Thursday, January 23, 2025

वृत्त क्र.  93

दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना  

नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात आले आहे की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉलतिकिट) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या परीक्षेची प्रवेशपत्रे (हॉलतिकिट) ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवार 20 जानेवारी पासून Admit Card या लिंकव्दारे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे. 

ऑनलाईन प्रवेशपत्रे (हॉलतिकिट) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ. 10 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र (हॉलतिकिट) ऑनलाईन पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. 

ज्या आवेदनपत्रांना Paid असे Status प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेशपत्रे Paid Status Admit Card" या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व Extra Seat No विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे Extra Seat No Admit Card या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. 

डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव, आईचे नाव, जन्मतारीख, जन्म ठिकाण अशा दुरूस्त्या असल्यास सदर दुरुस्त्या ऑनलाईन पध्दतीने करावयाच्या असून त्याकरिता Application Correction ही लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विहित दुरूस्ती शुल्क भरून दुरूस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात याव्यात व विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर Correction Admit Card या लिंकव्दारे सुधारित Admit Card उपलब्ध होतील. विषय, माध्यम बदल असल्यास प्रचलित पध्दतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरूस्त्या करण्यात याव्यात. 

ज्या आवेदनपत्रांना Paid" असे Status प्राप्त झाले नाही अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे Status Update होवून "Late Paid Status Admit Card" या Option द्वारे त्यांची प्रवेशपत्र उपलब्ध होतील. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यायचे आहे. 

फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणा-या इ. 10 वी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळा यांनी याबाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी, असे आवाहन देविदास कुलाळ सचिव राज्यमंडळ पुणे यांनी केले आहे.

0000

 

 वृत्त क्र.  92

फिरत्या वाहनावरील दुकानासाठी

दिव्यांगांना अर्ज करण्याची संधी 

नांदेड, दि. 23 जानेवारी :- हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज गुरुवार 6 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मागविण्यात आली आहेत. या अर्जासाठी https://register.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

 योजनेचा उद्देश

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीला चालना मिळावी. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन व्हावे. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा आहे. 

सन 2024-25 साठी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याची योजना लागु करण्यासाठी शासन निर्णय 10 जून 2019 नुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. यांच्यास्तरावरुन सुरू आहे. राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदाराची नाव नोंदणी (अर्ज करण्यासाठी) पोर्टल 22 जानेवारी 2025 रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्र.  91

लघु पाटबंधारे योजनेची सातवी प्रगणना

तर जलसाठ्यांच्या दुसऱ्या प्रगणनेचा कार्यक्रम 

कार्यरत प्रगणकांची माहिती सादर करण्याचे आवाहन  

नांदेड दि. 23 जानेवारी :- केंद्र शासनाकडून राष्ट्रव्यापी लघुसिंचन योजनांची (0-2000 हेक्टर सिंचन क्षमता) सातवी प्रगणना व जलसाठ्यांची दुसरी प्रगणना करण्यात येत आहे. यात पूर्ण झालेल्या भूपृष्ठाखालील, भूपृष्ठावरील, नागरी आणि ग्रामीण भागातील जलसाठे, कृषि व मृदसंधारण विभागाकडील तसेच व भूजल सर्वेक्षण यंत्रणेसंबंधित योजनांचा समावेश होणार आहे.

 याप्रगणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन निर्णयानुसार जिल्हा व तालुका स्तरावर संनियंत्रण पुढीलप्रमाणे समिती गठित करण्याचे आदेशीत केले आहे. 

यंत्रणेतील सर्व कार्यरत प्रगणक यांची सविस्तर माहिती प्राधान्याने जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा सदस्य सचिव (जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती- 7 वी प्रगणना) मृद व जलसंधारण विभाग नांदेड या कार्यालयास सादर करावी, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी ए. एस. कांबळे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 20 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षणातील सुचनेनुसार सदर कार्यक्रमास प्राधान्य देवून तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले आहेत.  

जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर सदस्य म्हणून महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी (पंचायत), जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता, जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद (ल.पा), जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, नगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासन अधिकारी, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग (ग्रामीण / नागरी) न.पा/न.प. म.न.पा, नांदेड आहेत. सदस्य सचिव म्हणून जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग हे राहतील.  

जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे कामे 

राज्यस्तरावरून आलेल्या सूचनांप्रमाणे जिल्हा व तालुकास्तरावर प्रगणनेच्या कामासाठी प्रगणकांच्या नेमणुका करणे. प्रगणनेची प्रपत्रे, सूचना संच वाटप करणे तसेच प्रगणनेचे क्षेत्रिय काम विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबत आदेश, सूचना मार्गदर्शन करणे. 

प्रगणनेसाठी नियुक्त केलेल्या प्रगणक, पर्यवेक्षकांचा जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आखल्याचे संनियंत्रण करणे.

प्रत्यक्ष क्षेत्रिय काम वेळेत सुरु करा, याचे पर्यवेक्षकाकडून सुयोग्य तपासणी करुन घेणे भरलेली पत्रके जमा करून घेणे याबाबत नित्रण करणे. 

तालुकास्तरीय तक्रारीचा आढावा घेणे व निराकरण करणेसाठी मार्गदर्शन करणे. प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे. सदरहू समितीच्या बैठकीचा इतिवृतांत व कामकाज आढावा वेळोवेळी महसूल विभागीय स्तरावरील संनियंत्रण समितीस व आयुक्त तथा राज्य प्रगणना आयुका कार्यालयास सादर करणे.  

तालुकास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तहसिलदार तर सदस्य म्हणून मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत, गटविकास अधिकारी, उपअभियंता जलसंपदा विभाग सर्व, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, (ल.पा.) जि.प., तालुका कृषी अधिकारी, उप अभियंता, पाणी पुरवठा विभाग (ग्रामीण / नागरी) न.पा/न.प./ म.न.पा, उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण अधिकारी उपविभाग हे सदस्य सचिव राहतील.  

तालुकास्तरीय समितीने करावयाची कामे

प्रगणकांच्या व पर्यवेक्षकांच्या नेमणुका करणे व सुचना पत्रक व प्रपत्रे वाटप करणे. प्रगणनेच्या कामाचे तालुकास्तरावर समन्वय ठेवणे. जलसंपदा/जलसंधारण/जि.प./ कृषी यांनी त्यांच्या प्रगणनेसाठी नियुक्ती केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक यांचा तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आखणे व त्यांचे संनियंत्रण करणे. प्रगणना 100 टक्के यशस्वी होईल यादृष्टीने प्रयत्न करणे. प्रत्यक्ष प्रगणना कालावधीमध्ये गणना सुरु झाल्याचे खात्री करणे. प्रगणक, पर्यवेक्षकांकडून सुयोग्य तपासणी होणे व भरलेलीपत्रके तालुकास्तरावर जमा करुन सनियंत्रण करणे. प्रगणना तक्रारीबाबतचा आढावा घेऊन निराकरण करणे या कामांचा यात समावेश आहे.

0000

 वृत्त क्र.  90 

प्रजासत्ताक दिनानिमित्त

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन

 

नांदेडदि. 23  जानेवारी :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार 26 जानेवारी 2025 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे.

 

 राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणदूग्धविकासअपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याहस्ते ध्वजवंदन होणार आहे. 

 

सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये,असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालयसंस्था,आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेतअसेही आवाहन करण्यात आले आहे. 

 

दरम्यानप्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रमसमारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावीअसेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

00000

 वृत्त क्र. 89  

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या  पात्र परिसरात कलम 144 

नांदेड, दि. 23 जानेवारी :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2025 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत. 

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 जानेवारी  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 फेब्रुवारी 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 

  वृत्त क्र. 88


राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन

 दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान

नांदेड दि. २३ जानेवारी :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे आज श्री. गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर १०.४५ ला आगमन झाले. लगेच ते ११ वाजता परभणीला नियोजित दौऱ्यावर रवाना झाले.​ आज 23 जानेवारीला  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे दीक्षांत समारंभ होत आहे. त्यासाठी ते नांदेड विमानतळावर आले होते. दुपारी ३ वाजता ते मुंबईला परत प्रयाण करणार आहेत.

विमानतळावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,आमदार डॉ. तुषार राठोड यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते.
​0000

 वृत्त क्र. 89

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे मुंबईकडे प्रस्थान

नांदेड दि. २३ जानेवारी :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज परभणी येथील कार्यक्रम आटपून दुपारी तीनच्या सुमारास मुंबईकडे प्रयाण केले.

सकाळी ११ वाजता त्यांचे परभणीच्या नियोजित दौऱ्यासाठी आगमन झाले होते
   
श्री. गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर निरोप देण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते.
000000











वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...