Friday, May 17, 2024

वृत्त क्र. 429

शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा उत्कृष्ट व रास्त भावात

मिळण्यासाठी जिल्ह्यात 17 भरारी पथकांची नियुक्ती

नांदेड दि. 17 :- खरीप हंगाम लवकरच सुरु होत असुन, शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, खते व किटकनाशके मिळण्याकरीता विक्रेते व उत्पादक यांच्या नियमित तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हयात जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुकास्तरावर एक असे एकुण 17 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही निविष्ठा विक्रेत्यांनी गैरव्यवहार, साठेबाजी, ज्यादा दराने विक्री, बोगस खते बियाणे विक्री करु नये, असे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एस. बऱ्हाटे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करताना काही अडचणी येत असतील किंवा विक्रेत्यांकडुन अडवणुक होत असेल तर तात्काळ संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

खरीप हंगामामध्ये कृषिसेवा केंद्र चालक किंवा खाजगी एजंन्ट मार्फत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे खते / बियाणे व किटकनाशके विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी कृषि विभागाकडुन कृषि सेवा केंद्राची नियमित तपासणी करण्यात येते. सर्व निविष्ठांचे व्यवस्थीत वाटप व चांगल्या प्रतीच्या निविष्ठा शेतकऱ्यांना मिळतील, त्यांची निविष्ठासाठी अडवणुक होणार नाही यासाठी भरारी पथक काम करणार आहे.

त्याचबरोबर कृषि निविष्ठा विक्रीमध्ये गैरव्यवहार, साठेबाजी, ज्यादा दराने विक्री, असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास उत्पादक, विक्रेत्यांचे परवाने निलंबित किंवा रद्य करण्यात येतील. गैरव्यवहाराचे स्वरुप गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा बोगस बियाणे, खते व किटकनाशकांची विक्री केल्यास संबंधिताविरुध्द भरारी पथकामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर भरारी पथकामध्ये तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती, निरीक्षक वजन व मापे व मंडळ कृषि अधिकारी यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकात कृषि विकास अधिकारी, मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, वजन मापे निरीक्षक यांचा समावेश आहे.

मागील वर्षात कृषि विभागामार्फत नांदेड जिल्हयात बोगस खते विक्री केल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बियाण्यांची अनधिकृत विक्री केल्यामुळे एका बियाणे उत्पादकावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच अप्रमाणीत बियाण्यांची विक्री केल्यामुळे उत्पादक व कृषि सेवा केंद्र चालक यांच्या विरुध्द 68 न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. येणाऱ्या खरीप हंगामामध्ये मोहिम राबवुन कृषि निविष्ठा विक्रेते व उत्पादकांच्या तपासण्या करण्यात येणार असुन त्यामध्ये अनियमितता आढळुन आल्यास संबंधितांचा परवाना निलंबित अथवा रद्य करण्यात येईल असेही कृषि विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...