Wednesday, March 8, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा
महिला मतदार अभियानांतर्गत ओळखपत्रांचेही वितरण
नांदेड, दि. 8 :-  जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, आरोग्य शिबीर, विविध स्पर्धा तसेच महिला मतदार जागृती अभियानात नवमतदारांना मतदार ओळखपत्रांचे वितरण अशा संयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.


कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसिलदार किरण अंबेकर, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, सहायक पुरवठा अधिकारी मुगाजी काकडे यांच्यासह जिल्हा महसूल प्रशासनातील महिला अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलताना प्र. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, महिला या सबलाच आहेत. त्यांच्याकडे परिस्थितीवर मात करण्यासाठीची मोठी इच्छा शक्ती असते. त्यामुळेच त्या दैनंदिन जीवनात अनेक भुमिका बजावूनही त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होतात. महिलांच्या या शक्तीचे समाज सदृढ आणि राष्ट्राच्या विकासात नक्कीच मोठे योगदान आहे. याप्रसंगी श्री. पाटील यांनी महिला मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यात यावी. त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत , अशी अपेक्षाही व्यक्त केली.
सुरवातीला मीना सोलापुरे यांनी शक्तीगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती ढालकरी यांनी केले. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. वेणीकर यांचे समयोचित भाषण झाले. महिला मतदार जागृती अभियानांतर्गत नांदेड तहसील कार्यालयाकडून नोंदविण्यात आलेल्या नवमतदारांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचेही वाटप करण्यात आले.
यावेळी ॲड. छाया कुलकर्णी यांचे महिलाचे अधिकार व समस्यांबाबत व्याख्यानही झाले. कार्यक्रमात श्रीमती ढालकरी, तहसीलदार संतोषी देवकुळे, ज्योती पवार, नायब तहसीलदार उषा इजपवार, उर्मीला कुलकर्णी, यांच्यासह चंदक्रला यमलवाड, सोलापुरे, वंदना गवळी, अनुपमा मुधोळकर, अनुराधा सुरेवाड, रेणुका पांडे, स्वाती पेदेवाड, अनिता काळे, उषा कदम, वंदना यमलवाड यांचाही सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेचे पारितोषिक वितरणही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांच्या हस्ते झाले.
तत्पुर्वी प्र.जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या हस्ते महिला दिनानिमित्त ध्वजारोहणही करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कक्ष व अधिकारिणी कक्ष यांचेही उद्घाटन करण्यात आले. डॅा. ललिता सूसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीराचेही आयोजन करण्यात आले.

00000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...