Wednesday, January 25, 2017

जवळगाव जि. प. हास्कुलच्या मिना वाघमारेस
राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेत पारितोषिक 
नांदेड, दि. 26 :- पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने पेट्रोलियम संवर्धन संशोधन क्षेत्रातील पेट्रोलियम कंझर्वेशन रिसर्च अशोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील निबंध स्पर्धेत हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या मिना गणेश वाघमारे हिने राष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेतील निबंधासाठीचे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
कु. मिना वाघमारे हिच्या यशासाठी आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. यावेळी पीसीआरएचे सहसंचालक योगेश जोशी, मिनाचे शिक्षक बाळासाहेब गुंड तसेच आई , वडील गणेश वाघमारे उपस्थित होते. मिना वाघमारे जवळगावच्या जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये इयत्ता 9 वीच्या वर्गात शिकते. तिने पर्यावरण आणि आरोग्य रक्षणासाठी इंधन वाचवा या विषयावर निबंध सादर केला होता. स्पर्धेत तिला राष्ट्रीय स्तरावरील मराठी भाषेतील निबंधासाठी तिसरा क्रमांक मिळाला आहे. पारितोषिक म्हणून तिने प्रशिस्तीपत्रासह लॅपटॉपचे बक्षिस पटकाविले आहे. या यशासाठी तिचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.  

00000000
राष्ट्र  उभारणीत रचनात्मक योगदानासाठी
तरुणांनी कटीबद्ध रहावे - पालकमंत्री खोतकर
प्रजासत्ताकदिनाचा मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा दिमाखदार समारंभ

नांदेड, दि. 26 :- राष्ट्र आणि राज्याच्या सकारात्मक आणि रचनात्मक उभारणीसाठी कटीबद्ध व्हावे लागेल असे सांगतानाच त्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणांची शक्ती यांचा समन्वय साधणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी आज येथे केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात ते शुभेच्छापर संदेशात बोलत होते.

पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या समारंभात पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शानदार संचलन आणि पोलीस दलाच्या जलद कृती दलाच्या थरारक प्रात्यक्षिकांमुळे समारंभ दिमाखदार झाला. समारंभास जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मंगलाताई गुंडले, महापौर शैलजा स्वामी, आमदार हेमंत पाटील, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींची तसेच व्यासपीठावर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांची उपस्थिती होती.
शुभेच्छापर संदेशात बोलताना पालकमंत्री खोतकर पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात, पुढच्या पिढ्यांमध्ये राष्ट्राभिमान द्विगणीत होईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील. राष्ट्र आणि राज्याची वाटचाल प्रगतशील आहे. या वाटचालीत तरुण होतकरूंची संख्या बलस्थान आहे. त्यामुळे या तरुण लोकसंख्येचा आपल्याला खुबीने आणि प्रभावशाली उपयोग करावा लागेल. तरुणांच्या शक्तींचा वापर सकारात्मक दृष्टीने करावा लागेल. जुन्या जाणत्यांचा अभ्यास आणि नव तरुणाईचा जोष यांची सांगड घालणे आवश्यक आहे. यासाठी तरुणांनाही आव्हानांना गवसणी घालावी लागेल. नव तंत्रज्ज्ञान आत्मसात करतानाच, राष्ट्राच्या-राज्याच्या विकासासाठी शिक्षण-संशोधनाच्या क्षेत्रांना पादाक्रांत करावे लागेल.
मनन-चिंतन आणि मनगटाच्या बळावर या देशाच्या विकासात भर घालण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी जग ते स्थानिक पातळीवरील परिस्थितीचे भान राखून सकारात्मक आणि रचनात्मक उभारणीसाठी कटीबद्ध व्हावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री खोतकर यांनी यांनी उपस्थित जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांच्याशी संवाद साधून त्यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशीही हितगूज केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे आणि पोलीस निरीक्षक शामराव राठोड यांच्या नेतृत्वात  विविध दलांनी शानदार संचलनाने मानवंदनाही दिली. या संचलनात मुदखेडच्या केंद्रीय राखीव पोलीस दल, हिंगोलीतील राज्य राखीव पोलीस दल, नांदेड पोलिसांचे जलद कृती दल (क्युआरटी), सशस्त्र पोलीस पथक, नांदेड पोलीस मुख्यालयाचे पथक तसेच नांदेडचे सशस्त्र महिला व सशस्त्र पोलीसांचे पथक, शहर वाहतूक शाखा, नांदेड, गृह रक्षक दलाचे महिलांचे व पुरूषांचे पथक, नांदेड महापालिकेचे अग्नीशमन दल पथक, यशवंत महाविद्यालयाचे राष्ट्रीच छात्रसेनेचे पथक, महात्मा फुले हायस्कुलचे मुलांचे व मुलींचे स्काऊट गाईड पथक, ग्यानमाता विद्यालय, पोतदार विद्यालय, नागार्जूना हायस्कुल, ऑक्सफोर्ड विद्यालयांच्या या चार शाळांतून आलेले मुला व मुलींचे पथक, पोलीस वाद्यवृंद पथक, जलद कृती दलाच्या बुलेटस्वारांचे पथक, सिमा या श्वानासह असलेले पथक, बॅाम्ब शोधक व नाशक पथक, मार्कस मॅन, न्याय वैधक शाळेचे पथक, वज्र वाहन, अग्नीशमन दलाचे बुलेटस्वारांचे पथक यांनी शानदार संचलन केले. या संचलनात वन विभागाच्या जलद सुटका पथक, सामाजिक वनीकरण विभागाची हरितसेना, तसेच 108 रुग्णवाहिकेचे पथक यांनी चित्ररथाद्वारे सहभाग घेतला.  
यावेळी पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते स्काऊट गाईडसाठीचे राष्ट्रपती महोदयांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ स्वप्नील भंगाळे (राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड), सैलीनी शेख, सागर बोरगावे, पवन पटणे ( सर्व बसवेश्र्वर विद्यालय, फुलवळ, ता. कंधार ), शारदा करेवार ( महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेकापूर, ता. कंधार ) यांना प्रदान करण्यात आले. यावेळी नांदेड पोलिस दलाच्यावतीने कराटेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.  विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत, डंबेल्स, घुंगर काठी, लेझीम, यांची प्रात्यक्षिके सादर केली. नांदेडच्या जलद कृती दलाच्यावतीनेही अपहरणातील सुटकेवर आधारीत चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते वन विभाग, नांदेड तहसीलच्या पुरवठा विभाग, पशूसंवर्धन विभाग तसेच रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या प्रदर्शन दालनांचेही उद्घाटन करण्यात आले. समारंभाचे व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचलन केले. समारंभास नांदेड शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरीकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000000
कुष्ठरोगाविषयी आज ग्रामसभेचे आयोजन
नांदेड दि. 25 :-  राज्य शासनाच्या सूचनेनुसार सोमवार 30 जानेवारी 2017 रोजी होणारी कुष्ठरोग विषयी ग्रामसभा रद्द करण्यात आली आहे. ही ग्रामसभा आज गुरुवार 26 जानेवारी 2017 रोजीच्या ग्रामसभेत घेण्यात यावी असे कळविण्यात आले आहे. याची सर्व ग्रामसेवक, मुख्याध्यापक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी केले आहे.

000000
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड दि. 25 :-  मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा शुक्रवार 27 जानेवारी 2017 च्या 6 वाजेपासून ते रविवार 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

000000
प्रजासत्ताक दिनानिमित्त आज
पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 25 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार 26 जानेवारी 2017 रोजी वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पूर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...