळ औषधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच रुग्णांच्या पुढील तपासण्यासाठी अन्नपाणी आणि उलटीचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत या गावामध्ये 03 आरोग्य पथके हे औषधोपचारसर्वेक्षण यासाठी कार्यरत करण्यात आलेली आहेत. या बाबीची सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासनाकडून रॅपीड रिस्पॉन्स (Rapid response) पथक गठीत करण्यात आलेले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...