Wednesday, March 8, 2017

* लेख क्र. 5

मराठवाड्यातील तरुणांसाठी कौशल्य वृद्धी कार्यक्रम
मागील काही वर्षामध्ये कृषि क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञानामुळे अमुलाग्र बदल झाले आहेत. परिणामी कृषि क्षेत्रामध्ये बदलत्या तंत्रज्ञानानुरुप शेती व शेतीपुरक व्यवसाय, उद्योग यामध्ये कुशल मनुष्य बळाची मागणी वाढू लागली आहे. बदलणाऱ्या या तंत्रज्ञानाचा वापर अधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीपुरक उद्योग करुन अर्थार्जनाचे विविध पर्याय उपलब्ध करण्याच्यादृष्टिने शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या मुलांकरीता कृषिक्षेत्रात कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे व त्यामाध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी क्षेत्रातील शेती व शेतीपुरक असणाऱ्या उद्योग धंद्यासंदर्भातील कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याविषयी माहिती देणारा हा लेख...
राज्यातील मराठवाडा विभागाचे एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जवळपास 85 टक्के क्षेत्र हे लागवडीखाली क्षेत्र आहे. या लागवडीखालील क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्र हे आवर्षण व प्रवरण क्षेत्र असल्याने या भागातील शेतकरी हा कायमचा कोरडवाहू शेतीवर अवलंबून असतो. येथील शेतकऱ्यांना टंचाई, दुष्काळ, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. लोकसंख्येचा विचार केल्यास औरंगाबाद विभागातील ग्रामीण लोकसंख्या, विभागाच्या एकूण लोकसंख्येच्या 72.88 टक्के इतकी आहे. ग्रामीण भागातील बहुतांश लोक शेतीवरच अवलंबून आहेत. मराठवाड्यातील शेतीचा विचार करता कोरडवाहू शेतीमुळे येथील शेतकऱ्यांना वर्षभर रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. परिणामी अल्प उत्पन्नामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत होवून त्यांच्या जीवनमानाचा स्तर खालावला आहे.
राज्यात युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने 2 सप्टेंबर 2015 रोजी "प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान" राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था यांना राज्य पातळीवर "नोडल संस्था" म्हणून नियुक्त केले आहे. या निर्णयातील तरतुदीनुसार मराठवाडा विभागातील शेतकरी व त्यांच्या कुटुंबासाठी कृषि क्षेत्रातील शेती व शेतीस पुरक उद्योगधंद्याशी संबंधित कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेमार्फत तयार करण्यात आलेले अभ्यासक्रम तसेच शेती व शेती पुरक उद्योगधंद्याशी संबंधीत पुढील प्रमाणे कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी सर्वसाधारणपणे 8 हजार शेतकरी किंवा त्यांचे कुटुंबीय यांचेसाठी कौशल्यवृद्धीचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कृषी यांत्रिकीकरणाचे कौशल्य विकासाद्वारे प्रशिक्षण
मराठवाड्यात शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करुन देण्यासाठी व आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी उपयोगी असणाऱ्या शेती यंत्रणाची दुरुस्ती व निगा राखण्याबाबत येथील तरुणांना प्रशिक्षण देऊन कौशल्य बळ निर्माण करण्यात येणार आहे.
कृषी उत्पादन विक्रीसाठी "मोबाईल ॲप" विकसीत करणे
साधारणपणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्तभाव व बाजारपेठ मिळणे अत्यंत आवश्यक असते. ही बाब विचारात घेता शेतमालाला अधिकाधिक भाव कोणत्या बाजारपेठेत मिळू शकेल किंवा विविध बाजारपेठेमधील शेतमालाचा भाव किती आहे, इत्यादी सारख्या गोष्टी शेतकऱ्यांना मोबाईलवर एक चांगले मोबाईल ॲप विकसीत केल्यास त्यांना नक्की फायदा होईल. यासाठी कौशल्य विकासाद्वारे तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मृदा व संवर्धन व मृदा तपासणी
शेतीचे उत्पादन मुख्यत: शेत जमिनीतील मृदेवर अवलंबून असते. अधिक शेती उत्पादनासाठी मृदेचा कस व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील यादृष्टीने या भागातील तरुण व महिलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून मृदा संवर्धन निर्माण करण्यात येणार आहे.  
शेतीस पुरक जोड व्यवसायांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रोत्साहन
कौशल्य विकासाचा वापर करुन या भागात समृद्धी आणण्यासाठी शेतीला पुरक असे व्यवसाय जसे फुलांची शेती, रेशीम उत्पादन आणि प्रक्रिया, मधुमक्षिका पालन, डेअरी पदार्थाची निर्मिती व विक्री, कुक्कट पालन व शेळीपालन असे जोड व्यवसाय सुरु करण्याचे प्रशिक्षण कौशल्य विकासाच्या माध्यमातून देता येईल. यासाठी तरुणांना व महिलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्यामार्फत बीज भांडवल योजनेतून कर्ज देऊन लहान-लहान उद्योग उभे करता येणार आहेत.
शेत मालावर प्रक्रिया व पॅकेजिंगसाठी कौशल्य विकास विकसीत करणे
बहुतांश वेळा उत्पादित केलेला शेतमाला हा जास्त काळ टिकवून ठेवता येत नाही. त्यासाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण आणि महिलांना कोल्ड स्टोरेज टेक्निशियन व ग्रीन हाऊस टेक्निशियचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच उत्पादित केलेला शेतमाल हा आधिकाधिक आकर्षित पद्धतीने पॅकेजिंग करुन तो बाजारपेठेत कसा उपलब्ध करुन देता येईल, याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. ऊसापासून साखर अथवा गुळ तयार करताना ऊसाच्या टाकावून भागापासून तसेच कापसापासून सूत बनविण्याचे प्रक्रियेदरम्यान गोवऱ्या बनविण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना कुटुंबियांना देऊन स्वस्त इंधनाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. याशिवाय बेरोजगारांनाही रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल.
कृषी विद्यापिठांशी करार
राज्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे कृषी विद्यापीठ काम करीत असून त्यांचे सोबत करार  ( एम.ओ.यु.) करुन त्या विद्यापीठामध्ये मराठवाड्याचे तरुण युवक व महिला शेती व शेतीस पुरक असणाऱ्या उद्योगधंदाच्या अनुषंगाने कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी कृषी विद्यापिठामध्ये कौशल्य विकास केंद्र उपलब्ध करण्यात येणार आहेत.  
"व्हॅल्यू चेन" उभी करणे
मराठवाड्याच्या काही भागामध्ये कापूस आणि रेशीमचे काम परंपरागत पद्धतीने मोठ्या प्रमाणावर केले जाते. विशेषत: पैठणी साडी जी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. अशा व्यवसायाचे कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिला व तरुणींना नवीन डिझाईन व टेक्नोलॉजीचे प्रशिक्षण देऊन परंपरागत व्यवसायामधून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियमित "जॉब फेअर" आयोजित करणे
मराठवाड्यात हळू-हळू उद्योगाचा विकास होत असून याविषयाच्या संदर्भाने औरंगाबाद येथे औद्योगिक संस्था यांचेशी चर्चा झाली आहे. त्यांच्या सहकार्याने मराठवाड्यामध्ये स्मॉल स्कील उद्योगामध्ये तरुणांना रोजगार मिळण्यासाठी उद्योग संस्थांसोबत करार (एम.ओ.यु.) करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जेणेकरुन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
मराठवाड्यामध्ये महिला आणि मुलींना "स्कील सखी"च्या माध्यमातून प्रशिक्षण
"स्कील सखी"चा प्रयोग कौशल्य विभागाने यु.एन.डी.पी. यांच्या सहकार्याने नागपूरमध्ये केला असून तेथे जवळपास पाचशे स्कील सखी या नव्याने तरुण मुलींना प्रशिक्षण देऊन ही स्कील सखी त्या गावाच्या महिला व युवतीला त्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये कौशल्य प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देतात. हा प्रयोग मराठवाडयामध्ये केल्यास येथे सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्कील सखी या नव्याने तरुण महिला व मुलींना प्रशिक्षण देऊन प्रत्येक गावामध्ये स्कील सखी पाठवून महिलांना शेती किंवा शेतीसपुरक असणाऱ्या उद्योग धंद्याच्या अनुषंगाने कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.  
 संकलन -  काशिनाथ र. आरेवार ,
 जिल्हा माहिती कार्यालय , नांदेड

*********
महिला दिनानिमित्त गर्भलिंग निदान प्रतिबंधक
कायद्याबाबत कार्यशाळा संपन्न
नांदेड, दि. 8 :-  जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांच्या कार्यक्षेत्रातील तालुका सामुचीत प्राधिकारी तसेच नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रधारक यांची गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (पीसीपीएनडीटी) विषयक एक दिवसीय कार्यशाळा आज येथील अतिथी हॉटेल येथे पार पडली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठाता डॉ. काननबाला येळीकर होत्या.

यावेळी डॉ. येळीकर यांनी पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी परिणामकारक होण्यासाठी नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रधारकानी गर्भलिंग निदान न करण्याबाबत आवाहन केले.   
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.पी. कदम यांनी जिल्ह्यातील मुला-मुलींचे लिंगगुणोत्तर प्रमाणाबाबत माहिती दिली. डॉ.एच.आर.गुंटरकर यांनी नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रधारकानी पाळावयाच्या आचार संहितेबाबत मार्गदर्शन केले. डॉ. अन्सारी यांनी पीसीपीएनडीटी कायदची माहिती दिली. ॲड. पुजा राठोर यांनी पीसीपीएनडीटी कायदची गरज समाजावर होणारे परिणाम तसेच सोनोग्राफी केंद्रात ठेवायचे अभिलेखे एफफॉर्म याबाबत माहिती दिली. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. इंगळे, डॉ. साखरे, डॉ. वाघमारे यांनी संयोजन केले.

00000000
लोकराज्यचा महिलाशक्ती विशेषांक प्रकाशित
लोकराज्यतील यशकथा महिलांसाठी पथदर्शी
-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 8 : लोकराज्य मार्च 2017 च्या महिला विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे झाले. लोकराज्य मासिकातील योजना, कायदेविषयक माहितीसोबतच अंकातील विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांच्या यशकथा राज्यातील महिलांसाठी पथदर्शी ठरणा-या असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागातर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास तथा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित,महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता सिंघल, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, महिला व बालविकास आयुक्त लहुराज माळी, 'माविम'च्या व्यवस्थापकीय संचालिका इंद्रा मालो आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी, इंग्रजी व उर्दू भाषेत प्रकाशित झालेल्या या महिला विशेषांकात विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांच्या यशकथा, महिलांसाठीच्या विविध योजना, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा, महिलाविषयक कायदे यावरील लेखांचा समावेश करण्यात आला आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आज घडीला महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. या अंकात समाविष्ट करण्यात आलेल्या यशकथांच्या माध्यमातून महिलांचा सन्मान करण्याचा छोटासा प्रयत्न लोकराज्यने केला आहे. त्यासोबतच अंकात समाविष्ट करण्यात आलेली विविध योजनांची माहिती महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.
महालक्ष्मी सरस या प्रदर्शनात सहभागी झालेल्या बचतगटांच्या यशकथांचा अंकात समावेश आहे. या यशकथा महिलांना आर्थिक उन्नतीसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच राज्यमंत्री विद्या ठाकूर यांची अंकातील मुलाखत राज्यातील महिला सक्षमीकरणाची दिशा अधोरेखीत करणारी आहे. महिलांसाठीचे सुरक्षा ॲप, सायबर सुरक्षेविषयी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या महत्त्वपूर्ण कायद्यांविषयी माहिती या अंकात देण्यात आली आहे. महिलांसाठीच्या विविध योजना, धोरण आणि संधींचा माहितीपूर्ण खजिना असलेला हा अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.

000000
  मृदपरीक्षक ( मिनीलॅब ) पुरवठा योजनेसाठी
प्रस्ताव मागविले; 14 मार्च मुदत
नांदेड, दि. 8 :- राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्य व्यवस्थापन योजना 2016-17  अंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), कृषि चिकित्सालय, अशासकीय संस्था (NGO), शेतकरीगट यांना मृदपरिक्षक (मिनीलॅब) चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी मंगळवार 14 मार्च 2017 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी खासगी संस्था, लाभधारक यांना 16 तालुक्यासाठी 62 मृद परिक्षक (मिनीलॅब) चालविण्यासाठीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यासाठी मृदपरिक्षक (मिनीलॅब) च्या एकुण किंमतीच्या 60 टक्के किंवा जास्तीतजास्त 45 हजार रुपये प्रतिनग याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्य व्यवस्थापन योजना 2016-17  अंतर्गत खताच्या समतोल वापरास एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनास चालना मिळण्यासाठी मृद आरोग्य पत्रिका योजनेच्या माध्यमात शेतकऱ्यांना त्यांच्या शेत मिनीची मृद आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. यासाठी सन 2016-17 मध्ये मृदपरिक्षक (मिनीलॅब) च्या माध्यमातुन गावातच शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका उपलब्ध होण्यासाठी इच्छ संस्था, लाभधारक यांना मृद परिक्षकाचा (मिनीलॅब) अनुदानावर पुरवठा शासन करणार आहे. मिनीलॅबमार्फत एकुण 12 घटकांचे परिक्षण करता येते. मिनीलॅबचे  सर्व  साहित्य एका लहान पेटीमध्ये बसवलेले असते. ही मिनीलॅब भारतीय कृषि अनुसंधान परीषदेने संशोधीत केलेली आहे. अत्यंत उपयोगी अशी ही मिनीलॅब आहे.
जमीन आरोग्य पत्रिका योजनेअंतर्गत मृद परिक्षक (मिनीलॅब) चालविण्यासाठी जिल्ह्यातील संस्थेची निवड जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत करण्यात येईल. सर्वसाधारणपणे संस्थेने कृषिक्षेत्राशी निगडीत केलेले काम, संस्थेकडे ज्ज्ञ मनुष्यबळ, जागेची उपलब्धता, आर्थिक स्थिती, लेखा परिक्षण अहवाल आदी बाबीचा निवड करताना विचार करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या संस्थेवर संबंधीत तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी यांचे तांत्रिक प्रशासकीय नियंत्रण राहील. संस्थेसोबत पुढील पाच वर्ष मृद परिक्षक चालविण्याचा सामजस्य करारनामा संबंधीत संस्था जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्यात करण्यात येईल.
संस्थेची निवड करताना नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), कृषि चिकित्सालय, अशासकीय संस्था (NGO), शेतकरीगट असा प्राधान्यक्रम राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक संस्थांनी मंगळवार 14 मार्च 2017 पर्यंत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड या कार्यालयास संबंधितांनी अर्ज सादर करावेत. अधिक माहिती व तपशीलासाठी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000000
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा
महिला मतदार अभियानांतर्गत ओळखपत्रांचेही वितरण
नांदेड, दि. 8 :-  जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, आरोग्य शिबीर, विविध स्पर्धा तसेच महिला मतदार जागृती अभियानात नवमतदारांना मतदार ओळखपत्रांचे वितरण अशा संयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.


कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसिलदार किरण अंबेकर, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, सहायक पुरवठा अधिकारी मुगाजी काकडे यांच्यासह जिल्हा महसूल प्रशासनातील महिला अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलताना प्र. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, महिला या सबलाच आहेत. त्यांच्याकडे परिस्थितीवर मात करण्यासाठीची मोठी इच्छा शक्ती असते. त्यामुळेच त्या दैनंदिन जीवनात अनेक भुमिका बजावूनही त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होतात. महिलांच्या या शक्तीचे समाज सदृढ आणि राष्ट्राच्या विकासात नक्कीच मोठे योगदान आहे. याप्रसंगी श्री. पाटील यांनी महिला मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यात यावी. त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत , अशी अपेक्षाही व्यक्त केली.
सुरवातीला मीना सोलापुरे यांनी शक्तीगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती ढालकरी यांनी केले. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. वेणीकर यांचे समयोचित भाषण झाले. महिला मतदार जागृती अभियानांतर्गत नांदेड तहसील कार्यालयाकडून नोंदविण्यात आलेल्या नवमतदारांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचेही वाटप करण्यात आले.
यावेळी ॲड. छाया कुलकर्णी यांचे महिलाचे अधिकार व समस्यांबाबत व्याख्यानही झाले. कार्यक्रमात श्रीमती ढालकरी, तहसीलदार संतोषी देवकुळे, ज्योती पवार, नायब तहसीलदार उषा इजपवार, उर्मीला कुलकर्णी, यांच्यासह चंदक्रला यमलवाड, सोलापुरे, वंदना गवळी, अनुपमा मुधोळकर, अनुराधा सुरेवाड, रेणुका पांडे, स्वाती पेदेवाड, अनिता काळे, उषा कदम, वंदना यमलवाड यांचाही सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेचे पारितोषिक वितरणही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांच्या हस्ते झाले.
तत्पुर्वी प्र.जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या हस्ते महिला दिनानिमित्त ध्वजारोहणही करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कक्ष व अधिकारिणी कक्ष यांचेही उद्घाटन करण्यात आले. डॅा. ललिता सूसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीराचेही आयोजन करण्यात आले.

00000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...